Monday, 30 July 2018

असं एक यंत्र हवं

असं एक यंत्र हवं...
जे सहज घेऊन जाईल दूर दूर नव्या प्रदेशात...
असा प्रदेश हवा परीकथेसारखा..
जिथे असतील वात्सल्याच्या नद्या, आनंदाची झाडं, प्रेमाची बेटं, गोड पाण्याचा समुद्र,  सुवासाचे रान,लखलखती वाळू, मायेचे उंच पर्वत, आणि परस्परांसाठी आसुसलेले जीव, प्राणिमात्र...
असं असावं एक यंत्र जे परत नेईल पाठी भूतकाळात...
मनात पक्की रुतलेली स्मरणचित्र दाखवत जाईल ते हळूहळू काळाच्या पडद्यावर..
असं असावं एक यंत्र....
जे सगळ्यांनाच बांधेल एका नाजूक धाग्यात आत्मीयतेच्या....
असंअसावं एक यंत्र जे आठवण करुन देईल हळव्या क्षणांची, लटक्या भांडणांची आणि पुन्हा जुळवलेल्या भावबंधाची....
असं असावं एक यंत्र जे सफर करुन आणेल विश्वाची, लुकलुकणार्‍या तार्‍यांची,गूढडोह आकाशगंगांची...
असं असावं एक यंत्र जे पोचवेल आपल्याला हवं तेव्हा हवं तिथे हवं त्या माणसांच्यात....
असं असावं एक यंत्र जे वाचेल दुसर्‍याचं मन अणि ऐकवेल आपल्याला त्याचं गुज...
असं असावं एक यंत्र जे नेईल काळाच्या आड केव्हा ना केव्हा.... पण तिथे असू आपण सगळेच पुन्हा एकत्र, अकृत्रिम स्नेहाने बांधलेले, वात्सल्याच्या नदीत डुंबणारे, आनंदाच्या झाडावर चढणारे,सुवासिक रानात उनाडणारे, गोड्या समुद्रात डुंबणारे, लखलखत्या वाळूचे किल्ले बांधणारे आणि मायेची पर्वतशिखरं ओलांडून पुन्हा नव्या परिकथेच्या प्रदेशात जाणारे... घट्ट बांधलेल्या हातांनी....
र्या

Saturday, 28 July 2018

स्वरसाज

आतुर काही जीवघेणे
वाटे त्याचे होतील तराणे
हुरहुर मनीची कंठी दाटता
त्यातुन उमटे सुरेल गाणे!!१
गाता गाता ऐकू येई
हाक माझिया कानी माझीच
षड्ज लावता खुला मोकळा
पडते कानी तुझे हासणे!!२
जीव काहिली साहून थकला!
स्वरवर्षावी भिजू लागला!
आवर्तांच्या ताना गुंफीत
मन हे झाले पुन्हा दिवाणे!!३
अशी कशी ही ओढच सखया
तुला न कळते सुरेल गाणे
तरीही तुझिया ओढीतून  मी
गळा चढविते सुस्वरलेणे!!४
आर्या

Friday, 27 July 2018

डोळ्यात वाच माझ्या...

नजरेतून काही सुचविणारी माणसं अनेकदा असं म्हणताना मी आसपासही पाहिलं आहे की "तुमची" नजर तशी होती! मला असं काहीच म्हणायचं ही  नव्हतं !!  मी असं कधी बोललोच नाही किंवा बोललेच नाही....
अशा काही भावना वेगवेगळ्या संदर्भात आपण अनुभवत असतो. अशा क्षणी मला रोहित आठवतोच आठवतो!
आमच्या एस.पी. काॅलेजच्या पाटील मॅडमनी मला त्याचा बारावीचा सहामाही पेपर लिहीणार का असं विचारलं! ती त्याची आणि माझी ओळख!
त्याला जन्मतःअंधत्व आणि कानांनीही कमी ऐकू येतं. त्याच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत आईवडिलांनी त्याला फार छान सांभाळलं आहे.त्याची धाकटी बहीणही गोड आहे.
त्याचा पेपर लिहून झाला आणि मधे खंड पडला, जाता येता भेटत राहिलो इतकच.
नंतर त्याला सहाही विषय शिकवण्यासाठी कुणीतरीहवं होतं. पाटील मॅडमनी यावेळीही मला विश्वास दाखवून विचारलं आणि सुरु झाली आमची शिकवणी काॅलेजनंतर दररोज!
मी त्याच्या घरी जायचे आणि नोटस् ध्वनीमुद्रित करून द्यायचे. दररोज मी त्याला ते समजावूनही सांगायचे. त्याला टिळक रोडला बसमधे चढवून मग मी घरी परतायचे.
माझ्या मैत्रिणी आणि त्याचे मित्र असा आपोआपच गट वाढत गेला.कला मंडळाचे कार्यक्रम,शास्रीय संगीताच्या मैफिली, साहित्य परिषदेतली व्याख्यान असं खूप काही आम्ही एकत्र enjoy केलं.
मी त्याचा हात धरलेला असायचा हे सातत्याने पाहून कुणीतरी मावशीकडे चुगली केली होती. त्यावेळी तिने ठामपणे उत्तर दिलं होतं की तो मुलगा नक्कीच रोहित असणार!!!
नंतरच्या काळात मी कोणत्या रंगाचा ड्रेस घातला आहे, एखादं फूल कोणत्या छटांचं आहे,व्यासपीठावर कोण कोण बसलं आहे हे आम्ही बोलताना ऐकून लोक अचंबितच होतात हे जाणवू लागलं. मला त्याच्या यंत्र लावलेल्या कानाच्या बाडूलाच तो बसायला सांगे जेणेकरुन त्याला माझं बोलणं ऐकणं सोपं जावं.
ऊन वारा पाऊस थंडी सर्व अनुभवत आमची मैत्री घडत गेली. मराठी भावगीते हा आमचा वीकपाॅइंट. मला फोन लावून "आंदू हे ऐक जरा वेगळं" असं तो नेहमी करायचा. नंतर मावशीही त्याच्याशी गप्पा मारायला लागली फोनवर!
काॅलेजात भेटूनही घरी गेलो की फोनवर बोलायचो.अभ्यास गाणी गाॅसिप अशी धम्माल!
डोळसांच्या जगात वावरताना मला त्याच्या नजरेतली आत्मीयता सुखावून जायची. आमच्या मैत्रीच्या सुदृढ आणि निखळ कल्पना आधीपासूनच कमालीच्या स्पष्ट होत्या अमच्या मनात. त्यामुळे कधी ताण वाटला नाही. गैरसमज प्रत्येकच नात्यात होतात. पण आम्ही ते समक्ष भेटून सोडवले आहेत नेहमी.
अशी ही जादूई मैत्री. रोहित आता बॅंकेत काम करतो . अयुष्यात स्थिरावायची स्वप्न पाहतो अहे. मी त्याला म्हटलंच आहे की तुझ्या लग्नात मला छान साडी नेसून मिरवायचं आहे म्हणून....
आर्या

Monday, 23 July 2018

पालखी पालखी

काही घटना अशा असतात की ज्या चुकणार अशा कल्पनेनेच मनात काहुर माजतं. पुण्यात दरवर्षी येणारी पालखी ही त्यापैकीच एक घटना.
१९९० पासून मी दरवर्षी पुण्यात पालख्या येतात त्यादिवशी त्यांचा आनंद घेतला आहे. इतक्या वर्षात दोन तीन अपवाद वगळता मी नक्की हजेरी लावली आहे. या आठवणी माझा आनंदठेवा आहेत.
अशा घटना म्हणजे रस्ते बंद,गर्दी,अस्वच्छता ही अनेकांची धारणा अहे आणि ती चुकीचीही नाही.फार कशाला माझा नवरा असं म्हणणार्‍या लोकांच्यात अग्रस्थानी आहे.
पण काहीही असलं तरी जायचच ही सवय मला माझ्या बाबांनी लावली.
आळंदीला सतत जाणं असल्याने आणि मी दरवेळी बाबांचं शेपूट असल्याने मला ही आवड लागली खरं तर. तो माहोलच वेगळा असतो. भक्तीने भरलेला,हुरहुर दाटवणारा.
शाळेत असेपर्यंत वेगळी मजा! त्यादिवशी शाळा अर्धा दिवसच असायची. कधी घरी जाते असं व्हायचं.
त्यावेळी तुलनेने लवकर येत असत दिंड्या.आता उशीरच होतो.कारण संख्या वाढली.
काॅलेजला गेल्यानंतरची सर्व वर्ष विनया आणि काकू अणि मी असं त्रिकूट जात असू. माझं अणि विनयाचं उनाडणं हा स्वतंत्रच विषय आहे.
लग्न झाल्यावर एक वर्ष हट्टाने नवरोबाला नेलं मी कारण त्याचं आॅफिस मागच्याच चौकात होतं तेव्हा. पण लहान मुलासारखं त्याचं चल चल म्हणणं अणि त्याचे विचार ऐकणं यापेक्षा हे बाळ घरी किंवा आॅफिसातच बरं असं ठरवून मी एकटीच जायचं नक्की केलं.
संत्रिकेत तर मी सतत घड्याळ पहायचे. लगतच्या कुमठेकर आणि लक्ष्मी रस्त्यावरचे स्पीकर गाऊ लागले की मला बाहेर पडायचे वेध लागत.
रस्त्याभर असलेली स्वागताची तयारी, रांगोळीच्या पायघड्या घालणारे कलाकार, पोलिसांची लगबग, रंगीबेरंगी खेळणी आणि फुगे विकणारे अशी धम्माल असते ती.दोन्ही बाजूंना हवशे!नवशे! गवशे हिंडतात तरी नाहीतर मोक्याची जागा पकडून बसतात तरी! एरवीचा फर्ग्युसन रस्ता चक्क भक्तिभावात रंगतो या दिवशी!!!
हळूहळू गर्दी वाढायला लागते. एकेक दिंडी आपापल्या गतीने येत असते.वाहनांच्या आवाजात आता टाळ मृदुंगाचे आवाज मिसळू लागतात आणि चालू वाहतूक बंद केली जाते.
कॅमेराधारी मंडळी काय काय टिपत असतात देव जाणे! असं मला पूर्वी वाटायचं. पण गेली दोन वर्ष मीही माझा कॅमेरा लटकवला आणि फिरले! प्रत्यक्ष पहावंच की पण काही साठवावंही!! या न्यायाने मीही असे अनेक क्षण,भाव कैद केले आहेत. ती मजा आणि नेमका क्षण टिपण्याचा आनंद शब्दबद्ध करणच कठीण आहे!
वारकर्‍यांना सुविधा पुरवणारे गट सज्ज होतात. कुणी वार्ताहर मुलाखती घेत असतो.कुणी मालिकेतल्या नायिका तिथे येऊन आपली भाविकता नोंदवत असतात अणि बघे त्यांना टिपत असतात.
आम्हीही भुकेच्या जाणीवेने आधी पोटोबा करून घ्यायचो. समोर दिसलेल्या कुणातरी वारकर्‍याला विचारलं जातच की माऊली किती लांब आहेत अजून!!! माऊली लांबच असतात पण तुकोबांचा अश्व पुढे येतो. हातात गंधाचे नाम ताटलीत घेऊन फिरणार्‍यापुढे जाऊन उभे राहणे हे तर नित्यनेमासारखेच आहे! हौशी पालक आपल्या लेकरांना भर गर्दीतही पारंपरिक पोशाखात आणतात तिथे. त्यांची तंत्र सांभाळताना पालकांचीही कसरत होत असते. आळंदीपासून चालत आलेले भाविक पुणेकर त्यांच्या मंद झालेल्या चालण्याच्या गतीवरूनच ओळखता येतात. एखादा संबळवादक, वीणेकरी एकटा सापडला की मग क्लिकक्लिकाट सुरु!
हौशी दिंडीकर बघ्यांनाही सामील करून घेतात आणि झिम्मा फुगड्या रंगतात!
गर्दीचा आवाज टिपेला जातो. अक्षरशः मुंगीलाही जागाा नसते. दिवसभर दमून काम करून आलेले दुचाकीधारक पोलिसांची बंदी पाहून अधिकच चिडचिडतात. या सगळ्या गडबडीत अखेर पाठोपाठ पालख्या येतात.दर्शनासाठी झुंबड उडते. शेव गाठ्या खाजा विकणारे,माळा विकणारे,मुखवटे विकणारेही आत याच गर्दीचा भाग होऊन जातात.
त्यातून मार्ग काढत काढत मी पुढे जात राहते कारण मला जे हवं असतं ते गवसलेलं असतं. मला पादुकांना हात लावायचाच नसतो. मला पहायचा असतो वारकर्‍यांच्या मनातले ज्ञानोबा तुकोबा. अन्य उत्साही लोकांच्या नजरेतली उत्सवप्रियता!
त्यानेच तृप्त होते मी.
आता तर दूर आहे या सगळ्यापासून. पण तरीही मनात याच आठवणी रुंजी घालत आहेत. काय करणार असे पीळ सहसा सुटत नाहीत जे तुम्हाला अंतर्बाह्य समृद्ध करतात.

मनाचिया गूढगर्भी तेजाळली एक मूर्ती!
कवणा सांगू तिची किर्ती, मायबापा!!
सावळे ते रूप स्थापियले अंतरी
वसविले निरंतरी माझ्या चित्ती!!
नयनांच्या कमळांचे भाव ठसले डोळ्यात
कटेवरी हात, पाय समचरण साधिती!
उजळला देह माझा, काया जाहली पुनीत!
झाले स्थिर अवयव झळाळली बुद्धी!!
उन्मनी साधली जीव झाला एकाकार!
सावळ्याच्या परिसस्पर्शे  जीव शिव अद्वैताती !!
माझेपण रिते झाले उरली केवळ भक्ती
आसावली माझी मती तुझिया प्रिती!!
देह आणि मन बुद्धी जाहली तुझीच आता
बापरखुमादेवीवरु लागली समाधी!!

मनतळाच्या आत  झिरपलं आहे संचित कोवळं
कधी शहाणं तर कधी खुळं!!
निखळ नितळ आणि निवळ!!!
त्या संचिताची फुलं झाली आणि निळ्याशार डोहात तरंगली!
त्यांचा रंग उमटला आहे मनावर अलगद!
तो ज्याने उमटवला  त्याचेच हात आहेत हे किमयेचे,आस्थेचे आणि सौहार्दाचे.!!!
आर्या.
आर्या

आषाढी

पांडित्यही थकले ज्याचे गुण गाता
डुबकी घेतली भक्तिसागरी पोहता!
रंगी रंगे मन ज्याचे चरण पाहता
गगनी गेला वेल ज्ञानियाला आठविता!!
विषवल्ली तुटे अमृतवेल रुजता
ठोस मिळे उत्तर समाधी लागता
बापरखुमादेवीवरु विट्ठली भेटता!
आषाढीचा मेघ आकाशातून सांडता
एकादशी तीच अमृतवर्षावे भिजता!!
र्या

काळा आणि निळा

निळा लोभसवाणा मेघ
त्यात बासरी दडली!
श्याम रंगी गर्दतेत
घुंगुरकाठी मंजुळली!!
एका खांदी उपरणे
एका खांदी घोंगडी!!
दोघांच्याही खांद्यावर भक्तीची गाठोडी!!
निळ्यात उतरला काळा काळाही झाला निळा
साधनेच्या आनंदमार्गी तृप्तीचा सोहळा!!
निघाले वैष्णव दिंड्या पताका घेऊनी!
टाळ मृदुंगाचे बोल पडती हो कानी!!
असा आला आला पहा
भक्तीचा महापूर
साधनेच्या गूढडोही भरून आला उर!!
कुंडलिनी सळसळे साधकाच्या ध्यानी
तिच्या परिसस्पर्शाने साधली उन्मनी!!
असा आहे पहा निळ्या काळ्याचा सांगावा
समाधीच्या पंढरी  ईश्वर शोधावा, सापडावा, साठवावा!!
र्या

आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण!!
त्याच्या खांद्यावरी हिरवाईचे उपरणं!!
आला श्रावण श्रावण...
भाळी लाविला हो त्याने तपकिरी टिळा!
गंधाळल्या मातीला अत्तरी उगाळून!!
आला श्रावण श्रावण!!
मनगटी गळी कानी रूळती त्याच्या माळा!
पानाफुलांनी की नटले त्याचे हो अंगण!!
आला श्रावण श्रावण!!
मनी त्याच्या झोका पंचमीचा झुले!!
कन्यका सजूनी आल्या लेऊनी कांकण
आला श्रावण श्रावण..
पूजिली ग गौरी तृप्त झाला शिव
त्याच्या उदरी दडले सृष्टीचे निर्माण
आला श्रावण श्रावण
मनगटी बांधिली ग त्याने एक राखी
बहिणीच्या वात्सल्याची हृद्य आठवण
आला श्रावण श्रावण
कुणी बांधिली हो पूजा, जन संघटित होती
ते पाहुनी तोषला  देव सत्यनारायण
आला श्रावण श्रावण...
सागराच्या कुशी रत्नांचीच खाण
श्रीफळ देऊनी कृतज्ञ झाली धीवर धनीण
आला श्रावण श्रावण
अष्टमीच्या रात्री जन्मला श्रीकृष्ण!
दहीदुधाने माखले गोपांचे बालपण!!
आला श्रावण श्रावण
तळहाती मेंदी अलवार आठवण
त्याच्या तिच्या मनी हसला श्रावण
हसला श्रावण!
र्या

कधी कधी भेटतात माणसं आयुष्यात, स्वतःच्याच बेहोशीत जगणारी!
त्यांना नसते तमा दुसर्‍याच्या मनाची.... असं समजतो आपण!
पण चुकुन कधीतरी अनुभवाला येतो अशांच्या मनाचा हळवा कोपरा...
थक्क होतो आपण आपल्याच नकळत अनुभवून असं काही!
मनातलं नकळत दिसतं जेव्हा डोळ्यात,खोल गहिर्‍या डोहात..
त्या डोहातल्या काळ्याकुट्ट भासणार्‍या जळात हळूच टपकतं एक फूल...फांदीवरुन
आणि होऊन जातो तो गंभीर डोह तरल,गंधीत आणि सांगून जातो मनीचं कूज!
कदाचित कृष्णाच्या पाव्याचाही असाच असेल का गहिरा रंग??? जो छेडत असेल सुमधूर तान गंधीत स्पर्शाने नटलेली??

भावगीत

श्यामल काळी सागरतीरी!
प्रीत आपुली फुले साजिरी!!
नयनांमधला मधु चुंबावा!
ओठी माझ्या तो झिरपावा!!
कुंतल काळे भाळावरती!
चंद्रकोरीला साद घालती!!
वाळूवरती येई लाट!
तुजला मजला कळे नं वाट!!
कसे कळावे कसे रुजावे!
प्रीतकोवळे स्वप्न दिसावे!!
गर्दकेशरी सूर्यबिंब हे!
तुझिया नयनी अस्ती जावे!!
मनामनाचे कण कण व्हावे!
शिंपल्यात या प्रेम भरावे!
जन्मो यातून धवळा मोती!
प्रितीतून या  गुंफू नियती!!
आर्या.

शाश्वताच्या गूढगर्भी नीलमेघी पुंजका
प्राण आले ओठंगुनी कासावीस हुंदका!
मनतळाच्या कोठडीतून हुंकार ये आक्रंदुनी
अंतरीच्या वादळाचा थांग ना लगे जनी!!
सांजवेळी कातरे मन भाबडे वेडेपिसे!
सोमदर्शी कवडसा झावळीतून येतसे!!
कोण कुठला जन्म माझा,जायचे कोठे असे?
गर्द झाडीतूनी वारा दाह शांत करीतसे!!
सावल्या या नाचताती लहर वायूची असे!
मन्मनीच्या प्रश्नमाला थांबवू रे कायसे!!
गुंफुनी हातात हाती चाललो रे सहचरा!
भविष्याच्या गूढगर्भी दडले काय योगेश्वरा??
आर्या.

Sunday, 22 July 2018

माझिया मळ्यात विठ्ठल भरिला
पानाफुलांच्यासवे तो हसूनी डोलला!!
केली मशागत सोपी गाऊनी आरती
विठु माझा आनंदून तिथे प्रकटला!!
ओली आई चिंब झाली न्हाली भक्तिरसे
तिच्यात माझा सावळा रुजूनी राहिला!!
बीज पेरले भक्तीचे पाणी दिले साधनेचे
कोंबकोंबातून विठूराया अंकुरला!!
रोपे तरारली त्यात कणसे फुलली
दाणा दाण्यातून  विठु पाझरु लागला!!
पुरी झाली आता सेवेची साधना
विठुराया अंतर्बाह्य सामावून गेला!!
अन्न खाऊनी तृप्तीने देह भरियेला
बापरखुमादेवीवरू "विठ्ठल" सेविला!!

Thursday, 19 July 2018

लंगर एक भक्तिपूर्ण आठवण

लंगर # एक भक्तिपूर्ण आठवण
आज फेसबुकवरच लंगरविषयी माहिती वाचनात आली आणि मी भूतकाळात गेले. व्हॅली आॅफ फ्लाॅवर्सच्या आमच्या ट्रेकची आठवण झाली. एक सामाईक रस्ता फाटा फुटून पुष्पदरीच्या स्वर्गीय प्रांतात नेतो तर तीच वाट सरळ पुढे हेमकुंडसाहिब लोकपाल सरोवराला जाते.
आदल्या दिवशी पुष्पदरीच्या रमणीय परिसरात मी छान रमले होते आणि आशुतोष फुलांच्या प्रजाती शोधत होता.  हा मला घेऊन इतक्या रमणीय ठिकाणी येऊन वनस्पतीशास्रात का शिरला आहे हे माझ्या गावीही येईना. त्यामुळे अरसिकेषुकवित्वनिवेदनम् अशी माझी गत झाली होती. सारांश काय तर दुसर्‍या दिवशी हेमकुंडला गेल्यावर हा मनुष्य आत दर्शनाला येणार की नुसताच गिरीशिखरं पाहत बसणार हे मला समजत नव्हतं. असो.....
आमच्या छोटोखानी हाॅटेलच्या समोरच छोटा गुरुद्वारा होता. संपूर्ण रस्त्यातच असे ठिकठिकाणी लंगर आपली सेवा करतात. ती दिखाऊ नसते. त्यात सच्चेपणा असतो.
एकूणातच शारिरीकदृष्ट्या थकवणारा हेमकुंडचा चढ आणि विरळ प्राणवायू  ओलांडून आम्ही सात वाजता पोचलो होतो गुरुद्वारात. पहाटे साडेतीनला काळोखातच चालायला सुरुवात केली होती. त्यावेळीही आमच्यासोबत शीख यात्रेकरुंचे लोंढेच्या लोंढे निघालेले होते. बोचरी थंडी जाणवत होती. हातपाय गारठले होते. आव्हान देणारी गिरीशिखरं नजरेत सामावत नव्हती. लोकपाल सरोवरापाशी  तर थंडीचा उच्चांक. पायातले बूट काढवेनात. तोवर एका मध्यमवयीन शीख काकांनी मला मदत केली. गरम गरम पाणी आणून दिलं हात तोंड धुवायला. इतक्या थंडीत ढणाणत्या चुलाण्यावर मोठ्या पातेल्यात पाणी तापत होतं. नंतर दोन जणांनी दोन जाड ब्लॅंकेटस् आमच्यावर पांघरली. कडकडीत चहा दिला प्यायला. हुशारी आली अणि मग हेमकुंडसाहिबजी समोर नतमस्तक झालो.आशुतोष त्या वातावरणात स्वतःला विसरलाच होता! गुरुग्रंथसाहिबचे मंद पठण, इतक्या दुर्गम ठिकाणीही फुलांची मोहक सजावट आणि स्वच्छता!!!
बाहेर आल्यावर प्रसादाची ऊन ऊन खाचडी आणि साजुक तुपातला मुगाचा शिरा! त्या प्रसादाची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे.
आपल्या झुली उतरवून आलेल्या प्रत्येकाला विनासंकोच तत्पर सेवा भक्तिभावाने पुरवणारे ते सर्व शीख बंधु भगिनी कायम मनात अढळ स्थानी आहेत माझ्या!!

Saturday, 14 July 2018

भात"लावणी" चा शृंगार

हिरवाईच्या साक्षीने सजला आषाढ
अन्नदात्याला भातलावणीची ओढ!
पोपटी, हिरवा कधी किंचित पिवळा
रंगांच्या छटांचा सुरेख सोहळा!!
कष्ट करिती महिला त्यांचे साथीदार सवे!
बैलांच्या गळ्यातील घंटांचे नाद बरवे!!
ओल्या मातीत रूतती पाय खालती वरती!
कमरेत वाकूनिया रोपे चिखलात रोवती!!
चार चार रोपांचा एकेक परिवार
तरारेल भात त्यातूनी दाणेदार!!
हसत खेळत सग्या सोयर्‍यांच्या साथी
लावणी होते पूर्ण घामेजल्या माथी!!
पाऊस  धरेवर थेंबथेंबांनी पडतो
सृजनाच्या निर्मितीचा भागीदार होतो!!
बैलही थकले काढून रांगोळी
त्यांच्या पावलांच्या खुणा भरताती जळी!
असा हा चालला अन्ननिर्मितीचा सण
तपकिरी ओल्या आईचे धान्यबाळाला कोंदण!!
आर्या

Monday, 9 July 2018

पंढरी विठ्ठलाची

निळा लोभसवाणा मेघ
त्यात बासरी दडली!
श्याम रंगी गर्दतेत
घुंगुरकाठी मंजुळली!!
एका खांदी उपरणे
एका खांदी घोंगडी!!
दोघांच्याही खांद्यावर भक्तीची गाठोडी!!
निळ्यात उतरला काळा काळाही झाला निळा
साधनेच्या आनंदमार्गी तृप्तीचा सोहळा!!
निघाले वैष्णव दिंड्या पताका घेऊनी!
टाळ मृदुंगाचे बोल पडती हो कानी!!
असा आला आला पहा
भक्तीचा महापूर
साधनेच्या गूढडोही भरून आला उर!!
कुंडलिनी सळसळे साधकाच्या ध्यानी
तिच्या परिसस्पर्शाने साधली उन्मनी!!
असा आहे पहा निळ्या काळ्याचा सांगावा
समाधीच्या पंढरी  ईश्वर शोधावा, सापडावा, साठवावा!!
र्या

Thursday, 5 July 2018

धरित्रीच्या कुशी....

काळे घन जणू कुंतल शोभिवंत!
हिरवाईचा शालू नेसून धनवंत!!
धरित्रीच्या गर्भी पेरून बीजे ती!!
कृषीवल होई मनोमनी तृप्त!!
भिजलेली काळी माती तिचा स्पर्श अलवार!
तिच्या चिक्लीताची नक्षी उमटे पायावर!!
सुखावून जीव जाई स्वप्न भविष्याचे पडे!!
समृद्धीच्या पावलांनी धान्यलक्षुमीचे सडे!!
आर्या.

भातलावणी... एक अनुभव.... माझे YouTube Videos

https://youtu.be/Sr3QsDUbR2o

https://youtu.be/VDRD-CGbe3c

https://youtu.be/VCL-r8eGOqc

भातलावणीची प्रक्रिया चित्रीकरण

Tuesday, 3 July 2018

पाऊले चालती पंढरीची वाट

काही घटना अशा असतात की ज्या चुकणार अशा कल्पनेनेच मनात काहुर माजतं. पुण्यात दरवर्षी येणारी पालखी ही त्यापैकीच एक घटना.
१९९० पासून मी दरवर्षी पुण्यात पालख्या येतात त्यादिवशी त्यांचा आनंद घेतला आहे. इतक्या वर्षात दोन तीन अपवाद वगळता मी नक्की हजेरी लावली आहे. या आठवणी माझा आनंदठेवा आहेत.
अशा घटना म्हणजे रस्ते बंद,गर्दी,अस्वच्छता ही अनेकांची धारणा अहे आणि ती चुकीचीही नाही.फार कशाला माझा नवरा असं म्हणणार्‍या लोकांच्यात अग्रस्थानी आहे.
पण काहीही असलं तरी जायचच ही सवय मला माझ्या बाबांनी लावली.
आळंदीला सतत जाणं असल्याने आणि मी दरवेळी बाबांचं शेपूट असल्याने मला ही आवड लागली खरं तर. तो माहोलच वेगळा असतो. भक्तीने भरलेला,हुरहुर दाटवणारा.
शाळेत असेपर्यंत वेगळी मजा! त्यादिवशी शाळा अर्धा दिवसच असायची. कधी घरी जाते असं व्हायचं.
त्यावेळी तुलनेने लवकर येत असत दिंड्या.आता उशीरच होतो.कारण संख्या वाढली.
काॅलेजला गेल्यानंतरची सर्व वर्ष विनया आणि काकू अणि मी असं त्रिकूट जात असू. माझं अणि विनयाचं उनाडणं हा स्वतंत्रच विषय आहे.
लग्न झाल्यावर एक वर्ष हट्टाने नवरोबाला नेलं मी कारण त्याचं आॅफिस मागच्याच चौकात होतं तेव्हा. पण लहान मुलासारखं त्याचं चल चल म्हणणं अणि त्याचे विचार ऐकणं यापेक्षा हे बाळ घरी किंवा आॅफिसातच बरं असं ठरवून मी एकटीच जायचं नक्की केलं.
संत्रिकेत तर मी सतत घड्याळ पहायचे. लगतच्या कुमठेकर आणि लक्ष्मी रस्त्यावरचे स्पीकर गाऊ लागले की मला बाहेर पडायचे वेध लागत.
रस्त्याभर असलेली स्वागताची तयारी, रांगोळीच्या पायघड्या घालणारे कलाकार, पोलिसांची लगबग, रंगीबेरंगी खेळणी आणि फुगे विकणारे अशी धम्माल असते ती.दोन्ही बाजूंना हवशे!नवशे! गवशे हिंडतात तरी नाहीतर मोक्याची जागा पकडून बसतात तरी! एरवीचा फर्ग्युसन रस्ता चक्क भक्तिभावात रंगतो या दिवशी!!!
हळूहळू गर्दी वाढायला लागते. एकेक दिंडी आपापल्या गतीने येत असते.वाहनांच्या आवाजात आता टाळ मृदुंगाचे आवाज मिसळू लागतात आणि चालू वाहतूक बंद केली जाते.
कॅमेराधारी मंडळी काय काय टिपत असतात देव जाणे! असं मला पूर्वी वाटायचं. पण गेली दोन वर्ष मीही माझा कॅमेरा लटकवला आणि फिरले! प्रत्यक्ष पहावंच की पण काही साठवावंही!! या न्यायाने मीही असे अनेक क्षण,भाव कैद केले आहेत. ती मजा आणि नेमका क्षण टिपण्याचा आनंद शब्दबद्ध करणच कठीण आहे!
वारकर्‍यांना सुविधा पुरवणारे गट सज्ज होतात. कुणी वार्ताहर मुलाखती घेत असतो.कुणी मालिकेतल्या नायिका तिथे येऊन आपली भाविकता नोंदवत असतात अणि बघे त्यांना टिपत असतात.
आम्हीही भुकेच्या जाणीवेने आधी पोटोबा करून घ्यायचो. समोर दिसलेल्या कुणातरी वारकर्‍याला विचारलं जातच की माऊली किती लांब आहेत अजून!!! माऊली लांबच असतात पण तुकोबांचा अश्व पुढे येतो. हातात गंधाचे नाम ताटलीत घेऊन फिरणार्‍यापुढे जाऊन उभे राहणे हे तर नित्यनेमासारखेच आहे! हौशी पालक आपल्या लेकरांना भर गर्दीतही पारंपरिक पोशाखात आणतात तिथे. त्यांची तंत्र सांभाळताना पालकांचीही कसरत होत असते. आळंदीपासून चालत आलेले भाविक पुणेकर त्यांच्या मंद झालेल्या चालण्याच्या गतीवरूनच ओळखता येतात. एखादा संबळवादक, वीणेकरी एकटा सापडला की मग क्लिकक्लिकाट सुरु!
हौशी दिंडीकर बघ्यांनाही सामील करून घेतात आणि झिम्मा फुगड्या रंगतात!
गर्दीचा आवाज टिपेला जातो. अक्षरशः मुंगीलाही जागाा नसते. दिवसभर दमून काम करून आलेले दुचाकीधारक पोलिसांची बंदी पाहून अधिकच चिडचिडतात. या सगळ्या गडबडीत अखेर पाठोपाठ पालख्या येतात.दर्शनासाठी झुंबड उडते. शेव गाठ्या खाजा विकणारे,माळा विकणारे,मुखवटे विकणारेही आत याच गर्दीचा भाग होऊन जातात.
त्यातून मार्ग काढत काढत मी पुढे जात राहते कारण मला जे हवं असतं ते गवसलेलं असतं. मला पादुकांना हात लावायचाच नसतो. मला पहायचा असतो वारकर्‍यांच्या मनातले ज्ञानोबा तुकोबा. अन्य उत्साही लोकांच्या नजरेतली उत्सवप्रियता!
त्यानेच तृप्त होते मी.
आता तर दूर आहे या सगळ्यापासून. पण तरीही मनात याच आठवणी रुंजी घालत आहेत. काय करणार असे पीळ सहसा सुटत नाहीत जे तुम्हाला अंतर्बाह्य समृद्ध करतात.

Sunday, 1 July 2018

मंतरलेल्या वेळूवनात

आज आम्ही कुडाळला जाऊन आलो. बांबूची रोपे आणायला अणि बांबू लागवडविषयक माहिती घ्यायला.
मिलींद पाटील हा दादा आमच्यापेक्षाही वयाने लहान आहे.पण त्याने वेगळी वाट निवडली आहे. मी त्याला विचारलं की घरातून याकडे कसं पाहतात तुझे पालक? तर त्यावर हसून त्याने समर्पक उत्तर दिलं.
आपली आवड वेळीच ओळखणे, त्याला उपयुक्त आणि साजेसे शिक्षण घेणे आणि दैनंदिन आयुष्यात ते प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करून त्याचा आनंद घेणारा हा दादा  मला म्हणूनच भावला!
आवडतं काम करणे,वडिलोपार्जित जमीन सांभाळणे आणि त्यातून शांत समाधानी आयुष्य जगणे हे त्याने निवडलं आहे हेत्यानेच आम्हाला सांगितलं.
आपण करीत असलेल्या कामातून आलेला अनुभव इतरांनाही देणे हेआम्ही आज त्याच्याबाबतीत अनुभवलं.आशुतोषला त्याने बर्‍याच गोष्टी सांगितल्या.
वयानुरूप येणारा आत्मविश्वास अणि त्यातून येणारी देहबोली ही त्याच्या व्यक्तिमत्वाचा भागच बनली आहे.
आज भौतिक सुखांच्या मागे धावत असलेल्या नव्या पिढीकडे पाहताना असे युवक युवती नक्कीच आदरणीय वाटतात.
आशुतोषच्या निमित्ताने वेगळ्या वाटेने जाणारी वेगळ्या क्षेत्रातली माणसं आता मला भेटू लागली आहेत हे किती छान आहे.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...