सह्याद्रीचा परिसर सुखावणारा आहे तितकाच तो रौद्रही आहे.शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातील बौद्ध लेण्यांच्या समूहात आज भर पावसात फिरताना मन कुठेतरी त्या काळात फिरत होतं.आकाशातून येणारे ढगांचे लोटच्या लोट आणि समोरून हळूहळू आपल्याच दिशेने सरकत येणारा पाऊस.
एक व्यक्ती म्हणून आपल्याला समृद्ध करतात असे क्षण जे फक्त आपले असतात.हौसेने छायाचित्र काढण्याचा आग्रह मी आशुतोषला केला खरा पण मी त्या छायाचित्र टिपलं जाण्याच्या प्रक्रियेत नव्हतेच.लेणी समूह परिसरातली ती एक जागा अशी आहे जिथे समोर विस्तीर्ण पसरलेला प्रदेश दिसतो.आज तिथे फक्त पावसाचा आवाज होता.अचानक आलेल्या पावसाने सर्व पर्यटकांची त्रेधा उडवली त्यामुळे सगळेच त्या शैलाश्रयांखाली जाऊन विसावले.माणसं अवतीभवती असूनही अचानक त्यांचं अस्तित्व दिसेनासं झालं आणि समोर दिसत राहिला फक्त पाऊस पाऊस पाऊस आणि समोरचा परिसर.
तिथून उठावंसं वाटेना,काही करावंसं वाटेना.मी तिथेच होते बसलेली पण माझं मन नेमकं कुठे होतं ते मलाही सांगता येणं कठीण आहे.डोळ्यांनी दिसणारं बुद्धीत साठवलं आणि ते मी उतरवलंही झरझर पण तरीही या सगळ्याचा अनुभव घेणारी मी तिथे नव्हतेच त्या क्षणी...
मी होते कुठे? त्या स्तूपाभोवती ?समोर पडणार्या पावसाच्या थेंबांमधे की सह्याद्रीच्या रांगांमधे?
कुठेतरी नक्की होते पण अजूनही शोध लागलेला नाही... त्या शोधातच सारं आयुष्य सरून जावं... ते शोधता शोधताच जगणं साजिरं व्हावं...
आर्या