Monday, 31 December 2018

रोझी

चर्चमधे नवीन वर्षाची प्रार्थना सुरु होती. सजलेल्या चर्चचा रंगच अनोखा होता. सजलेले भाविकही नव्या वर्षाची स्वप्नं पाहत होते. गोव्याचा किनारा आणि किनारा उत्साही लोकांनी भरून आणि भारून वाहत होता.
बारा वाजता चर्चचे टोल पडले.समुद्रातल्या बोटींनी भोंगे देत नव्या वर्षाचं स्वागत केलं....
तिने येशूला प्रार्थना केली मनापासून आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने तिची वाटचाल सुरु झाली.
रोझी.... आई वडिलांची लाडकी... गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात लहानाची मोठी झालेली... तारूण्याच्या उंबरठ्यावरच्या रोझीला नव्या लोकांना आपलं गाव दाखवायचं होतं. पण तिला फक्त महिला आणि मुलींनाच हे जग फिरवायचं होतं... ती गाडी चालवायला शिकली तेवढ्यासाठी. डॅडीच्या मागे लागून नवी गाडीही विकत घेतली.
गोव्याचा कोपरा आणि कोपरा माहिती करून घेण्यासाठी ती वर्षभर फिरली.कुणाला काय आवडेल... कुणाला काय... याचा विचार तिने नोंदवला आणि फेसबुकवर जाहिरात टाकली माहितीवजा...
तिला तसं पहायला गेलं तर वेगवेगळ्या पूरूषांनीच संपर्क केला... तिने तो विनयतेने नाकारला.आपल्या जाहिरातीत ती परत परत लिहीत राहिली... फक्त महिला सदस्यांसाठी... आणि केवळ पर्यटन मार्गदर्शिका म्हणून आणि म्हणूनच....
अबोलीने एका मैत्रीणीकरवी तिची माहिती वाचली आणि रोझीला संपर्क केला.
रोझीशी पहिल्यांदा बोलल्यावरच तिला आत्मीयता वाटली. राहण्याची व्यवस्था आमच्या घरात स्वतंत्र सोयीनी युक्त खोलीत आरामशीरपणे केली जाईल... निःशंक या...
अबोली एकटीच... त्यातून गोव्यात.... बाबा तयार होत नव्हते."अग मुली हल्ली कशा असतात त्यांचाही काही नेम नाही."  जग इतकंही विश्वासार्ह नाही अबोली...पण मला जाऊदे बाबा...

अबोलीने आईला पटवलं आणि रातराणीने गोव्याकडे निघाली. रोझी तिला पणजीत घ्यायलाच आली होती.
पहिल्या भेटीतच ओळख झाली छान दोघींची...
रोझीच्या घरी तिला आपलेपणा आणि निवांतपणाही मिळाला.स्वतःचा हक्काचा राखीव वेळही मिळाला...

दुसर्‍या दिवशीपासून दोघी निघाल्या.गोवा फिरता फिरता त्यांची मैत्री झाली.धर्म भाषा याच्यापलीकडे जाऊन झालेली मैत्री त्यांना आनंद देऊन गेली.
गोव्याला एक दीपगृह पाहण्याची अबोलीची इच्छा होती. रोझी तिला घेऊन गेली.
तिथे गेल्यावर तिला अचानक मनातून फार भरून आलं. अथांग समुद्रात भरकटणार्‍या नावाड्यांना दिशा देणारं दीपगृह!!!! आपणही असच व्हायला हवं...
अबोलीला मनोमन शांत झालेलं पाहून रोझी विचारात पडली. आपल्या हाताने हलकेच अबोलीच्या खांद्यावर तिने थोपटलं... क्षणात अबोलीला भरून आलं....
आम्ही लहान असताना गोव्याला आलो होतो अग... आईची मैत्रीण शालिनी मावशी,काका आणि पियु...
समुद्रात खेळताना चिमुकली पियु...... खरंतर इतक्या छोट्या पियुला पाण्यात न्यायला नको होतं काकांनी... पण.... आमच्या डोळ्यादेखत चिमुकली पियु....
खूप शोधली... पोलीस तपास.... पण नाहीच सापडली........
मनातून घट्ट रूतून बसलं माझ्या ते. पियु माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होती... पण मला आठवतय ते सगळं लख्खं...
तेव्हापासून आईबाबांनी मला समुद्रावर न्यायचं नाही असंच ठरवलं...
मावशीला नंतर मुलगा झाला कालांतराने... आता सर्व ठीक झालं पण पियु......
तिन्हीसांजा घरी आलेल्या रोझीची आणि अबोलीची वाट पाहत रोझीची आई थांबली होती...
किती छान मैत्री झाली गं तुमची.... पुढच्या वेळी आईबाबांना घेऊनच ये. रोझीला हे काय खूळ लागलय सगळ्यांना गोवा दाखवायचं आणि तेही मुलींना... का तर त्यांना सुरक्षितपणे इथे आनंद घेता यावा म्हणून....
हो नं आँटी... आता परत जायची वेळ झाली माझी परवाला पण जावंसंच वाटत नाही..... आणि रोझीचं म्हणाल तर छान आहे की हे सगळं.... तिला शिकायला खूप मिळेल,छान मैत्रिणी मिळतील आणि स्वतः स्वतःसाठी पैसे कमविण्याचा आनंद आणि तुमच्यासाठीही....
रोझीचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली तशी अबोली दुःखी झाली. अबोलीला विमानतळावर सोडायला रोझीची आईपण आली सोबत.खरं पहायला गेलं तर रोझीने पेशा म्हणून हे स्वीकारलं होतं पण अबोली आणि रोझीच्या कुटुंबाचं एक अनामिक नातंच तयार झालं..
गोव्याहून परतल्यावर सर्वांना गोव्याच्या आठवणी सांगताना अबोली हरखून गेली.रोझीबद्दल तर ती भरभरून बोलत होती..
बोलव तिला कधी मुंबईत... अबोलीची आई म्हणाली...
तोवर फोन वाजला.. शालिनी मावशी... बोल ग....
"अबोली... तुझ्या व्हाॅटस् अप ला जो डीपी आहे त्यातली मुलगी कोण आहे? खूप पाहिल्यासारखी वाटते....."
अग ती रोझी. गोव्याला भेटली.तिनेच मला गोवा फिरवलं आणि छान गट्टी झाली आहे आमची...."
ती मूळ गोव्याचीच आहे का???
होय... पण का ग मावशी.....
फोन बंद झाला......
चार दिवसात शालनचा फोन नाही बघ अबोली,.. त्यादिवशी तुझ्याशी एवढं काय बोलली देव जाणे....
वसंतराव आणि ती गेलेत कुठेसे असं वैभव म्हणाला... पण कुठे ते माहिती नाही म्हणाला...
कमालच आहे बाई या दोघांची... मुलालाही सांगून जाउ नये यांनी म्हणजे कमालच.......
दुसर्‍या दिवशी आठ वाजताच शालन मावशी आणि काका दारात उभे..... अबोलीचा विश्वासच बसेना.. त्यांच्यासोबत "रोझी" उभी होती. दोघींनी घट्ट मिठी मारली... पण या मिठीत रोझीला नव्हे पियुला तिची जुनी बालमैत्रीण भेटली होती जी तिच्या स्मरणातही उरलेली नव्हती...
नव्या वर्षात नवं स्वप्नं पाहतानाची आस बाळगताना रोझीला आपलं सर्वस्व आणि माहिती नसलेला भूतकाळ पुन्हा सापडला होता...


नवे वर्ष 2019

खरं तर आपलं नवीन वर्ष सुरु होतं पाडव्याला
तरीही नेहमीच  हुरहुर दाटते आजच्या दिवशी संध्येला!
वापरतो आपण सहज तारीख नवी नवी रोज
नवा दिवस घेऊन येते आणि देते मौज!
वर्ष मात्र तेच असतं चार अंकी नटलेलं
तिसर्‍या रकान्याचा कायम आब सांभाळत बसलेलं!
तेच वर्ष आज आता संपून जाईल रात्री
त्या चार आकड्यांची झालेली आपली मैत्री!
नवे मित्र आले तरी जुने तसेच राहतात
नवे जुने एकत्रपणे आयुष्य समृद्ध करतात!
सरली वर्ष तशीच ठेऊ जपून आपल्या पोतडीत
नवे चार अंक आणतील आनंद रोजच्या धकाधकीत!
त्या चार अंकांचं स्वागत करू हर्षाने
जीवजीव जोडून घेऊ नव्या वर्षी सुखाने!!
दीपार्यातोष


Sunday, 30 December 2018

गुलालाची उधळण
उडत्या थव्यांची पखरण
खिल्लारांच्या गळ्यातील किणकीण
संध्यासमयी ईश्वराला अनन्यभावे लीन!!
चांदोबाचा टीळा
चांदण्यांची रांगोळी
सांजगारव्याचा धूप
अनाहत नादाची टाळी!
अशी सजली पूजा
संध्यासमयीची
परमेश्वराच्या चरणी
ओढ माझ्या अंतरीची!!
आर्या

अवचित आली कानी ऐकू
रिमझीम पावसाची
फसले आणि हसले मी ही
ही तर सळसळ पानांची
मत्त गुलाबी हिवाळ्यातली
सोनरूपेरी सकाळ
भावमधुर मज करूनी गेली
हिरवी तान मधाळ

Tuesday, 25 December 2018

गावदेवीचा उत्सव

वर्षातून एकदा येणारा गावाकडचा गावदेवीचा उत्सव.नवी नवरी असलेली स्पृहा कल्पनेनेच हरखून गेली.तिच्या माहेरचं गाव असं आता राहिलं नव्हतं.पण देवेशच्या घरचं म्हणजे तिच्या सासरचं मूळ गाव गोव्याजवळच्या छोट्या निसर्गसंपन्न खेड्यात. त्याचे चुलतकाका आणि त्यांचं कुटुंब आजही तिथे आहे.काजू,सुपारी सांभाळत गोव्यात आपलं दुकान सांभाळत शेतीही करत आहेत.
तसं गोवा म्हटलं की निसर्गसंपन्न भूमी,समुद्र,नारळी पोफळीची राया,काजूच्या बागा,जुनी मंदिरं हे चित्र समोर उभं राहतचं.
दिवाळीनंतरच्या त्रिपुरीच्या चांदण्यात गावातला उत्सव होत असे. खेळे होत. भजनं कीर्तनं महाप्रसाद होत असे. किरीस्ताँव छाप ल्यायलेल्या आजूबाजूच्या गावांपेक्षा हिंदू वळणाचं आणि घरांचं हे छोटेखानी गाव आडही लक्षवेधी होतं.फोंड्याजवळचं मडकी गाव.नवदुर्गा मंदिर असलेलं.
स्पृहाने उत्साहाने सगळी तयारी केली.तिच्या सासूबाईंनाही आश्चर्य वाटलं कारण स्पृहा एक संगणक अभियंता. सतत परदेशात projects वर जाणारी. पण इतकी हरखून गेली आहे.. कौतुकास्पदच आहे.
सासूबाईंनी तिला लग्नातली शिवलेली नऊवार साडी,नथ,मोठं मंगळसूत्रं असं सगळं बरोबर घ्यायला सांगितलं.लेकही सोवळं नेसून बायकोबरोबर मानाची पूजा करायला तयार झाला.
गावातल्या वेशीवरच नारळीच्या झापांनी मांडव सजवला होता. कौलारू उतरत्या छपराचं,मोठं अंगण असलेलं जुनं पण तरीही काळाच्या ओघात पून्हा तेल पाणी पिऊन नवं रूप घेतलेलं घर पाहुण्यांनी भरलं होतं.
घरापासून चालत पाच मिनीटं देऊळ होतं.
उत्सवासाठी मुंबई पूण्यातले किंबहुना परदेशात असलेले नातेवाइक,आडनाव बंधूही उत्साहाने आले होते.
या घरात रहायला अडचण होईल म्हणून स्पृहाच्या नवर्‍याने त्याच्या कुटुंबाची व्यवस्था फोड्यातल्या हाॅटेलवर केली होती. दिवसभर इथे थांबू आणि रात्री निवांत हाॅटेलवर परतू असं त्याच्या मनात.
पण या वातावरणात स्पृहा रमली.घरभर फिरली.तासाभरातच तिने सर्वांना आपलंसं केल.
मंदिरातली आरास, प्रसन्न नटलेली देवी,मंदिराबाहेरच्या दगडी बांधीव तळ्यात देवीच्या नौकाविहारासाठी सजवलेली नाव पाहून ती वेडीच झाली.
हौस म्हणून आणलेल्या हँडिकॅमवर सर्व चित्रीकरण तिने केलं.एकत्र चुलाण्यावरचा रूचकर स्वयंपाक, फुलांच्या वेण्या आणि हार तयार करर्‍या, माळा ओवणार्‍या नटलेल्या काकू,आत्या,आज्या,सासवा!!
चिमुरड्या  शहरी आधुनिक पोशाखातल्या मुली, पाचवारी साडी नेसून गजरा घालून नटलेली ती स्वतः , देवीपुढची अंगणातली पालखी, त्या पालखीच्या मागे नाचणारी स्थानिक मंडळी,नारळ सुपारीच्या राया,पर्‍ह्याचा आवाज.....
रात्री दमून कधी झोपते असं तिला झालं.पाच वाजता चहा घेता घेता देवीचं ऐकलेलं भजन, देवळात चाललेली पणत्या लावण्याची तयारी हे सगळं ती भान हरपून पाहत राहिली.गुंगूनच गेली.
देवेशला म्हणाली की ईथेच थांबू रात्री घरी.उशिराने देवी नौकाविहाराहा नेतील ते कसं पहायला मिळणार हाॅटेलवर गेलो तर?
अग पण उद्या पहाटे आपल्यालाच पूजा करायची आहे उत्सवाच्या सांगतेची. नंतर गावजेवण. आपण निघायचय संध्याकाळी परत. परवा आॅफिस गाठायचय नं म्हणून तर ड्रायव्हर घेऊन आलो आहोत रात्री जायचं परत म्हणून..
हो.उशिराने जाऊ. पण थांबू.
रात्री असंख्य पणत्यांच्या प्रकाशात देवी आणि मंदिर ऊजळलं.देवी प्रसन्न मनाने नौकेत फिरूनही आली आणि आरतीनंतर निद्रीस्त झाली.
पूजा आटोपून प्रसाद घेऊन मंडळी निघाली.
स्पृहा पुण्यात आॅफिसला पोहोचली पण मनात ऊत्सवच होता.तिचा मित्र अनिश एडिटिंग करायचा. तिने दूसर्‍या दिवशी अनिशला गाठलं आणि शूटीग पहायला घरी बोलावलं.
मला यावर छोटी फिल्म करायची आहे.हे सगळं शहरात पोचायलाच हवं पुढच्या पिढीपर्यंत. केवढ्या मोठ्या आनंदाला मुकतात ही मुलं आणि आपणही. वर्षातून एकदा वेळ काढणं कठीण नाही या आनंदासाठी.
अनिशला हे आव्हान होतं. स्पृहा काही चित्रीकरणातली तज्ज्ञ नव्हती.  पण तिने टीपलेली दृश्य त्याने प्रयत्नपूर्वक जोडली. सासू सासरे आणि चुलत आजेसासूबाई यांच्याकडून माहिती गोळा झाली उत्सव परंपरेची. अनिशची मैत्रीण नेहा सुरेख लिहायची. नेहाने संहिता लिहीली.
मित्र मैत्रिणींच्या उत्साहातून हौसेने एक उत्तम माहितीपट तयार झाला. असंच कुणाला कुणाला हौसेने कौतुकाने दाखवला गेला. यू ट्यूबची लिंक शेअर केली गेली.सोशल मीडियावर अचानक या माहितीपटाने प्रसिद्धी मिळवली. अनीशला व्यावहारिक बारकावे माहिती असल्याने अधिकृत प्रमाणपत्र घेऊन माहितीपट आंतरराष्टीय महोत्सवात दाखल झाला.एवढच नव्हे तर उत्तेजनार्थ पूरस्कारही त्याला मिळाला.
या धांदलीत स्पृहा पंधरा दिवस यू एसला कामासाठी धावती भेटही करून आली. अख्खं घर माहितीपटमय झालं.
स्पृहाच्या उत्साहाचं आणि कल्पनेचं प्रचड कौतुक झालं घरात.
माहितीपटाचं प्रमाणपत्र आणि जिंकलेलं पारितोषिक देवीला अर्पण करायला स्पृहा आणि देवेश अनिशसह मार्गस्थ झाले.... मनातून तृप्तता आणि भक्तिभाव घेऊन... 
व्यवहार सोडून चालत नाही आणि आधुनिक काळात शहरात राहण्याशिवाय पर्याय नाही. हे खरं असलं तरी आपल्या पूर्वजांची ही परंपरा सांभाळण्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या गावी यायलाच हवं... नाही का?

Monday, 24 December 2018

धर्म

धर्म....
जाणवतय का तुम्हाला माझं मर्म....

मी नाही एक चौकट, मी नाही केवळ एक बांधीव पुस्तक..
मी आहे एक जीवनप्रणाली आणि जगण्याचं भान देणारं वास्तव....

कुणी वदवलं मला रणांगणावर कुणाच्यातरी मुखातून
कुणी सजवला मला हिरव्या रंगाच्या कागदी सोनेरी नक्षीच्या वर्खातून
कुणी ठेवलं मला बंद करून स्तूपात
कुणी अडकवून ठेवलं मला डोक्यावरच्या काटेरी मुकुटात!!

कुणी म्हटलं मी आहे शाश्वत चिरंतन सत्य
कुणाला सापडलो मी म्हणत सर्वच आहे दुःख आणि अनित्य!
कुणी म्हटलं एक दिवस येईल निर्णयाचा दिवस
कुणी म्हटलं स्वर्गाच्या दारी गेलं की संपेल थांबेल जीवनच!

कुणाचा प्रेषित गात येतो करूणेचे गीत
कुणाच्या ऋचा गाती समाजसंस्थापनेचे संगीत
संध्याकाळी कुणी हाक देतं आरोळीत
कुणी डोंगरी लेण्यात बसून ध्यानसाधनेत मन रमवीत!!

कुणाचा देव एक तर कुणाचे अनेक
कुणी पूजतात दिशा केवळ कुणी लिहीतात शिलालेख!

असं असलं तरी मी सर्वांच्या मनात सारखाच आहे
माणुसकी माझा प्राण आणि आत्मीयता माझा श्वास आहे
मी नाही व्यक्ती मी नाही जात
मी आहे मनामनातून तेवणारी वात

ही वात शांततेची ही वात घडण्याची
ही वात घडविण्याची आणि जीवन उजळविण्याची

सवे येऊन सारे आपण वातीने वात जोडूया
तेजस्वितेच्या प्रकाशात सर्व एक होऊया
धर्माचे मर्म जाणूया
आर्या


Wednesday, 19 December 2018

पुळ्याचा गणेश

समूद्राची पुळण,भरतीच्या लाटांनी थेंबाथेंबांनी सजणारा किनारा, मागे समुद्राच्या अथांगतेला आध्यात्मिक आणि सात्विक अधिष्ठान देणारा गणपती आणि त्याचं पावित्र्याने भरलेलं स्वच्छ सुंदर मंदिर!
सहसा महाराष्टातील देवळांमधे अभावाने आढळणारी स्वच्छता आणि काटेकोरपणा इथे मन प्रसन्न करतो.
मोठ्या प्रमाणावर भक्त येऊनही सर्वांची चोख व्यवस्था करणारा सेवकवर्ग, भक्तांना पुरेसं मन भरेपर्यत देवाचं दर्शन घेऊ देणारे पुरोहित यामुळे मला गणपतीपुळ्याचा गणेश अधिक भावला असावा.
आरतीच्या वेळेलाही शिस्तबद्ध रचना आणि सूचना, त्यानंतर मिळणारा मन आणि जीभ तृप्त करणारा नेटका प्रसाद विशेष वाटला.
देवदर्शन करून आपण डोंगराला प्रदक्षिणा करायला बाहेर पडतो. हिरव्यागार नारळीच्या बाग्, कोकणातली पूर्वीची जुनी पाण्याची दगडी बांधीव पायर्‍यापायर्‍यांची कुंड, समोर अचानक दिसणारा समुद्र हे सगळं आनंद देतं.
गर्दीच्या दिवसात इथे नियोजन कसं असतं हे मी नाही अनुभवलेलं पण मंदिरात बसून शांतपणे अथर्वशीर्ष म्हणणे, गुरुजींची नेटकी आणि नेमकी योग्य शब्दांची आरती आणि मंत्रपुष्पांजली मला आवडली. इथली काकडआरती आणि शेजारती पुढच्यावेळी नक्की अनूभवायची असं मनाशी ठरवतच मी मंदिराच्या बाहेर पडले.

Monday, 17 December 2018

सागरास...

मऊशार वाळूत पाऊलखुणा उमटल्या
संध्येच्या लालिम्याने तारका हसल्या...
निळ्याशार सागराची खुणावणारी गाज
भरतीच्या पाण्याचा किनार्‍याला साज!!
वाळूतला किल्ला पाण्याने भरला
तुरतूर खेकडा शिंपल्यात लपला!!
दूरवर क्षितीजावर डोलणारी नाव
सूर्यबिंबाच्या साक्षीने खुलला आत्मीय भाव!!


Sunday, 16 December 2018

कळ्या

कळ्या
माळीकाका नेहमीप्रमाणे बागेत काम करत होते. ती सवयीप्रमाणे उठून गॅलरीत आली आणि छानसा आळस देता देता तिचं लक्ष काकांकडे गेलं. तिच्या बालपणापासून माळीकाका त्यांच्याकडे कामाला होते.
ती अगदी छोटी असताना बागेतल्या हिरवळीवर रांगायची तेव्हापासून माळीकाका तिला आवडतात.
धोतर नेसलेले,अंगात सदरा, कपाळी गंध आणि बुक्का,गळ्यात तुळशीची माळ.
रोज घरात यायचे तेच बागेतली फुलं घेऊन फुलदाणीत ठेवायला.ही रांगता रांगता पायात आली की तिलाही उचलून घ्यायचे हातात. आजीला आवडायचं नाही पण आई बाबा कौतुकाने पहायचे.
माळीकाका बागेला पाणी घालायचे, गवत कापायचे, झाडांना नीट कापून आकार द्यायचे, हिरवळीवर पडलेली वाळकी पानं काढून स्वच्छता करायचे. झाडावरची फुलं अलगद काढून परडीत ठेवायचे. आजी  मात्र बागेत येऊन स्वतःच्या हाताने पूजेसाठी फुलं तोडून न्यायची....
आईला फुलदाणीत सजवायला हवी असलेली फुलं काकाच नेऊन द्यायचे.
डवरलेल्या बागेत पक्षीही यायचे छान...
दिवस सरत होते. रीमा मोठी होत होती. आता शाळेत जाताना दोन वेण्यांवर आई हौसेने दारच्या बागेतल्या सूगंधी फूलांचा  गजरा घालून द्यायची.
सोनटक्का, गुलाब, कवठीचाफा अशी छान छान फुलं शाळेतल्या बाईंसाठीही ती घेऊन जायची हौसेने.
माळीकाकांच्या घरात कोण कोण होतं हे मात्र तिला कधीच कळलं नाही. ते एकटेच असतात असं तिला समजलं थोडं मोठ्ठं झाल्यावर.
माळीकाका दरवर्षी एकदाच सुट्टी घ्यायचे. आषाढी वारीला जायचे. आईने त्यावेळी त्यांना पैसे देताना रीमाने एक दोनदा पाहिलं होतं.
रीमाबेबी छान मोठी होईल,माझ्या विठ्ठलाचे आशीर्वाद आहेत तिला!
रीमा मोठी झाली तशी बागही वाढू लागली,बहरू लागली!
आता काॅलेजात जाणार्‍या रीमाला रोज माळीकाका हातात फुलांचा सुंदर गुच्छ द्यायचे.
रविवारी सकाळी रीमा काकांबरोबर बागेत वावरायची. शाळेत असताना नव्हता उत्साह तिला पण काॅलेजात फुलपंखी दिवसात मात्र तिला बागेत वावरायला आवडू लागलं. रोपांची निगराणी,पाणी घालणं,नवी रोपं तयार करणं हे रीमा शिकली!
आता रीमाच्या आयुष्याच्या बागेतही एक भुंगा रुंजी घालू लागला होता.
अभ्यास,काॅलेजचे कार्यक्रम, नाचाचा क्लास आणि कार्यक्रम, मित्र मैत्रिणींचे वाढदिवस या सगळ्या गदारोळात हा विशेष मित्रही आला. अजूनही रोज माळीकाका गुच्छ घेऊन सकाळी दारात येत रीमाच्या स्वागताला.
माळीकाका हळूहळू थकत चालले होते. पण उत्साहाने बागेत वावरत होते. रीमाला एक-दोनदा त्या मित्राबरोबर येताना त्यांनी पाहिलंही होतं.
 होता होता दिवस सरले. माळीकाका अजून थकले. थोडे आजारीही झाले.
हाॅस्पिटलमधे असताना रीमाच्या आई बाबांनी त्यांचा खर्च केला आणि रीमालाही त्यांना भेटावंसं वाटल्यावर आवर्जून भेटायलाही जाऊ दिलं त्यांनी.घरचाच घटक होते नं माळीकाका!
बाग या दरम्यान सुकली.रीमा काकांकडून शिकली होती त्याप्रमाणे वेळात वेळ काढून बागेकडे लक्ष देऊ लागली.ती बाग उजाड होऊ नये म्हणून जीवापलीकडे  सांभाळू लागली! काॅलेजलाही न जाता,मित्रालाही न भेटता बागेतल्या झाडांची काळजी करण्यातच तिला रस वाटू लागला.
काका बरे होउन येण्याची वाट ती पाहत होती पण काका गेले...
आई बाबा आणि रीमाला अतीव दुःख झालं.सर्व पुढची व्यवस्था बाबांनीच केली!!
एक  दिवस रीमाचा मित्र घरी आला आणि तिच्या घराजवळच्या एका इमारतीतल्या आऊटहाऊसमधे तिला घेऊन गेला...
अरे हे तर माळीकाकांचं घर आहे.पण आता ते इथे नाहीत... रीमाला हुंदका फुटला....
तो रीमाला म्हणाला" मला तू खूप आवडतेस आणि आपण शिक्षण आणि नोकरी असे स्थिर झालो की लग्नही करू. पण मला एक वास्तव तुला सांगायचय आज".
रीमा विचारात पडली.काकांच्सा आथवणीतून बाहेर येताना फिला त्रास होत होता पण मित्राने तिला घरात नेलं...
माळीकाका आणि काकू... ब्लॅक अँड व्हाईट एकमेव फोटो!! लग्नातला!!
पण काकूंना कधी पाहिलंच नाही रे मी!!!
" कशी पाहणार तू??? तुला जन्म दिला आणि इस्पितळातच गेल्या".
काय????? काकू????? मला ????? जन्म??????
अरे काय बोलतो आहेस मूर्खासारखं!!!!
हो रीमा.तू माळीकाकांची आणि काकूंची मुलगी आहेस!!!
ते तुझे आई वडील... जन्मदाते...
तुझ्या आई बाबांना लग्नानंतर पाच वर्ष मूल झालं नाही.आजी फार त्रास द्यायला लागली. लग्नाच्या आधीपासूनच तुझे बाबा तुमच्या बंछल्यात कामाला यायचे आणि संध्याकाळी उदबत्त्या वळायच्या कारखान्यात जायचे.
तुझा जन्म झाला आणि आई गेली... काकांना प्रश्न पडला की लेकराचं काय आता???
तुझ्या आजीने आई बाबांना समजावलं आणि माळीकाकांना विश्वासात घेऊन तुला कायदेशीर दत्तक घेतलं.
तू सधन घरात गेलीस आणि कामानिमित्त ते रोज तुला भेटत राहिले.
पण हे गुपित गुपितच राहिलं....
तुला रोज फूलं,गुच्छ देताना त्यांच्यातला जन्मदाताही सुखावत असेलच नं!!! निर्धास्त झाले ते आणि तुझ्या भविष्याची काळजीही मिटली त्यांची!!!
तुझा त्यांचा नुसता सहवासच नाही तर रक्ताचं नातं होतं म्हणूनच तुला त्यांच्याबद्दल इतकी आत्मीयता वाटते.
त्यांची कळी दुसर्‍याच्या हसर्‍या फुलत्या बागेत उमलली, त्यांचं रोपटं दुसर्‍या मातीत रूजलं पण म्हणून त्यांनी त्या बागेतल्या कळ्यांवरही तितकीच माया केली. पानाफुलांच्या जोडीने तुझ्यावरही माया करीत राहिलेच आणि ती आवड तुझ्याही मनात रुजवली....
रीमा आता अनाथाश्रमांच्या परिसरात बागा फूलवते. तिथल्या मुलामूलींना आर्थिक मदत देण्यापेक्षा आपल्या जोडीदाराच्या आणि आईवडिलांच्या मदतीने अनाथाश्रमातील विश्वस्तांशी बोलून प्रशिक्षित माळ्यांना नेमून बागा फुलवते.
त्या बागेतली फुलं भरभरून ओंजळी आश्रमातल्या देवाला वाहण्यापेक्षा अनाथ मुलामुलींच्या ओंजळी त्यांनी भरून टाकते, त्या कळ्यांची दुसर्‍या दिवशी फुलं होतात...

Saturday, 15 December 2018

भजन सेवा

गावातल्या मंदिरात सुरु होई अभंग
त्याच्या सुरांचे येती वार्‍यावरून तरंग!!
रात्रीचा गारवा होई भक्तिमय सारा
मनामनात आनंद भरला गाभारा!!
कुणा हाती वीणा कुणी घेई झांज
भक्तिच्या सागरी भक्तिचीच गाज!!
कुणी घाली लोटांगण कुणी नाचवी पालखी
ढोल ताशांच्या सवे हो नादतसे हलगी!!
देव देवळातला रात्रभर जागा
भक्तीच्या उन्मादात भक्त रंगिला वो रंगा!!
असा हा उत्सव चालला दिनरात
देवाजीच्या कृपेला भक्ताचीच साद!!
मी ही गाते भजन होऊन लीन मनी
वंदिता तुजला देवा सुखावले क्षणी!!  

Friday, 14 December 2018

गोष्ट इंद्रधनुष्याची

एकदा देवबाप्पा एकटाच खूप कंटाळला. कुणी हसायला नाही की बोलायला नाही....
मग त्याने त्याच्याबरोबर खेळायला एक छोटा देवदूत तयार केला. दोघे मिळून गप्पा मारायचे,खेळायचे. पण थोडेच दिवसात दोघेही कंटाळले! अरेच्चा!!
देवदूत म्हणाला बाप्पाला की मला माझ्याशी खेळण्यासाठी छोटे मित्र मैत्रिणी हवे आहेत.... मग देवबाप्पा म्हणाला की अरे त्या बाळांसाठी एक छा न घर हवं.त्यांची काळजी घ्यायला कुणीतरी हवं.खाऊ हवा...
मग काय... लगेचच देवाने नदी,झाडं,डोंगर,वनस्पती तयार केल्या. छोट्या मुलांची काळजी घेण्यासाठी आईबाबांनाही शिकवलं आणि मग छोटी बाळं पृथ्वीवर मजेत बागडू लागली...
पण मग हे सगळं नुसतंच पांढरं होतं.हे असं छान नाही दिसत. मग काय करूया??
देवाने हिरवा रंग तयार केला आणि देवदूताने तो सगळ्या झाडांच्या पानांना दिला.त्यामुळे सूर्यप्रकाशात झाडं आपला खाऊ आपणच तयार करू लागली.
झाडांना येणारी फुलं,फळं यांनाही रंग नव्हते.
मग देवदूताने लाल रंग तयार केला. गुलाबाच्या पाकळ्यांना तो ब्रशने लाल रंग देऊ लागला. गुलाबाच्या फुलाला त्या ब्रशने गुदगुल्याच झाल्या.
उरलेला लाल रंग त्याने काही झाडांच्या पानांनाही दिला.तरी थोडा रंग राहिलाच शिल्लक!
मग देवाने केशरी रंग तयार केला, झेंडूची फुलं,मॅपलची पानं असं सगळं सजलं... तुम्ही ओळखा पाहू देवाने अजून कशाकशाला केशरी रंग दिला असेल???
मग पिवळा रंग त्याने सूर्याला दिला.पण सूर्याला केशरी रंगच जास्त आवडला.तो बसला रूसून... मग देव त्याला म्हणाला की रूसू नको रे आदित्य! तुला केशरी रंगही देतो पण तो फक्त तुझ्यावर सकाळी उगवताना आणि संध्याकाळी मावळतानाच दिसेल! आदित्य खुशच झाला.
हिरवा रंग भाज्यांना, कलिंगडासारख्या फळांनाही देऊन झाला.त्यावर काळ्या रंगाने नक्षीही काढली देवदूताने.
मग निळा,पारवा आणि जांभळा रंग तयार झाले. सांगा बरं तुम्हीच की हे रंग देवदूताने कशाकशाला दिले असतील???
व्वा व्वा.सगळं जग रंगीबेरंगी दिसू लागलं... रंगीत फुलपाखरं बागडू लागली. डोंगरांवर इवल्या इवल्या रंगीत रानफुलांचे गालिचे पसरले.
पृथ्वीवर मुलं मुली आनंदाने नाचू लागले.
देवदूताच्या हातून निळ्या रंगात चुकून पांढरा रंग पडला आणि झाला फिकट निळा सुंदर रंग. देव म्हणाला थांब थांब." हा रंग छान आहे.मला आवडलाय.माझ्या घराला देऊया."
तो रंग फारच छान दिसायला लागला...
देवदूत म्हणाला देवाला की हे बाकीचे छान रंग थोडे उरलेत.त्याचं काय करूया?
देव म्हणाला "आयडिया". माझ्या घराची एक भिंत रंगवूया..,, देवाने ब्रश घेतला आणि उरलेले तांबडा, नारंगी,पिवळा!हिरवा,निळा,पारवा आणि जांभळा रंग ओळीने एकाखाली एक अर्थगोल असे रंगवले भिंतीवर.
देवदूत म्हणाला मस्तचचच.पण ही कमान माझ्या पृथ्वीवरच्या मित्रांना कशी दिसणार?
देव म्हणाला" जेव्हा पावसाळ्यात एका बाजूला सूर्य असेल आणि दुसरीकडे पाऊस असेल भुरभुर तेव्हाच आकाशातल्या माझ्या भिंतीवरची ही कमान सगळ्यांनाच दिसेल."
हिचं नाव काय ठेऊया?? कमान...
नको... माझा एक मित्र आहे.त्याचं नाव इंद्र. ही कमान रंगवायला त्याने मला मदत केली आहे आणि त्याच्या हातात एक धनुष्यही असतं.त्यामुळे या कमानीला आपण मराठीत इंद्रधनुष्य म्हणू. इंग्रजीत Rainbow आणि हिंदीत तीर कमान....
दिसतं नं तुम्हालाही पावसाळ्यात देवाच्या आकाशी भिंतीवरचं सातरंगी इंद्रधनुष्य???
 डाॅ.आर्या जोशी

चारोळ्या

१ )आले कुठे? कुठूनी आले?
चालता चालता हरवूनी गेले!
हिरव्या गवताच्या पात्यांनी
गुलाबी रानफुले डोलवीत आले!!


२)जंगलातलं तळं पाण्याने भरलेलं
व्याकुळ हरिण मात्र मृगजळामागे धावलेलं!!

३)घोंगावणार्‍या वार्‍यांनी वादळ आलं
खोल खोल समुद्राला हेलावून गेलं!!

४)मनातला भाव डोळ्यात वाचताना
सांजावलेल्या पापण्यात मिटून घेताना!!

५) प्रेमरंगी न्हाऊनी गेले
तृप्त झाले मनी
दुरुनी आला पावा कानी
बावरले साजणी!!

६) तुझ्या आठवांचा शहारा!
गंधाळला सांजवारा
रातराणीचा पसारा
अंगणी माझ्या!!

Thursday, 13 December 2018


नसतं एखाद्या नात्याला नाव
म्हणून खोटे असतात का मनातले भाव?
गुपित उलगडावं तसं नातं उमलत जातं
हळुवार मखमलीच्या लड्या गुंफीत जातं
मनातलं मनाला समजायला लागतं
मनतळ्याकाठी प्राजक्ताचं झाड सडा घालायला लागतं
प्राजक्ताच्या सुवासात मनही घमघमतं
झाडंही आता नाचू डोलू लागतं
नातं तुझं माझं प्राजक्ताचं फूल
रात्रीच उमलतं  पण पहाटेला घालतं भूल
त्या पहाटेला  भात गातो भूपाळी
प्राजक्ताच्या अबोलतेची शांत हळुवार कथुली!

निसर्ग साक्ष


मंद वारा,पहाटेची झूल
सोनचाफ्याच्या झाडाला गंधाची चाहूल
दवाने भिजले पान आणि पान
फुलांनी छेडली सुरेल तान
हिरव्या पानात दडली पिवळसर कळी
सोनकेशरी उन्हाच्या गालावरची खळी
कुणीतरी कुणाला साद दिली झाडावर
बहरलेल्या फांद्यांवर, थंडगार झर्‍यावर
त्यांच्या आवाजाने भारून गेला आसमंत
मधुर कूजनाने मन झाले तृप्त
प्राजक्ताचा सडा भरले आहे अंगण
वासुदेवाच्या अभंगाने  भिजले विठ्ठलाचे चरण!!
आयुष्य असं आपलं सृष्टीने भारलेलं
प्रत्येक क्षणी निसर्गाच्या साक्षीने सजलेलं!

माझ्या ओव्या

पहिली माझी ओवी! देवाजीच्या पायी!
फुलांची ओंजळ! त्याच्यासाठी!!
दुसरी माझी ओवी! झाडापानांसाठी!
त्यांच्या सोबतीने! पक्षी राहती!!
तिसरी माझी ओवी! शेतीभातीसाठी!
धरतीच्या कुशी! हिरवी बाळे!!
चवथी माझी ओवी!चवतीचा चांद!
मळ्यात आपुल्या ! कष्ट करी!!
पाचवी माझी ओवी! चंद्राची  चांदणी!
खेळे माझ्या अंगणी! रातदिन!!

Wednesday, 12 December 2018

कोल्हापूर अंबाबाई मंदिर एक भावपूर्ण दुपार

एक दुपार भावपूर्ण
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा परिसर तसा शांतच होता. देवीसुद्धा बहुधा वामकुक्षी करीत असावी.भक्तांची काळजी वाहून श्रांतावलेली..
उत्कृष्ट शिल्पकामाने सजलेले तिचे मंदिर. तिथलं शिल्प आणि शिल्प ऊन सावल्यांचा छायाप्रकाशाचा खेळ झेलत जिवंत होत होतं.
भाविकांचे असंख्य प्रकार अनूभवताना मजा येत होती. त्या चार तासात मी चार हजार माणसं तरी "पाहिली" असतील.
त्यात लक्षवेधी होती देवीच्या पाया पडायला आलेली नवी जोडपी.त्यातही दोन प्रकार.काहीजण लग्नानंतर हातभर हिरवा चुडा घालून , डोक्यात गजरा,सुंदर साडी अशा नटलेल्या आणि आपल्या पतिराजांच्या हातात हात घालून प्रदक्षिणा घालणार्‍या युवती! तर दुसर्‍या गटात कार्यालयातून थेट मंदिरात आलेली जोडपी!यातही ग्रामीण परंपरा,शहरी आणि ग्रामीण अशी संमिश्र संस्कृती तर काही अगदी आधुनिक पोशाखातल्या वधू!
या प्रत्येक जोडप्याबरोबर तितक्याच नटलेल्या करवल्या आणि एखादी जाणती महिला. करवल्यांच्या हाती करा आणि दिवा आणि महिलेच्या हातात ओटीची पिशवी. सात जन्माची गाठ बांधूनच मंडळी येत होती. मला हे प्रकर्षाने दिसून आलं की नवरा मुलगा चालायला लागला की ती बांधलेली गाठांची वस्र सांभाळत नवरीला त्याप्रमाणे चालावं लागे!!! यह सिलसिला इस मोडसेही शुरु होता है .... मग हमखास तिचं जोडवं,डोक्यावरची बिंदी,नाकातली नथ असं काहीतरी हलायचं किंवा पडायचं! मग मात्र नवरोजींना थांबवच लागे.. अशी गंमत सुरु होती.
भाविकांचेही असंख्य प्रकार.चंपाषष्ठीच्या नवरात्रामुळे जोतिबाला जाऊन त्याच्या आशीर्वादाचा जांभळट गुलाबी गुलाल माथी मिरवत लोक येत होते. काही तुळतुळीत माथ्याचे... हे बालाजीला जाऊन आलेले.
आई नुसती चालणारी,बाबाच्या हाती बाळाची पिशवी आणि आजीच्या दोन हातांवर झोपलेलं नातवंड.
वैविध्यपूर्ण पोशाख आणि त्यात भाविकता घेऊन आलेली माणसं.
काहीजण सेल्फीत मग्न, काहीजण देवळाचे फोटो काढण्यात.कुणा हाती संपूर्ण ओटी तर कुणा हाती नुसतच कमळाचं फूल!!
आपापल्या धारणेनुसार आणि भक्तिनुसार जो तो देवीची आराधना करीत होता.काहींच्या गळ्यात कवडीची माळ, कुणा घुंगट ओढलेल्या राजस्थानी महिलेच्या हाती धातूची देवीमूर्ती!!
कुणी प्रसादाचे लाडू विकत घेणार तर कुणी अभिषेकाची पावती करणार. लहान मुलं परिसरात मोकाट धावत सुटणार, तर कुणी ओसरीवरून खाली उडी मारणार!
एक गोष्ट न चुकता प्रत्येक महिला करत होती. आवारातल्या ठुशीच्या दुकानात डोकावणे आणि अटळ अशी खरेदी. तोपर्यंत फक्त खिशात हात घालण्याची अनैच्छिक आणि सक्तीची,तरीही प्रेमाची जबाबदारी पूर्ण करणारा वर्ग मोबाईलमधे गर्क. हाक आली की नोट काढून देणार फक्त!!! हा हा हा!!! कोणत्याही समाजगटात वयोगटातल्या जोडप्यात दिसणारं हे कमालीचं साम्य!!
गुरुजींशी अभिषेक ठरवणारे भक्त, नियमीत दर्शनाला येणार्‍या स्थानिक आजी आजोबांच्या गप्पा, सस्थानकडून लाऊडस्पीकरवरच्या सूचना हे सगळं त्या आवाजाची उंची वाढवत होतं.
मी आत जाते,त्या गर्दीतही देवी मला पोटभर भेटते, दर्शन देते आणि मी तृप्त मनाने पुन्हा त्या गर्दीचा भाग होते.
मलाही असंच कुणी कुणी पाहिलं असणारच की आणि माझं चित्रही त्यांच्या डोळ्यात उमटलं असेलच की... पण मी ते शब्दबद्ध केलं कारण माझं त्यांच्यापेक्षा असलेलं वेगळेपण मला गाभार्‍याच्या थंडगार वातावरणात जाणवून गेलं.















Saturday, 8 December 2018

मुग्धा घर बांधते....


मुग्धाचा बाबा निसर्गवेडा. बाबाने पुण्याजवळच्या एका छोट्या गावात शेतजमीन विकत घेतली आणि तिथे शेती करायचं ठरवलं.आपाल्या कामांचे व्याप सांभाळून शेतीचाही आनंद घेणं,मुग्धाला खुला मोकळा निसर्ग वाचायला शिकवणं असा त्यांचा हेतू होता.
शेतात रहायला घरही हवंच नं! पण बाबा म्हणालं की आपण निसर्गपूरक मातीचं घर बांधूया. मुग्धाची मावशी आर्किटेक्ट होती.तशीच निसर्गप्रेमी. मातीची घरं बांधायचं शिक्षण तिने आवर्जून घेतलं होतं. मग काय... मस्त टीम जमली आणि मुग्धाच्या शेतात मातीच्या घराचं काम सुरु झालं.
आता मातीची घरं बांधायची तंत्र लोक विसरले आहेत.सगळे सिमेंट किंवा चिरा वापरतात. पण मुग्धाच्या नव्या गावात राहणारा बंकाराम तयार झाला नवं तंत्र शिकायला!
मुग्धाला तसंही मातीत खेळायला प्रचंड आवडायचंच त्यामुळे तिची तर चंगळच होती. दिवाळीच्या सुट्टीत मावशीबरोबर दर दोन दिवसाआड मुग्धा एस.टी.ने जाऊ लागली कोतापूरला. तसं तासाभराचंच अंतर.पण बाबाच्या गाडीखेरीज आणि शाळेच्या व्हॅनखेरीज दुसर्‍या कुठल्याच वाहनात न बसलेली मुग्धा या प्रवासाची मजा घेऊ लागली. मुग्धाला कंडक्टर काका आणि प्रवाशांची भांडणं एकताना पण गंमत वाटू लागली.
बंकाराम काका आणि त्याची गावातली ओळखीची काका,मावशा मंडळी रोज येऊ लागली. मुग्धाही आता त्या प्रक्रियेचा आनंद घेऊ लागली.
मावशीच्या सूचनेप्रमाणे माती कालवून त्याच्या विटा पाडणं,त्या सूर्यप्रकाशात वाळवणं या सर्व कामात मुग्धाही बरबटून जायची.पण ती जामच खुश होती... सगळ्या काका मावशांच्यात बसून त्यांच्या शिदोरीतली भाजी भाकरी खायला मुग्धा इथेच शिकली... झणझणीत रस्सा आणि कोरडीशी भाकरी, काहीवेळा ठेचाही.
विटा पाडून झाल्या आणि मावशीने भिंती चढवायला घेतल्या. मापं कशी घेतात, विटा कशा रचतात, त्यांच्यामधे मातीच कशी लिंपतात हे पाहून पाहून मुग्धाही ते लीलया करायला शिकली. आईने आणि मुग्धाने शेण आणि मातीच्या ओल्या मिश्रणाने घराच्या भिंतीही लिंपल्या!घरच्यांच्याच काय तर गावकर्‍यांच्याही कौतुकाचा विषय झाली!बाबाही रोजच्या कामातून वेळ काढून येई तेव्हा तोही घराचं काही ना काही काम करीत असे.
आता दरवाजाच्या आणि खिडक्यांच्या चौकटी तयार होऊन आल्या. सुतारकाकांची धांदल पाहत मुग्धाही ती हत्यारं काळजीपूर्वक हाताळू लागली. रंधा मारून पडलेला गोलगोल भुसा तिने आईबरोबर बसून रंगवला आणि काड्या लावून फुलदाणीत ठेवला!
खिडक्यांच्या चौकटीला कडू तेल लावायचं होतं.मुग्धा ऐटीत ब्रश घेऊन बसे आणि लाकडाला तेल लावी. तेल पिऊन तुकतुकीत झालेलं लाकूड पहायला तिला मस्त वाटे.
मातीचा किल्ला करणं, मातीची भांडी करणं, लाकडाच्या वाया गेलेल्या उरलेल्या ठोकळ्यांना चिकटवून रंगवणं या उद्योगाने मुग्धाची पुण्यातली खोलीही भरुन गेली. दिवाळी सुट्टी संपून शाळा सुरु झाली तरी मुग्धाबाई चक्क दांड्या मारून कोतापूरला पळायच्या.आई बाबांनीही तिला हे स्वातंत्र्य दिलं कारण त्यातून मुग्धा खूप नव्या गोष्टी शिकत होती मोकळ्या निसर्गात... ज्या तिला शाळेच्या चार भिंतीत शिकायला मिळाल्या नसत्या....
पाचवीतली मुग्धा मावशीसारखाच कागदावर घराचा आराखडा काढायला शिकली.घराच्या छपराची रचना कामगारांना दाखवायला मावशीने पुठ्ठ्याचं घर केलं त्यातही मुग्धा मॅडम लुडबुडल्या.
हळूहळू घराने आकार घेतला. बांबूचं छत तयार करण्यासाठी भोरला बांबू पहायलाही मुग्धा गेली आणि तिथल्या काकांकडून तिने बांबूविषयी माहितीही मिळवली.  त्यावर्षी शाळेचा प्रकल्प तिने बांबू या विषयावरच केला!
पावसाळ्याच्या तोंडावर काजव्यांनी लखलखणारं आपल्या शेतातलं झाड पाहून ती नाचायलाच लागली!!विंचू, साप,बेडूक यांच्याशीही तिची ओळख होऊ लागली...
मितालीताईच्या लग्नात आजी गंमतीने मुग्धाला म्हणाली की मुग्धा पहा बरं... लग्न केलं की नवर्‍याच्या घरी रहायला जावं लागतं...

त्यावर मुग्धाबाई टेचात म्हणाल्या.,. मुळीच नाही... मी लग्न करणारच नाही... आणि केलं तरी माझा नवरा "माझ्या" घरी रहायला येईल कोतापूरला... कारण माझं ते घर "मीच" बांधलं आहे नं???







Friday, 7 December 2018

पुष्पदरीतील झुंज... जगण्या मरण्याची


यावर्षी व्हॅलीला जायचं तिचं नक्की झालं होतं.आईला चारधाम करण्याची इच्छा होती.पण एकदम सगळं जमणं कठीण वाटत होतं.त्यामुळे आईचं बद्रिनाथ होईल आणि आपला व्हॅलीला जाऊन ट्रेक आणि फुलांचा अभ्यास दोन्ही होईल अशा विचाराने तिने मावशीला आणि काॅलेजमधली घट्ट मैत्रीण अनुयालाही बरोबर न्यायची तयारी केली. चौघीच जाणार म्हणून बाबा काळजीत होते पण तिचा मित्र  राकेश त्याचदरम्यान त्याच्या ट्रेकिंग क्लबबरोबर आसपासच्या परिसरात फिरणार होता.त्यामुळे सगळंच जुळून आलं.
पहिला प्रवास सुखरूप पार पडला आणि मंडळी मजल दरमजल करीत घांगरियाला पोहोचली. आई आणि मावशी गोविंदघाटहून घांगरियाला घोड्यावरून येऊन हाॅटेलात दाखल झाल्या आणि ती म्हणजे स्वप्नजा आणि अनुया राकेशच्या समूहाबरोबर दिवसभराची खडी चढण चढून पोहोचल्या. दमून झोपल्या आणि पहाटे अंमळ चारच्या आसपासच उठून राकेशच्याय गटासह त्या दोघींनी पुष्पदरीची वाट चोखाळायला सुरुवात केली. ग्लेशिअरच्या वितळलेल्या बोचर्‍या पाण्याचे झरे,आकाशाशी स्पर्धा करणारे हिमालयाचे पर्वत, भोवतालची आच्छादित वनराजी आणि पुष्पदरी नाव सार्थ करणारी फुलांची आरास आणि गालिचे....

तिने टिपण साहित्य कॅमेरा सोबत घेतला होताच. स्वप्नजाला पी.एचडी नंतर पोस्ट डाॅक्टरेट करण्यासाठी पुष्पदरीतल्या विशिष्ट फुलाचा अभ्यास करण्याची तीव्र इच्छा होती.त्यासाठी तिच्या मार्गदर्शकांनी तिला प्रोत्साहन दिलं होतं.विशिष्ट काळात पण अगदी कमी काळासाठी उमलणारी हिमालयाच्या पुष्पदरीतली ही नाजूक वनस्पती अभ्यासणं हे आव्हानच होत.पण स्वप्नजाची जिद्द दांडगी होती.त्यामुळेच राकेश आणि अनुयाही तिला मदत करत होते.

मधल्या टप्प्यात आल्यावर बरोबरचा कोरडा खाऊ सगळ्यांनी खाल्ला.गार झर्‍याचं पाणी प्यायले. आता विरळ हवामानात श्वास घ्यायलाही त्रास होत होता पण एकमेकांचं मनोबल वाढवत हसत खेळत सगळे पुढे जात होते.निघण्यापूर्वी महिनाभर केलेला व्यायाम इथे उपयोगी पडतो अशावेळी!

अचानक.... अनुयाच्या लक्षात आल.... स्वप्नजा?????

तिने राकेशला हाक दिली... शोधाशोध आणि धांदल उडली....

इकडे फुलांचा सुगावा लाजल्याने भान हरपून स्वप्नजा पुढे जात राहिली.फोटो काढणं,सोबतच्या पिशव्यामधे जपून फुलांचे नमुने गोळा करणे यात तिलाही कळलं नाही की ती सर्वांपासून लांब वेगळ्याच वाटेने पुढे भरकटली होती.... आत आत उंच झाडांच्या  गर्द सावलीत  पोहोचली.....

आपण कुठे आलो आहोत याची तीव्रतेने जाणीव होण्यापूर्वीच ती जोरात किंचाळली... एक युवक निपचित अवस्थेत पदला होता... तो जिवंत होता की.....??? खरचटलेला... काट्याकुट्यांच्या रूतलेल्या खुणा... जखमी... कपडे फाटलेला,,, पाठीवर सॅक तशीच,.. बूट फाटलेले....

ती क्षणभर धीर करून सावरली. दबकत पण भेदरलेल्या धडधडत्या हृदयाने पुढे गेली..... तो जिवंत होता... श्वास मंदावला होता पण चालू होता श्वास.......

तिने क्षणाचाही विलंब न करता आपली सॅक, कॅमेरा उतरवला.त्याच्या तोंडावर पाणी मारलं बाटलीतलं सपासप... त्याच्या छातीवर चोळलं.... पण तो अजूनही निःशब्द होता....

दोन दिवस एक गिर्यारोहक वाट चुकलेला असून त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक संस्था हेलिकाॅप्टरने प्रयत्न करीत आहेत हे तिला ऐकून माहिती होतं.सगळ्याचं हळहळूनही झालं होत. पण हाच असावा तो,.,. पण तो गिर्यारोहक व्हॅलीत वाट चुकला नव्हता... मग हा इथे कसा आला????? विचारांच्या आवर्तात ती हेही विसरली की आपण स्वतःही वाट चुकलो आहोत आणि आपल्याला सगळे शोधत असणार... आता आपण दोघेही समदुःखी... हा अनोळखी गिर्यारोहक आणि आपण स्वतः.

अंधारायला लागलं.तिलाही दमल्यासारखं झालं.तेवढ्यात त्याचा थकलेला क्लांत अस्पष्ट हुंकार तिने ऐकला.

तिने त्याला पाणी पाजलं. त्याला कसंबसं बसतं करून त्याची सॅक काढली.उघडली आणि आता फर्स्ट एडचं सामान हाती लागलं.बिस्कीटचा पुडा आणि इलेक्टालचं पाकिटही!!! टाॅर्चही होता.

ती आता सावरली तोच हेलिकाॅप्टरची घरघर ऐकू आली.पण तिला ते दिसेना!!! त्यांना ते कसे दिसणार!! तिच्या पल्लवीत आशा क्षणात मावळल्या.

थकल्या मनाने आणि शरीराने ती लुडकली.शरीराच्या विधींचं भानही विसरून गारेगार झोप लागली तिला तिथेच त्याच्या शेजारी.

जाग आली तेव्हा उजाडत होतं. तो अजूनही अस्पष्ट पुटपुटत होता, तो जिवंत आहे अजून... तिने घाइघाईने बाटलीत इलेक्टाल भरून त्याला महत् कष्टाने पाजलं. स्वतः चार बिस्कीटं कोंबली. त्याच्या जखमा आपल्या स्कार्फने पूसून मलम लावलं. रूतलेले काटे तिला काढायला भिती वाटली पण प्रयत्न केला निकराने. गालावर अडकलेला काटा निघाल्यावर तो विव्हळला अस्पष्ट.पण तिला त्यामुळे हुशारी आली.डोळे किलकिले करून त्याने पाहिलं तिला पण पुन्हा निपचित झाला काहीसा मनोमन नकळत आश्वस्त होऊन.

आता तिला आपल्या शरीराची,मनाची!बुद्धीची जाणीव झाली.... दोघांचीही सुटका होणं हे आता महत्वाचं होतं.....

सुदैवाने हा विचार मनात येताच पुन्हा हेलिकाॅप्टरचा आवाज आला.... तिच्या डोक्यात वीज चमकली आणि तिने कॅमेरा उघडला.आकाशाच्या दिशेने लेन्स करून तिने क्लिकक्लिकाटच सुरु केला.त्या गर्द झाडीतून हा चकचकाट वर दिसावा वैमानिकाला ही तिची अपेक्षा.... आवाज वाढे आणि कमी होई.घिरट्या घालण्याच्या आजच्या प्रयत्नात तिची युक्ती वैमानिकाला दिसली.कुठूनतरी गर्द झाडीतून मधेच चकाकतय. एक प्रयत्न करून पाहू....

सफल शोध... वाढणार्‍या घरघर आवाजाने ती सूखावली.जोरजोरात ओरडू लागली. स्कार्फ हवेत हलवू लागली.कॅमेर्‍यातून क्लिक करत राहिली... मदतीचा दोर आणि एक सहाय्यक अंतिमतः त्या गर्द झाडीत उतरले. अनपेक्षित त्याला पाहून तिला हुंदकाच फुटला....

....... आता ते दोघेही गोविंदघाटच्या इस्पितळात होते.... सुखरूप.....

तोही शुद्धीवर आला आहे.नाजूक आहे प्रकृती पण सुखरूप आहे... भटकंती करताना वाट चुकला आणि पाय निसटून दरीत कोसळला.नशीब बलवत्तर म्हणून वाचला. मोडक्या आणि सुजलेल्या हातापायाने जिवाच्या आकांताने दरी चढून जीवाशी आणि आयुष्याशी खेळ खेळतच इथे आला.... एवढंच आठवलं त्याला.... दिशाज्ञान,भूगोल!नकाशे सर्वच थिटं पडलं होतं त्याच्यासाठी... पण देवाने स्वप्नजाच्या रूपात त्याला नवं आयुष्य भेटवल...

तो मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. अभियंता आहे. आता आयुष्य पूर्ववत होतं आहे. स्वप्नजाच्या रूपाने एक छान मैत्रीण त्याला मिळाली आहे.

Thursday, 6 December 2018

घुबड

पुष्करचे बाबा वनाधिकारी होते. दरवर्षी सुट्टीत दिवाळीत आणि मे महिन्यात तो आईबरोबर जंगलात जात असे बाबांबरोबर रहायला. खूप आतुरतेने तो वाट पाहत असे त्या दिवसांची.
बाबाबरोबर पहाटे झर्‍यावह जाणं,रात्रीच्या अंधारात घराच्या अंगणातून बाहेर पडून घुबडांचे आवाज ऐकणं! मे महिन्याच्या शेवटी पावसाळ्याच्या आधी काजव्यांनी चमचमणारी झाडं डोळे भरुन पाहणं असं खूप खूप काही...
आई खूप सारा वेगवेगळा खाऊ सोबत नेत असे.जंगलात फारसं काही मिळत नसे आणि काही हवं असेल तर बाबा जीपने जवळच्या गावात जातील तेव्हा कुणा बरोबरतरी पिशव्या भरून पाठवत असत. अगदी फोनसुद्धा तिथे लागायचा नाही.त्यामुळे पुष्करला दोन्ही आजोबा आजींची आठवण आली तरी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी खूप वाट पहावी लागे.मात्र तरीही तो जंगलात खुश असे.
यावर्षी बाबा जिथे होते तिथे त्यांची नुकतीच बदली झाली होती. बाबांची घरातली कामं करायला आणि स्वयंपाक करायला जंगलात राहणारी चिंधी नावाची आजी रोज येत असे. तिचा नातू गोलू तिच्याबरोबर एके दिवशी आला.पुष्करच्याच वयाचा. पुष्कर पाचवीत होता त्यामुळे तोही पाचवीतच असेल असं पुष्करला वाटलं. पण इथेच खरी गंमत होती.
चिंधी आजीला आईची भाषा बोलता येईना.बाबाची कामं ती खाणाखुणांनीच करीत असे.आणि आता गोलूसारखा सवंगडी मिळाला तरी भाषा कुठे येत होती त्यांना एकमेकांची???
मग पुष्कर आणि गोलूही खाणाखुणांनी बोलू लागले.
दोन दिवसानंतर चिंधीआजीशी जरा ओळख झाल्यावर आईने बाबाला विचारलं आणि बाबाच्या परवानगीने पुष्करला गोलूबरोबर जंगल उनाडायची परवानगी मिळवली.
चिंधीआजीने आपल्या गोंडी भाषेत गोलूला समजावलं आणि छानसं हसून पुष्करच्या गालावर हात फिरवून आपल्या कानांपाशी बोटं मोडली.आता गोलू आणि पुष्कर जंगल वाचायला बाहेर पडले.
गोलूला हे जंगलाचं अख्खं पुस्तक पाठ होतं.झाड आणि झाड, पक्षी आणि पक्षी त्याला ओळखू येत असत.झरे,निर्झर अगदी उन्हाळ्यातही कसे झुळूझुळू वाहतात हे पाहून पुष्करला आश्चर्यच वाटलं.
प्राण्यांची जंछलात पडलेली विष्ठा, पिसं, प्राण्यांच्या पावलांचे जंगलवाटांवर उमटलेले ठसे असं सगळं सगळं गोलू पुष्करला दाखवत होता.
चारेक दिवसांनी पुष्करने आईकडे तिचा मोबाईल मागितला... गेम खेळण्यासाठी नाही... जंगलात पाहिलेल्या गोष्टी टिपण्यासाठी. नोंदवून ठेवण्यासाठी.आईनेही  तो काळजीपूर्वक वापरायला सांगून त्याला दिला आणि तो फोन पाहून गोलूही हरखून गेला.
गोलू आणि पुष्कर रोज भटकायचे. गोलू जंगलातला मेवा पुष्करला खायला देई.कशाचीतरी गोडूस रसाची पान,करवंद,जमिनीखालचे उकरलेले कंद, फुलांच्या देठातील चोखलेला गोड रस असं सगळं पुष्कर खायला शिकला.नवनवीन बिस्कीटं,चाॅकलेटं असं आता पुष्करही गोलूला द्यायला लागला.
पुष्करला आणि गोलूला खाणाखुणांनी बोलता यायला लागलच पण आता पंधरा दिवसाच्या ओळखीत गोलू मराठीचे पाच सहा शब्द आणि पुष्कर गोंडीमधले तीन चार शब्द बोलायला शिकले!!
गोलूने पुष्करला जंगल दाखवलं तसंच पुष्करनेही गोलूला आपली बरोबर आणलेली पुस्तकं दाखवली, खेळ खेळायला शिकवले.त्या दोघांची छान गट्टीच जमली.
एकीकडे पुष्कर आणि गोलू यांनी एके दिवशी चक्क दिवसा झाडीच्या ढोलीत बसलेलं घुबडाचं पिलू पाहिलं. दिवसाढवळ्या दिसलेलं घुबडाचं चक्क गोंडस पिलू पाहून पुष्करने त्याचे भरपूर फोटो आणि व्हिडीओ काढले. घुबड आईला आणि पिलूला कोणतीही चाहूल लागणार नाही आणि त्रासही होणार नाही याची काळजी गोलूने घेतली.
घरी परतल्यावर बाबाला पुष्करने नेहमीप्रमाणे दिवसभराचा वृतान्त सांगितला जेवताना आणि फोटोही दाखवले.
हे घुबड????? अरे हे कुठे दिसलं??? चल आत्ता लगेच जाऊया... दाखव मला...
पुष्करला कळेना की बाबा इतका का घाई करतो आहे?????
बाबाने जीप काढली आणि पुष्करला घेऊन तो निघाला. अंधारात पुष्करला रस्ता दाखवताना थोडा प्रश्न पडला पण बाबाला त्याने खाणाखुणा सांगत रस्ता सुचवला.बाबालाही कौतुक वाटलं!! बाबाने मनोमन गोलूलाही शाबासकी दिली.
बाबाने त्या घुबडाचा आवाज ऐकला आणि बाबाचे डोळे लकाकले!!!
कोणत्यातरी आनंदातच बाबा परतला आणि त्याने पुष्करला पातीवर थाप मारून दोन हात उंच करून टाळी दिली!!
दुसर्‍या दिवशी गोलू येईपर्यंत बाबा घरीच थांबला. वनाधिकारी साहेब आपल्याशी काय बोलणार या कल्पनेने गोलू भांबावलाच पण पुष्करने त्याला विश्वास दिला.
गोलूच्या खाणाखुणा पुष्करला नीट समजायला लागल्या होत्या.बाबाचे त्या घुबडाच्या पिलाबद्दलचे सर्व प्रश्न पुष्करने गोलूला विचारले आणि गोलूची उत्तरे पुष्करने बाबाला समजावून सांगितली. चिंधीआजीपण मधे काही काही सांगत राहिली.आईने हे सर्व दृश्यही चित्रित केलं... कौतुकाने आणि गंमतीने.
संध्याकाळी बाबाच्या टीममधले अजून चार काका घरी आले. पक्ष्यांचे आवाज रेकाॅर्ड करायला यंत्र, पक्ष्यांचे फोटो काढणारा विशेषज्ञ अशी ती मंडळी होती. चिंधी आजीचा मुलगा म्हश्या म्हणजे गोलूचा बाबा आज गोलूला घेऊन आला संध्याकाळीपण.
हे सगळे गोलू आणि पुष्करसह निघाले त्या घुबडाच्या पिलूला शोधायला.
रात्रभर शोधमोहीम झाली. पुष्कर हे जंगल असं रात्री पहिल्यांदाच अनुभवीत होता. या घुबडाच इतकं काय काय कौतुक का चाललय हे मात्र त्याला आणि गोलूला कळेना. कधीतरी मध्यरात्री जीपमधेच दोघे लुडकले.
दोन तीन दिवसांनी आईची आवराआवरी सुरु झाली.गोलू आणि त्याचं हे जंगल सोडायला पुष्करला जीवावर आलं होतं. पण बाबाने खुशखबर दिली की गोलूपण काही दिवस त्याच्याबरोबर पुण्याला येणार आहे!!! पण फक्त काही दिवसच!!
पुण्याला आल्याआल्या पुष्करने इंटरनेट सुरु केलं.गोलूला शेजारी बसवलं आणि तहानभूक विसरून तो त्या घूबडाबद्दल शोधू लागला माहिती!!!
अरेच्चा!!! वनखाते आणि एकूणच महाराष्टातील पक्षी अभ्यासक गेली दहा वर्ष ज्या घुबडाच्या प्रजातीला शोधत होते त्या प्रजातीचं पिलू या दुक्कलीला सहजी दिसलं होतं. ही प्रजाती नामशेष होण्याची भीती अभ्यासक आणि संशोधकांना वाटत असतानाच या दोघांनी आपल्या जंगल भटकंतीत हा आशेचा किरण नकळतच शोधला होता....
आपला आनंद गोलूला कसा सांगावा या आनंदात पुष्करने त्याला घट्ट मिठी मारली. नव्या जगात भेदरलेला गोलू मात्र या मिठीने सुखावला...
बाबाही पाठोपाठ पुण्याला आला.वनखात्याचा अहवाल तयार झाला.त्यामधे पुष्कर आणि गोलूच्या नावाची आवर्जून दखल घेतली गेली होती.
बाबाने आणि काही पक्षी अभ्यासक संस्थांनी एकत्रपणे एक पत्रकार परिषद घेतली. बाबाने शिकवल्याप्रमाणे गोलू आणि पुष्कर यांनी आधी घुबडाच्या पिलाचे दर्शन कसे झाले! त्याची गोष्ट सांगितली.त्यानतर बाबाने या प्रजातीविषयी माहिती सांगितली आणि तिच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी वनविभाग काय करेल तेही नोंदवले.
सर्वांसह झालेल्या सत्काराने गोलू आणि पुष्करर मात्र गोंधळूनच गेले. पूष्करच्या शाळेतही गोलू आला आणि तिथेही छोटी फिल्म बाबाने दाखवली.
 होता होता गोलूची परत जायची वेळ आली.बाबाच त्याला घेऊन जाणार होता.
पुष्करच्या आईने गोलू आणि पुष्करच्या फोटोसह त्या घुबडाच्या पिलूच्या फोटोचं कोलाज केलं आणि एक फ्रेम गोलूला भेट दिली. दिवाळीच्या सुट्टीत शेवटचा पेपर झाला की लग्गेच येतो तुझ्याकडे असं म्हणत पुष्करने गोलूचा निरोप घेतला.
दिवाळीच्या सुट्टीत ते दोघे जाणीवपूर्वक जंगल फिरणार आहेत आणि नवं काही शोधणार आहेत...
आपण पण जाऊया का दोघांबरोबर जंछल फिरायला आणि रोज  नवं दिसणारं जंगल पुस्तक वाचायला,..


Tuesday, 4 December 2018

काल्याचं कीर्तन

काल्याचं कीर्तन
कोणत्याही सप्ताहाची, उत्सवाची सांगता लळिताच्या कीर्तनाने करण्याची कीर्तन परंपरा आहे. मात्र त्यापूर्वी कृष्णाच्या लीला कथन करणारं काल्याचं कीर्तन हा एक विशेष आविष्कार म्हणावा लागेल.
काला म्हणजे गोपाळकाला. कृष्ण आणि छोटे सवंगडी यांना आरती करून मानाने देवळात आणलं जातं.देवळाला भोवती म्हणजेच प्रदक्षिणा घातली जाते आणि बाळकृष्ण मंदिरात येतो.
कृष्ण आणि त्याच्या बालगोप सख्यांचं आनंदनिधान म्हणजे दही,दूध,लोणी चोरणं... या जाचाला,बाललीलांना कंटाळून शेवटी यशोदेने कृष्णाला आणि त्याच्या सवंगड्यांना गाई घेऊन चरायला पाठवलं... बुवा रंगून सांगत असतात... तबला आणि पेटीच्या साथीवर कथा पुढे जाते.
बाळसवंगडीच ते.गाई वळायला सोडल्या की ते थोडेच शांत बसणार???? मग सुरु होणार त्यांचे खेळ.... आट्यापाट्या,चेंडूफळी,फुगडी....
विरजण घुसळणं हा गोपींचा प्रतिकात्मक उद्योग असं सारं सारं...
बुवा गात असतात,,, गोपाला गोपाला.. आणि त्या तालावर पुरुषांच्या आणि महिलांच्या फुगड्या रंगू लागतात. सोन्याचा वर्ख आणि मोत्याच्या माळांनी सजवलेला छोटा चेंडू विठोबाच्या हातांना लावला जातो... कुणीतरी तो कीर्तनकार बुवांकडे फेकतो.मग बुवा तो झेलून परत देवाकडे फेकणार.... असा सोहळा सुंदर साजिरा... तो संपताना सगळे देवळाच्या अंगणात जातात.कुंकू रेखलेल्या छोट्या मडक्यावर श्रीफल ठेवलेलं असतं. बुवा ती हंडी फोडतात..
 खेळून दवलेले सवंगडी आपापल्या शिदोर्‍या उघडतात.सर्वांचा गोड तिखट खाऊ,पोहे असं सगळ्ळं एकत्र कालंवलं जातं.त्याचा प्रसाद सर्व भक्तांना वाटला जातो. तो अवीट चवीचा प्रसाद जिभेवर घोळतो तोच बुवा भैरवीचे सूर आळवतात. आरती होते आणि काल्याची सांगता होते. मनात आणि आठवणीत रूंजी घालतं काल्याचं कीर्तन आणि बाळगोपाळ. दमल्या भागल्या ग्रामीण जनतेला क्षणभर विसावा देणारा आणि दैनंदिन चाकोरीतून महिलावर्गाला दिलासा देणारा उत्सव... रात्री समईच्या उजेडात पेंगताना विठोबाच्या बाळमुठीत असेल घट्ट पकडलेला सोनेरी वर्खाचा मोती जडवलेला त्याचा चेंडू...

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...