Sunday, 30 March 2025
तुझी -माझी चैत्रगौरी
Tuesday, 11 March 2025
त्वं मे सहव्रता भव।
या विवाहाच्या निमित्ताने पुनः पुनः व्यक्त व्हावंसं वाटतं आहे कारण संस्कृतीचा आदर ओतप्रोत दिसतो आहे.
विवाह कशासाठी? कोणासाठी? त्यातले विधी असेच का आहेत? याबद्दल जर सारासार विचार केला तर दिसून येतं की गृहस्थाश्रम हा कायमच समाजव्यवस्थेचा कणा मानला गेला आहे.गृहस्थ आणि गृहिणीने त्यांच्या वैयक्तिक विषयसुखांचा आनंद घेतानाही एकमेकांची मर्यादा राखत संसार पूढे न्यायचा आहे.
वैदिक परंपरेत सूर्यासावित्रीचे विवाहसूक्त खूप बोलके आहे.त्याचा अभ्यास आजच्या काळातील युवतींनीही करण्यासारखा आहे.
गृह्यसूत्रांमधे तर प्रथम समागमाचा विधीही सुंदर पद्धतीने मांडलेला आहे आणि त्याला मंत्रांची जोड दिलेली आहे कारण अपत्य जन्माला घालणे हे पती पत्नीचे कर्तव्य आहे आणि एक भावी नागरिक त्यातून राष्ट्राला द्यायचा आहे.
कोणताही ग्रंथ जेव्हा एखाद्या विषयावर काही मांडणी करतो तेव्हा केवळ हे काहीतरी मागास आहे अशा दृष्टीकोनातून त्याकडे पाहणे संकुचित ठरेल.पण बहुधा तसेच होताना दिसते! कारण याबद्दल फारशी माहिती नसते.
भारतावरील आक्रमणे लक्षात घेता येथील सामाजिक व सर्वात आधी कौटुंबिक परिस्थितीवर घाला घातला गेला.मंदिरे उध्वस्त झाली तशा महिलाही उध्वस्त झाल्या.या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी लहान वयात होणारा त्यांचा उपनयन विधी बंद करून विवाह हाच त्यांचा उपनयनसंज्ञक विधी मानावा असं स्मृतिकारांना म्हणावं लागलं तर ते गैर नसावं त्या काळाच्या दृष्टीने.मग पती हाच गुरु म्हणून त्याला वंदन करण्याची,आदर देण्याची पद्धती! (मी दरवर्षी गुरुपौर्णिमेला माझ्या नवर्याला नमस्कार करते वाकून ! कारण intimate relationship मधेही mentorship होऊ शकते आजच्या भाषेत याचं आम्ही उदाहरण आहोत असं मला नेहमी वाटतं! माझ्या मनातलं उंचीच भय काढून टाकून मला थेट हिमालयात गिरीभ्रमणाला नेणारा माझा मित्र जेव्हा माझा नवरा होतो म्हणून त्यातलं गुरुतत्व बाधित होत नाही उलट ते वाढतं! आणि तो ही सांगतोच की मी आर्याकडून या चार गोष्टी शिकलो! मला असं नाही वाटत की मीच का त्याला नमस्कार करायचा! समानता आहे नं! कारण कृती ही फक्त प्रतीकरूप आहे आणि त्यामागचा भाव महत्वाचा आहे.आणि त्यातून मी वयाने त्याच्यापेक्षा थोडीतरी लहान आहेच! पण तरीही कयतींनाही अर्थ आहे म्हणून विधीतील उपचार सांगोपांगी महत्वाचे आहेत!
पण याच स्मृतिकारांनी स्रीलाही पूज्य मानण्याविषयी सांगितलं आहे कारण त्यांनाही दिसत असावंच नं की युद्धामुळे,आजारांमुळे ज्यांचे पती गेले आहेत अशा विधवांची काय अवस्था होत असावी! म्हणूनच की काय पुढच्या काळात अविधवा नवमी श्राद्ध केलं जाऊ लागलं! अशा परिस्थितीत जिचा पती सुखरूप तिचा भाग्योदय कारण समाज आणि कुटुंबरचनाही विधवांसाठी अवहेलनेचीच ठरली!
मधल्या काळात विवाह संस्कारात मुलीचे कन्यादान याच्याशी संबंधित तिचे श्राद्ध करण्याचीही पद्धती प्रचलित असल्याचे दाखले सापडले आहेत.काही महिलांकडून मी माझ्या Ph.D च्या वेळी तसे अनुभवही ऐकले आहेत सर्वेक्षणावेळी! दुर्दैवाने या प्रथा अधिक जोमाने फोफावल्या व रूजल्या आणि त्यामुळे विवाह संस्कारविधी विचारातील गर्भितार्थ मागे पडत गेला.सारं काही फक्त वरासाठी व फक्त वधूसाठी असं नाही आहे यात कारण आता आपण दोन शरीरे पण एक आत्मा असंच रहायचं आहे नं यापुढे! हा उदात्त विचार स्वीकारायला काय अडचण असू शकेल?कारण त्यामुळे कुटुंब,समाज आणि राष्ट्र बांधलं जातं आहे हे किती महत्वाचं आहे!
सातच पावलं का? आठवं का नाही? चारच का नाही? हे प्रश्न मला फुकाचे वाटतात.ज्यावेळी या रचना बांधल्या गेल्या आहेत त्यावेळच्या परिस्थितीनुसार हे सारं ग्रथित झालं आहे! आणि त्यात जर सहजीवनाचं सार बांधलं जात असेल सर्वार्थाने तर ते जसंच्या तसं स्वीकारण्यात नेमकी अडचण कुठे आहे?
मंगलसूत्र बंधन कारण ही कुणाची तरी विवाहित स्री आहे हे समजावं! ते बंधन समाजदृष्ट्या महत्वाचं आहे.आजही अनेक घटस्फोटीत किंवा विधवा महिला मंगळसूत्र आवर्जून घालतात कारण आता तर समाजाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे.
सौभाग्यवती या शब्दाचा विवाहित स्री हा अर्थ संकुचितपणे घेऊ नये.भग शब्दाचे विविध अर्थ आपल्याला कौशसाहित्यात सापडतात.भगवान असं आपण म्हणतोच नं परमेश्वराला! भग म्हणजे ऐश्वर्य,समृद्धी,शील असे विविध अर्थ! या सार्यांनी युक्त सहजीवन नववधूला मिळावे या आशीर्वादात केवढा मोठा अर्थ दडलेला आहे!
तर काय हा सारा विषय मुळातून समजून घेण्याची गरज आहे. लिहिण्यासारखं खूप आहे पण संशोधकालाही मर्यादा असतात कारण सारंच संशोधन लेखाच्या स्वरूपात खुलं करणं थोडं अवघड जातं!
जे आकर्षक वाटेल ते स्वीकारण्याकडे लहान मुलांचाही कल स्वभावतःच असतो.पण सज्ञानांनी मात्र गोष्टी तावून सुलाखून व परंपरेचा आदर करीत निष्पक्षपातीपणे समजून घ्यायला हव्या व नंतर त्यावर चर्चा करुन मार्ग काढायला हवा आहे कारण धर्मशास्रज्ञ हा विषय कधीही थेट तुम्हाला काही सांगणार नाहीत,त्याचे between the lines शोधण्याचा Wisdom सुद्धा आपली हीच भारतीय संस्कृती आपल्याला प्रदान करते!
डाॅ.आर्या जोशी
त्वं मे सहव्रता भव।
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
