Sunday, 24 February 2019

मा मा

मा मा अर्थात माहेरचा माणूस
हा मनुष्य माझ्या माहेरचा झाला आहे आता.म्हणजे तसा तो सासरचा असायला हवा होता कारण तो माझ्या नवरोबाचा मित्र आहे.पण आता तो माझाही मित्र झाला नव्हे माझ्या माहेरचा माणूस झाला त्याच्या शब्दात.
कसे कुठे ते मला कळेना अनाम नाते जडून आले
नभातूनी चैत्रचाहुलीचा चांदवा मी खुडून आले असं कोण्या कवीने म्हटलय.
अभिजीत गांधीने आमच्या घराचं केलेलं 3D पाहूनच लोकांचे डोळे विस्फारले होते.अनुज्ञाने त्याला मूर्तरूप दिलं. या सगळ्या प्रक्रियेत कुटुंबाची कसरत सांभाळताना माझी उलघाल झाली. ती कुणा तथाकथित  पर्यावरणप्रेमीशी मला बोलायचीच नव्हती. मला जे म्हणायचं आहे त्याप्रमाणे माझ्या मतांचा आदर करत आणि माझी मतं दुरूस्त करताना मी दुखावली जाणार नाही अशा पद्धतीने मला नवा रस्ता दाखवत ते काम अभिजीतने केलं.
त्याचा तो व्यावहारिक पण निसर्गप्रेमी संतुलित approach  मला अधिक भावला.
त्याच्या सूरावटींवर गायलेलं होठोंसे छुलो तुम असो किंवा त्याच्या आईच्या हातची गरमागरम थालिपीठं रिचवणं असो याला आपोआप एक आत्मीयता आली ती यामुळेच.
मित्र हा मित्र असतोच पण माहेरचा माणूस तुमच्या भूमीत आणि भूमिकेत शिरून तुमचा विचार करू शकतो.तुमची शारिरीक मानसिक अवस्था समजू शकतो. अभिजीतने त्याच्याही नकळत हे माझ्यासाठी केलं आहे.
प्रेमाने आणि समजुतीने त्याने स्वयंपाकघरात केलेली लूडबूड असो किंवा दीपान्वाताशी त्याचं खेळणं असो.ताम्हाण्याच्या प्रकल्पात सगळं जग एका बाजूला वारेमाप कौतूक करत असताना मैत्रीच्या आणि थोड्या मोठ्या वयाच्या अनुभवाने त्याने आशुतोषला या प्रकल्पाची व्यावहारिक बाजूही उलगडून दाखवत माझा मार्ग थोडा सोपा केला आहे.
खरं सांगायचं तर टोकाच्या पर्यावरणवादी विचारसरणीचा  नेमका अर्थ उलगडून पाहणं मला निव्वळ कठीण होतं. पण ताम्हाण्याच्या प्रवासात मला मध्यम मार्ग काढत कुटुंब निसर्ग आणि मी स्वतः असा त्रिकोण सावरण्याचं काम करायला बळ दिलं आहे ते केवळ या मा मा ने!


Friday, 22 February 2019

अपरान्त भूमीतलं देवघर


माझ्या परिचयात कोकणातली जी घरं आहेत ती बहुतांशी एका विशिष्ट समाजगटातली आहेत.त्या कुटुंबांशी माझं असलेलं सख्य किंवा स्नेह असा आहे की मी त्या घरातल्या मुख्य देवघरातही जाऊ शकते.कधी त्या घरातली काकू तिन्हीसांजा हळदीकुंकू लावायला बोलावते तर कधी विशेष निमित्ताने बोलावलं तर ओटीही भरली जाते.
यामुळे होतं काय तर मला त्या घरचं देवघर आवर्जून पहायला मिळतं.

चराचर व्यापलेला परमात्मा आपल्यासाठी सगुण साकार रूप घेऊन येतो आणि आपण त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी घेतो.
या जुन्या घरांमधे अंगणा परसातल्या फुलांनी झाकले गेलेले देव सहसा दिसत नाहीत पण तो घरच्या फुलांनी सजलेला देवघराचा देखावाच अधिक ठाव घेतो मनाचा.
पूजाअर्चा,त्याची तयारी यानिमित्ताने पूजक आणि घरातल्या महिला वर्गाला आपोआप एक शिस्त लागते.त्यांच्या जीवनशैलीचाच भाग असतो नं तो!
शिमगा गणेशोत्सव अशावेळी सारवून चोपलेल्या देवघरापुढच्या जमिनीवरची रांगोळी हसते.
मंडपीवर लावलेली तोरणं किंवा झेंडूच्या माळा शरद ऋतूचा आनंद वाढवतात.नव्याच्या पुनवेला बांधलेल्या ओंब्या लोंब्यांनी कसा समृद्धपणा भरतो घरात आणि मनातही.
विशेष निमित्तांचे नैवेद्य,संध्याकाळची दिवेलागणीची दूधसाखरेची चिंगुली वाटी,तुळशीपुढचा दिवा आणि यात भर घालणारा पडवी किंवा माजघरातला गाणं म्हणणारा झोपाळा!
पूर्वापारचे टाक,धातूच्या देवमूर्ती एखादा पूजनीय मानलेला छोटासा शिलाभाग असं सगळंच तिन्हीसांजा डोलू लागतं.
अशा देवघरांची एक खास वेताची परडीही असते.तिची ऐटच न्यारी आणि त्यात दारची फुलं भरून घरची न्हाऊन सुस्नात अशी गृहलक्ष्मी घरात पावती झाली की ती परडीही लेकुरवाळी भासायला लागते.
असे देव अशी देवघरे आणि त्यांचा आब आणि शोभा अनन्यभावाने सांभाळणार्‍या भाविक कुटुंबांच्या पिढ्या .....


Wednesday, 20 February 2019

भास

तुझ्या संचिताचा इथे होई भास
जुळती क्षण नाचरे मनी रुजे आस
कसे अनुभवावे मी कोवळ्या क्षणांना
कसे थांबवावे नेत्राच्या घनांना!!
आर्या


Monday, 18 February 2019

ऋण -अनुबंध

मृण्मयीला आज खूप कंटाळा आला होता. डिसेंबरची सुखद गारेगार दुपार होती. मैत्रिणीकडे काल रात्री राहून आज दुपारचं जेवण तिकडेच उरकून ती घरी परतली आणि अर्ध्या तासातच कंटाळली.
आई बाबा दोन दिवस बाहेरगावी गेले होते आणि त्यामुळेच मृण्मयीला कंटाळा आला होता. सगळेच मित्र मैत्रिणी कुठेनाकुठे जाणार होते त्यामुळे आपण एकटीनेच काय करायचं अख्खी संध्याकाळभर असा गहन प्रश्न तिला पडला होता.रात्री उशिराने सुकन्या येणार होती सोबतीला तिच्या पण तोपर्यंत काय?
मूव्हीला जाउया??? पण एकटीने!!! नकोच.
मग तुळशीबागेत फेरफटका??? मागच्या रविवारी तर जाऊन आलो आपण...
घरात बसून  टीव्ही पाहूया??? छे.अत्यंत कंटाळवाणा उद्योग...
तिने विचार केला चला आज मस्तपैकी एकटीनेच माॅल फिरायला जाऊया.येताना तिथूनच पार्सल आणू. सुकन्या येईल म्हणून छानपैकी आईस्कीम आणि पेस्टीही आणूयात.
ती तयार होऊन निघाली. गारगार वार्‍यात गाडी चालवताना तिला टवटवीत वाटायला लागलं.एकटेपणा कुठच्याकुठे पळून गेला.
दुपार संपून संध्याकाळ सुरु होत होती.. लोकांचे जथ्थे आज माॅलकडे वळत होते. तिला एकदम लक्षात आलं की परवा तर नाताळ आहे. माॅलमधेही नाताळच्या स्वागताची तयारी केलेली दिसत होती.
गाडी पार्किंगला लाऊन ती वर यायला जिना चढली त्याचवेळी तिला सिग्नलला फुगे आणि नाताळच्या टोप्या विकणार्‍या जोडप्याच्या दोन मुली दिसल्या. तिच्या नजरेत त्या आल्या तरी तिने दखल घेतलीच असं नाही. ती झरझर वरती आली.
सुरेल सुरावटीच्या धुनेने माॅलचं वातावरण चैतन्यमय झालं होतं.काचेआडच्या निर्जीव वस्तूही सजीव होऊन डोलत होत्या. मोठ्या दोन रेनडिअरच्या कटआऊटसमोर उभं राहून खराखुरा सांटा घंटा वाजवत होता.मुलांना चाॅकलेट देत होता.भलीमोठी ख्रिसमस ट्री रंगीबेरंगी सजावटीने आणि दिव्याच्या माळांनी लखलखत होती.
लहान मुलं जंपिंग जॅकवर उड्या मारत होती. कुणी
संटाकडून गप्पा मारत भेटवस्तू घेत होती.कुणाला त्याचे आईबाबा आवडती वस्तू विकत घेउन देत होते तर कुणी छान आवडता खाऊ खात होते.
मृण्मयी बालपणात शिरली.तिच्या बाबांना दोन वर्ष कंपनीने बेल्जिअमला पाठवलं होतं.त्यातलं एक वर्ष बाबांनी तिला आणि आईला नाताळ पहायला बोलावून घेतलं होतं... ते दिवस आठवून मृण्मयी  सुखावली.
तिनेही मनोमन खरेदी केली.एक छानसा टाॅप तिने ट्रायलरूम मधे जाऊन घालून पाहिला.छान दिसतो आहे म्हटल्यावर खरेदीही केला. त्याला साजेसे कानातलेही घेतले विकत हो नाही करत.
मनमुराद हिंडल्यावर आणि गर्दीची आणि नाताळची झगझगाटी दुनिया पाहिल्यावर आता ती दमली.छानपैकी काॅफी पिऊया आणि एक चीज सँडवीच... या पदार्थांवर आपण आयुष्यभर जिवंत राहू..... आपल्या आवडीची तिलाच गंमत वाटली.
काऊंटरला आॅर्डर देऊन वाफाळती काॅफी आणि सँडवीच घेऊन ती बसली.काचेच्या तावदानातून एकीकडे गजबजलेला रस्ता आणि दुसरीकडे माॅलचा सरकता जिना आणि गर्दी ती पाहत होती.
तेवढ्यात तिच्या बाजूच्या काचेला नाक लावून त्या मगाशी पाहिलेल्या दोन मुली तिला दिसल्या!!!
त्यांच्या नजरेत उत्सुकता आणि पोटात भूक तिला दिसली... नव्हे जाणवली...
आपल्या समृद्ध जगाच्या पलीकडचं हे वास्तव पाहून ती कासावीस झाली... काय करावं,काय पाहतो आहोत या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत राहिली. पर्समधे दोन हजार रूपये आणि कार्डही होतं.
ती काॅफी आणि सँडवीच तसंच ठेऊन बाहेर गेली.तिने मुलींना आत आणलं.जगाची प्रलोभने आणि फसवी दुनिया त्या मुलींना अजून माहिती नसावी. त्या नाचतच मृण्मयीमागे आल्या.आई वडिलांनाही कल्पना नव्हती की आपल्या मुली कुठे आहेत???
त्या नव्या दुनियेत शिरताना दोघी भांबावल्या पण मृण्मयीने हसूनच त्यांना दिलासा दिला.
दुकानातही नाताळची प्रतीकं सजली होती.मुलींनी ती हात लावून पाहिली... मृण्मयीने दोन पेस्टी आणि दोन सँडवीचेस विकत घेतली.दोघींनाही खुर्च्यांवर उचलून बसवलं. आजूबाजूचे लोक कुतुहलाने या सगळ्या घटनेकडे पाहत होते.पण मृण्मयी आणि त्या अनोळखी मुलींचं भावविश्व तयार  झालं.. तिघींनी शब्दांशिवाय एकमेकींना खूप काही सांगितलं. मुलींना पेस्टी आणि सँडवीचेस तिने उघडून दिली आणि आपण कसे खातो तसं खा असं खुणेनेच शिकवलं...
तुडुंब भरलेल्या पोटाने आणि मनाने मुली खुर्चीवरून ऊतरल्या आणि व्यावहारिक जगात वावरण्याचे संकेत माहिती नसल्याने कळकट फ्राॅकना हात पुसून बाहेर धावल्याही...
मृण्मयीला त्या दिसेनाशा होईपर्यंत ती पाहतच राहिली. कोण कुठल्या... नाव गाव माहिती नाही...
पण यावर्षीचा नाताळ त्या मुलींच्याही नकळत छान होता.सांताच्या टोप्या विकणारे आई वडील... पण आज मृण्मयीच्या रूपाने सांता त्यांना भेटला होता...
अतीव समाधानाने मृण्मयीने गाडी सुरु केली.भर थंडीतही स्वेटर न घालता बोचरी थंडी झेलत मनातून नाचतच मृण्मयी घरी आली.. कोणता ऋणानुबंध होता हा की जो तिला आणि त्या मुलींना बांधून गेला!!!? त्यांचं माहिती नाही पण मृण्मयीच्या मनात तरंग उमटवून गेला...









दुपार

एका शांत दुपारी निर्मनुष्य आसमंतात
निवांत तळ्याकाठी मी...!
कललेली दुपार पक्षी चुकार
हलकेच करती पुकार...!
निष्पर्ण चाफ्याचे झाड फुलण्याची अनिवार ओढ
कळ्यांमधे सामावलेले वेड...!
मनात माझ्या लहर आनंदाला बहर
भेटीची हुरहुर तुझ्या नि माझ्या...!
आर्या






Friday, 15 February 2019

महाशिवरात्र

आजचा दिवस वेगळाच होता. आनंदराव धर्माधिकारी आज बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या मिटींगसाठी निघाले होते. त्याचवेळी सुमनचीही लगबग सुरु झाली.घरातल्या कामवाल्या बाईला सूचना देऊन सुमन आवरून निघाली. सासूबाईंना माहिती होतं की तिच्या मैत्रिणींबरोबर ती आज एका दिवसाच्या सहलीला चालली होती.उद्या येते सासूबाई संध्याकाळी पाच वाजेपर्यंत. हे ही घरात नाहीत आणि अर्णवही गेला आहे ट्रेकला.सांभाळून रहा.नम्रता.. आपल्या गंगाबाईंची मुलगी येईल संध्याकाळी तुम्हाला सोबत.सकाळी जाईल उठून लवकर.काही हवं नको ते तिलाच सांगा.
अगं हो सूनबाई,नको इतकी काळजी करूस.
ड्रायव्हर गाडी घेऊन तयारच होता दारात.आनंदरावांनी आज त्याला सांगितलं की तू आज जा घरी परत.आज अनेक दिवसांनी स्वतः गाडी चालवण्याची इच्छा आहे माझी. आनंदराव स्वतः चालकाच्या खुर्चीत बसले आणि त्यांनीच आज ड्रायव्हरला चौकात सोडलं.
सुमन रीक्षात बसली आणि फोन वाजला.
हो निघाले आहे.पोचते एक दहा मिनीटात.
सुमन रीक्षातून उतरली आणि चौकात आनंदरावांच्या गाडीत बसली. दोघांनी एकमेकांकडे पाहून एक हास्य उमटवलं प्रसन्नतेचं.
गाडी सुरु झाली.
दोघंही काहीही न बोलता समोर धावणार्‍या रस्त्याकडे पाहत होते.
आज  महाशिवरात्र... पण तिचं काय महत्व?
तीस वर्षांपूर्वी महाशिवरात्रीच्या संध्याकाळी आनंदने सुमनला आपल्या प्रेमाची कबुली दिली. सुमन गोंधळली पण सुखावलीही. घरी जाऊन तात्यांशी बोलण्याचं धाडस मात्र तिच्यात नव्हतं.
आनंद एक दिवस घरी आला,कर्मठ आणि काहीशा बेदरकार असलेल्या सुमनच्या वडिलांकडे त्याने लग्नाचा विषय काढला...
आम्हाला आमची मुलगी गळ्यातली धोंड नाही झालेली बरं.आणि आम्ही जातीचे पक्के खानदानी आहोत. त्यामुळे आमच्याच भावकीत स्थळ शोधणार.दुसरीकडे नाही द्यायची हो मुलगी आम्हाला....
सुमन प्रतिकार करू शकली नाही.आईनेही तिला पाठिंबा दिला नाही.पळून जावं का असा विचारही मनात आला दोघांच्या... पण भावकीतली मंडळी सुखाने जगू देणार नाहीत याची कल्पना होतीच तिला.
शेवटी व्हायचं तेच झालं... सुमनने आपल्या प्रेमाला तिलांजली दिली.
आनंदचा नाईलाज झाला. रडून रडून सुमन थकली.निराशेच्या छायेत आनंद कासावीस झाला.
एका मुहूर्तावर सुमनचं लग्न झालं.भल्या माणसाचं दान ओंजळीत पडलं. पण ती मनाने त्याच्याशी जोडली नाही जाऊ शकली. सर्वांशी जुळवून घेत आपल्या नवर्‍याला तक्रारीला जागा न ठेवता संसार करत राहिली.त्याला पुसटशी कल्पनाही नाही आली सुमनच्या भूतकाळाची.
पंधरा वर्ष उलटून गेली.आनंदची आठवणच मनात उरली होती.पण थांगपत्ता नव्हता. शोधलं तिने पण सापडला नाही.
घरात थोडी अडचण आली म्हणून कर्ज काढावं लागलं.नवर्‍याबरोबर बँकेच्या मॅनेजरला भेटायला गेली.... आनंदराव धर्माधिकारी...
कसं थोपवावं हे मनातलं वादळ दोघांनाही समजेना...
दोन दिवसांनी आनंदने बँकेत असलेल्या तपशीलावरून तिला फोन केला.एकटीच होती घरात... भरभरून बोलली.
धीर करून भेटलीही एकदा,.. पुलाखालून पाणी गेलं होतं पण प्रेम मात्र आजही अंतर्यामी रूतलं होतं.
मी लग्न नाही केलं.तुला विसरू शकत नाही सुमन मी.तू आनंदी आहेस हे पाहून बरं वाटतय...
मी आनंदात आहे पण माझीही अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नाही आनंद!मात्र वर्तमानाशी सर्वथैव प्रामाणिक आहे मी.
मी बँकेच्या परीक्षा दिल्या. मुंबईत राहिलो.नोकरी केली. बढती होत होत इथे बदली झाली या शाखेचा अधिकारी म्हणून.आई थकली आहे पण माझ्याबरोबरच राहते. बाबा गेले दहा वर्षापूर्वी. मीना सुरतला असते. तिला एक मुलगी आहे.मीनाने बहीण म्हणून प्रयत्न केला माझ्या लग्नासाठी.पण तिलाही माहिती आहेच कारण.
सुमनलाही आता थोडा धीर आला होता संवादातून.
मी लोणावळ्याला एक घर बांधलं आहे.गडी घर सांभाळतो. दर महाशिवरात्रीला तिथे जातो वर्षातून एकदा... तुझी आठवण सांभाळायला.... नंतर मी तिथे फिरकतही नाही वर्षभर...
सुमन आणि आनंदराव गेली दहा वर्ष महाशिवरात्रीला भेटतात.वर्षातून एकदा फक्त आणि फक्त याच दिवशी. मग घरात काही असो किंवा बँकेत. तातडी आली तरीही त्यातून मार्ग काढून भेटतात. सुमनने आजही तिच्या वर्तमानाशी असलेला प्रामाणिकपणा सोडलेला नाही. आनंदरावांनीही तिच्या या भावनांचा आदर केला आहे. वर्षभरात नंतर कधीही भेटत बोलत नाहीत.कोणताही संपर्क नसतो त्यांचा. पण ठरल्याप्रमाणे काहीतरी योजना करून सुमन बाहेर पडतेच शिवरात्रीच्या दिवशी सकाळी... ठरलेल्या जागी भेटून दोघे पुढे जातात...
मोबाईल फोनची सुविधा आली आहे तेव्हापासून आदल्या दिवशी आणि त्या दिवशी सकाळी फक्त संपर्क करतात एकमेकांना.
वर्षातून एकदाच आपलं प्रेम भरभरून जगतात.  एकमेकांच्या भावनांचा आवडीनिवडीचा आदर करत.,. देवाणघेवाण कशाचीच नाही. फक्त भेटणं आणि त्या आठवणींचं संचित वर्षभर वापरणं पुढच्या शिवरात्रीची वाट पाहत...


चंद्र चांदणी

मनातला चंद्र हासला
अचानक उगवली चांदणी
तिलाही झाला मनी आनंद
नाचू लागली गगनांगणी
चंद्रमाधवीच्या प्रदेशातली
वाट उजळून गेली
चंद्र आणि चांदणीला
आल्हाद देऊन गेली.


हृदयामधले गाणे

हृदयाने हृदयाला शिकवावे सुरेल गाणे
हृदयाने हृदयाचे सोडवावे उखाणे
हृदयाने हृदयाला भेटूच नये नेहमी
तरीही प्रेम जपले जाईलच अंतर्यामी
हृदयाने हृदयाला सांगावे गुज
जणू काही कृष्ण आणि पाव्याचे अलगुज!
हृदयाने ऐकावेत हृदयाचे बोल
त्यातून घडेल  नाते अनमोल
तुझं हृदय माझं हृदय असंच आहे नक्की
सात जन्मांची सोबत आणि गाठ आहे पक्की
तुझ्या हृदयात माझं हृदय जपलेलं
मखमली पेटीत जणू टपोर्‍या मोत्याला सांभाळलेलं!!


पळस पांगारा..

वसंताची चाहूल घेऊन पानगळ सुरु झाली
तापू लागलेल्या उन्हाने काहिलीची जाणीव दिली!
हिरवे डोंगर आता करडे भासू लागले
पाणवठ्यावर पक्ष्यांचे आवाज घुमू लागले!
अशातच फुलले आहेत सावरी,पळस,पांगारा
त्यांच्या अस्तित्वाने फुलला निसर्गाचा गाभारा!
देवत्वाची येते प्रचिती त्यांच्या रंगछटांमधून
रखरखीत दुपारी शांतावते नजर गुलाबी केशरी भासातून!
कुणास ठाऊक कशी काय निसर्गाची किमया अशी
सूर्याच्या धगीला झेलणारी धरित्रीची माया जशी!
अनाम चाहुल येते दाटून पाहत डोळा क्षण साजिरा
बहरत राहो असे वसंती पळस,सावरी,पांगारा!
आर्या.


Saturday, 9 February 2019

मागे वळून पाहताना

एस एन डी टी चा निसर्गरम्य परिसर. पाचवी ते दहावी या रस्त्याने फिरताना ताया दिसत. मजा करणार्‍या, कँटिनमधे खाऊ खाणार्‍या,लायब्ररीतून पुस्तकं नेत असलेल्या, बेकरी विभागात शिकत असलेल्या ताया हातात केकचे ट्रे घेउन फिरताना दिसत तेव्हा तोंडाला पाणीच सुटे. आपण शाळेत वेळापत्रकाप्रमाणे बसायचं आणि या ताया मस्त उनाडत असतात असंही मनात येऊन जाई.
या जगाची नवलाई वाटे. शाळेपासून विद्यापीठाच्या पुढच्या दारापर्यंत जाता येता ही मौज दिसे.  बावीस वर्ष लोटली तरी इथलं मैदान,इथला सुंदर राखलेला निसर्ग आजही आठवतो.
मला गणित आणि शास्र येत नाही म्हणून बाबांना काळजी वाटे. अनेकदा इथून जाता येता मला त्यांची काळजी आठवत असे आणि मी अस्वस्थ होई. आई गेल्यानंतर तर बाबांना माझी अधिकच काळजी वाटे.
हुशार आहे पण हिचा कल निव्वळ पैसे मिळवणारा नाही. कसं होईल हीचं?
आज बाबा पाहत असतील निःशंक. आज मी इथे मराठी विकिपीडियाची कार्यशाळा घ्यायला आले आहे. जुने दिवस तरळून जात आहेत. पैसा, बुद्धीमत्तेचा विधायक कामात वापर, मानसन्मान आणि स्वतःबद्दलचा अभिमान असं सारं  सॅकमधे घालून आज मी या परिसरात चक्क पायर्‍यांवर मस्त बसले आहे.
ज्ञात भूतकाळाच्या छायेत अभिमानास्पद वर्तमान कर्तृत्वाची शिखरं चढणार्‍या भविष्यकाळाची स्वप्नं पहात....


Tuesday, 5 February 2019

चंद्रमाधवीच्या प्रदेशात....

गुलालाची उधळण
उडत्या थव्यांची पखरण
खिल्लारांच्या गळ्यातील किणकीण
संध्यासमयी ईश्वराला अनन्यभावे लीन!!
चांदोबाचा टीळा
चांदण्यांची रांगोळी
सांजगारव्याचा धूप
अनाहत नादाची टाळी!
अशी सजली पूजा
संध्यासमयीची
परमेश्वराच्या चरणी
ओढ माझ्या अंतरीची!!
या माझ्या ओळी... गावातल्या रम्य संध्याकाळी मला सुचल्या... अवतीभवती जे अनुभवायला मिळतं ते "छंदा"त बांधण्याचा माझा हा "छंद" अर्थात कविता करणं.
तसंही लहानपणापासूनच समोर काही वेगळं दिसलं की त्याचा निबंध लिहीण्याची सवय मला माझ्या बाबांनी लावली आहे.थोडी मोठी झाल्यावर माझी समजही थोडी वाढली असावी.संस्कृत भाषेने माझं शब्दविश्व समृद्ध केलं आणि गद्याऐवजी पद्यात अभिव्यक्त होण्याचा "छंद" मला जडला... मी कविता करू लागले माझ्याही नकळत...
शहरातल्या गर्दीच्या रस्त्यातून जाताना लाल चाफ्याचं फूलही माझ्या कवितेचा विषय होतं आणि कोकणातल्या आमच्या आडगावातल्या घराभोवती धुक्याला लपेटून येणारी पहाटही मला प्रेरणा देते कविता करण्याची...
हा अनुभव वेगळाच असतो. असं बसून ठरवून कागद लेखणी घेऊन कविता सुचत नाहीच. ती सुचण्यासाठी समोर डोळ्यांनी काही अनुभवावं लागतं, ते डोळ्यातून हृदयाच्या तळाशी झिरपावं लागतं... मग मनाच्या कागदावर वैखरी अक्षरं उमटवत जाते. आणि साकारते "कविता".
मन आनंदी असलं तरी कविता सुचते आणि मन निराश झालं तरी त्या भावनांना मोकळी वाट करून देते माझी "कविताच".
मी शहरात होते त्यापेक्षा गावात आल्यावर मला माझा छंद अधिक ऊर्जा देतो असं जाणवतं. माझा एकाकीपणा घालवणारा, मला लोकांच्या मनोराज्यात फिरून यायची मोकळीक देणारा, काहीवेळा वास्तवापलीकडे जाऊन चंद्रमाधवीच्या प्रदेशातही फिरवून आणणारा माझा छंद!
तो माझा छंद नसून तो माझा मित्र आणि प्रतिबिंबही आहे.
अलीकडे तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीही मला कवितेची प्रेरणा देतात. अगदी मीच थापलेली भाकरी पौर्णिमेचा चंद्र होते तर  गावातल्या मतिमंद मुलाला फिरायला नेणारी आईही मला काव्य सुचवते.
पहिली माझी ओवी! देवाजीच्या पायी!
फुलांची ओंजळ! त्याच्यासाठी!!
दुसरी माझी ओवी! झाडापानांसाठी!
त्यांच्या सोबतीने! पक्षी राहती!!
तिसरी माझी ओवी! शेतीभातीसाठी!
धरतीच्या कुशी! हिरवी बाळे!!
चवथी माझी ओवी!चवतीचा चांद!
मळ्यात आपुल्या ! कष्ट करी!!
पाचवी माझी ओवी! चंद्राची  चांदणी!
खेळे माझ्या अंगणी! रातदिन!!
माझं कुटूंब,आमचं रोजचं आयुष्य हे असं आता वेगवेगळ्या "छंदात" सामोरं येतं.कधी ओवी तर कधी अभंग होऊन,कधी चारोळी तर कधी मुक्तछंद  होऊन.
सणांच्या शुभेच्छा सर्वांना देतानाही त्या आतूनच "छंदातच" उसळत येतात आणि मला अनामिक ऊर्जा देऊन जातात.
ज्ञानाचा नंदादीप,
सद्भावनांची माला!
आत्मीयतेच्या घटी
परमेश्वरी लीला!!
नवज्ञानाची शस्रे पारजून
कुंठीत विचारांचे सीमोल्लंघन!
विजयादशमी अशी साजिरी
प्रसन्न होईल तन आणि मन!!
असं म्हणत माझा छंद मला ईश्वरचरणी लीन करतो तर कधी देशप्रेमाने उचंबळूनही येतो.
मी आणि माझ्या रोजच्या जगण्याला "अर्थ" देणारा माझा छंद कालांतराने मला व्यवहारातही "अर्थ" मिळवून देऊ लागला.. पण माझा छंद त्यासाठी नाही हे मला पक्कं ठाऊक आहे. केवळ हौस म्हणून मी तंत्रज्ञानाचा वापर करून काव्यनाद हा माझा पहिला ई कवितासंग्रहही प्रकाशित केला.. तो क्षणही आठवणीत जपून ठेवण्यासारखाच आहे.
माझा छंद मला प्रत्येकवेळी प्रसववेदनांची आठवण करून देतो. शब्ध मनातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतात, मी ही कासावीस होते, स्वतःला विसरते.कधी श्रांतावतेही. पण हळूहळू   माझ्या शरीराची नाळ तोडत तोडत  अक्षरं स्वतःचं अस्तित्वं दाखवतात, अक्षरांचे शब्द,शब्दांच्या ओळी, ओळींना छंदांची जोड मिळत एक बाळ हाती येतं... टपोर्‍या अक्षरात हसतं.... माझं काव्य.
माझा छंद म्हणजे कविता करणं हे माझं बाळही आहे. तो पुनःप्रत्ययाचा आनंद हीच माझी ऊर्जा आहे.


राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...