घरचे ओले काजू आणि बटाटा घातलेली झणझणीत भाजी आणि तांदळाची लुसलुशीत भाकरी असा घास डब्यातून घेत त्याने न्याहरी संपवली आणि अक्षरशःमोठ्ठी ढेकर ऐकू लागली. तृप्ततेची...
आता त्याने मी दिलेला कोरा चहा घेतला...आलं, गवती चहाची पात, भरपूर साखर आणि चहाची पावडर घातलेला.. दूध नाही हं त्यात.. तो पिऊन त्याला आणखी तरतरी आली आणि तो उत्साहाने खालच्या मळीत काम करायला बाहेर पडला...
आज शहरात इतके रूग्ण नव्याने सापडले ... इतक्या जणांचा मृत्यू... कुणीतरी एक मुलगा कोरोनाग्रस्त अंध वडिलांना रूग्णालयात दाखल करतो आणि त्यांचे तिथे झालेले हाल माध्यमावर पोस्ट करतो तर कुणी विलगीकरण कक्षात आलेले चांगले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवत असते...
कोकणातल्या एका खेड्यात बसून मी या दोन दृश्यांची एकाचवेळी साक्षीदार असते. पहिलं माझ्याच घरात घडतं आणि दुसरं मी फेसबुक, व्हाॅटस्अप, इ वृत्तपत्रे यावर वाचत, पहात असते.
रत्नागिरी जिल्हा,तालुका राजापूर येथील ताम्हाने हे छोटं गाव. वाड्या बारा. लोकसंख्या 2500 च्या आसपास.पूर्वी बरीच होती असं ग्रामस्थ सांगतात. पण नोकरीसाठी बरेचसे तरुण मुंबईला गेलेले असल्याने ही संख्या कमी झाली. शिमगा आणि गणपती या उत्सवासाठी हमखास चाकरमानी आपल्या कोकणातल्या घरी येतो.यावर्षीही शिमग्यासाठी चाकरमानी आले पण लाॅकडाऊनमुळे अडकले.लाॅकडाऊनमुळे मुंबईतल्या आपल्या लहानशा घरात राहणेही कठीण झाल्याने लाॅकडाऊनच्या दुसर्या तिसर्या टप्प्यात मिळेल त्या वाहनाने, असेल तितकी जास्तीची रक्कम देऊन मंडळी कोकणातल्या आपल्या घरी आली. यामुळे सध्या गावात हजारभर माणसांची भर नक्की पडलेलीआहे.
लाॅकडाऊन आणि कोरोना या परिस्थितीत कोकणातल्या या छोट्या खेड्यात माझ्याच घरात मी कुटुंबासह राहिले आणि मला जे दिसलं, जे आम्ही अनुभवलं ते इथे नोंदवते आहे. आम्ही सेंद्रीय शेती करतो इथे त्यामुळे आमच्याकडे मदतीसाठी स्थानिक सदस्य येतात. त्यांच्याशी झालेला संवाद, गावात फिरताना अनुभवलेली परिस्थिती, माझ्याकडे अभ्यासाला येणारी दोन वाड्यांमधील मुले यांच्यामुळे मला विविध कंगोरे टिपायची संधी मिळाली.त्याची ही थोडी मांडणी...
पुण्यात गुढीपाडव्याच्या दिवशी मंडईत उसळलेली गर्दी असो किंवा मुंबईत मरीन डाईव्हवर फिरणारे हौशी असोत... संसर्ग वाढतच राहिला. पण आमच्या गावात मुंबईहून आपापल्या जरी परतलेला चाकरमानी आणि त्यांची कुटुंब चौदा दिवस माळावरच्या गोठ्यात किंवा बंद असलेल्या आणि आता स्वच्छ करून कुटुंबानेच जागा उपलब्ध करून दिलेल्या घरात बंद होता.
"काय करणार ताई, माझीच जाव हाय. पण बशीतून उतरल्यावर मी तिला झरात पन घेतली नाय. तांब्या भांडा लांबच ठेवलीला नं मी... आपलीच मानसं हायती पन गावात आजार पसरंल मनून कालजी घेतलेली बरी नं!" माझी मदतनीस ताई मला आयुष्याचं तत्वज्ञान सांगत होती आणि मी तिच्याकडे आश्चर्याने पहात होते.
हे वास्तव सर्वदूर अनुभवाला येतं की ग्रामीण भागातील लोक हे अडाणी, गावठी, खेडूत म्हणून गणले जातात. शिक्षण कमी, संधी कमी, सुविधा कमी म्हणून शहराच्या तुलनेत मागे राहिलेला मोठा समाजगट गावांमधे हायला मिळतो. यांना काही स्वप्नं नाहीत, यांच्यात काही क्षमता नाहीत, यांना उज्वल भविष्य नाही म्हणून हिणवला जाणारा हा समाजगट शहरातल्या उच्चशिक्षितांनाही लाजवताना कोरोनाच्या काळात आम्ही अनुभवला.
यांच्याकडे दोन पायांची गाडी, थोडी सुबत्ता असली तर घरातल्या युवकाकडे एखादी बाईक आणि चारचाकी तशी विरळाच! दिवसभर शेतात, घरात, रानात राबणारा हा समाज कोरोनाच्या काळात सजग होता.आत्मनिर्भर होता हे माझं निरीक्षण आहे.कारण
मुंबईहून आलेल्या आपल्याच जिवलगांना यांनी स्वयंप्रेरणेने कोरोन्टाईन केलं. त्यांच्यासाठी पाणी, शिधा, चुलीसाठी फाटी, ताटं,भांडी अगदी टूथपेस्टसुद्धा अशा सगळ्या सोयी घराबाहेर उपलब्ध करून दिल्या.
लाॅकडाऊन जाहीर व्हायच्या आधी कडूवाडीतला प्रसिद्ध महिलांच्या लेझीमचा पालखीभोवतीचा नृत्याविष्कार सगळ्या गावाने अनुभवला. जसे शासकीय आदेश येऊ लागले तसे मात्र लोकांनी स्वयंप्रेरणेने पालखी आटपती घेतली. शेवटच्या दिवशी होत असलेले पूजेचे उपचार थोडक्यात आटपले आणि दुपारीच देवी मंदिरात नेऊन पुनःस्थापित केलीसुद्धा.दरवर्षी होणारी रोमटाची जत्राही झाली नाहीच अर्थात.
लाॅकडाऊन जाहीर झाल्याने मुंबईकर, पुणेकर गावातच अडकले. घराघरात दाटी झाली. पहिल्या एकवीस दिवसांच्या काळात एक अनामिक भीती मनात दाटली होती. अनिश्चितता.. आणि पुरवठा कसा होणार याची काळजी...
गावातलं किराणा मालाचं एकमेव दुकान आणि दुसरं रेशन दुकान, खाजगी केशकर्तनालय सर्व बंद होतं. लोकांनी दुसर्याच्या शेतात जाऊन करायची कामंही थांबवली होती.मुलं वाड्यावाड्यात एकत्र खेळत होती पण तरी तणाव दिसत होता.
कोरोनाचे नियम पाळा सांगणारी ग्रामपंचायतीची रीक्षा वाड्यावाड्यात फिरली. सरपंच आणि समिती सदस्य घरोघरी जात होते. रूग्णसेविका ताई माझी मैत्रीणच आहेत. दिवसभर त्या स्वतःआणि अंगणवाडी ताई घराघरात जात होत्या. एक शिक्का मारलेला माणूस फिरतो आहे गावभर ही तक्रार पंचायतीत त्याच्या कुटुंबियांनीच दिली!!!
वैद्यकीय यंत्रणा काम करत होती. शाळेतल्या शिक्षकांना पोलिसांचे सहाय्यक म्हणून ड्यूटीही लागली.
पण हे फार काळ नाही जाणवलं. आठवडाभराने लोक आपापल्या शेतातील कवळं तोडणे,भातलावणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करणे, भाजावळ करणे अशी कामं करताना दिसू लागली.
किराणा मालाच्या दुकानापुढे चौकोन आखले गेले . एका भावाचा दूरभाष क्रमांक नोंदवला गेला. इथे यादी पाठवा आणि दुसर्या दिवशी आपली पिशवी घेऊन जा असे सुचविण्यात आले. दर आठवड्याला भाजीचा टेम्पो येऊ लागला. लोक मास्क बांधून, अंतर ठेऊन भाजी विकत घ्यायला जायचे. फळंही मिळायची अधूनमधून.आठवडी बाजार कटाक्षाने बंद होता. फक्त वैद्यकीय सेवा सुरु होत्या.
गवळी कुटुंबातून दूध पुरवठा होत होता त्यामुळे दुधाची सोय झाली होती.घरात खूप माणसे असल्याने जिथे वस्तू कमी पडतील तिथे त्या एकमेकांना दिल्या जात होत्या.
एक महिला म्हणून नजरेने टिपलेलं असं की मुंबई पुण्याहून आलेल्या नातलग महिला अंगणात खुर्च्या टाकून गप्पा मारत असत आणि कोकणातल्या घरी असलेली जाऊ, सासू, बहीण, नणंद मात्र विस्तारित कुटूंबासाठी राबत होत्या. त्या कुरबुरीही कानावर आल्या. पण लाॅकडाऊन वाढल्यावर मात्र या शहरातून आलेल्या महिलाही भाजी घ्यायला आलेल्या दिसू लागल्या. घरकामात मदतही करू लागल्या.
धान्य, भाजी नाही, मांसाहारी पदार्थ नाहीत पण लोकांनी अंडी खूपच वापरली आहारात. अंड्याचा टेम्पो आला की लोक पाच सहा डझन अंडी सहज नेत होते.परिस्थितीशी सामंजस्य दिसत होतं.
घरात साठवलेला वर्षभराचा तांदूळ, भाकरीसाठी नाचणी आणि पिठल्यासाठी कुळीथ आहेत वैनी. कशाला जाचं तडमडायला शेहेरात... काय नाय तर भात आणि पिठी (कुळीथाचं पिठलं) चुलीवर करून दोन वेळा खायाचं आणि गप बसायचं...
मी मात्र आज फ्लाॅवर नाही, आज टाॅमेटोच खराब अशी कुरकुर मनात करायला सुरूवात करतानाच शेजारच्या घाग वहिनींनी मला नकळत डोळ्यात अंजन घातलं. चार महिने मग मी ही आमच्या शेतातल्या चवळीच्या शेंगा, वांगी, दुधी याच भाज्या परतपरत वेगवेगळ्या पद्धतींनी करून पाहिल्या!!!उसळी केल्या आणि काहीच नसलं तर कांदे आणि बटाटे मिळत होतेच. सकाळी कांदा बटाटा, संध्याकाळी बटाटा कांदा.... पण काही अडलं नाही... पोट तृप्तीने भरत होतंच.
रोजी बंद म्हणून रोजंदारीवर काम करणारा वर्ग अस्वस्थ नक्कीच झाला. पण यावेळी मुंबईतले नातेवाईक मदतीला मिळाल्याने अनेकांनी मिळेल त्या सामानात घरांची डागडुजी केली, परिसर नीटनेटका केला एवढंच काय रात्री वहाळातून जाऊन छोट्या मोठ्या शिकारीही केल्या... गावात ते सहज घडतं... पावसाळ्यात तर मासे, चिंबोर्या पकडायला जाळी घेऊन अनेक जण आजही रात्री बाहेर पडतात... उद्याच्या कालवणाची सोय...
चाकरमानी मुंबईतील परिस्थिती पाहून बेचैन झाले. पण हस्तकौशल्याचे कसब या लोकांना जन्मजातच असते बहुधा. शांतपणे या सदस्यांनी गावात छोटी मोठी कामे मिळवून करायला सुरूवात केली. वेळही जातो आणि पैसेही मिळतात.
घरोघरची भातलावणी तर यावेळी लग्नघरासारखी पार पडलेली अनुभवायला मिळाली. शेतात पंचवीस तीस कुटुंबीय एकत्र दिसत होते." यावेळी मुंबईचा भाव आला ना कोरोनामुळे त्यामुळे लावणी कवाच उरकली... जास्त काय वाटला नाय काम... पोरोंनी मजाच केली लय..."
भाजीचा टेम्पो आला किंवा सौंदळच्या पंपावर उद्या पेट्रोल येणार आहे... पाचल हे आठवडी गाव आज उद्या सुरू असणार आहे अशा मदतीच्या बातम्याही पसरत होत्या.
गावाची पलंपरागत खोती ज्या कुटुंबाकडे आहे ते कुटुंबही अतिशय स्वस्थतेने नेहमीसारखं जगत होतं. त्यांचंच किराणामालाचा एकमेव दुकान आहे गावात. म्हणून व्यस्तता अधिक होती. पण नियम पालन करून धान्य मिळत होतं. घरातल्या महिला वेळच्यावेळी तुळशीपुढे दिवा लावताना, वाती वळताना, स्वयंपाक करताना अगदी नेहमीसारख्याच रमलेल्या होत्या.
गाव भरलं होतं त्यामुळे नेटवर्कवर ताण आला हे खरं. मात्र अधूनमधून नेटवर्क मिळत होतं.
आम्हाला खरंचच जाणवलं नाही की पुण्यात मुंबईत काय घडतय... नातलग, स्नेही सर्वांची चिंता वाटत होती पण शहरातल्या असुरक्षिततेची पुसटशी कल्पनाही आली नाही.
शरात राहिल्यामुळे गावातल्या घराशी, जीवनशैलीशी अपरिचित झालेले लोक मात्र ई पास काढून परतले. पण बहुतांशी मंडळी आता गणपतीपर्यत राहणार आहेतच. काही शिक्षित मुले शहरात कंपन्यांमधे कामाला आहेत त्यांना कामे सुरू झाल्याने परतावे लागले. पण ई पास काढून खास गाडी करून कुटुंबासह परतताना सर्वांनी दोन महिन्याचा सर्व शिधा, वाणसामान पोत्यात भरून भरून गाडीत कोंबला अक्षरशः!
हे सर्व वर्णन नोंदवताना मला आजही जाणवतय की आयुष्याकडून फार कमी अपेक्षा ही या ग्रामीण जीवनाची गुरुकिल्ली आहे! माझ्याकडे मुलं अभ्यासाला पाठवली पालकांनी यातूनहे ही स्पष्ट झालं की पालक आणि मुलं त्यांच्या भविष्याबाबत जागरूक आहेत. आपणही मोठं व्हावं असं मुलांनाही वाटतय. पण यांचं जगणं खरंच " आत्मनिर्भर" शब्दाला साजेसंच आहे.
चार पैसे कमी मिळाले किंवा आज आत्ता याक्षणी मला हवं ते मिळालं नाही म्हणून चिडचिड नाही.आहे त्या परिस्थितीत, निसर्गाशी जुळवून घेत ही माणसं जगत आहेत. आरोग्याच्या समस्या यांनीही आहेत. कौटुंबिक विवंचनाही आहेतच. माणूस म्हटलं की हे सगळं ओघाने येणार.
तरीही जे उपलब्ध झाले त्यात समाधान मानून गावात सगळ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली. पाच जणांची छोटी दिंडी पुरेसे अंतर राखून विठ्ठल मंदिरात आली.आषाढ अमावास्याही गावात साजरी झाली आणि पंचमीला मातीचा नागोबाही घरोघरी पूजला गेला.
पावसाळ्याच्या सुरुवातीला एकमेकांच्या अंगण परसातल्या वेली झाडं छाटून आणली गेली आणि आपल्या अंगणात रूजवली गेली. मलाही गावातल्या एका आजींनीस्वतःहून अशी चार पाच रोपं दिली अंगणात लावायला!
तर हे सगळं मी अनुभवलं... माझ्या शहरी चष्म्यातून मी याकडे पाहिलं आहे हे अगदी नक्की! पण त्यामुळे मला समजली ग्रामीण आयुष्यातली आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मकता. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि "समाधान" हा सहसा मानवी आयुष्याच्या कोशात न सापडणारा शब्द मला यांच्या शब्दकोशात सापडला....
लाॅकडाऊनच्या काळात मी गावातल्या स्थानिकांच्या कुटुंबात नैराश्य पाहिलं नाही,आयुष्य संपलं की काय असा आविर्भावही कुणाचा दिसला नाही.
संपूर्ण जग हादरलेले असताना एक बारा वाड्यांचं छोटं गाव नांदतं आहे. यासारखी अनेक गावं भारतभर आहेत. तिथेही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असेल कदाचित. कोकणात ज्यांची नांदती घरं आहेत अशा आमच्या अनेक परिचितांचंही आयुष्य आम्ही लांबून पाहिलं, पण या काळात तेही गढूळलेलं दिसलं नाही.तणाव असला तरी समाधान जागतं होतं.
लाॅकडाऊनच्या काळात मोठमोठी शहरं उदासीनतेच्या छायेत आणि माणसं निराशेच्या गर्तेत जात असताना गावातली ही रंगीबेरंगी तुकड्यांनी विणलेली गोधडी कोरोनाच्या अनिश्चिततेच्या सावटातही मला ऊब देऊन गेली...