Monday, 21 December 2020

आपली मैत्रीण रूक्मा

 देवदिवाळीच्या दिवशी अख्खं गावच सजल्यासारखं दिसत होत. प्रत्येकाच्या घरापुढे सारवण झालं होतं. त्यावर सुबक रांगोळी काढलेली होती. रुक्माला आज जरा उठायला उशिरच झाला होता. आईने गोठ्यातून जाऊन बिंदली आणि धनूचं धारोष्ण दूध काढून चुलीवर तापायला ठेवलं तेव्हा कुठे रूक्मा जागी झाली.

" आजसरावाला जायाचा न्हाई का माळावर?" तात्यांचा प्रश्न! " न्हाई वो तात्या, आज देवदिवाळीची किबिले गुरजींनी सुटी दियायली". पण रूक्मे उठ आता, चांदणी चार दिस झालं गावं ना..जा शोधून आन तुझ्या मैतरनीला".
देवदिवाळीसाठी मुंबईहून कोकणातल्या घरी आलेले रूक्माचे काका काकू चुलत भावंडं अजून नीजू नीजूच होती. पण चांदणीचं नाव ऐकल्यावर ती ताडकन् उठली!
विहीरीवर जाऊन तिनं पाणी शेंदून काढलं. स्वतःचं आवरलं.आईने पहाटे पेटवलेली पाणचूल विझू लागली होती. रूक्मेनं त्यात चार लाकडं सरकवली आणि ती पुन्हा पेटवली. स्वतःच्या बादलीत गरम पाणी ओतून घेऊन तिने दोणीतलं आणखी एक बादली पाणी चुलीवरच्या मातीने लिंपलेल्या घंगाळ्यात ओतलं आणि ते अंघोळीला पळाली.
" मोठी आई,, जानेवारीत नं तालुक्याच्या स्पर्धा हायती उंच उडीच्या. किबिले गुरजी त्याचीच तर परॅक्टिस घेतात नं रोज.. मला म्हनले ते की रूक्मे तालुक्याला जिंकलीस तर जिल्ह्याला उतरता यील बग तुला". मी जानारे मोठी आई आनि मोठा कप बी जिंकून येनार..."
" जा बाई... तुझा बा सरपंच झाल्यापासून तुला काय काय शिकू देतुया... शिका अन् मोटं व्हा..."
दोन घट्ट वेण्या आजीकडून घालून घेऊन रूक्मा पळाली... ।चांदे अग ए चांदे.".. त्यांची म्हैस गेले चार दिवस बेपत्ताच होती. रूक्मा तिचा अन् ती रूक्माचा जीव की प्राण..
कुठे गेली होती कुणास ठावकी... तिचं दूध काढायचं तर रूक्मानेच. तिला दर आठवड्याला वहाळावर नेऊन तिचं अंग घासून धुवायचं रुक्मानेच आणि स्वतःही डुंबायचं रूक्मानेच... अशी दोघींची धमाल चाले. चांदेचं रेडकू आता तसं मोठं झालं होतं त्यामुळे चांदणी आता गावभर भटकत राही. इकडंच तिकडंच गवत खात राही. सणाच्या दिवशी चांदेला घरी आणलं पाजेच असा मनात विचार येईपर्यंतच तिला चांदणी दिसलीच! कुठल्यातरी झाडाचा पाला ओरबाडून रवंथ करत असलेली!!
चांदे गो चांदे... रूक्मेनं तिला गळ्याला मिठी मारली आणि चांदणी तिचा हात चाटू लागली. " चल घरी, आज पुरनपोळीचा निवद हाये चांदे... तुझ्याबिगर गोटा सुना वाटावं गं"
चांदणीही समजल्यासारखं तिच्या मागं चालू लागली... येताना वाटेत दिसणार्‍या काटक्या रूक्मा गोळा करत होती. आपल्याला पेलवेल इतकी मोळी जड झाल्यावर तिनं वाटेतली एक वेल खेचली अन् पटकन् त्याची छानशी मोळी बांधून टाकली अन् डोक्यावर घेतली."
" चांदे अग आज मम्मी देवळाच्या जत्रेत वडे अन् भजीचा स्टाल लावती. बचत गटाबरबर.. मी पन जानारे संगं... वडे तळूक मदत करनार... पुढच्या वर्षी न्हाई जानार... शिंदे बाईंनी सांगितलय आता पाचवीत गेलं की स्काॅलरशिपला बसवनार मला... मग अभ्यास करावं लागलं ना...आणि क्रीडास्पर्धा पण असत्यात ना ग... अशा गप्पा मारत रूक्मा अन् चांदणी घरात दाखल झाल्या.
" शानी माझी बाय ती"रूक्माच्या आईने तिची अलाबला घेतली... अन तिच्या डोक्यावरची लाकडाची मोळी उतरवली.
"मम्मी संध्याकाळी कितीला जायाचं जत्रंला ग?"
"अग आधी निवद हू दे." मंग पुढचं पुढं...
हात पाय धुवून आणि चांदणीला रेडकूजवळ गोठ्यात बांधून रूक्मा घरी आली.
" तिची मोठी मम्मी म्हणजे काकू आणि आजी पीठ मळत होत्या."
थोडावेळ आपल्या चुलत बहिणीला ठिक्कर शिकवून झाली अन् आजीनं केलेला मऊ भात चुलीवरून ताटात वाढून घेऊन तो खायला रूक्मानं सुरूवात केली. छानशी ढेकर दिल्यावर रूक्मानं मागल्या दोणीवर आपली ताटली अन् पेला घासला अन् फ्राॅकला हात पुशीत ती घरात आली.
"मम्मे,, सकाळी पण भजे करू ना..."
" हो माजे आई करूचा गे"....
रूक्माने मोठ्या पातेलीत बेसन घेतलं. त्यात आजीला विचारून तिखट, मीठ, धने जिरे पूड, घातली. कोथिंबीर धुवून चिरून घातली, तीळ घातले. थोडी घरच्या तांदळाची पिठी पण घातली...
" मम्मे.. भजेचं पीठ कालवून ठेवलय...भजे करचं ग.."
तिची चुलत बहीण वैभवी म्हणाली.. "यात कांदा बटाटा काही नाही का?!"
"" याला बोंडाभजे म्हनतात ग. तू खाऊन बघंच.. झाक लागत्यात..." रूक्मा म्हणाली....
" चल शेजारी पमा, दिनू सगळ्यांची न्याहरी झालेली दिसते.. खेळायला जाऊ" असं म्हणून आपला धाकटा भाऊ गोंद्या अन् चुलत भावंडांना घेऊन रूक्मा पळाली ती बाबांच्या हाकेनंच घरात आली.
जेवणाचा घमघमाट सुटला होता.घरात येऊन रूक्मानं देवघराकडे धाव घेतली. सुंदर सारवलेल्या जमिनीवर छोटा खड्डा दिसत होता. तिने शेणाचं पाणी करून ठेवलेलं भगुलं उचललं अन् त्याने त्या खड्यावरून छान हात फिरवून खड्डा बुजवून टाकला सुद्धा!
तिथला ओला भाग सुकल्यावर तिने त्यावर छान रांगोळी काढली... तात्यांनी निवद वाढून आणला होताच...
"मम्मे सर्जा राजाचं घास मी डोंगरात जाऊन भरवून येत्ये गो"
पावसाळ्यानंतर गोठ्यातली बैलं म्हणजे बैल मोकळ्या डोंगरावर बांधली जातात अशी गावात पद्धत. रुक्मेचे बैलही वरतीच होते. आईने दिलेली पडशी सांभाळत आणि भावंडांना बरोबर घेत हसत खिदळत रूक्मा निघाली सुद्धा,..
" चला लवकर ये पोरांनो... खाली येऊन जेवनं करून नट्टापट्टा करायचाय अन् जत्रेला जायाचय... आज नाटक हाये कुनाचंतरी.. माझ्या मैतरनी पण भेटणार ... अन् मी मम्मीला भजे वडे तळायला मदत पन करनार.. मम्मे मला त्याचे धा रूपये बक्षीस देनार हाये. मी पुढल्या महिन्यात स्पर्धेला जानार ना... तेव्हा खाऊ खानार मी त्या पैशाचा...."
ओशिवळ्याच्या जिल्हा परिषद शाळा नंबर तीन मधे शिकणारी उत्साही बडबडी आपली मैत्रीण रूक्मा.... आपल्याच बडबडीत दंग अशी चालत चालत बघता बघता डोंगरावर पोहोचली सुद्धा...
आज आपण उठलो रूक्माबरोबर... आणि दुपारच्या जेवणापर्यंतचा आजचा सणाचा दिवस आपण रूक्माबरोबर घालवला... आवडेल का तुम्हाला रूक्माबरोबर संध्याकाळच्या जत्रेची मजा पण अनुभवायला?


Thursday, 3 December 2020

जागतिक अपंग दिन

 या अस्मादिक आहोत...वैतागलेल्या...वय वर्षे सहा म्हणजे इयत्ता पहिली. मागे जी हिरव्या साडीत आहे ती यमूताई म्हणजे माझी दुसरी आईच! तिचा साखरपुडा त्यादिवशी होता. ते रामचंद्र नावाचे काका आता यमूताईला घरी घेऊन जाणार या कल्पनेनेच मी प्रचंड वैतागलेली होते....यमूताईबरोबर तुला पण नेईन मी घरी... असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा हा फोटो निघाला! पण आजही अगदी माझ्या लग्नातसुद्धा रामचंद्रकाका आले तेव्हा मी आशुतोषला हळूच म्हटलं... या काकांनी माझे लाड केलेत... खाऊ आणलाय, खेळणी आणली पण मला ते मुळ्ळीच आवडले नाहीत.... का तर यमूताईला घेऊन गेले कायमस्वरूपी !

तर आता या सगळ्याचा संबंध पुढच्या सर्व मनोगताशी आहे....
या छायाचित्रात जो छोटा दादा दिसतो तोही आमच्या घरी मदतनीस होता. माझा खेळगडी आणि मला शाळेत सोडणारा, आणणारा, घरात आजीला मदत करणारा आणि यमूताई तर माझा जीव की प्राण! आज यमूताईही आजी झाली आहे तरी माझ्या मनात ती माझी आईच आहे.... कारण माझ्या आई वडिलांच्या शारिरिक मर्यादा...
आपल्या सारख्याच व्यंग असलेल्या जोडप्यांना जेव्हा निर्व्यंग बाळ होतं तेव्हा ते त्याला कसं सांभाळत असतील? त्यांना मनासारखा सह अनुभूतीने वागणारा जोडीदार, कुटुंब मिळेल का? असे प्रश्न माझ्या जन्मानंतर त्यांना भेडसावले आणि त्यातून जन्म झाला " अपंग संजीवनीचा". आई मला कधी कडेवर घेऊन फिरू शकली नाही, ना माझ्याशी धावाधावी खेळू शकली पण तिचं वात्सल्य आणि यमूताईने घेतलेली माझी काळजी यामुळे आज मी जी आहे ती दिसते आहे. आईच्या आईने तर मला तळहाताच्या फोडासारखं जपलं! माझं बालपण लाडाकोडात (जोशीबुवांच्या भाषेत-फाजीललाडात!!)गेलं पण तो हेहीमान्य करतो की सामाजिक जाणिवा समृद्ध असलेली आणि इतरांबद्दल आत्मीयता असलेली मुलगी त्याच्या सासूसासर्‍यांमुळे त्याला जोडीदार म्हणून मिळाली आहे! पण ते श्रेय माझं नव्हेतर त्याचं गुपित माझ्या अनोख्या बालपणात दडलंय!
1983 साली अपंग संजीवनीचा जन्म झाला.यमूताईच्या पुढे पळता पळता मी पहात होते की कुणी दोन डोळे असलेले पण तरीही पांढरी काठी आपटत आपटत आपला जिना एक काका चढत आहेत.
एक मावशी येते तिच्या आईबरोबर पण तिला एका हाताला पंजाच नाही...
एक दादा येतो तो आपल्या बाबांसारखाच चालतो. विजय गुप्ते काका येतो.... आपल्याबरोबर जेवतो, बसून खेळतो पण त्याचे पाय कुठे आहेत?? तो हातावर चालतो आणि हातात चप्पल घालतो.
रविमामा येतो, सुजाता मावशी येते, आपण सगळे मिळून राजा शिवाजी विद्यालयात जातो.तिथे असे खूप लोक असतात...मग यमूताईच्या कडेवर बसलेल्या मला ही सर्व मंडळी भेटायला येत...
अमर सिंह मामा येई... पण तो काय बोलतो ते मला समजत नसे... फक्त त्याच्या हातून फाईव्ह स्टार घेणे माझ्या आवडीचे.
आणि कुणी येई मावशी तिचं नाव हिरामणी वाधवा... ती मला मांडीवर घेऊन बसे आणि हाताने चाचपत ती माझे लाड करत असे...तिच्या पर्समधली काॅम्पॅक्ट मला लावून म्हणे... अदिती तू मुळातच गोरी गोरी पान ग.... पण तरी मी लावते हं तुला पावडर....!! हिला तर दिसत नाही मग ही कसं म्हणत्ये मला की तू गोरी पान आहेस?? काही मंडळी एकत्र जमत आणि तोंडातून अस्फुट हुंकार काढत बोटांच्या हालचाली करत आपापसात बोलत, हसत आणि भांडतसुद्धा!!!!
हे मी आज शब्दबद्ध करू शकते आहे कारण ते मनःपटलावर कोरलं गेलं आहे म्हणूनच..नाहीतर ते वय हे सर्व समजण्याचं नव्हतं!!!
कळू लागलं तसं समजू लागलं की आपल्या मित्र मैत्रिणींचे आई बाबा चालू शकतात पण आपल्या आई वडिलांची शरीरं वेगळी आहेत. तिची आई तिच्यामागे धावते पण माझ्यामागे यमूताई, विलास धावतात, त्याचे बाबा त्याच्याबरोबर लंगडी घालतात पण माझे बाबा नाही करत..... पण आजही त्याचं शल्य वाटत नाही मुळीच! अपार प्रेम ,स्नेह, वात्सल्याने भरलेलं बालपण! माझं विश्व नकळत्या वयापासून असं भरलेलं, भारलेलं!
आम्ही खाली खेळताना असंच कुणी आलं की नंतर मी धावत त्या व्यक्तीला भेटे आणि स्वतःहून हात धरून घरी वर नेई..... हे मला कुणी सांगितलं नाही... आई बाबांनीही नाही... पण जाणिवेतूनच मला हे उमगायला लागलं!
अशा सर्वांचे विवाह जुळवणं, त्यांना गरज असेल तर संसारासाठी आर्थिक सहाय्य, अल्प दरात विवाहाचे कार्यक्रम करणं, प्रसंगी त्यांच्या लग्नाचं पौरोहित्य करणं... माझं कन्यादान करायला आई बाबा नव्हते पण त्यांनी अशा तेवीस अनाथ अपंग मुलींचं कन्यादान केलं आहे!!! लिहीतानाही डोळे चटकन् पाणावले माझे!!! काय विलक्षण पाहिलं आहे मी हे सर्व. आणि हे सर्व आमच्या तिघांच्या आयुष्याचाच भाग होतं!
अंधांच्या क्रिकेटच्या स्पर्धांना जाणे, अपंगांच्या तीनचाकी सायकल स्पर्धा, मेळावे, अपंग साहित्य परिषद, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आमच्या घरातला आणि आमचा त्यांच्या घरातला वावर, अपंगांच्या सहली, त्यामधे ते घेत असलेला निकोप आनंद, एखाद्या अंध मामीला बाळ होणार आहे हे कळल्यावर माझ्या डाॅक्टर असलेल्या आईने तिच्या प्रसूतीसाठी शब्दशःधावणं, नंतर ते बाळ बघायला मला घेऊन जाणं...... this is endlesss...
अपंग दिनाच्या निमित्ताने मला माझं उजळलेलं बालपण शब्दबद्ध करावंसं वाटलं कारण ते फार कमी मुलांना लाभत असेल!!!
मी तत्वनिष्ठ आहे, मला नियमांची पायमल्ली केलेली खपत नाही, मी फटकळ आहे पण तरीही माझ्या जवळच्या मंडळींना माहिती आहे की प्रेम करावं एखाद्यावर तर ते अदितीनेच! कुठे शिकले मी हे?????? यात जी सहजता आहे ती इतरांना पोचते पण मला असं कधीच वाटत नाही की मी प्रेमळ बिमळ आहे, काळजीवाहू आहे... फिरून बालपणात मुशाफिरी केली की लक्षात येतं.... अपंगांच्या आयुष्यात एक टोकेरीपण कदाचित व्यंगामुळे येतं ते त्यांच्या सहवासात माझ्यामधे आलं असेलही पण जर मी आत्मीय आहे असं कुणी आवर्जून म्हणत असेल तर त्याचं श्रेय या सर्वांचं आहे... वेदनेच्या मुळाशी एक हुंकार येतोच..... आई गं!!! माझ्यासाठी तर वात्सल्य आणि वेदना या दोन्हीचा हुंकार हा एकच आहे! जीवाला जीव लावणारी प्रसंगी out of the way जाऊन इतरांसाठी धडपडणारी माझी शरीराने अपंग पण मनाने खंबीर तितकीच मायाळू आई आणि बाबा आणि त्यांचे हे सर्व मित्र मैत्रिणी!!!!!
त्यामुळे माझ्यातलं जे न्यून आहे ते माझं आहे आणि जे चांगलं आहे , रसरशीत आहे ते या सार्‍या सार्‍यांचं आहे!

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...