Wednesday, 26 February 2025
छावा
Saturday, 22 February 2025
अमृतकण वेचताना भाग ७
Friday, 21 February 2025
ज्याचा त्याचा महाकुंभ
Thursday, 20 February 2025
अमृतकण वेचताना भाग ५
प्रयागराजला उत्तम निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था होणे,संगमावर चांगल्याप्रकारे स्नान करायला मिळणे यासाठी एक ईश्वरी योजना निश्चितच होती.त्याने ICCS च्या माध्यमातून आम्ही महाकुंभला जावे अशी रचना केली ज्याबद्दल त्या ईश्वरीय चैतन्याची मी सर्वात प्रथम ऋणी आहे आणि त्यानंतर ICCS ला धन्यवाद!(माहेरपणच झालं की तुझं इथे असा माझ्या अहोंनी म्हणणं यातच सारं आलं!)
आमची व्यवस्था सेक्टर १८ येथे सुरभि शोध संस्थान यांच्या शिबिरात केली गेली होती.ICCS च्या सत्रासाठी मी परमार्थ निकेतन आश्रम (सेक्टर २४) येथे सर्व ICCS परिवारासह असताना माझे कुटुंबीय अतिशय चांगल्याप्रकारे सुरभि शोध संस्थानच्या व्यवस्थेचा अनुभव घेऊ शकले.
सुरभि शोध संस्थानची जी व्यवस्था आम्हाला मिळाली त्याविषयी लिहीणे आवश्यकच आहे कारण कोटींच्या कोटी संख्येने येणार्या जनसमुदायात आपल्याला इतकी उत्तम सोय लाभणे यामागे या संस्थेच्या योजनांचा व नियोजनाचा मोठ्ठा वाटा आहे ज्याबद्दल खरोखरीच नतमस्तक!
विविध भाविक इथे मोठ्या संख्येने येऊन प्रसादाचा लाभ घेत होते."यहाँ का खाना अच्छा होता है।" असंही मी काही अनोळखी भाविक महिलांकडून तिथेच बाहेरच्या बाजूला उभी असताना ऐकलं.
तंबूंमधे आम्हाला आठ महिलांची व्यवस्था होती व पुरुषांची वेगळी.
उगीचच इतकं सामान घेऊन गेलो असं वाटलं कारण उत्तम पलंग,त्यावर व्यवस्थित गादी,उशी,गादीवर घालायला चादर,वरून कव्हर लावलेली जाड मऊसूत दुलई,अंघोळ करायला मोठा पंचा,तोंड पुसायला छोटा टाॅवेल हे सारं त्या कीटमधे तिथे व्यवस्थित ठेवलेलं होतं.
मी स्वच्छतागृह शोधत बाहेर आले तर समजलं की इथे प्रत्येक खोलीला जोडूनच कमोड,बाथरूम,वाॉश बेसिन आणि हँड वाॅश,आरसा असं सगळं स्वच्छतापूर्वक उपलब्ध होतं.
उत्तम भोजनव्यवस्था,चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत! लेकीसाठी बरोबर गुळाच्या पोळ्या,घारगे असं नेलं होतं ते सारं तसंच परत आलं कारण तिथे छान गरमगरम भोजनाचे लाड होते.
१६ तारखेचा आमचा दिवस बराच पायी चालण्याचा व दिवसभराच्या सत्रांमुळे थकव्याचा झाला होता.आमच्या खोलीवर परत आल्यावर गरम चहा प्यायले.माझी आवडती मऊसर लुसलुशीत मुगाची खिचडी,त्यावर घ्यायला साजूक तूप,गरमगरम कढी,वांग्याची भाजी,पाकातली गरम बुंदी आणि तूप लावलेले फुलके! पिण्याच्या पाण्याची सोय तर होतीच!
देवाने आणखी किती कृपा करावी आपल्यावर?
संस्थेमार्फत असल्याने आमच्याकडून शुल्क नाही घेतले पण आपणही जाणीव ठेवून काही देणगी देऊन येतोच.इतकं पंचतारांकित सारं महाकुंभामधे मिळणं,त्यासाठी रचना बसवणं,हजारो हात त्याला लागणं, केवढी पूर्वतयारी इथे झाली असेल आणि अव्याहत इथे भंडारा सुरू आहे! हे मी केवळ मी जिथे राहिले तिथलं लिहीलं आहे पण अन्यत्रही अशा विविध व्यवस्था आपापल्या परीने सुरू होत्या.
परमार्थ निकेतनला गरम गरम बटाटेवडे सुंदरशा चटणीसह खायला मिळाले! त्याचाही फोटो काढून ठेवलाय.
या व्यवस्थांमुळे महाकुंभातल्या गर्दीतही सारं सुखावह झालं!या सार्या सहस्र हातांचे आम्ही ऋणी आहोत.
अमृतकण वेचताना भाग ६
माता भूमिः पुत्रो s हं पृथिव्याः। असं आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलं आहेच.हे केवळ भारतीय परंपरेतच आहे असं नाही तर जगभरातील विविध संस्कृती पृथ्वीला आपली माता मानतात आणि आपण सारेच तिची लेकरं आहोत अशी धारणा आपल्याला विभिन्न परंपरांमधेही दिसते.
जगापुढील विविध राजकीय,सामाजिक,पर्यावरणीय आव्हाने पेलण्यासाठी या एकत्वाची आज आपल्याला नितांत आवश्यकता आहे.
कराग्रे वसते लक्ष्मी ने आपल्या परंपरेत आपण दिवसाच्या सुरुवातीलाच पृथ्वीमातेची क्षमा मागतो व तिच्याप्रती आदर व्यक्त करतो.पंचमहाभूतांची उपासना युगानुयुगे आपण जपत आलेलो आहोतच किंबहुना आपल्या रोजच्या जगण्यातून आपण ते वजा करूच शकत नाही.आपल्या शरीरातही ही पाच तत्वे आहेतच की!
या सार्याचा समसमा संयोग म्हणजे KIVA Ritual.
ICCS ने या किवा कुंभमेळ्यात सहभाग घेतला आणि सामाईक चर्चासत्रात सहभागही घेतला.
परमार्थ निकेतन आश्रमातील एका मोकळ्या जागेत एक मोठा बर्यापैकी खोल खड्डा खणण्यात आला होता.ज्याच्या तीन दिशांना तीन वेदी तयार करून त्यावर काही प्रातिनिधीक उपास्य चित्रे ठेवण्यात आली होती. गोलाच्या मध्यभागीच्या वेदीवर अग्नी प्रज्वलित करण्यात आला होता.यासाठीही विविध संस्कृतींच्या प्रतिनिधींनी,पुरोहितांनी (महिला आणि पुरुष)आपापल्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला.या वेशभूषेलाही धर्माचरणाचा अर्थ जोडलेला आहेच.
प्रत्येक प्रतिनिधीने पुढे येऊन एकेक करून आपापल्या उपचार पद्धतींनी अग्नीची उपासना व प्रार्थना केली.यातील बर्याचशा पुरोहितांनी अप्रदक्षिण पद्धतीने अग्नीला वंदन केले ही विशेष जाणवलेली बाब होती.
तीन दिशांना स्थापन केलेल्या तीन वेदींपैकी मधल्या वेदीवर प्रत्येक संस्कृतीची धार्मिकी प्रतीके ठेवण्यात आली होती ज्यात कुठे पूजनीय मण्यांची माळ,कुठे दोर्यांचा क्रोशापासून केलेला चेंडू तर कुठे पक्ष्यांची पिसे असे वैविध्य दिसत होते.
पारंपरिक ड्रम,फ्लूट अशा वाद्यांच्या साथीने त्या त्या संस्कृतीची प्रातिनिधीक प्रार्थनागीते,मंत्र म्हटले जात होते व अग्नीला,पृथ्वीला,सूर्याला प्रार्थना केली जात होती.
सर्व elders सदस्यांनी शेवटी अग्नीभोवती एकमेकांचे हात धरून गोल प्रदक्षिणा केली.उपस्थित सदस्य आपले हात वर करून बोटे हालवीत पूजेमधे सहभागी होत होते.
या विशिष्ट विधीचे चित्रीकरण वा छायाचित्रण करण्याची परवानगी नसल्याने गुगलवर उपलब्ध फोटो संदर्भासह जोडते आहे.
संध्याकाळी एक चर्चासत्र संपन्न झाले ज्यामधे ICCS चे ईशान्य भारतातील प्रतिनिधी सहभागी झाले व निसर्गपूजनाच्या आपापल्या संकल्पना सर्वांनी मांडल्या.
आपण सर्वजण पाणी पितो,आपण सर्वजण श्वास घेताना हवेतला आॅक्सिजनच शरीरात घेतो..या सार्यामुळे आपण प्रेमाच्या आणि एकत्वाच्या धाग्यांनी बांधलेले आहोत आणि पर्यावरणाचा समतोल वैश्विक पातळीवर सांभाळण्यासाठी या स्नेहबंधाच्या सूत्रानेच सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील असे विचार सर्वांनीच मांडले.
ICCS चे घोषवाक्य Mitakuye Oyasin म्हणजे We are one असेच आहे.आपण कोणकोणत्या लौकिक आणि पारलौकिक पातळ्यांवर परस्परांशी जोडलेले आहोत हे लक्षात यायला लागले की भारत,ब्राझील,कैलंबिया असे भौगोलिक सीमांचे डोंगर कोसळून पडतात आणि वसुधैव कुटुंबकम् ची महती आपोआप लक्षात येते!
चला ही महती रोजच्या आचरणात जगण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यासाठी International Centre for Cultural Studies तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे.
अमृतकण वेचताना भाग ४
मावंदं#गंगापूजन#संगमस्नान#
हे तो तृप्तीचे तीर्थोदक#अमृतकण वेचताना# समारोप#
मी मनापासून आस्तिक आहे,ईश्वर,श्रद्धा,धारणा हे सर्व माझ्या जगण्याचे विषय आहेत कुटुंबात आणि समाजात.आपलं जगणं आधी कुटूंबातून अधोरेखित होतं आणि त्यानंतर त्याचं प्रतिबिंब समाजातही दिसायला लागतं.सुदैवाने माहेर,सासर,आणि मी जिथे अनेक वर्ष काम केलं ती प्रबोधिनी या सार्याच ठिकाणी माझ्यातली ही आस्था जपली गेली,फुलली,बहरली.पण व्यक्ती म्हणून मला या सार्या धारणांबद्दल कायमच कुतूहल वाटत राहिलं आहे,अजूनही वाटतं.
विविध ग्रंथांनी आपल्याला तीर्थयात्रा आणि त्यांचं महत्व विशद करून सांगितल.त्याचे विधी व अर्थवाद म्हणजे अमुक ठिकाणी अमुक केल्यास अमुक मिळेल असंही फल सांगितलं आणि ते करण्यास सर्व समाजाला प्रोत्साहित केलं.
या सार्याचा परिपाक असा समोर प्रत्यक्ष घडताना पाहणं हा एक दैवी योग असावा जो मी अनुभवला.तिथे ओझरत्या दिसलेल्या प्रत्येक माणसाबद्दल मला आदर आहे.
फक्त भारतीयच नव्हे तर अभारतीय सदस्यांनाही या सोहळ्याविषयी आकर्षण वाटण्याची आधुनिक पुराणे म्हणजे सोशल मीडिया! पूर्वी पारापारांवर बसून पुराणातील कथा विषद केल्या जायच्या! आज प्रत्येक मोबाईल तुम्हाला महाकुंभाची महती सांगतो आहे!
विविध घडामोडींनी चर्चेत राहिलेला महाकुंभ व त्याला गैरसोय सोसूनही किंबहुना ती गैरसोय आहे असं मनात पण येणार नाही अशा पद्धतीने लोक वावरत होते.आहे त्याचा स्वीकार करत संगमावर स्नान करीत होते.
मी डुबकी मारली नाही... इथे येऊनही कोरडीच राहिले??? मला त्या संगमावर स्वतःला बुडवून घेण्याचं आकर्षण नव्हतं... मला पहायची होती लोकं जी भाविकतेने त्या पाण्याशी स्वतःला एकरूप करत होती.कृतार्थतेचा भाव अनुभवत होती.
मी पाय बुडवले आणि तीनदा माझ्या डोक्यावर ते पाणी शिंपडून घेतलं... बस्स! माझ्यासाठी ते खूप होतं.. माझ्यापुरतं!
ओंजळीत पाणी घेऊन ते सोडलं.. माझे दिवंगत आई बाबा,सासूबाई,मावशीकाका,आजी आजोबा आणि माझ्या चार पायाच्या लेकरासाठी... या सार्यांचं असणं होतं म्हणून मी आज इथे उभी आहे या भावनेने सर्वांच्या आठवणीने व्याकुळ झाले... त्यांना मी काय देणार? संगमावरच्या तीर्थाची एक ओंजळ फक्त.....
या सार्यांनी माझ्या ओंजळीत जे घातलं आहे ते या सार्यापेक्षा कितीतरी पटीत अधिक आहे.
पण सर्वांसारखीच माझीही श्रद्धा आहे की १४४ वर्षांनी येणारा हा योग मलाही साधायचा होता.इथे येणारी प्रत्येक व्यक्ती वेगळा अनुभव घेते आहे भौतिक सुविधांबाबत! पण प्रत्येकाचे संगमस्नान प्रत्येकालाच आतून काहीतरी सकारात्मक देऊन गेलं आहे.... मला जे गवसलं ते हेच की एकाजागी बसून ग्रंथ वाचून तुम्हाला कणभर मिळेल...पण त्याचं प्रतिबिंब अनुभविण्यासाठी समाजात उतरावं लागेल...त्याचा एक भाग होऊन तुम्हाला कान,डोळे उघडे ठेवून वावरावं लागेल...मग हाती येईल ते चार दोन श्लोकांपलीकडचं आहे..... या सार्याचंच एक पुराण होईल... ते आपल्यालाच मिळून ललिहावं लागणार आहे... जनभाषेत... आणि देववाणीत.
पुढच्या पिढ्यांसाठी...त्याच्याही पुढच्या पिढ्यांसाठी कारण माझी भारतीय सनातन परंपरा कायमच अक्षुण्ण होती,आहे,राहील!!!
अमृतकण वेचताना भाग ३
ज्या व्यक्तीला जत्रा फिरायला आवडत असेल,गर्दीचा भाग होऊन त्या गर्दीचा आनंद घ्यावासा वाटत असेल आणि हरतर्हेची माणसं वाचायची असतील तर महाकुंभ ही महापर्वणीच!
लाखोंचा महासागर उसळत असतो.विविध सेक्टर्समधून माणसे इतस्ततः पसरत असतात.
प्रयागराजला आत पोहोचल्यावर आमच्या इच्छित सेक्टरला पोहोचेपर्यंंत बराच उशीर झाला होता.प्रयागराजपासून १० किंमी.अंतरावर आम्ही सध्याकाळी ६.३० वाजता होतो आणि इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत रात्रीचे ११.३० झाले.हा सर्व प्रवास चारचाकीनेच झाला आहे.
पोलिसांच्या रचना गर्दीचा अंदाज घेऊन बदलत राहतात आणि सर्वत्र बोर्ड असले तरी तुम्ही पहिली चार वळणे हमखास चुकता.एक मोठ्ठी साडी किंवा ओढणी अथवा दोरी धरून माणसांचे गट चालत राहतात.लहान मुले हातात किंवा पाठीवर बसलेली,वृद्ध माणसेही मुलीचा,सूनेचा पदर किंवा मुलाच्या,जावयाच्या,भावाच्या खांद्यावरील पंचा पकडूनच चाललेली. खरा भारत कुंभात पहायला मिळाला आणि आपण ईश्वरकृपेने आणि आईवडिलांच्या,घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने किती privileged आहोत हे इथे पावलोपावली जाणवले.एका पायाला सायटिका आणि दुसर्या पायाच्या गुडघ्याचे ACL Tear operation झाल्याने मला वीस पंचवीस कि.मी.चालणे शक्य झाले नसते.मनाची तयारी असली तरी शरीरही चालायला हवं नं! पण आम्ही रीक्षा,दुचाकी आणि आमची चारचाकी असे काही अंतर फिरलो.त्यामुळे पंधरा कि.मी.पेक्षा अधिक आतला टप्पा मी किमान आनंदाने चालू शकले.
आम्ही नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग व तिथून भेडाघाटला पोहोचलो..भेडाघाट राॅक मार्बल्स,धुवाँधार धबधबा पाहिला.तिथेही धुवाँधारपाशी लोक भक्तिभावाने नर्मदेत स्नान करीत होतीच.नग्नतेच्या आपल्या संकल्पना इथे बोथट होतात! मला नाही आवडत पहायला पण लोकांना अशा संकल्पना मनाला शिवूनही जात नाहीत हे जाणवलंच!
भेडाघाटहून प्रयागला येताना वाटेत खाण्याचे तीन चारचप्रदार्थ मिळणारे धाबे ठिकठिकाणी आहेत. मध्य प्रदेश शासनाच्या हाॅटेलच्या चेन्सपण आहेत.पण सर्वत्र व्यवस्थांवर ताण आलेले आहेत.रोटी आणि दालफ्राय,क्वचित पनीरची भाजी ,नाश्त्याला पोहे,सामोसे,कचोरी आणि छोट्या तात्पुरत्या दुकानांवरचा ताजा उकळून ओतलेला कळकट पातेल्यातला चहा!!! धम्माल!
रीवानंतर प्रयागच्या अलीकडे ४० कि.मी.अंतरावर या रस्त्यावरून येणार्या मोठ्या बसेस थांबतात.इथून टूर ट्रॅव्हल्सवाले छोट्या रीक्षा वा गाड्यांमधून व्यक्तींना पुढे नेतात.ग्रामीण भारत मात्र डोक्यावर आपलं सामान उचलून चालायलाच सुरुवात करतो.मी या भक्तीपुढे नतमस्तक आहे.
प्रयागला आत पोहोचणे हे पोलिसांच्या रचनांवर अवलंबून आहे. आधीच्या पौलिसाला माहीती नसते दोन चोक सोडून काय असेल! पण आपण जात रहायचे विचारत विचारत.यात्रेकरूंमधून वाट काढीत पुलावरून चारचाकी चालविणे ही कसरत! यातच आम्हाला जशी परवानगी मिळत गेली तसे आम्ही शेवटपर्यंत पुढे जात राहिलो.आतल्या आत झालेल्या गदारोळात साडेतीन तास अशा प्रदक्षिणा घालत राहणे हा अनुभव खास आहे.नंतर सेक्टरच्या रस्त्याला लागल्यावर आपण हुश्श करतो कारण गुगल मावशी एकाचवेळी लाखो भाचरांना दाशा देताना स्वतःच पागल होऊन जाते व स्वतःचे केस उपटायला लागते आणि पोलिसमामा तुम्हाला चौथीकडूनच जायला सांगत असतात!पुढे जाता येत नाही आणि मागे डाता येत नाही!अशीही एक अवस्था येते ज्यात आपण अभिमन्यू होतो.पण यमुना ब्रीज,गंगा ब्रीज चारचाकीतून पार करायला मिळाल्याच्या आनंदात आपल्याला खाली वसवलेली प्रयाछराज नगरी व सुंदर दिव्यांची आरास धिसते व यूथे आल्याची कृतार्थता मनात दाटते! रात्रीच्या अंधारात त्या दिसत नाहीत पण अस्तित्व जाणवते.नकळत हात जोडले जातात त्यांच्या अस्तित्वाला व महाकुंभ रचनाकारांनासुद्धा!
अमृतकण वेचताना भाग २
अमृतकण वेचताना#भाग २
प्रयागराज# दिवस दुसरा#
सेक्टर अठरा मधून सेक्टर चोवीसला जाणे,मधे पूल पार करुन पलीकडे जाणे,यासाठी विविध वाहने वापरणे आणि भरपूर पायी चालणे#हा कुंभ#
बाजूला थाटलेली दुकानं,भिक्षा मागणारे भिक्षेकरी,कल्पवासी भाविक,विविध आखाड्यांचे तंबू असं सारं केवळ नजरेन टिपत टिपत मी पुढे जात राहिले.मोबाईल पर्समधे असूमही फोटो काढण्याचा मैह मी निश्चितच टाळला याचे कारण गर्दीतून जाताना आपल्या गतातील सदस्यांशी होणारी आपली चुकामूक टाळणे! अशी चुकामूक झालीच असती तर किसी चौराहेपर"पुनासे आर्यादेवी,आर्याकुमारी आप यहाँ पोल के पास आ जाईए वगैरे आवाज ऐकू आले असते.घरची मंडळी वेगळ्या संगमावर स्नानासाठी गेली पण आम्ही ICCS ची मंडळी पहाटे साडेपाचलाच मार्गस्थ झालो होतो.आधी मस्तपैकी टेंपो,नंतर चालत,मग और आगे,और आगे करत करत पूल ओलांडून पलीकडच्या तीरावर, तिथून बरेचसे अंतर रीक्षा,आणि नंतर चेंगराचेंगरी काहीशी जवळून पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव.चारचाकींना जायला वाट मिळत होती पण लाखो माणसे संगमावर जायच्या रस्त्यांवर अडकत होती. आम्ही चार महिलांनी ओढणी पकडून त्या गर्दीतून पुढे वाट काढली.
समोर संगमावर नावा धावत होत्या.पायी चालताना पुलावरून दिसणारे संगमाचे दोन्ही तट,तिथे स्नान करणारी,डुबक्या घेणारी भाविक मंडळी,नदीतल्या पक्ष्यांचे थवे या सार्यात मला फक्त माझं चालणं दिसत होतं.आमचा कार्यक्रम स्नानांतर दुसर्या ठिकाणी असल्याने हे सामान थोडं न्यायला लागलं पण चालण्याची गती कमी पडत होती.मग कधी संदीपजी,कधी रविशंकरजी यांनी माझ्या हातातला भार हलका करत मला मोकळीक दिली,
का येतात माणसं इतक्या गर्दीत? कुंभनगरीत असणार्या व्यवस्था आता हळूहळू कमी होत आहेत कारण आखाडे बंद होत आहेत.तथापि माणसं अजूनही येतच आहेत.इतकी गर्दी आत प्रयागराजमधेही आहे की आज तर परिचितांचे नातेवाईक बारा तास त्या तिथेच गोल गोल फिरत राहिली होती!!
संध्याकाळी कार्यक्रम आटोपून पुन्हा पायाची,रीक्षाची,आणि दुचाकीची कसरत करीत आलो.पोलिस कधीही रस्ते अचानक बंद कहतात! त्यांना व्यवस्था सांभाळायच्या असतात पण भाविकांना त्या बदलांचे त्रास होत आहेत.आम्ही दुचाकी घेतली व दहा कि.मी.अंतर आलो आमच्या तंबूंपर्यंत पण सार्यांना नाही शक्य होत!
लिहीण्याबद्दल खूप आहे पण दोन दिवसातलं अनुभवलेलं इतकं एकजिनसी झालं आहे मनात की ते कप्पे करुन आखून रेखून लिहिणं मलाही जमल असं वाटत नाही.
महाकुंभाचंही तसंच झालं आहे त्यामुळे माझंही तसंच होणं स्वाभाविकच आहे.
उद्या पुढच्या लेखासह भेटते!
Wednesday, 19 February 2025
नर्मदे हर...हर नर्मदे
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली....
तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली.....
क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे विभ्रम दाखवत ती येऊ घातलेल्या रात्रीलाही मोहात पाडत राहिली...
नदीच्या प्रवाहाच्या मध्यभागी असलेल्या शिवमंदिरातल्या आरतीमधे ती ही नतमस्तक झाली आणि चिमुकल्या मंदिरातल्या चिमुकल्या परिसरात चेतविलेले छोटे छोटे दीप तिचं सौंदर्य अधिक खुलवत राहिले...भक्तिभावाने हात जोडले जण्यापेक्षा ते दृश्य हृदयात कोरून ठेवण्यातच मी ही रमले...
नावेतल्या प्रवासात चुबूक चुबूक आवाजाच्या साथीने डहुळणारे पाणी त्या संध्येच्या गूढ वातावरणाला अधिक गहिरं करीत होते...कुणीही कुणाशी काहीही बोलत नव्हतं...
आकाशही आता हळूहळू सजू लागलं.एकेक चांदणी येऊन सरत्या संध्येचा निरोप घेत होती आणि येणार्या रात्रीचे स्वागत करत होती...
दूर कुठेतरी पक्ष्यांचा एक चुकार थवा अजूनही आकाशात रेंगाळत होता...
लांबवर दिसत होता दिव्यांनी उजळलेला,इतिहासाच्या पाऊलखुणांनी सजलेला महेश्वरचा अहिल्याबाईंचा राजवाडा व घाट,मंदिरं....
दूरवर पाहिलं की असंख्य ज्योती आपलं रूप पाण्यात न्याहाळत स्वतःच्या तालातच डोलत होत्या.... एक,दहा,शंभर,हजार.... नाव थोडी जवळून गेल्यावर दिसलं की चौकोनी आकाराच्या छोट्या द्रोणांमधे पहुडलेल्या त्या चिमुकल्या ज्योती एकत्र येऊन संपूर्ण नदीचं पात्र झगमगून टाकत होत्या...
सहस्रधारा आपल्याच नादात रोरावत,कुणाचीही फिकीर न करता,आपला आब सांभाळत पुढे जात होत्या.... त्यांचा धाकही वाटला त्या कातर छायेत...
तिच्याकाठी निवांत बसून अशीच एक संध्याकाळ अनुभवावी आणि मनातली हुरहुर तिच्यातच रिती करावी...असं खूप वर्ष मनात होतं...ते तिने असं जुळवून आणलं.....
आठवला तो...आपल्या भाळीची ती ठुसठुसती जखम शांत करायला...तेल मागत फिरणारा...तिच्याच काठी..कित्येक युगे..
त्या संध्याकाळी माझीही एक नव्हे तर असंख्य भळभळत्या जखमा मलाच सामोर्या आल्या..... मी नाही कुणाकडे काही मागत फिरले त्यांचा दाह कमी करायला कारण माझ्या अंतरंगात डोकावून,आपल्या शीतल पवित्र जलाची फुंकर तिने त्या करकरीत तीनसांजेला माझ्यावर हळुवार घातली...
अनंत जन्मांचं तिचं माझं ऋण काल तिने फेडलं आणि माझ्या असंख्य जखमांना तिने शांत केलं... तिच्या जलाने,तिच्या पात्रात डुलत राहिलेल्या सहस्र तेजस्वी ज्योतींनी....
Friday, 14 February 2025
अमृतकण वेचताना भाग १
नमामि गंगे!
महाकुंभ हे एक स्वप्न आहे...भारतीय परंपरा व संस्कृतीला पडलेलं... आम्ही तर या परंपरेचे पाईक त्यामुळे हा विषय जिव्हाळ्याचा असावा यात तीळमात्र शंका नाही.त्यातून आमचे International Center for Cultural Studies म्हणजे जागतिक प्राचीन परंपरांचा वारसा सांभाळण्याचं वसा घेतलेलं केंद्र! आपण सर्व एक आहोत ही घोषणा देतच हे सर्व काम सुरु आहे.त्यामुळे १४४ वर्षांनी येणारी ही महाकुंभाची पर्वणी याचि देही याचि डोळा अनुभविण्याची व संस्कृती पूजनाची संधी अनेकांनी व्यक्तिशः घेतली तर अनेक संस्थांनीही या संधीचं सोनं केलं आहे.त्यात ICCS सुद्धा सहभागी होत आहे.
त्रिवेणी संगमावरील स्नान,पूर्वजांचे स्मरण,देवी-देवतांचे दर्शन,साधूंच्या आखाड्यांची प्राचीनता व इतिहास,हौशे,नवशे,गवशे अशा सगळ्यांचाच हा मेळा!
मनातसुद्धा नव्हतं आलं की या गर्दीचा भाग होऊन जावं! पण तरीही ICCS च्या बैठकीत समजलं की इथे एक चर्चासत्र होणार आहे ज्यात संस्थेचा सहभाग असेल अन्य समविचारी संस्थांसह.मग आम्हीही तयारी सुरू केली.
विमानाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर,रेल्वेची आरक्षणं आयत्यावेळी मिळणं दुर्लभ! मग आमच्या अहोंनी ठरवलं की आपली जीप घेऊनच हा सारा प्रवास करूयात!
आणि आम्ही अगदी कमी कालावधीत जमेल तशी तयारी करुन निघालो आहोत... आज रात्री भेडाघाट...
समृद्धी महामार्ग हे वरदानच त्यामुळ प्रवास सोपा झाला.आशुतोष आणि आमची मैत्रीण स्वाती या दोन चक्रधरांनी वाहनाचं सारथ्य केलं आहे आज आणि मी निवांत बसून ,बदलणारा प्रदेश,माणसं,परिसर आणि 'फुलले पलाश रानी'चा आनंद डोळ्यात आणि मनात भरून घेत होते.
मध्य प्रदेशात जसा आपण प्रवेश करतो तसं ठिकठिकाणी महाकुंभभक्तांसाठी फलक लावून सोयी करण्यात आलेल्या दिसल्या.महाकुंभ संपण्याचे दिवस जवळ येत आहेत तरीही लोकांचा उत्साह अफाट आहे.गाड्या भरभरून माणसांचे जत्थेच्या जत्थे येथे येत आहेत.
पुराणांमधे वाचलेला तो समुद्रमंथनाचा प्रसंग, ते देव,ते असुर आणि हाती आलेला अमृताचा कुंभ दुष्ट प्रवृत्तींपासून वाचवत भरारी घेतलेला तो वैनतेय... या सार्यांची प्रतिरूपं उद्या तिथे पोहोचून पाहण्यास मी उत्सुक आहे...
डाॅ.आर्या जोशी
Monday, 3 February 2025
सहजमार्ग आध्यात्मिक शिबिर
झालिया दर्शना# सहजमार्ग परिवाराचे एकात्म दर्शन#हार्टफुलनेस ध्यान शिबिर
50,000 (किमान पन्नास हजार) अभ्यासींच्या उपस्थितीत साजरा झालेला हार्टफुलनेस परिवाराचा भंडारा म्हणजे उत्सव.आदिगुरु लालाजी महाराज यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य! वसंत पंचमीचा त्यांचा जन्म असल्याने ३१जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळात या आध्यात्मिक उत्सवात सहभागी होण्यासाठी मी कान्हा शांतिवनम् येथे गेले.(वसंत पंचमी भारताच्या प्रादेशिकतेनुसारव पंचांगानुसार वेगवेगळ्या दिवसांमधे साजरी होते.)पण इथला वसंत परवा बहरला आहे...
कान्हा शांतिमवनम् ४०००(चार हजार)एकर क्षेत्रफळावरील हे एक चिमुकले जगच आहे.आदरणीय कमलेशजी पटेल ऊर्फ दाजी यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली हा सर्व कामाचा विस्तार फुलतो आहे.
प्रबोधिनीच्या निमित्ताने शिक्षण,संशोधन,ग्रामविकसन,स्री शक्ती प्रबोधन,संघटन,राष्ट्रीय एकात्मता अशा विविध कार्यदिशांचा परिचय मला वीस बावीस वर्षात जवळून झाला आहे.विकीमीडिया उपक्रमाच्या निमित्ताने जगभरातील एकाच ध्येयाने प्रेरित झालेली मंडळी मला जवळून अनुभवता येतात,त्यांच्यासह काम करता येते.
आय.सी.सी.एस् चे पुन्हा सुरु झालेले काम म्हणजे जगभरातल्या संस्कृतींची आत्मीयता सांभाळणे.
या सार्या अनुभवाचे गाठोडे घेऊन मी इथे आले.
प्राणाहुती म्हणजे transmission हा पायाभूत अधिष्ठान विषय असलेली ही ध्यानप्रणाली आणि प्रेम हा त्याचा सर्वोच्च बिंदू.मी गेली दोन वर्ष हे ध्यानप्रयत्न करीत आहे.एका जन्माचे हे कामच नाही पण या जन्मात ओळख तरी झाली या संकल्पनेची.
विपश्यना,सुदर्शनक्रिया, हे शिकल्यानंतर ही नवी ध्यानप्रणाली प्रणोतीकडून शिकले.शेवटी सारं एकाच परब्रह्मापर्यंत जातं फक्त पद्धती वेगळ्या.
सामूहिक उपासनेचा अनुभव प्रबोधिनीच्या उपासना मंदिराला भारून टाकतो तसा इथे मला भारावलेपणाचा अनुभव दिला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित अभ्यासी बंधु भगिनींना पाहून.
इथल्या व्यवस्था,सोयी वाखाणण्यासारख्या आहेतच.इतक्या गर्दीत बहुजनमनाला शिस्त व वळण लावणे जरा कठीण पण प्रयत्न सुरु असल्याचे नक्की दिसले.
अल्पशिक्षित वा अशिक्षित शेतकरी समाजापासून उच्चविद्याविभूषित गर्भश्रीमंतांपर्यंत सगळे इथे एका छत्राखाली एकत्र येतात व ध्यानाचा सराव करतात.ध्यान कसे झाले यापेक्षा इथल्या माणसांमधले विविधांगी पैलू न्याहाळण्याची जी संधी मला मिळाली ती मला विशेष भावली आहे.
इथे काय नाही? सारंच आहे.त्याबद्दल उत्सुकता असेल तर गुगलवर सर्व इत्थंभूत माहिती आहेच.
मला आवडलेलं आणि स्वतंत्रपणे आयोजित छोट्या वर्गांपैकी एक वर्ग म्हणजे breathing techniques.विष्णूदादाने थोड्या वेगळ्या म्हणजे हार्टफुलनेस साठी उपयुक्त प्राणायाम थोडे सोपे,Inst सहज असे शिकविले.हे सत्र मला आवडलं किंबहुना ते मला शिकायचं होतं ते साधून गेलं.
त्यानंतर आवडती जागा अर्थात ग्रंथालय.अनेक सुंदर पुस्तकांनी,विविध भाषांमधे विवाध विषय असलेली व सहजमार्ग विषयक विवेचन करणारी पुस्तकं.
पुनः पुन्हा अधोरेखित करावंसं वाटतय ती संधी म्हणजे भूषा,भाषा,भोजन,भजन या सार्यात वैविध्य असलेली जगभरातील मंडळी भक्ती नावाच्या या एका संकल्पनेखाली एकत्र येणं अद्भुत आहे.कान्हा शांतिवनम् हे जगातील सर्वात मोठे ध्यानकेंद्र आहे.
प्रत्येकाचे गंतव्य वेगळे आहे पण कोणतातरी रस्ता आपण पकडतोच.चार्वाक आहेत तसेच द्वैती अद्वैतीही आहेत....भारतीय ज्ञान परंपरेची हीच तर मजा आणि वैशिष्ट्य आहे.मला जे भावेल,जे माझ्या प्रकृतीला झेपेल ,पचेल,रूचेल आणि सरतेशेवटी माझ्यातल्या माणूसपणावर जे हळुवार फुंकर घालेल ते आत्मसात करावं व आपल्या आतच आपल्याला शोधावं!
माझ्या शोधात मला खासकरून माझ्या आणि चार पायांच्या दिवंगत लेकराचं नातं सापडलं.त्याचं नुकतंच निधन झालेलं आहे जे काळीज पोखरून गेलं आहे.माझ्यातली बगिराची आई अस्वस्थ आहेच पण मी त्याच्यावर जे प्रेम केलं ते या ध्यानप्रक्रियेच्या दोन वर्षांच्या अभ्यासातून अधिकच वाढलं होतं.जे त्याचं होतं ते तो घेऊन गेला आहे...
आज माझी ओंजळ रिती आहे असं इथे येऊनही जाणवलं कारण आपल्या हृदयातला प्रेमाचा ओलावा समजून घेण्यास दोन पायांचे जीव तोकडे पडणारच आहेत पण आपण आपल्या हृदयातलं प्रेम असंच सर्वांना वाटत राहू. प्रेम या शब्दामधे जी आध्यात्मिक उदात्तता आहे ती यात अभिप्रेत आहे.ज्याला त्यात भिजायचंय त्याने भिजावं,ज्याला कोरडं रहायचं असेल त्यावरही वर्षाव करीत रहा ही शिकवण घेऊन मी इथून मार्गस्थ होते आहे.
@डाॅ.आर्या जोशी
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...







