Thursday, 6 April 2023

हे जीवन "छुंदड" आहे..

 सोमवारपासून करावली विकीसमूहासह सुरू झालेला हा प्रवास आज थांबतो आहे.आजचा दिवस विश्रांतीचा आणि कोटराकडे परतण्याचा.

आपण काहीतरी चांगलं काम करण्यासाठी बाहेर पडतो आहोत ज्याचा समाजाला थेट उपयोग होणार आहे हे मी हल्ली मनात ठसवूनच घराचा उंबरठा ओलांडते.अन्यथा एक आई,एक बायको,एक सून घराबाहेर पडणं हे तितकं सोपं आजच्या गतिमान युगातही नाही.पण काम संपलं की घराची ओढ लागतेच!

मागच्या वर्षी ईशान्येत मला नवी माणसं भेटली.तिथे इंग्रजी आणि हिंदी भाषा अवगत असलेली बरीच मंडळी होती त्यामुळे फार अडचण नाही आली.पण इथे मात्र मज्जा होती.ना कन्नड समजत ना तुळू! पण तरीही इथे प्रेम "भेटलं".

ज्या महिलांना मी ओळखत नाही किंवा ज्यांना माझ्याबद्दल माहिती नाही त्यांनी माझे हात हातात घेऊन माझं स्वागत केलं.पुरुष मंडळींनी आदरपूर्वक दोन हात जोडून नमस्ते म्हटलं.ही मंडळी तुळूमधे किंवा कानडीत बोलायला सुरुवात करायची आणि मला बोलावंसं वाटूनही प्रतिसाद देता यायचा नाही.मग करावली विकी समूहातील माझी मैत्रिण यक्षिता प्रत्येकवेळी माझ्या मदतीला यायची.पण तरीही "हास्य" हा इतका बहुमोल दागिना आपल्याला परमेश्वराने बहाल केला आहे की त्यातून भाषेच्या पलीकडे जाऊन माणसं आपल्याला जोडता येतात.

भरतेशला मी भेटले प्रथमच.सर्व संवाद मेल,दूरभाष आणि गुगल मीटवर.पण त्यांच्या उत्सवात सहभागी होऊन एकत्र अभ्यास करण्याची माझी इच्छा त्याने अतिशय प्रेमाने उचलून धरली.इथे आल्यापासून मी जे पहायलं हवं,अभ्यासायला हवंच असं त्याला वाटत होतं ते सारं मला दाखवण्याची त्याची धडपड कौतुकास्पद आहे. माझ्यासारख्या म्हटलं तर विकी परिवारातील पण तरीही भौगोलिकदृष्ट्या बाहेरच्या व्यक्तीला सामावून घेणं यांना किती सहज जमलं!

माझ्या बुद्धीत मी जे साठवलय तो माझ्या कामाचा,अभ्यासाचा भाग होता पण माझ्या मनात,हृदयात जे घेऊन मी परतते आहे त्याला खरोखरीच तोड नाही.

प्राध्यापक,संशोधक,कॅमेरामन,दिग्दर्शक यांच्यापासून ते ग्रामीण भागातील सुपारीची बाग सांभाळणारा,भातशेती करणारा शेतकरी अशी ही सगळी मंडळी.अभिनिवेश कुणालाच नव्हता.

कन्नड विषयाचे प्राध्यापक विश्वनाथ बडिकना यांच्या चारचाकीतून मी सगळीकडे गेले. या गृहस्थाकडे प्रचंड विद्वत्ता आहे पण ती माणुसकीच्या हातात हात घालून येते.प्रा.तुकाराम  निडल हेही असेच आहेत.

महाराष्ट्र आणि तुळूनाडू येथील लोकसंस्कृतीबद्दल,अगदी स्वयंपाकघरात रोज शिजणार्‍या पदार्थांबद्दल आम्ही मोकळेपणाने बोललो.आपापल्या लेकराबाळांचे फोटो,व्हिडिओही  कौतुकाने एकमेकांना दाखवले.

करावली विकी समूहाचे सारेच सदस्य.. पाच किंवा सहाच आहेत ते.विकी समूहाच्या विस्तीर्ण क्षितीजावर नगण्य वाटू शकतील असे.पण तरीही प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा त्यांच्यात आहे.

यक्षिताच्या घरी मी राहिले.नीर डोसा पासून इडीअप्पम पर्यंत स्वतः सर्व करून मला प्रेमाने खायला घालून तिने तिचं प्रेम दाखवलं आहे!

यक्षिताच्या निरक्षर ग्रामीण जीवन जगलेल्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजीने मला बाहेर निघताना तयार होताना पाहिलं.घरात साध्या पोशाखात असलेली मी आणि बाहेर जाताना मी हातात घातलेल्या बांगड्या,कानात घातलेले लोंबते डूल हे सर्व आजी निरखत होत्या.त्या तुळूमधे काहीतरी बोलल्या आणि त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला.यक्षिता म्हणाली आजी म्हणते आहे " You looks preety".

म्हणजे माझ्या बग्गीच्या भाषेत "छुंदड".

का नाही दिसणार मी सुंदर? कारण ज्या ज्या वळणांवर प्रेम भेटतं आणि ते आपल्यासोबत राहतं तिथे सौंदर्यही खुलतं!

हा माझा आनंद माझ्या चेहर्‍यावर प्रतिबिंबित व्हावा आणि तो मी नक्की काय करण्यासाठी इथे आले आहे हे जिला माहिती नाही अशा आजीच्या मुखातून बाहेर पडावा यातच सारं काही आलं! नाहीतर माझ्यासारखी व्यक्ती जी लौकिकार्थाने सौंदर्याच्या कुठल्याच कक्षेत मावत नाही तिने मनापासून आनंद घ्यावा आणि तो इतरांनाही द्यावा यातच या अभ्यासभेटीची कृतार्थता आहे.

परिपूर्ण कुणीच नाही... प्रत्येकातच कमी अधिक आहे.. पण तरीही भाबड्या कष्टकरी समाजाच्या निष्ठावान आणि श्रद्धावान आनंदी आयुष्याचा जवळून अनुभव घेतला की मनोमन पटतं "हे जीवन छुंदड आहे!"



मनतळाच्या गूढ डोही..

 ( माझं स्टेटस पाहून मला बर्‍याच जणांनी उत्सुकतेपोटी कांतारा या बहुचर्चित चित्रपटाविषयी विचारलं.खरंतर स्थानिक जनता आणि अभ्यासकांच्या मते त्यातील मूळ संकल्पना लोकसंस्कृतीशी निगडीत असली तरी चित्रपट तद्दन व्यावसायिक आहे असं सर्वांचंच मत आहे.)

 भूत खोला.. भूत म्हणजे भूत.. दैवत जे रक्षण करतं आणि खोला म्हणजे नृत्य!

 आज मी सत्यदेवता(कानडी भाषेतील नाव) आणि कल्लुटी (तुळू नाव) या लोकदेवतेचं लोककलेतील रूप अगदी जवळून अनुभवलं!

 यात विशेषकरून समाजाने निम्न स्तरातील ठरवलेल्या गटातील सदस्यच या देवतांचा वेष धारण करू शकतात.ग्रामदेवतांचे पुजारीही उच्च वर्णीय नसतात.असे असले तरी या लोकदेवतांच्या सादरीकरणाला धार्मिक विधीचा दर्जा दिला गेला आहे आणि अपार श्रद्धेने तो सांभाळलाही गेला आहे.

 मला आज महाराष्ट्रात विशेषतः पुण्यामुंबईत अनुभवाला येणार्‍या शारदीय नवरात्री उत्सवातील अष्टमी व्रताची आठवण झाली.(मी कोणत्या घरात जन्मले आणि कोणत्या घरात लग्न होऊन गेले याची चर्चा येथे आवर्जून झालीच आणि मी चित्पावन ब्राह्मण कुटुंबाशी निगडीत असल्याने मला जरा अधिक आदराची वागणूक मिळाली जे खरंतर मला अपेक्षित नव्हतं.)असो.

 येथे मंदिरे सार्वजनिक स्वरूपात भूतखोला आयोजित करतात.त्याचे व्यवस्थित बॅनर्स लावतात.इच्छुक भाविक त्या दिवशी त्या त्या मंदिरात जाऊन आपला नवस फेडतात.

 आजही सत्यदेवता मंदिरात सत्यदेवतेचा पोशाख घातलेले सदस्य लोकांचा नवस फेडण्यास मार्गदर्शन करीत होते.त्याला आपण सोंग म्हणू शकत नाही कारण या व्यक्तीमधे त्या देवतेचा संचार होतो अशी श्रद्धा आहे.

 Energy follows the intention हा अनुभव मी घेत गेले आहे आणि नुकतंच मी ते ईशान्येतही अनुभवलं आहे.तोच अनुभव इथेही थोड्या फरकाने दिसला.

 आज जे छोटे चित्रीकरण सोबत पाठवते आहे त्यात दिसेल पुरूषाने धारण केलेले सत्यदेवतेचे रूप.ज्या कुटुंबाने पूजा नोंदवलेली असते त्या कुटुंबाने या देवतेसाठी फुलांच्या माळा,प्रसाद अशी सर्व व्यवस्था करायची असते.

 मंदिरातले पुजारी देवतेच्या सूचनेनुसार सर्व गोष्टी करतात.कुटुबाला देवतेपुढे उभे करून गार्‍हाणे घातले जाते.सुशान्तिः भवतु। हेच थोड्याफार फरकाने स्थानिक भाषेत देवता उच्चारते. या देवता ओरडतात मधेच अचानक असा भास होतो.पण ते किंचाळणे नसून ईश्वरीय तत्वाशी तो अतींद्रीय संवाद असतो.

 नवरात्रीच्या अष्टमी व्रतातल्या घागरी फुंकत फुंकत भविष्यकथन करणार्‍या महिला आठवून पहा! ती जशी एक उन्मनी अवस्था असते इथेही तसेच अनुभवायला मिळाले.मनापासून सांगायचे तर क्षणभर भीतीही मनाला स्पर्शून गेली!

 पण हे सारं जिवंतपणाने समोर घडत होतं.वास्तविक हे चार दिवस स्थानिक सुग्गी ऋतुनुसार या विशिष्ट उत्सवासाठीचेच असतात त्यामुळे चित्रीकरणातही सहजता अनुभवायला आली.ओढून ताणून काहीही नव्हतं!

 पद्भ्यां शूद्रो अजायत म्हणून काहीशा आढ्यतेने ज्या समाजाकडे पाहिलं गेलं किंवा आजही वेगळ्या पद्धतीने त्याचे कंगोरे समोर येतात त्याच समाजगटातील लोकांना ईश्वराने दिलेला हा विशेषाधिकार! त्यांच्या तोंडून ईश्वरच बोलणार,त्यांच्या शरीरात काहीकाळ ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आपल्यालाही होणार!

 श्रद्धा,आस्था,भाविकता आणि गूढता,असं सारं संमिश्र आहे मनात! चित्रीकरण संपलं आहे पण माझ्या मनाच्या गूढ डोहात मात्र पुरेशी खळबळ सुरू झाली आहे!!

 

 

Wednesday, 5 April 2023

लोकदैवतांच्या सहवासात.... जनात आणि वनात.. मनामनात

कांतारा म्हणजे वन... वनाची देवता,जनाची देवता आणि जनांच्या मनाची देवता म्हणून स्थान मिळवून असलेली विविध लोकदैवते दक्षिण कर्नाटकात विशेषत्वाने पहायला मिळतात.आपली संस्कृती कृषीशी संबंधित असल्याने क्षेत्रपालाची विविध रूपे या प्रांतात पूजली जातात.अशी दैवते नक्की किती व कोणती हे सांगणंही कठीण आहे पण त्यातल्या त्यात अधिक मान्यता पावलेली लोकदैवते सण उत्सवांचा विशेषत्वाने भाग होतात.

कर्नाटकातील बौद्ध  संप्रदायाचा प्रभाव यावर Ph.D केलेले इतिहास आणि कन्नड भाषेचे निवृत्त प्राध्यापक टी.वसंतकुमार यांच्या घरी काल चित्रीकरण झाले.त्यांच्याशी माझ्या अभ्यासविषयाच्या खूप गप्पा झाल्या.विकी व्यासपीठासाठी यातून आणखी काय काय करता येईल याविषयीही आम्ही बोललो.

नारळ व  सुपारीच्या बागांमधे दडलेल्या घरातील मुलगा चिदानंद, तुळू विकीपिडिया संपादित करतो.त्याच्या घरी काल दुपारी विशेष भोजन झाले.त्याच्या आईने केवळ माझ्या एकटीसाठी शाकाहारी जेवण तयार केलं होतं अन्य सदस्य मांसाहार करणारे होते.तिथलं प्रेम,आतिथ्य,आपुलकी ही भाषेला ओलांडणारी मूल्य माझ्या मनात घर करून गेली.(माझ्या बग्गुला लोळायला आमच्या दोन्ही पडव्या फारच लहान पडतात त्यामुळे त्याच्यासाठी दोन्ही पडव्या मोठ्या करायचा विचार चिदानंदच्या घरातल्या पडव्या पाहून मी मनोमन ठरवून टाकला.)

संध्याकाळी जो अभूतपूर्व सोहळा पाहिला तो शब्दात कसा मांडू या विचारात मी अडकले आहे.... त्याचे अगदी छोटे चित्रीकरण सर्वांसाठी पाठवते आहे नमुन्यादाखल...

या सोहळ्याची तयारी चार तास आम्ही पहात होतो.रोजची कामं संपवून त्यानंतर  सुरू झालेली कलाकारांची रंगभूषा,वेशभूषा,पूजेची तयारी, गावकर्‍यांची लगबग,तयार होणारा नैवैद्य,सादर केल्या जाणार्‍या खेळाची उत्सुाता अन् सुपारीच्या झाडांमागून दिसणारा पौर्णिमेचा चंद्र असं एक ना अनेक!

सादरीकरणाविषयी नंतर सविस्तर लेखन करणार आहेच पण वर्षानूवर्षे ऋग्वेद वाचल्यावर,काही भाग शिकवल्यावरही असं वाटलं की हा "जनवेद" सांभाळणंही फार आवश्यक आहे...त्यासाठी तो आधी ऐकावा लागेल,समजून घ्यावा लागेल आणि त्यामागची निरागस प्रामाणिक भावना समजून घेण्यासाठी आपणंही तितकंच निरागस व्हावं लागेल!!!!

आर्या


करावली परिसराची लोकसंस्कृती जवळून पाहताना

 पहाटे साडेपाचला सुरू झालेला आमचा कालचा दिवस काल मध्यरात्री एक वाजता संपला.त्यानंतर सगळे अर्थातच निद्रादेवीच्या आधीन.. इतके की रात्री स्वप्न पडल्याचंही आठवत नाही.

प्रसन्न मनाने नव्या दिवसाची सुरुवात करताना कालची उजळणी आवश्यकच.

दक्षिण कर्नाटकातील लोकसंस्कृतीशी निगडीत विविध कलाप्रकार नोदवले गेले आहेत.परदेशी अभ्यासकही येऊन येथे राहून अभ्यास करून गेले आहेत.तरीही एक महत्वाचा लोककलाप्रकार जो वर्षानुवर्षे जनवेद स्वरूपात मौखिक परंपरेने सांभाळला गेला आहे त्याचे दस्तऐवजीकरण करणे स्थानिक विकीसमूहाला महत्वाचे वाटले.

नाथपंथाचा प्रभाव असलेला सिद्धवेश हा कलाप्रकार नृत्यनाट्यच आहे.मला त्याबद्दल ऐकून खात्री पटली होतीच पण काल प्रत्यक्ष अनुभवल्यावर शिक्कामोर्तब झालं की हे महाराष्ट्रात कोकण भागात प्रसिद्ध असलेल्या दशावतारी खेळांशी साधर्म्य सांगतं.. अगदी संकासुरही आठवतोच.

लोककला अभ्यासक श्री.तुकाराम निडले यांच्याशी झालेल्या माझ्या गप्पांमधून ते अधिक उलगडत गेलं.

दिवसभर आम्ही धर्मस्थळहून  सुमारे दीडशे किलोमीटर परिसरातील छोटी मोठी ग्रामदेवतांची,स्थानदेवतांची मंदिरे पालथी घेतली.जैन धर्माचाही विशैष प्रभाव या परिसरात जाणवतो.१९०१सालचा जैन स्थानिक राजा बल्लाल यांचा राजवाडाही पाहून आलो.तो छानपैकी सांभाळणार्‍या त्यांच्या वंशजांचं विशेष कौतुक वाटलं!

नागदेवतांचा प्रभाव,वीरगल्लु,महासतिकल्लु,कुद्रेमुख पर्वत आणि त्याच्या आख्यायिका,कन्नड तुळू आणि मराठी भाषेतील साम्यस्थळे अशा विविध विषयावर कन्नड साहित्याचे प्राध्यापक श्री.विश्वनाथ यांच्याशी बोलायला मिळणे ही तर पर्वणीच होती! सोबतीला होता पश्चिम घाटाचा नयनरम्य सुखावणारा परिसर!

संध्याकाळी सहा वाजता आम्ही भजिला गावात आलो.या गावातील गौड समुदायाचे स्थानिक सदस्य पुरुषेरकुट्टुना सादर करतात.पुरुषेर म्हणजे पुरूष आणि कट्टुना म्हणजे वस्र.(या विषयावर एक शोधनिबंध करायचा असल्याने याचा तपशील आत्ता इथे नोंदवत नाही) पण ग्रामीण लोकजीवनाची,तळागाळातील लोकांच्या भावभावनांची नर्मविनोदी शैलीत कथा सांगणारी रचना म्हणजे पुरुषेरकट्टुना.जेव्हा हा कलाप्रकार केवळ गौड समाजातील नाथपंथी सादर करतात तेव्हा त्याला म्हणतात सिद्धवेस किंवा सिद्धवेश.

एकूणातच भाबड्या ग्रामीण जनतेच्या आशाआकांक्षांना स्थान देणारा,उच्चवर्णियांच्या ज्ञानावर मिस्कीलपणे मात करणारा, असा हा लोककलाप्रकार! यातले सदस्य म्हणजे आपल्या शिमग्यातली सोंगच आहेत!दोन सोंगांसह मी उभी राहून मी ही त्याच जातकुळीतली आहे हे मी "सिद्ध" केले आहे.एकूणातच देव,मानव,निसर्ग यांना जोडणारा हा कलाप्रकार मनाला भावला.मला कन्नड आणि तुळू दोन्ही भाषा येत नसल्या तरी मुळातून भाषेची आणि त्यातून संस्कृत समजणारी व्यक्ती असल्याने जे समोर घडतय त्यातले शब्द टिपत त्याचा आनंद घेणं मला निश्चितच जमलय..

आर्या


तुळुनाडूतील जनवेदाचा अभ्यास करताना

 आनंद घ्यायचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे,नव्हे तो द्विपद आणि चतुष्पदांनाही आहे.भारतीय संस्कृती असा आनंद बहाल करते सण उत्सवांच्या निमित्ताने.

भारताच्या प्रांतोप्रांती जपली जाणारी लोकसंस्कृती आणि त्या संस्कृतीमधील विविध संकल्पनांमधून रचला जातो "जनवेद".

अशाच एका जनवेदासंबंधी काम करण्याचा अर्ज करावली विकी समूहाकडून विकीमीडिया फौंडेशनकडे आला.संस्कृती आणि धर्म असा विषय असल्याने आमच्या समन्वयकाने तो सर्वात आधी माझ्याकडे सोपवला.

वाचताना लक्षात आलं मला, यांना जे काही करायचं आहे त्याचं साधर्म्य कोकणातील लोकसंस्कृतीच्या अगदी जवळ जाणार आहे...

मग सुरू झाला माझा या गटासह माध्यमावर संवाद.मी या समूहासह एक विकी कार्यकर्ता आणि अभ्यासक म्हणून काम करू शकते असं मला लक्षात आलं आणि मी फौंडेशनकडे शिष्यवृत्ती अर्ज केला.प्रश्नोत्तरांची मालिका पूर्ण होऊन माझं अनुदान मंजूर झालं आणि काल मी मंगलोरच्या पुढे असलेल्या छोट्या गावात येऊन विसावले.

हा सारा माझा प्रवास पुढील चार दिवस करावली विकी समूह सदस्यांसह होणार आहे.कन्नड भाषेत करावली याचा अर्थ coastal region.

आम्ही काय करीत आहोत,त्याची फलश्रुती काय हे सारं हळूहळू उलगडत जाईलच.

बह्मपुत्रेच्या आठवणी अजून मनात ओल्या असताना मी आज नेत्रावतीच्या कुशीत येऊन विसावले आहे.... 

सांगत राहीन ही गोष्ट लोकसंस्कृतीची,लोकांच्या मनात दडलेल्या श्रद्धांची,मानवतेची,नव्याशी नाळ जोडताना न विसरल्या गेलेल्या प्राचीन परंपरांची...


राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...