Monday, 23 September 2024

ती एक ज्योती

 (या लेखात सधवा,विधवा असा शब्दच्छल किंवा अनादर अपेक्षित नाही याची कृपया नोंद घ्यावी. केवळ अविधवा नवमीच्या निमित्ताने सुचलेले हे काही नोंदवीत आहे.)


ती एक ज्योती # अविधवा नवमी -एक विचार


माझ्या आयुष्यातल्या दोन महत्वाच्या स्रिया अहेवपणी गेल्या.एक माझी आई आणि दुसर्‍या माझ्या सासूबाई.दोघींचंही माझ्या आयुष्यात विशिष्ट स्थान आहे.

या दोघींचा विचार करता अविधवा नवमीच्या स्मरणाचं औचित्य मला अधिक जाणवतं.

कुटुंबाला आणि त्यायोगे समाजालाही तुमची गरज असताना,सारा कुटुंबकबिला मागे ठेवून एका क्षणी कुटुंबातली कर्ती स्री  अचानक नजरेआड होते कायमस्वरूपी.तिच्या नसण्याचं स्मरण पावलोपावली होत असताना मग पितृपक्षात वेगळं स्मरण का योजलं असावं?

ती असते तेव्हा तिच्या पद्धतीने कुटुंब आकार घेतं,तिच्या विचारानुसार कुटुंबाच्या कक्षा ठरतात,घराचे नीतिनियम ठरतात.तिच्या घडणीनुसार ती आपापल्या परीने परंपरा सांभाळते,नाती जपते.रूसवेफुगवे तिलाही असतातच पण तरीही कुटुंब बांधून ठेवण्याची हातोटी तिला असते.ज्या क्षणी ती जाते त्या क्षणी एक पोकळी तयार होते न भरून येणारी... त्यामुळे तिचं स्मरण.

मला आईची साडी,तिच्या पदराची ऊब आठवते तसं सासूबाईंच्या हातातल्या बांगड्यांची किणकिणही   आठवते. आईच्या हातचे पदार्थ आणि अहो आईंच्या हातचे पदार्थ,त्यांच्या साड्या,त्यांचे दागिने असं सारं माझ्यापाशी असलं तरी त्यांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची उणीव जाणवतेच.

मग हे एखाद्या विधवेला लागू नसेल का? तर जरूर आहे.फक्त तिचा पती तिच्याआधी गेला इतकाच फरक.

तो त्या काळात अधिक जाणवला असेल ज्याकाळात परकीय आक्रमणांमुळे युद्धात पती मारला गेला.लहान वयातच मुलीचं लग्न झालं आणि शिक्षणही बंद झालं.पती हाच आचार्य आणि विवाह हाच उपनयनसंज्ञक विधी ठरला! तिच्यापेक्षा वयाने मोठा पती कधी आजाराने दगावला!कधी युद्धात वीरगतीला गेला तर कधी आणखी काही! समाजाने तिला ताठ मानेनं जगण्याची संधी दिली नाही.तिचा मूक शारीरिक,मानसिक,बौद्धिक संघर्ष ती जगत राहिली,सहन करीत राहिली.अशक्य झालं तेव्हा तिने प्रसंगी स्वतःला संपवलं देखील!

काहीवेळा पतीच्या चितेवर तिला सक्तीचं आरोहण करावं लागलं आणि तिचा आक्रोशही वाद्यांच्या आवाजात दाबला गेला.

लहानपणी पिता,विवाहानंतर पती आणि त्याच्यानंतर पुत्र तिचा सांभाळ करेल असंही स्मृतिकारांना म्हणावं लागलं!

मग तिचं अस्तित्व आदरपूर्वक तेव्हाच सांभाळलं जाणार जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे! तो हयात असताना हिरव्या काकणाने,भरल्या मळवटाने तिने जगाचा निरोप घेणं म्हणजे तिचं कल्याण होणं! म्हणून ही प्रथा आली असावी तिला आदर देण्याची!

त्यामुळे अशा दिवंगत स्रीचा सन्मान हा एका विशिष्ट तिथीला होणे याला महत्व प्राप्त झालं! तिच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ सुवासिनीचं वाण दिलं जाऊ लागलं.समाजातल्या अन्य गरजू सुवासिनीला भोजनासाठी,साडीचोळीसाठी बोलावलं जाऊ लागलं.

माझे वडिल गेल्यानंतरही मी अविधवा नवमीला माझ्या आईच्या स्मरणार्थ काही ना काही करतेच.कारण तिचं स्मरण होणं आवश्यक आहे.

ते रोज होतंच परंतु त्या स्मरणाच्या निमित्ताने कुणालातरी गरजूला दान देणं,माझ्या मनातली कृतज्ञता जागी ठेवणं आणि वर्षातून एकदा आवर्जून तिच्या सौभाग्याचं स्मरण करणं!

सौभाग्यवती म्हणजे फक्त पती हयात असलेली स्री नव्हे! भग म्हणजे ऐश्वर्य,संपत्ती,भाग्य,शक्ती असे विविध अर्थ प्रचलित आहेत.या सार्‍यांनी युक्त ती सुभगा... सौभाग्यवती!

तिचं स्मरण मनात आहेच ते कृतीत उतरविण्याचा हा आदरणीय,पूजनीय कृतीरूप उपचार म्हणजे अविधवा नवमी! मग विधीवत् श्राद्ध करा वा सोयीनुसार दान द्या. 

जे योग्य वाटेल,आपापल्या शक्यतेनुसार करता येईल ते जरूर करा.कारण ती असते म्हणून आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे.

© डाॅ.आर्या जोशी


Tuesday, 3 September 2024


हरितालिकेची पूजा हे कुमारिकांचे व्रत आहे.किशोरवयात येणार्‍या मासिक धर्माचे नियमन होण्यासाठी या व्रताच्या सांगतेला रुईच्या पानाला तूप लावून ते चाटण्याची परंपरा आहे... अनेकांना हे माहिती नसतं त्यामुळे आपण सर्वांना संबोधित केलं पाहिजे हे आमचे मा.यशवंतराव वेळोवेळी सांगत असत.त्यातलाच हा एक प्रयत्न! काळ बदलतो तसे संदर्भही बदलतात त्यामुळे दरवेळी नव्याने काही मांडणं औचित्याचं आहे!


मैत्रीण कशी असावी? याचंही उत्तम उदाहरण म्हणजे हे व्रत! पतीची निवड कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे व्रत!

शिवाचं वास्तव्य कुठे तर स्मशानात! हाती भिक्षेसाठी काय  तर कवटी! रूप इतकं सुंदर !की अंगाला ती माखलेली  राख ती सुद्धा चिताभस्म! तरीही तिला त्याचाच मोह पडला नं!(हे आजच्या काळातील मुलींनी शिकण्यासारखं आहे!) पटकन् कशाचाही मोह पडला आणि त्यातून टोकाचे निर्णय घेतले गेले... त्यातून काय काय घडतं आहे आजच्या समाजात!!!! पार्वतीचा आदर्श मानावा आणि विचारपूर्वक आयुष्यभराचे निर्णय घ्यावेत! कारण शिव आणि शक्तीचं हे अद्वैत हे समाजापुढे ठेवलेलं एक रूपक आहे! 

सखी आणि पार्वती ही अशी मैत्री आहे की जी पार्वतीला चुकीच्या वळणावर नेत नाही.ती सखीही तितकीच महत्वाची ठरते हे पण लक्षात घेण्यासारखं आणखी एक रूपक! कुणाच्या सहवासात असावं,कुणाकडे गुपित खुलं करावं हे सुद्धा मुलींना समजायलाच हवं!

विष्णुसारखं उत्तम स्थळ नाकारून पार्वती जेव्हा शंकराला वरते आहे तेव्हा त्यामागे दडलेला अर्थ समजून घेत घेत हरितालिकेचं व्रत करणं आवश्यक आहे!

हिरव्यागार झालेल्या पृथ्वीतत्वाकडूनही सर्जन शिकावं,दुसर्‍याला आनंद द्यावा आणि असंच बहरत जावं!

पण यात स्वतःच्या स्वत्वाचा वासर पडू देऊ नये.

गणेश चतुर्थी आणि हरितालिका ही स्वतंत्र व्रते आहेत हेसुद्धा ध्यानी घ्यावं.

समोर मांडलेल्या दोन महिलांच्या वामनमूर्तीची पूजा ही बाजारपेठेतली नाविन्याची कल्पना आहे. (हल्ली या मूर्तीही आधुनिक महिलांचे प्रतिबिंब वाटाव्या अशाच सजलेल्या असतात.)

मूळ व्रत वाळूची शिवपिंडी करावी आणि त्याची पूजा करावी असं आहे.

शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी

त्रिगुणांचे ते तीनच फासे चराचरांतुनी निनादती!

तो खेळ असाच सुरु राहणार आहे! कारण तो खेळला गेला नाही तर विश्वाचा व्यापार सुरू कसा राहणार?

मला दरवर्षी हरितालिकेला कैलास लेण्यात पाहिलेलं कैलास शिल्प आठवतं.दशानन रावण पर्वत हलवतो आहे पण शिव शांत आहेत! जराही चलबिचल नाही! मागे दासी घाबरून पळताना दिसते आणि तिचा अंबाडाही सुटला आहे तो सावरायचीही तुला शुद्ध नाही.शिवाशेजारी बसलेली पार्वती घाबरून त्याला केवळ बिलगली आहे! त्यातलं तिचं मार्दव विलक्षण मोहमयी आहे.

समाजात वावरताना कसं वावरावं,संकटकाळीसुद्धा आपल्या सहचरावर अढळ विश्वास ठेवावा अशी अनेक रूपकं मला त्यात सापडत गेली आहेत...

मला जशी सापडली तशी ती तुम्हालाही सापडत जावोत...

©डाॅ.आर्या जोशी

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...