शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी#
तो खेळ सुरु आहे म्हणूनच सृष्टीचा व्यापार सुरू आहे.... राजापूर येथील धूतपापेश्वर मंदिरात असा सारीपाट खेळतात शिव आणि शक्ती.दहाव्या अकराव्या शतकात शिलाहार राजांनी बांधलेलं हे मंदिर आहे असं अभ्यासक सांगतात.
या मंदिरात रात्रीच्या आरतीला एकदातरी उपस्थित रहावंच ते हा मांडलेला सारीपाट बघण्यासाठी!
मंदिरात संध्याकाळी साडेसात पावणेआठला आरतीची तयारी सुरु होते.पुजारी आणि गुरव हे दैघेही आपापली कामे पार पाडताना येथे दिसतात.
आरतीच्या आधी गाभार्याच्या भवतीचा परिसर झाडून स्वच्छ केला जातो.
शिवपिंडीला रूद्राक्षांची मोठी माळ घातली जाते.चादीचा त्रिशूळ आणि डमरू शेजारी मांडला जातो.मोठ्या फुलांच्या हारांनी पूजा बांधली जाते.देवापुढे नैवैद्याची ताटे झाकून मांडली जातात.शिवपिंडीशेजारीच पार्वतीची सुबक देखणी मूर्ती आहे.
धुपारती केली जाते आणि शिवपिंडीसह गणपती,देवळातील गाभार्याबाहेर असणार्या अन्य देवतांच्या मूर्ती यांनाही धुपारत दाखविली जाते.यावेळी पूर्वी नगारावादन होई.आता बधलत्या काळानुसार यांत्रिक नगारा वाजविला जातो.हे काम गुरव करतात.
त्यानंतर पाच नीराजने उजळवून त्यात वाती घातल्या जातात.ही नीराजने प्रज्वलित करुन गर्भगृहाच्या उंबर्यावर ठेवली जातात व घंटा वाजवत आरती म्हटली जाते.
शिव आणि पार्वती यांच्यासमोर पाट ठेवला जातो ज्यावर सारीपाटाचे चौकोन आखलेले आहेत.यावर सारीपाटाच्या सोंगट्या तसेच नागाच्या प्रतिमा सुबक रीतीने मांडून ठेवल्या जातात.हे सारं समोरून पहाणं हा एक आनंददायी अनुभव आहे.
याजोडीनेच चिमुकला सुबक नंदी,पादुका हे ही सारे शिवापुढे मांडले जाते.
आरती झाल्यावर गर्भगृहाचे दार लावले जाते.
रात्री येथे शिवपार्वती सारीपाट खेळतात अशी भाविकांची धारणा आहे.