Wednesday, 30 July 2025

ज्येष्ठा गौरी

मातीशी जोडलेल्या संकल्पना मातीपासून दूर जाऊ लागल्या की विचार करावासा वाटतो...
मागील वर्षी मी याच विषयावर लेखन केले होते.अनेकांना ते रूचले नाही असाही अभिप्राय आला.तो मी खूप गांभीर्याने नाही घेतला कारण जेव्हा आपण समाजाला संबोधित करीत असतो तेव्हा वर्षानुवर्षे रूळलेल्या वाटा बदलणे सोपे नसते हे एक आणि आधुनिक काळात माध्यमांच्या रेट्यामुळे आणि आर्थिक संपन्नता असलेल्या ठिकाणी एक नवी संकल्पना कुणी करुन पाहिली की ती आचरण्याची एक नवी संस्कृती तयार होते आहे.
हा रेटा थांबवणे विविध कारणांनी कठीण आहे पण समाजातील विचारी माणसांनी थोडा प्रयत्न केला तर हे फारसे अवघड नसावे.
ज्येष्ठा गौरी व्रत म्हणजे भाद्रपदात केले जाणारे व्रत हे पृथ्वीतत्वाचे पूजन आहे.सर्जनाशी त्याचा संबंध लोकपरंपरेत मानलेला आहे.त्यामुळे मुलींनी,महिलांनी नदीवर किंवा जवळच्या पाठवठ्यावर जाऊन तेथील खडे आणणे,तेरड्याची रोपे आणणे व त्यांचे पूजन करणे असे सांगितले आहे.मुखवट्यांचीही विविध प्रकारची रूपे आपल्याला पहायला मिळतात.
खडे हे जसे निसर्गातून आले आहेत तसेच ओबडधोबड रूपात त्यांची पूजा ही निसर्गाला धरूनच आहे.Value addition किंवा सुशोभीकरण करून काय साधते? असा   प्रश्न मला पडतो आहे कायमच.जशी मी तशी माझी देवी म्हणून त्या खड्यांना चेहरा रंगवला जातो पण मग उरलेल्या शरीराचे काय? गौरी ही सर्जनशक्ती आहे तर मग नुसतं नाक डोळे कुंकू एवढंच पुरे का??? सर्जनाचे ते अवयव रंगवले जातात का खड्यावर?  असं स्पष्ट म्हटलं तर मग हे वाचायलाही अवघड वाटेल....
ही अपूर्णता आहे असं लक्षात येत नसेल का? आपण फक्त चेहर्‍याचाच विचार करत गुंतलोय!!!!!!!!
उभ्याच्या गौरी  आपण व्यवस्थित उभ्या करतो. त्यांच्या पोटात धान्य भरतात.
गंगागौर वगैरैमधेही कलशावर मुखवटा ठेवतो.कलशात पाणी असते.
यामुळे पूर्णत्व येते.
आपण उभ्याच्या गौरींसमोर त्यांची बाळेही ठेवतो.या सार्‍याला लोकपरंपरेतून आलेला एक विचार आहे तसाच तो खड्याच्या गौरींनाही आहे.
सुगडावरच्या गौरीही नुसत्या ठेवल्या जात नाहीत.त्यांनाही खाली आधाराला काही ठेवले जाते त्यामुळे पूर्णता येते.
ज्या ज्या प्रदेशात त्या त्या प्रथा आहेत त्याचाही सारासार विचार करणे आवश्यक आहे.
पृथ्वीतत्वातून आलेली संकल्पना असल्याने चांदीचे खडे,सोन्याचे खडे ज्याला मुखवट्याचा आकार दिला आहे ते ही हल्ली सर्रास जाहिरातींमधे दिसत आहे....
आपल्या परिसरात,जवळच्या टेकडीवर अशा ठिकाणी खडे मिळू शकतात.महानगरांमधेही कुठे ना कुठे अशा थोड्या जागा नक्की जवळपास सापडतील जिथून असे खडे आणता येतील.ते तुळशीत ठेवले तरी चालू शकतात.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे...
गणपतीमूर्ती हा विषय आता कक्षेपलीकडे गेला आहे....विविध पर्याय उपलब्ध आहेत पण उत्सवी रूपामुळे मूळ आशय मागे पडतो आहे.
सुज्ञांनी जरूर विचार करावा ही विनंती.

संत्रिका सुवर्णमहोत्सव

सुवर्णवर्षावाने भिजला देववाणीचा माथा
परंपरांनी, संस्कारांनी रचिली सुंदर गाथा!

गुरूकुलातील ऋषि- ऋषिकाही, आशीर्वच देती
सप्तसिंधुही वाहत उसळत, यशोगीत गाती।
राष्ट्रभक्ती अन् सुविचारांनी रंगुन गेली कथा
सुवर्णवर्षावाने भिजला देववाणीचा माथा। १

रामचरित्रे जगत् व्यापी ती,दिव्यत्वाचे अमोघ संकुल
संस्कारांचे पुनर्जागरण,तत्वविचारी विद्वत्मंडल
जुन्या- नव्याचा मेळ घालिती श्रद्धा अन्  आस्था
सुवर्णवर्षावाने भिजला देववाणीचा माथा।२

दीप उजळला तेजाचा अन् केले आरात्रिक्य
परस्परांचे कर करी जोडत साधीत गेले ऐक्य
उलगडली मज याच मंदिरी धारा  आणिक राधा
सुवर्णवर्षावाने भिजला देववाणीचा माथा।३
डाॅ.आर्या आशुतोष जोशी









मनभावन श्रावण

मनभावन श्रावण
डॉ . आर्या आशुतोष जोशी 


श्रावण म्हणजे  ऊन पाऊस , श्रावण म्हणजे व्रते, श्रावण म्हणजे शंकराची पूजा आणि श्रावण म्हणजे झाडाला बांधलेला झुला ! 


असा हा मनाला भावणारा श्रावण महिना . हिंदू धर्म आणि संस्कृतीत या श्रावण महिन्याला विशेष असे स्थान आहे . आपल्याकडे चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत वेगवेगळ्या सणांची , व्रतांची विशेष दिवसांची रेलचेल पहायला मिळते . केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत वर्षभर आनंद सोहळ्यांमध्ये रमलेला असतो . असं  असलं  तरीही मग श्रावणाचं विशेष महत्व का ?

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र असते त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे . स्कंद पुराणात या महिन्याला नभा असेही नाव आहे कारण आकाश जसे निर्मळ असते तसेच हा महिना निर्मळ राहण्यासाठी योजला गेला आहे -स्वच्छत्त्वाच्च नभस्तुल्यो  नभा इति तत :स्मृत :| स्कंद पुराण १. १९

 श्रावण महिन्यातील व्रते समाजातील सर्व समाजगटातील  सर्वांनी  करावी असेही सांगितले गेले आहे . 


स्कंद पुराण या ग्रंथामध्ये तीस अध्याय आलेले आहेत ज्यांना श्रावण माहात्म्य असे म्हटले जाते. यामधे  भगवान शंकर स्वतः: सांगतात -


द्वाद्श्वमपि मासेषु श्रावण : मे अति वल्लभ:|

श्रावणार्हं यन्माहात्म्यं  तेनासौ श्रवणो  मत :|| स्कंद पुराण १. ७

किं  बहुक्तेन  विप्रर्षे   श्रावणे विहितं तु यत् |

तस्य चैकस्य कर्ताsपि मम प्रियतरो भवेत् || स्कंद पुराण  श्रा . मा . ३०. ३६


सनत्कुमार यांनी प्रत्यक्ष शिवाला विचारले त्यावेळी शिवाने सांगितले की श्रावण महिना  मला अत्यंत प्रिय आहे . या काळात  जे करणे योग्य आहे असे सांगितले आहे त्याचे  आचरण जो  मनापासून करेल तो मला प्रिय होईल . त्यामुळेच भारतीय समाजमानत श्रावण महिन्याचे विशेष धार्मिक-आध्यात्मिक महत्व मानले गेले आहे . 


श्रावण महिन्यातच नाही तर चातुर्मासाचे चार महिने विविध व्रते करण्यासाठी सांगितले गेले आहे . भक्तांच्या मनातील आस्था सांभाळत त्यातून त्या व्यक्तीचा विकास होईल , समाजाचे कल्याण होईल असेही पाहिले गेले आहे . 


श्रावण महिन्यात खास करून नियम करून दररोज शंकराला अभिषेक करणे, फुले, फळे, धान्य यांचा लक्ष वाहणे , नक्त उपवास करणे, बिछान्यावर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपणे , आपल्याला आवडीच्या वस्तूचा त्याग करणे, दान देणे,खरे बोलणे, अशी विविध व्रते सांगितली गेली आहेत . 

श्रावणातील सोमवारी शिवपूजन , मंगळवारी शिव मंगळागौरी पूजा , बुधवारी बुधाची पूजा, गुरुवारी बृहस्पती आणि विष्णू पूजन, शुक्रवारी जिवतीची पूजा , शनिवारी हनुमान आणि रविवारी सूर्याची पूजा अशी व्रते सांगितली आहेत . त्याच्याशी संबंधित कथाही आहेत . याखेरीज गौरीव्रत , श्रीधर पूजा ,सूपौदन व्रत ,श्रावणी कर्म  अशी विविध व्रतेही  सांगितली गेली आहेत . या सर्वांमुळे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी एका व्रताचे पालन केल्याने आपल्या आचरणाला शिस्त लागते , नेमस्त होण्याची सवय अंगी बाणवली जाते हे महत्वाचे !


श्रावण जसा व्रतांचा राजा तसाच तो सणांचा राजाही आहेच . नागपंचमी , राखी पौर्णिमा , गोकुळाष्टमी  हे सारे सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरे होतात . 


हरियाली तीज 


श्रावण तृतीयेला पंजाब, राजस्थान येथे हा सण महिला साजरा करतात . तीयन , शिंगार  तीज अशीही हिची वेगवेगळी नावे आहेत . नवविवाहित मुलीला तिच्या सासरच्या कुटुंबाकडून नवे कपडे,बांगड्या , सिंदूर,मेंदी आणि गोड  पदार्थ भेट म्ह्णून दिले जातात . तीज माँ  म्हणजेच देवी पार्वतीला उद्देशून स्त्रिया निर्जळी उपवास करतात . आपल्या पतीच्या  सुखी  आयुष्यासाठी  हे व्रत केले जाते . आपल्या माहेरी जाऊनही हे व्रत स्त्रिया करतात . १६ शृंगार केल्याने पतीचे कल्याण होते अशी भावना यामागे आहे . 


नागपंचमी


 महाराष्ट्रात शेणा- मातीचा नागोबा करून ,त्याची पूजा करून पंचमी करून साजरी केली जाते . मुली आणि महिला वारुळावर जाऊन त्याची पूजा करतात . झाडाला झोके बांधून आनंद घेतात . मराठी मातीतल्या ओव्याही या सणाचे महत्व गातात-


आखाडा मासी  एकादसी ,नागार पंचीम कोण्या दिसी ।

पंचमी आली बुधवारी पुस  नक्षत्रावरी ।।


कर्नाटकात महिला वारुळापाशी जाऊन निरांजन लावतात आणि दुधाचा नैवेद्य दाखवितात . 


केरळ आणि तामिळनाडू येथे या दिवसाला आदि  पंचमी म्हटले जाते . दारात आणि अंगणात या दिवशी कुंकवाने किंवा हळदीने नाग काढले जातात . नाग मंदिरात जाऊन अभिषेक केला जातो . या दिवशी शेतीची कामे बंद ठेवली जातात .

 

आसाम , झारखंड आणि बंगाल प्रांतात विशेषतः  कुमारतुली येथे  या दिवशी सर्प देवता मनसा देवी हिचे पूजन होते . श्रावण, भाद्रपद या महिन्यांमध्ये हे पूजन करतात . सर्पदंशापासून रक्षण होण्यासाठी मनसा देवीला प्रार्थना केली जाते . शिवाचे विषापासून (हलाहल )तिने रक्षण केले अशीही लोक परंपरा येथे मानली जाते . 


राखी पौर्णिमा 

महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा आणि कोळी बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय यामुळे नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो . कोळी बांधवांच्या सुरक्षेसाठी सागराला विनंती केली जाते. याच दिवशी बहीण भावाला राखी बांधते. पूर्वी या दिवशी प्रजेचे रक्षण करणा-या राजाला रक्षासूत्र बांधले जात असे. 

राजस्थान भागात बहिणी फक्त भावाला राखी बांधत नाहीत तर वहिनीला सुद्धा धागा बांधतात . हिला लुम्बा  राखी असे म्हणतात . ही राखी वहिनीच्या बांगडीला बांधली जाईल अशी असते . 


गुजरात मध्ये या दिवशी रक्षा बंधन होतेच पण त्याच जोडीने शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध, दही , तूप याने स्नान घातले जाते . आपण केलेल्या चुकांची कबुली दिली जाते अंडी देवाचे आशीर्वाद घेतले जातात . 





ओरिसा, बंगाल या राज्यात या दिसवही झुलन पूर्णिमा साजरी होते . राधा आणि कृष्णाला झोपाळ्यात बसवून हा दोलोत्सव मंदिरात साजरा केला जातो . हरी भक्ती विलास या ग्रंथात या उत्सवाचा उल्लेख सापडतो . भागवत पुराणातील गोपी आणि कृष्ण यांच्या प्रेमावर आधारित गीते या दिवशी गायली जातात , नृत्य केले जाते .


जन्माष्टमी 


जन्माष्टमी म्हणजे कृष्णभक्तीने  भारलेली पवित्र रात्र . कृष्ण जन्म वृंदावन येथील मंदिरात भक्तिभावाने संपन्न होतो . जगभरातून भाविक या उत्सवासाठी येतात . नंदगाव येथे या दिवशी नंदोत्सव होतो ज्यामध्ये कृष्णय्याच्या मूर्तीला दूध, दही, तूप यांचा अभिषेक करतात . चंदन , केशर, हळद यांचे लेपन मूर्तीला केले जाते . नंद या गवळ्यांचा  राजा असल्याने नंदगावात  या उत्सवाचे महत्व विशेष आहे . आपल्या बासरीने गाईंनाही मोहवून टाकणारा कृष्ण आणि त्याचा हा जन्मोत्सव !


असा हा आपल्या संपूर्ण देशाला आनंदाच्या , प्रेमाच्या सूत्राने बांधून ठेवणारा , भक्तिभावाने ओथंबलेला मन भावना श्रावण !


येत्या श्रावणात एखादा छानसा संकल्प करूया आणि तो कृतीतही आणूया !

स्वधर्माचे सिंहावलोकन-श्रावणी /उपाकर्म संस्कार



डाॅ.आर्या आशुतोष जोशी

श्रावणी हा संस्कार सर्वांना परिचित आहेच असे नाही .याचा तपशील सर्वांपर्यत  पोहोचविणे हे एक महत्वाचे काम आहे . तथापि सर्वसमावेशक गटाला समजेल असा एक प्राथमिक स्वरूपाचा परिचयात्मक लेख असावा या हेतूने हा लेखनप्रपंच !


चला समजून घेवूया  काय  आहे श्रावणीचा संस्कार ?

भारतीय ज्ञान परंपरेत शिक्षण अर्थातच वेदांच्या शिक्षणाचे स्थान आदराचे आहे असे आपल्याला दिसून येईल. लेखनकला अस्तित्वात येण्यापूर्वी मौखिक परंपरेने चालत आलेले हे ज्ञान शतकानुशतके टिकवून ठेवणारी रचना म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती .
आधुनिक काळात शाळांमध्ये , महाविद्यालयात सत्रांची  विभागणी असते . काही विशिष्ट निमित्तांचे  औचित्य साधून सुट्टी दिली जाते . यालाच वैदिक परंपरेत अनध्याय  म्हटले जाते . कोणत्या कारणाने वेदांच्या अभ्यासातून सवलत घ्यावी याविषयीही सविस्तर मार्गदर्शन गृह्यसूत्रे,स्मृतिग्रंथ यांनी केलेले आपल्याला दिसून येईल. 

उपनयन किंवा मुंज हा धार्मिक विधी नसून तो शिक्षणाच्या आरंभीचा महत्वाचा संस्कार आहे . मुले आणि मुली दोघांचेही उपनयन होत असे . त्यानंतर गुरुकुलात जाऊन गुरूंच्या सानिध्यात पुढील शिक्षणाचा आरंभ होई . 

गुरुकुलात रहात असताना ब्रहमचर्य  व्रताचे पालन करावे लागे . ब्रहमचर्य  , गृहस्थ , वानप्रस्थ आणि संन्यास  अशा चार आश्रमांची रचना भारतीय जीवन परंपरेत दिसून येते . प्रत्येक आश्रमाची स्वतः:ची कर्तव्ये सांगितली गेली आहेत व त्यानुसार व्यक्तीचे आचरण असणे अपेक्षित मानले गेले आहे . 

काळाच्या ओघात गुरुकुल पद्धतीचा लोप झाला . काही ठिकाणी  विशेषतः  वेदांचे अध्ययन करणा-या वेदपाठशाळा  आजही गुरुकुल पद्धतीने शिक्षण देतात असे दिसून येते . परंतु अन्य आश्रमाच्या स्वरूपात काळाच्या ओघात बदल झाले . विवाह संस्कार आजही संपन्न होतात ज्यामुळे गृहस्थाश्रमात प्रवेश होतो . 

 आपले व्यक्तिमत्व घडवून आयुष्याला विधायक दिशा देणारा संस्कार उपनयन . यानंतर वयाच्या साधारण २५ वर्षांपर्यत  गुरूंच्या घरी राहून अभ्यास केला  जाईल आणि त्यासाठीचे जे नियम त्यातील एक रचना म्हणजे उपाकर्म  अर्थात श्रावणी ! 

 ज्ञानप्राप्तीची सुरुवात हिरव्यागार श्रावणात करावी हे सांगणारे आपले धर्मशास्त्रकार! ऋतू हिरवा आहे कारण नव्या वनस्पती आता उगवल्या आहेत . अशा प्रसन्न काळात श्रावण नक्षत्र असताना किंवा पंचमीला हस्त  नक्षत्र असताना ज्ञानग्रहणाचा आरंभ करावा ! याज्ञवल्क्य  स्मृतीच्या आचाराध्याय विभागात स्नातकांसाठी जे नियम सांगितले आहेत त्यामध्ये याचा समावेश होतो . 

अध्यायानां  उपाकर्म श्रावण्यां  श्रवणेन वा |

हस्तेनौषधी भावे वा पञ्चम्यां श्रावणस्य  तु || आचाराध्याय : १४२

( उमेशचंद्र पांडेय ,(संपादक) याज्ञवल्क्य स्मृती , काशी संस्कृत ग्रंथमाला ,२०२१, चौखम्बा  प्रकाशन  ),२०२१)

अथात उपाकरण उत्सर्जने व्याख्यास्याम :|श्रवणा पक्ष  ओषधीषु  जातासु हस्तेन पौर्णिमास्यां वा ध्यायोपाकर्म ||(सत्याषाढ  हिरण्यकेशी स्मार्त  संस्कार रत्नमाला द्वादश प्रकरण ।।) यामध्ये विविध गृह्यसूत्रातील  श्रावणी विधीचे उल्लेख सापडतात . 

पौष महिन्यातील रोहिणी नक्षत्रावर किंवा अष्टमी तिथीला जलाशयाजवळ बसून  आपापल्या शाखेनुसार असलेल्या गृह्यसूत्रात सांगितल्याप्रमाणे वेदांच्या अभ्यासाची काही काळापुरती सांगता करावी . याला उत्सर्जन विधी म्हटले जाई.आजच्या परिभाषेत शैक्षणिक सत्राची सांगता किंवा विश्रांतीचा काळ.

भट्ट गोपीनाथ दीक्षित यांच्या संस्काररत्नमाला  ग्रंथातही श्रावणीचे विवेचन आढळते . धर्मशास्राशी संबंधित विविध ग्रंथ श्रावणी विषयी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करतात असे आपल्याला आढळून येईल.


ऋग्वेद , यजुर्वेद, सामवेद यापैकी आपण ज्या संहितेशी संबंधित आहोत त्यानुसार आपली शाखा निश्चित होते . आपापल्या शाखेनुसार अध्ययन केले जाते व त्याला असनुसरूनच विविध संस्कार केले जातात .  

श्रावणी संस्कार ऋग्वेद शाखेसाठी श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्रावर यजुर्वेद शाखेसाठी  पौर्णिमा तिथीला ,सामवेद शाखेसाठी हस्त  नक्षत्र असताना करावा असे नियम सांगितले गेलेले दिसून येतात . 

हा विधी केवळ विद्यार्थी नव्हे तर गृहस्थ , वानप्रस्थ स्वीकारलेल्या व्यक्ती , यांनीही  करावा.  प्राचीन काळी गुरुकुलात गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यांच्या उपस्थितीत हा विधी केला जात असे . 


श्रावणीच्या विधीमध्ये जुने जानवे बदलून नवे धारण करायचे असा संकेत प्रचलित आहे . परंतु या विधीचा एवढाच अर्थ नाही . ब्राह्मण  क्षत्रिय आणि वैश्य यांना हा काळ हक्काच्या विश्रांतीचा असे. भारतीय संस्कृती शेतीप्रधान असल्याने घरातील शेतीची कामे आषाढातील पावसात आटोपून घ्यावी लागत . त्यावेळी चिखलाने माखलेले कपडे , जानवे यांचा त्याग करून नवे धारण करणे याला एक व्यावहारिक जोड दिसते . आजही आपण पाहतो की भातशेतीची मुख्य कामे आटोपली की श्रावण भाद्रपद  महिन्यात  पिकावर लक्ष द्यावे लागते . मग या काळात व्रते करणे, सण उत्सवांचा आनंद घेणे ओघाने आलेच . विजयादशमीला देवीने सीमा ओलांडली की मग राजे युद्धासाठी बाहेर पडत कारण पावसाळा ! मोकळ्या मैदानातील युद्धे पावसाळ्यात शक्य नसत . व्यापारही थंडावलेला असे कारण नवे पीक अजून हाती आलेले नसे . ही व्यावहारिक कारणेही समजून घ्यावीत अशीच आहेत . 


ऋषी म्हणजे द्रष्टे ! या ऋषी परंपरेचा आदर म्हणून श्रावणीमध्ये ऋषी तर्पण केले जाते . 

सहा कर्मे , तीर्थ आवाहन , हेमाद्री संकल्प ,दश स्नान , जानवे बदलणे , तर्पण , पितरांचे स्मरण  अर्घ्य दान , नमस्कार, गायत्री देवतेचे स्मरण  या सर्व विधींना यज्ञाची जोड आहे . यज्ञामध्ये  वैदिक देवतांना आहुती दिल्या जातात . श्रद्धा , मेधा ,प्रज्ञा , धारणा या ज्ञान संपादनासाठी आवश्यक देवता होत . याचा संकल्प अतिशय विचार करण्यासारखा आहे- विष्णूचे स्मरण करून त्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करावा . त्यानंतर संकल्पात काय म्हणावे ? ज्ञात अज्ञात अशा कोणाचे मी काही घेतले असेल , चोरले असेल, खोटे  बोलले गेले असेल, पती आणि पत्नी यांच्याकडून व्रताचे उल्लंघन केले गेले असेल. चोरी केली असेल, कठोर बोलणे झाले असेल, कुणाचा विश्वासघात केला गेला असेल ,नियमांचे उल्लंघन केले गेले असेल, इंद्रियांवरील निर्बंध चुकीने मर्यादेबाहेर गेले असतील , स्वतः:वरील संयम सुटला असेल तर त्या सर्व चुकांची कबुली देणे , या दोषापासून मुक्तता होण्यासाठी संकल्प करावा असा विचार पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी मांडलेला दिसतो .
 श्रावणी म्हणजे श्रावण महिन्याचा आल्हाद अनुभवीत प्रसन्न मनाने आपल्या शिक्षणातील सत्राची सुरुवात उत्साहाने करणे होय.पण हे केवळ व्यावहारिक शिस्त म्हणून नाही तर याला देवतांच्या स्तुतीची,प्रार्थनेची जोड दिली गेली आहे.वर्षभरातील स्वतःच्या आचरणाकडेही प्रामाणिकपणे पाहून केलेल्या चुकांची कबुली व त्या चुका न करण्याचे दिलेले संकल्पपूर्वक वचन हे स्वतःच्या घडणीसाठी उत्तम माध्यम आहे.
दक्षिण भारतात विशेषतः तमिळनाडूमधे या विधीला अवनी अवित्तम म्हटले जाते. तिथेही आपापल्या शाखेनुसार श्रावणीचा विधी संपन्न केला जातो.
महाराष्ट्रातही सामूहिक पद्धतीने याचे आयोजन केले जाते.
अशी श्रावणी विधीपूर्वक सर्वांना करणे शक्य असेलच असे नाही.पण या विधीमधील आशय समजून घ्यावा व त्यानुसार आचरण करावे हे मात्र आपल्याला नक्की जमू शकेल.

Sunday, 6 July 2025

स्री उपनयन-एक संस्कार,एक परंपरा

स्री-उपनयन-एक संस्कार,एक परंपरा
डाॅ.आर्या आशुतोष जोशी
(फोन 9422059795)

हिंदू धर्मातील एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना म्हणजे संस्कार!   हे संस्कार मनुष्याच्या जन्माआधीच सुरु होतात आणि त्याला शेवटचा निरोपही संस्कारपूर्वक दिला जातो हे लक्षात घेण्यासारखे आहे.
गर्भाधानापासून सुरु होणारा हा प्रवास अंत्येष्टी संस्कारापाशी येऊन थांबतो.हे सर्व संस्कार व्यक्तीचे व्यक्तित्व घडवितात,त्याला समृद्ध करतात,सक्षम करतात.
आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील महत्वाचे संस्कार म्हणजे नामकरण,उपनयन,विवाह हे होत.
व्यक्तिमत्वाची पायाभरणी करणार्‍या वय वर्ष आठ ते बारा या काळात होणारा उपनयन संस्कार किंवा मुंज हा संस्कार अतिशय महत्वाचा आहे.

उप म्हणजे जवळ आणि नी -नय म्हणजे नेणे.मुलाला ज्ञानप्राप्तीसाठी गुरुंजवळ घेऊन जाणे याला उपनयन संस्कार असे म्हटले जाते.

आपल्याला कल्पना नसते की वैदिक परंपरेत केवळ मुलाचे नाही तर मुलीचेही उपनयन होत असे.तिला मंत्रपठणाचा,ज्ञान मिळविण्याचा,पौरोहित्य करण्याचा अधिकारही भारतीय ज्ञान परंपरेने दिलेला आहे.
चला समजून घेऊया थोडं सविस्तर याविषयी-

ऋग्वेद हा भारतीय परंपरेचा आद्यग्रंथ!  ऋग्वेदात केवळ पुरूष ऋषींनी  रचलेल्या सूक्तांचा समावेश नसून ऋषिका म्हणजे महिलांनी रचलेली २७ सूक्ते ऋग्वेदात समाविष्ट आहेत.  शौनक रचित बृहद्देवता या ग्रंथात या महिलांची नामावली दिलेली आहे.(२.८२.८४)
कक्षिवान यांची पुत्री घोषा हिने आपल्या सूक्तात अश्विनीकुमारांची स्तुती केलेली आहे.(ऋग्वेद १०.३९)
विश्ववारा,जुहू,सरमा,सर्पराज्ञी अशा विविध ऋषिकांचे उल्लेख आपल्याला दिसून येतात.

 वैदिक काळात मुलींनाही शिक्षण मिळत होते. त्यांच्याही अभ्यासाची सुरुवात उपनयन संस्काराने होत असे. त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला जाई. कन्यांचे उपनयन झाल्यावर त्या गुरुगृही राहून त्या वेदाध्ययन करीत असत. 

पुराकल्पे कुमारीणां मौंजीबंधनमिष्यते।
अध्यापनं च वेदानां सावित्रीवाचनं तथा।।(वीरमित्रोदय,संस्कारप्रकाश ४०२-४०३)

अध्ययन पूर्ण झाल्यानंतर समावर्तन संस्कार केला जाई.समावर्तन म्हणजे सोडमुंज.या विधीमधे ब्राह्मणिने सुगंधी द्रव्य आपल्या मुखाला लावावे,क्षत्रियाने खांद्याला लावावे,वैश्याने पोटाला लावावे आणि कन्यांनी ओटीपोटाला लावावे असे  आश्वलायन गृह्यसूत्र (३.८.११)
 यामधे सांगितले गेले आहे हे नोंद घेण्याजोगे आहे.

ब्रह्मचर्याचे पालन करून अध्ययन पूर्ण करणाऱ्या कन्येला सुयोग्य वराची प्राप्ती होते, असे अथर्ववेदात म्हटले आहे.
ब्रह्मचर्येण कन्या युवानं विन्दते पतिम् । अ.वे.११.९.१६ ऋषिका जुहू ही बृहस्पतीची पत्नी होती. प्रमादामुळे त्याने पत्नीचा त्याग केला होता. तथापि वैदिक संहितांचे अध्ययन-अध्यापन करून तिने स्वतःचे उर्वरित जीवन व्यतीत केले. विश्वावरा आत्रेयी हिने स्वतःच यज्ञाचे पौरोहित्य केले व अन्य स्त्रियांनाही तसे करण्याचा उपदेश केला. अग्नीची पूजा करण्यास तत्पर आणि विद्वानांचे स्वागत करणाऱ्या विश्वावरेला यज्ञकर्ती म्हणून संबोधिले आहे.उपनयन संस्कार झाल्याखेरीज वैदिक काळात असे अधिकार प्राप्त होत नसत.

वैदिक काळापासूनच स्त्रियांचे उपनयन होत असे. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे यामध्ये स्त्रियांच्या उपनयनाचे संदर्भ आढळतात. संस्कार रत्नमालेच्या उपनयन प्रकरणात हारीतस्मृतीतल्या वाचनाला धरून स्त्रियांचे दोन प्रकार सांगितले आहेत. 
ब्रह्मवादिनी- ब्रह्मतत्त्वाचे अध्ययन करू इच्छिणारी ती ब्रह्मवादिनी. तिचे उपनयन करून तिला वेदाध्ययन करू द्यावे. २. सद्योवधू - संसाराची इच्छा बाळगणारी असेल ती सद्योवधू. तिचे उपनयन करून लगेच तिचा विवाह करावा, असे सांगितले आहे. 
यज्ञ हा वैदिक धर्माचा मेरुदंड मानला जाई. कौशीतकी ब्राह्मणात पथ्यास्वस्ति ही स्त्री उत्तरेकडचा खडतर प्रवास करून अध्ययन करते व तिच्या पारंगततेबद्दल वाच् ही उच्च पदवी मिळविते असा संदर्भ आहे. व्याकरणकार पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथात तसेच पतंजलीच्या महाभाष्यातही काही स्त्रिया आचार्य या नात्याने अध्यापन करीत, असे उल्लेख आढळतात.(अष्टाध्यायी ४.१.६३) पतंजली (४.१.७८)



गार्गी व मैत्रेयी यांच्या कथा बृहदारण्यक उपनिषदांत आल्या आहेत. त्यांची नावे सामान्यपणे सर्वांना माहिती असतात.(बृहदारण्यक २.४,४.५)
कात्यायनी व मैत्रेयी या याज्ञवल्क्य ऋषींच्या दोघी पत्नी. कात्यायनीला प्रामुख्याने गृहकृत्याची आवड होती तर मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी होती. याज्ञवल्क्यांनी संन्यास घेण्यापूर्वी मैत्रेयीला तिच्या इच्छेनुसार ब्रह्मज्ञान दिले. पृथ्वीवरील वैभवापेक्षाही अमरत्वाचे ज्ञान मैत्रेयीला अधिक महत्त्वाचे वाटले.

विदेह देशाच्या राजा जनकाने बहुदक्षिण यज्ञ केला व आवाहन केले की सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी ब्राह्मणाने शिंगाना सोने बांधलेल्या एक हजार गाई न्याव्यात. याज्ञवल्क्य ऋषींनी पुढाकार घेतल्यावर अन्य ब्राह्मणांनी त्यांच्याशी शास्त्रचर्चा केली परंतु याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांना निरुत्तर केले. त्यानंतर गार्गी वाचक्नवी पुढे आली आणि तिने याज्ञवल्क्य ऋषींशी शास्त्रचर्चा केली. गार्गी मर्यादेचे उल्लंघन करून प्रश्न विचारते आहे असे मानून याज्ञवल्क्य ऋषींनी तिला धमकी दिली की तुझे मस्तक गळून पडेल. पण गार्गीला त्याचे भय वाटले नाही. ज्याप्रमाणे पुरुष ब्रह्मचारी राहून तप, स्वाध्याय, योग इत्यादी द्वारे ब्रह्मपद प्राप्त करीत असत त्याप्रमाणे स्त्रियाही परमार्थाची वाटचाल करीत असत.

रामायण काळातील स्त्रियांना धर्मशिक्षण दिले जात असे. सीता, कौसल्या, तारा, वेदवती, स्वयंप्रभा यांना वैदिक शिक्षण दिले होते. सीतेचे उपनयन झाले असून ती सायंसंध्या करीत असल्याचे उल्लेख सापडतात.
संध्याकालमनाः श्यामा ध्रुवमेष्यति जानकी।
नदीं चे मां शुभजलां संध्यार्थे वरवर्णिनी।। (वा.रा.५.१४.४९)
श्रीराम व लक्ष्मण यांना विश्वामित्रांबरोबर पाठविण्यापूर्वी कौसल्येने त्यांचे स्वस्त्ययन केले.( वा.रा.१.२२.२)  वालीची पत्नी तारा ही मंत्रविद् म्हणून ओळखली जात असे. मतंग मुनीच्या आश्रमात राहून ज्ञानार्जन करणारी शबरी सर्वांना परिचित आहे.


महाभारतातील सुलभा-जनक संवाद प्रसिद्ध आहे. सुलभा ही एक कुमारी संन्यासिनी असून प्रधान नावाच्या राजाची कन्या होती. संन्यास आणि योगमार्गाचे आचरण करणाऱ्या विदुषी सुलभेने मिथिलेचा राजा जनक याच्याशी कर्मयोग, गृहस्थाश्रम यासारख्या विषयांवर शास्त्रचर्चा केली आहे. (म.शां. ३०८ ) या सार्‍याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी उपनयन झाल्यानंतर गुरुंजवळ राहून ज्ञानग्रहण करणे अनिवार्य होते.



शिक्षणाच्या अधिकारामुळे स्वतःला ब्रह्मपदी नेण्याचा अधिकार असलेल्या स्त्रीच्या सामाजिक अधःपतनाला उत्तर वैदिक काळात सुरुवात झालेली दिसते. भारतातील भौतिक समृद्धीचा मोह पडून अनेक परकीय आक्रमकांचे आघात भारताला झेलावे लागले. त्यामुळे स्त्रियांच्या विशेषतः मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये मनूने नोंदविले आहे की विवाह हाच मुलीचा उपनयनसंज्ञक विधी मानावा. पतिसेवा हीच तिची गुरूसेवा आणि गृहकृत्ये हेच तिचे यज्ञकृत्य होय. 
वैवाहिको विधिः स्रीणां संस्कारो वैदिकः स्मरतः।
पतिसेवा गुरौ वासो गृहार्थे अग्निपरिक्रिया।।
मनुस्मृती २.६६-६७

 
वैदिक कालापासून स्त्रियांचे धार्मिक क्षेत्रातील स्थान हिंदू परंपरेने जोपासलेले दिसून येते. भारतावर झालेली आक्रमणे, चातुर्वर्ण्याची प्रसृत झालेली संकल्पना यामुळे स्त्रियांना शैक्षणिक अधिकार नाकारले गेले, त्यांचे धार्मिक क्षेत्रातील अधिकारही काढून घेतले गेले. तथापि  अनेक सुधारकांनी केलेल्या कार्यामुळे स्त्रियांना स्वतःचा विकास करण्याचे व शिक्षणाचे अधिकार मिळाले. 

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वस्ती यांनीही महिलांना धार्मिक कृत्यांमध्ये पौरोहित्य करण्याचे अधिकार दिलेले दिसतात. पुण्यामध्ये शंकर सेवा समिती आणि ज्ञान प्रबोधिनी या संस्थांमध्ये महिलांना पौरोहित्य शिकविले जाते व समाजात त्या सर्वदूर पौरोहित्य करतात. ज्ञान प्रबोधिनी संस्थेमधे सर्व समाजगटातील मुलींचे उपनयन करण्याची पद्धती पुनरूज्जीवित करण्यात आलेली आहे.शिर्डीजवळ साकुरी येथेही महिला पौरोहित्य प्रशिक्षण दिले जाते.

असा हा महिलांना धार्मिक कार्याचा आणि व्यक्तिविकासाचा अधिकार देणारा उपनयन संस्कार आजच्या आधुनिक काळात सर्वसमावेशक होताना दिसतो आहे.मुलांच्या बरोबरीने देशाच्या रक्षणासाठी स्रियाही आता सरसावल्या आहेत.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथून महिलांची पहिली तुकडी नुकतीच प्रशिक्षण पूर्ण करुन बाहेर पडली आहे.अशा काळात स्रियांचे उपनयन आणि सर्व समाजगटातील स्रियांचे उपनयन होणे,त्यांना पौरोहित्याचे अधिकार मिळणे यासाठी आपण प्रयत्नशील राहणे अगत्याचे वाटते.विविध सामाजिक संस्था यामधे कृतीशील आहेत त्यांच्या कार्यात आपणही सहभाग घेणे स्वागतार्ह आहे.

(लेखिका मागील वीस वर्षांपासून हिंदू धर्मशास्र ,भारतीय संस्कृती,तत्वज्ञान या विषयातील संशोधक आहेत.२००५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी स्री पौरोहित्य या विषयावर M.Phil पदवीसाठी प्रबंधलेखन केलेले आहे.लेखिका मराठी विकीपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत.)

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...