Thursday, 23 April 2020

चिकू पिकू वारली समाज लेख

वारली जनजातींमधील देवता-एक रंजक दालन
डाॅ.आर्या जोशी
आपल्या केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातच अनेक वर्ष जंगलात राहणारे,निसर्गाच्या सान्निध्यात जगणारे आपले बांधव आणि भगिनी आहेत.त्यांच्या स्वतःच्या प्रथा,परंपरा आणि जगण्याचे नियम आहेत.ते सर्व निसर्गाशीच जोडलेले आहेत.निसर्गाच्या अंगाखांद्यावर वाढणार्‍या या जनजातींना आपण ओळखतो "आदिवासी" या नावाने.
आपल्या महाराष्टातली एक प्रसिद्ध जनजाती म्हणजे वारली. वारली चित्रांमुळे हे नाव आपल्याला माहिती असतंच! काढायला सोपी अशी ही चित्र छोट्यांना आणि मोठ्यांनाही आवडतात. ही नुसती चित्र नसतात तर यात वारली आदिवासींच्या आयुष्याचं चित्रण केलेलं असतं.
यात एखादं झाड असतं,समूहाने नाचणारे तरुण - तरुणी दिसतात आणि त्यांच्या मध्यभागी तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविणारा कलाकारही दिसतो. वारल्यांचं घर,देऊळ आणि धान्याचं कोठार दिसतं तसं त्यांच्या अवती-भवतीचे प्राणी,पक्षीही दिसतात.
वारली आदिवासींचं जीवन निसर्गावर आधारलेलं असल्याने त्यांनी निसर्गातल्या शक्तींनाच सर्वश्रेष्ठ मानलं आहे.भारतीय संस्कृतीचे प्राचीन ग्रंथ असलेल्या ऋग्वेदातही अग्नी, उषा (पहाट), मरुत् (वारा),वरूण(पावसाची देवता) यांची प्रार्थना केलेली दिसते. तीच परंपरा वारली त्यांच्या भाबड्या आणि सरळ आयुष्यात जगताना दिसतात.
चला तर मग आज थोडी सैर करुन येऊया वारली जनजातींच्या निसर्ग देवतांच्या प्रदेशात...
हिरवा हा वारल्यांचा देव तर आपल्याही घरी येतोच दरवर्षी!आता तुम्ही म्हणाल की "हिरवा""???..हो...हिरव्यागार भातशेतीतून भक्ताच्या डोक्यावर पाटावर बसून घरी येणारा गणपतीबाप्पा! तो येतो तेव्हा सगळा परिसर हिरवाईत रंगलेला असतो भाद्रपद महिन्यात! त्यामुळे गणपतीलाही यांनी त्या रंगाचच नाव आदराने दिलं आहे!
वारली पिकवतात नाचणी आणि तांदूळ.ते तर त्यांचं मुख्य अन्न. आणि भातशेती म्हटली की ती पावसावर अवलंबून असणारच अर्थात. मग या पावसालाच त्यांनी देव मानलं आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे " पावशादेव".
ज्या जमिनीवर वारली समाज राहतो ती जमीन,भोवतीचा निसर्ग ही तर त्यांची आईच आहेत्यामुळे पृथ्वीला आई मानणं हे तर ओघाने आलंच. शेतीची देवता असणारी आणि पहिल्यांदा भूमीत बीज रोवणारी युवती हिची कथा वारली लोकसंस्कृतीत आदराचे स्थान बाळगून आहे.
जंगलात निसर्ग सान्निध्यात राहताना ऊन,पाऊस,वारे यांचा तर सतत सहवास आणि संपर्क. वादळीवारे काहीवेळा त्रासदायकही ठरू शकतात . त्यामुळे मग त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांनाही प्रार्थना केली जाते. या देवाला "वावदीवारन्' म्हटलं जातं. तर "ढगशारदेव" नावाने आकाशातले ढगही वंदनीय ठरतात.सर्व सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव वारली समाजात"ब्रह्मनदेव" म्हणून पूजला जातो. कोकणातही वाड्यावाड्यात आजही अशी ब्रह्मनदेवाची छोटी मंदिरं दिसतात.
पाणी हे जीवन असं आपण म्हणतो त्यामुळे पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्यालाही"नारनदेव" असं संबोधून त्याची प्रार्थनाही वारली करतात.पावसाचं पाणी साठवून ठेवणारे तलाव, जंगलातून वाहणारे झुळझुळ झरे हेसुद्धा यांचे देवच! झर्‍याला "जर्‍यादेव" तर तलावाला "बत्तीसपोह्या"म्हटलं जातं. या सर्व नावांचा संदर्भ वारलींच्या लोककथांमधे आढळून येतो.नदी ही तर जीवनदायिनीच."वरमादेव"म्हणून शुभकार्याच्या वेळेला नदीचं स्मरणही केलं जातं.
आकाशातले सूर्य, चंद्र हे ही मोकळ्या आभाळाखाली फिरणार्‍या वारल्यांचे देवच ! क्षितीजावर उठून दिसणारी शुक्राची चांदणी "सुकेशारदेव"म्हणून ओळखली जाते.
रामायण आणि महाभारतातील व्यक्तिरेखा आणि पूराणातील देवताही वारल्यांना पूजनीय आहेत. जुगनाथ आणि भर्जा हे दांपत्य म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी. याजोडीने राम,लक्ष्मण,सीता,मंदोदरी, रावण आणि पांडवसुद्धा वारली समाजाच्या धार्मिक आयुष्यात महत्वाचे आहेत. इतकच नाही तर तांदूळ साठवून ठेवण्याची कणगीसुद्धा त्यांना वंदनीय आहे. जंगलात ज्याचं भय वाटतं तो वाघोबासुद्धा यांच्या प्रार्थनेचा विषय आहे.
यातून तुमच्या लक्षात आलं असेलच की खुल्या निसर्गात जगणारे वारली आणि त्यांचे देव! देव म्हटलं की आपल्यासमोर मूर्ती, देऊळ,पूजा,नैवेद्य असं सगळं येतं.पण ज्यांच्या ज्यांच्यावर वारली समूहाचं जीवन अवलंबून आहे ती सर्व निसर्गाची रूपं आणि घरातल्या कोठरातली कणगीसुद्धा त्यांना पूजनीय आहे!
त्यातून आपण कशात "देवत्व" पाहतो हे या आदिम आणि काहीशा मागास समजल्या जाणार्‍या निसर्ग बांधवांकडून शिकण्यासारखं आहे.... हो ना?
डाॅ.आर्या जोशी

Wednesday, 1 April 2020

उजळलेलं आयुष्य

"अरे श्रीरंग,आता काय करणार तू?या अशा परिस्थितीत तुला पुढचे किमान तीन आठवडे सदानंदच्या घरीच रहावं लागणार आहे.तरी मी तुला सांगत होते की काही गरज नाही आहे जायची त्याच्या गावी उत्सव पहायला"
"अग आई हो हो हो.मी इथे मजेत आहे.तू अजिबात काळजी करू नकोस.सदाचं घर भरपूर मोठ्ठं आहे.पडवी,ओसरी,माजघर,स्वयंपाकघर,अंगण,परस सगळं काही सुरेख आहे.त्याची वाडीही किती सुबक आहे.सगळे आहेत इथे काळजी घ्यायला माझी"
"अरे पण या भयंकर साथीने जग हादरलय सगळं बाळा! कसं कळत नाही तुला"
"आई इथे गावातही लोक घरातच बसून आहेत.ग्रामपंचायतीतर्फे सरपंच सूचना देत आहेत.पोलिस फिरत आहेत."
"हॅलो हॅलो...
शेवटी फोन बंदच झाला.सदा आणि श्री काॅलेजमधले मित्र.सदाचं गाव कोकणात.आई बाबा मोठा दादा तिथे असत.सदा शिकायला पुण्यात होता.सदाच्या घराचं,शिमग्याचं वर्णन ऐकूनश्रीसुद्धा यावेळी हट्टाने त्याच्याबरोबर गावी गेला आणि एका जगाला हादरवून सोडणार्‍या आजाराने सगळं जग ठप्प झालं.
श्रीची आई आणि वडिल नक्कीच काळजीत पडले पण या आडवाटेवरच्या गावात आपण शहरापेक्षा अधिक सुखात आहोत असं सारखं श्री ला वाटत होतं.
" चला रे मुलांनो,जरा दोन खळ्यांची भाजावळ करूया. परवा नांगरट करूया. काय आता आठवडी बाजारही बंद आहे.तेव्हा जरा चार भाज्या लावूया.आपल्यालाही होतील आणि गावातही विकल्या जातीलच". सदाचे बाबा म्हणाले.
श्रीला सतत समजत होतं की मोठ्या शहरात सगळेजण घरात अक्षरशः कैद झालेत पण इथे मात्र आपल्याला वाडीत मस्त फिरायला मिळतय.नारळीपोफळीच्या थंड सावलीत मस्त गप्पा मारत दुपार कशी संपते ते ही कळत नाही.
सदाचे चार मित्र येऊन दोन दिवस क्रिकेटही खेळून गेले होते इथे.पण आता मात्र सगळ्यांनीच ठरवलं होतं की जरा आपापल्या घरीच राहूयात.ते सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
सदाच्या घराच्या पुढच्या सारवलेल्या पडवीत नाहीतर अंगणात चांदण्या मोजत रात्री दोघे गप्पा मारीत झोपत.
भल्या सकाळी किंबहुना पहाटेच कोंबडा आरवला की झोप चाळवली जाई. सदाचा दादा गोठ्यात म्हशींचं दूध काढायला जात असे. आह्निकं उरकून आलं की वहिनी गरम चहाऐवजी दुधाचे पेलेच देत असे पुढे.तेही चुलीवर तापवलेलं दूध.
"इथे दूध इतकं सुंदर आहे आणि भरपूर पीता येतं आहे आणि तिकडे लाॅकडाऊनमुळे दूधही मिळत नाही आहे रोज चहाला सुद्धा" श्रीचं म्हणणं ऐकून वहिनी हसली फक्त.
गावात असंच असत अहो.माझं माहेरही पलीकडेच आहे नदीच्या.आमच्याही घरीशेती,दुभतं आहे.कमी कशाचीच नाही.कष्ट मात्र खूप हं!।
हे झाल्यावर दररोज सदाचे वडिल,सदा आणि श्रीरंग किजू शोधायला बाहेर पडत असत. मोठमोठ्या टोपल्या भरून काजूखालचे काजू वेचून आणण्यात आणि गप्पात वेळ सरे.
मग घरी आल्यावर मऊ तांदळाची भाकरी,मऊ भात ,खिमट असं काहीतरी खाऊन मग थोडावेळ टीव्ही पाहणं.पण फारसं नाहीच.
सदाचे बाबा शेतात जात किंवा गोठास्वच्छ करत किंवा काही दुरुस्तीची कामं.एखादा गडी रोज येत होता कामाला.तो काजू सोलत असेनाहीतर एखाद्या मावशी आल्या तर सदाची आई त्यांना काही काम सांगत असे.हे सर्व अनुभवण्यातच श्री रमला होता. विहिरीवर जाऊन थंडगार पाण्याने अंघोळ आणि धमाल झाली की जेवणाची हाळी येई. सकाळी लवकर अंघोळ झाली तर परसात पाणचूल असे त्यावरच्या हंड्यातलं मस्त उकळतं पाणी मिळे.केळीच्या आडोशानेही अंघोळ करताना मजा येई.
फणस,काजू ,केळफूल अशी मस्त भाजी, भाकरी,आमटी भात कधी कुळथाची पिठी असं पोटभर जेऊन मग सुपारीच्या बागेत दुक्कल जाई.
" सदा इथे आयुष्य किती सुरळित सुरु आहे. जिथे उंबराही ओलांडता येत नाही आहे जगाला तिथे आपण मात्र मस्त भटकतोय"
"होय श्री.कारण आम्ही आमचं अंगण राखलय.शेती सांभाळली आहे.वाडी जिवंत ठेवली आहे.मी शिकायला आलो खरा पण जरा हाती पैसा आला की मी ही दादासारखाच इथेच राहणार आहे. आपली माणसं आणि आपली माती यासारखं सुख नाही रे".शहरात पैसा आहे पण इथे शांतता आणि समाधान आहे. तूच पाहतो आहेस ना की आपल्याला इथे कळतही नाही आहे की जगात केवढी उलथापालथ होते आहे.या मोकळ्या स्वच्छ हवेत श्वास घेणं किती सोपं आहे.
आपण संध्याकाळी वाडीत फिरतो.पुन्हा धार काढतो मी तेव्हाही तू येतोस. दादाची कामं सुरू असतातच दिवसभर.मिरीला पाणी दे. सुपारीची बाग स्वच्छ ठेव.
मोहोरावर ठेव आमराईत. तीनसांज कधी उतरते कळतही नाही.
संध्याकाळी निरांजनाच्या प्रकाशात उजळलेला आईचा चेहरा मला पहायला रोज आवडतो.आजी आजोबा होते तेव्हा तर मजा यायची.
माझी आत्या आणि काका दोघेही अमेरिकेत. पण इथे कधीच येत नाहीत.बालपण इथेच गेलं पण आता यावंसं वाटत नाही. पण आम्ही सुखी आहोत श्री.तू पाहतो आहेसच".
श्रीने मोबाईल पाहिला.आईला फोन करायला हवा होता.रेंज आली होती जरा. पण त्याला तेही नको वाटलं.आई बाबा तेच सांगणार.. आज इथे हे बंद.अमकीकडे इतके मृत्यू.तमकीकडे राजकीय चर्चा....
कदाचितसदाच्या आईने मन वाचलं असावं त्याचं."श्रीरंग.. अरे आई ही आई असते.काळजी करणारच.पण म्हणून तू टाळू नकोस त्यांना.तुला फिरून तिथेच जायचं आहे. पण इथल्या आठवणी मात्र कायम सोबत ठेव मनात.कधीही उदासवाणं वाटलं तर हक्काने ये हो इथे"....
श्रीला हे लोभसवाणं जीवन खरंच आवडलं मनापाहून.इथे सगळे आयुष्य "जगत" होते पण "धावत" नव्हते.आयुष्य जस आणि ज्या गतीने नेईल ती गती त्यांनी स्वीकारली होती आणि तो आनंद त्यांचं घरदार अंगण परस वाडी उजळून टाकत होता.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...