अंगणात माझ्या वृक्ष डेरेदार
पक्षिगणांच्या अस्तित्वाचे राखणदार
एक सुतारपक्षी लाल तुर्याचा
त्याच्या मित्रांसमवेत अंगणात यायचा
आवाज त्यांचा खूप बडबडही फार
एकमेकांना गोष्टी सांगतात भारंभार
आज आली त्याला हौस नाच करण्याची
झाडाच्या बुंध्याला बिलगून गिरकी घेण्याची
त्याला नव्हते माहिती की मी उभी होते
त्याचे सगळे विभ्रम दुरुन पाहत होते
लाल तुरा उडवीत गोल फिरून दमला
माझ्या मनाला कोवळा हळुवार आनंद देऊन गेला.
Wednesday, 30 January 2019
सुतारपक्षी
रायपाटण बागवाडी
बागवाडी.रायपाटण. पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणार्या साकवावरून पुढे गेलं की चिर्याच्या पायर्या आपल्याला खड्या चढणीने एका चार वाड्यांच्या टुमदार परिसरात नेतात.
आज राष्ट सेविका समितीच्या अनुभवी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या संजनाताई मराठे आणि श्रुतीताई ताम्हनकर यांच्यामुळे मला या गावात जायला मिळालं.
अगदी अक्षरशः परवाच संजनाताई ताम्हाण्यात येऊन गेल्या घरी आणि मैत्रीच झाली.
रायपाटणात हळदीकूंकू आणि मातृशक्ती व राष्टघडण विषयावर त्यांचे मार्गदर्शन,महिलांचे खेळ असा कार्यक्रम होता. त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि एक छान अनुभव मला मिळाला.
ताम्हाण्यातून कुठल्यातरी आतल्या गावात वाहने बदलत एकटीने जाण्याची मज्जा मी घेतली. आडवाटेच्या गावात शाळा, तिथले शिक्षकगण, पहिली ते सातवीचे तेहतीस विद्यार्थी, कार्यक्षम आणि उत्साही ग्रामीण महिला आणि वाड्यावाड्यातून आलेल्या महिलांचे हसू आणि आनंद असा मस्त अनुभव मिळाला.
शेवटी काय तर संघ,केंद्र,प्रबोधिनी, समिती हे सर्व वर्तुळ कुठेतरी पूर्ण होतं.. ओळखी निघतात... रत्नागिरीतल्या छोट्या गावापासून अरूणाचल आसामपर्यंत गप्पा होतात आणि शेवटी आपण सर्वजण राष्टघडणीच्या वारीचे वारकरी ही खूणगाठ मनाची घट्ट बसते... पुन्हा एकदा.
Friday, 25 January 2019
सरस्वती
विवाह सोहळा सुरू होत होता. सनातनी पद्धतीने वत्सलेचा विवाह केशवरावांशी होत होता. सगळे पुरुष नातेवाईक जमले होते. सरस्वती ही होतीच घरची करवली म्हणून.विधींना सुरुवात करण्यापूर्वी केशवरावांचे वडील बंडोपंत, वत्सलेच्या वडिलांना घेवून थोडे मंडपाच्या बाहेर आले. सर्व जमलेल्या मंडळीत चर्चा सुरू झाली. तसही सरस्वतीच्या येण्याने कुजबुज झाली होतीच त्यात ही भर पडली.
ब्रिटिशांच्या अंमलाखाली सनातनी आणि सुधारणावादी अशा दोन वर्गांचे अस्तित्व समाजात ठळकपणे दिसू लागले होते. बंडोपंत आणि त्यांचे कुटुंब हे सनातनी वळणाने जाणारे. हुंडा द्यायचा नसला तरी रूपाने बेतासबेत असलेल्या वत्सलेच्या रूपापोटी तरी तिच्या वडिलांनी काहीतरी वरदक्षिणा द्यावी असा आग्रह केशवरावांच्या वडिलांनी धरला.वत्सलेचे वडील चिंतेत पडले... अहो तुम्ही सुधारक समाज मंडळीत एकीकडे व्याख्याने देत असता आणि दुसरीकडे हे असे विचार!!! त्यातूनही आमची कन्या रूपाने डावी आहे हे तुम्हास आधीच माहिती होते!!! आता भर मंडपात ही सर्व चर्चा!!!
प्रश्न तत्वाचा आहे बंडोपंत. आम्ही वधूपक्षाची मंडळी म्हणून हे स्वीकारूही लेकीच्या भल्यासाठी... पण तुमचे चिरंजीव घरची शेतीवाडीही पाहत नाहीत. शिक्षणही सुमार आहे.असे असताना आम्हीही आमच्या मुलीला समजावले आहे. आमच्या घरात आम्ही सुधारकी वळणाची पुरोगामी मंडळी आहोत त्यामुळे तिचे लग्न लहान वयात लावले नाही इतकेच..
पण बंडोपंत या बोलण्याने अपमानित झाले... हा विवाह होणे नाही....
आत खालमानेने आत्याजवळ बसलेली वत्सला या वाक्याने भेदरून गेली... कुटुंबाचा अपमान आणि समाजात कटुता... नानांचे काय झाले असेल या वाक्याने????
ते ऐकून सरस्वती मात्र सरसावली...
दाराआडूनच नेमकं पण ठामपणे म्हणाली" लहान तोंडी मोठा घास घेते आहे म्हणून क्षमा करा. पण आता काळ बदलतो आहे. त्यामुळे वरपक्षानेही विचार करायला हवा... बाहेर आपले धोरण एक आणि कुटुंबात एक असे हे वागणे झाले आहे... हे समाज मंडळीत पसरायला वेळ लागणार नाही.त्यामुळे उभय कुटुंबाच्या हिताचा विचार करता हा विवाह विनाशर्त पूर्ण होणे योग्य वाटते...
सरस्वतीचे वडील आबासाहेब केळकर या अचानक वक्तव्याने चकीत झाले.
तिच्या बोलण्यावर सर्वजण चपापले असतानाच आबासाहेबांनी बंडोपंतांची माफी मागण्यासाठी पुढे यायचं ठरवलं... तोच.,.
दिनकर वझे पुढे आला.... वकिलीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेला दिनकर... थोडा प्रौढत्वाकडे आलेला पण उमदा... रुपाने डावाच पण कर्तृत्वाने करारी... समाज मंडळामधे त्याची व्याख्याने लोकप्रिय होत होती. ब्रिटीशांचा अंमल झुगारून देण्यासाठी ज्या योजना होत होत्या त्यात दिनकरही होता.. पण तो आपल्या संयमाने आणि हुशारीने काम करीत असल्याने त्याच्याबद्दल कोणताही पुरावा हाती मिळत नव्हता... त्याचा जिवलग मित्र गंगाधरही त्याच्यासोबत या सर्व मोहिमेत होताच..
दिनकरने सरस्वतीचं म्हणणं योग्य आहे आणि बंडोपंतांनीही ते मान्य करावं असं निग्रही शब्दात सांगितलं....
पुढे चर्चा होणे नव्हतेच...
विवाह पार पडला..
दाराआडून सरस्वतीने डोकावून पाहताना तिची आणि दिनकरची क्षणिक नजरानजर झाली.....
सरस्वतीला आबासाहेबांनी मुलाप्रमाणेच लहानाची मोठी केली.. भरल्या घरात सुखवस्तू कुटुंबात सरस्वतीला मोठ्या भावानेच घरी शिकवलं... तिची आईही थोडंफार शिकली होती...
मुंबई ईलाख्यातून आवर्जून पुस्तकं मागवून आबासाहेबांनी आपल्या लेकीला लिहितं वाचतं केलं. वेगवेगळी नियतकालिकं वाचायला शिकवलं.आजूबाजूला घडणार्या घडामोडींवर ते तिच्याशी बोलत असत. परकरातून ही पोर नऊवारीत आल्यावर लग्नासाठी मागण्या येऊ लागल्या पण मला योग्य वर सापडेपर्यंत मला लग्नच नाही करायचं हे सरस्वतीचं ठाम मत..
आई अन्नपूर्णाबाई या प्रकाराने व्यथित होत असे.अशाने एखादा म्हातारा बीजवरच मिळेल हो सरू... पण आबासाहेब ठाम होते.
गोड गळ्याची सुस्वरूप सरु पहाटे विठ्ठलाच्या मंदिरात अभंग गाई, जात्यावर दळताना ओव्या म्हणे आणि दादाबरोबर इंग्रजीत तिला बोलताही येत असे...
एकूणातच काळाच्या थोडं पुढे असलेली सरु आणि तिचे आबासाहेब...
या घटनेनंतर घरात सरूच्या धिटाईची चर्चा झाली नसेल तर नवलच...
सरुची मैत्रीण म्हणजे शेजारची रुक्मिणी... दोघी सोबतीच्याच. रुक्मिणीचं लग्न खूप आधी झालं होतं आणि आता रूक्मीणी गरोदरपणासाठी माहेरी आली होती.शेजारच्याच गावात दिली होती..
सरु दोन दिवस झाले... काहीतरी बिनसलय तुझं....
छे ग.. वत्सलाच्या लग्नाने अस्वस्थ आहेस नं... नको काळजी करूस... पण सरुची सावित्री झाली होती... सत्यवान क्षणभरच दिसला पण मनाचा ठाव घेऊन गेला..
घरी येऊन पाहते तो गंगाधर आणि नानासाहेब वझे घरात... ती मागल्या दारातून आत गेली...
हातपाय धुते तोच आईची हाक आली...
सरू जाऊन फक्त पाया पडून आली... गोधळलेल्या चेहर्याने तिने गंगाधरकडे पाहिलं... काही कळेना...
आत गेली धडधडत्या हृदयाने...
आई.... तू गप गं... आबा बोलत आहेत नं... जा वर माडीवर जाऊन बैस बरं...
रात्री आबांनी तिला बोलावलं... सरु दिनकररावांचं स्थळ आलं आहे.....
तिला गारठून गेल्यासारखंच झालं... हे खरं आहे का??? मनात मोर नाचायला लागले...
थोडं अधिक अंतर आहे वयात आणि त्यांची पहिली पत्नी बालपणीच निवर्तली आहे.संसारसुख माहितीच नाही. शिक्षणही उत्तम आहे आणि कर्तृत्व लौकिकही....
सरु.... तू काही बोलत नाहीस....
आबा....
अग तुझा करारीपणा त्यांना भावला आहे.अशाच मुलीच्या शोधात होते ते.पण दिनकररावांना शिकलेली आणि संस्कारी पत्नी हवी म्हणून अनेक सुस्वरुप आणि खानदानी मुली नाकारल्या त्यांनी.एका टप्पायावर त्यांचं लग्न होणार की नाही अशीच विवंचना होती... पण तू भावली आहेस त्यांना... पण एक अडचण आहे....
त्यांना विवाहापूर्वी तुला भेटायचं आहे... आपल्याकडे अशी रीत नाही बाळा... तुझ्या आईला ते पटणार नाही आणि आजीलाही...
गंगाधर योग्यवेळी चित्रात आला. महाशिवरात्रीला भरणार्या उत्सवात तो निधर्मी दिनकराला घेऊन आला... सरुला तिचा दादा घेऊन आला...
पारापाशी भेट झाली... काही क्षणच...
तुम्हाला हे लग्न मान्य आहे नं सरस्वती???
मला माझ्या स्वातंत्र्यकार्यात पाठिंबा देणारी, घरातच का होईना पण माझ्याकडून शिकू इच्छाणारी आणि स्वतच्या विचारांनी वागणारी पत्नी मला हवी आहे. मी दुर्दैवाने बीजवर आहे पण मला माझ्या पहिल्या पत्नीचा फक्त खेळकर चेहराच आठवतो. लग्नाच्या दिवशी पाहिली.त्यानंतर दुसर्या दिवशी माहेरी गेली.पंधराव्या दिवशी तिला खेळताना घेरी आली आणि पडली तोच गेली... तिच्या माहेरहून निरोप यायलाही दोन दिवस गेले. मीही शाळकरी वयातच होतो.
न्यायममूर्ती रानडेंसारख्यांच्या सहवासात मीही सुधारकी विचारांचा झालो आहे.अभ्यासातून विचारातून काहीसा कठोरही आहे मी...पण मृदुपणाची कसर तू भरून काढशील....
मला मान्य आहे.....
सरुचा आश्वस्त चेहरा आबासाहेबांना दिलासा देऊन गेला... वझे कुटुंबही आता सरूच्या सुमंगली पावलांची वाट पाहू लागलं....
आणि एका संध्याकाळी सरस्वती दिनकररावांची प्रेरणा बनून वझ्यांच्या घरात आली... शिवमंदिराच्या दारातला पिंपळ हसला आणि लग्नघरातून परत जाणारा गंगाधरही...
Thursday, 24 January 2019
प्रजा स्त्ताक दिन
माझा देश माझी आस्था
तिरंग्यात या वसे बंधुता
समता आणि स्वातंत्र्याचे राष्ट्रगीत गाऊ...
प्रेरक ऊर्मी संचलनाची
तिन्ही दलांच्या अभिमानाची
त्यांचे दर्शन घेऊन आपण कृतार्थ सारे होऊ...
बालक सारे शौर्य धुरंधर
गजांत त्यांना लेणे सुंदर
चित्ररथाने संस्कृतिला या उजाळा ही देऊ...
कुणी सांडले रक्त रणांगणी
शौर्य परम कीर्ती ही साधूनी
त्यांच्या त्यागापुढती आपण नतमस्तक होऊ..
Wednesday, 23 January 2019
आठवडी बाजार
रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात.असा बाजार शहरात पहायला मिळणं आता तसं कठीणच .आपल्या शहरांमध्ये जागोजागी वेगवेगळी दुकान असतात. त्या दुकानांमध्ये सुईपासून सायकलपर्यंत सगळं काही मिळतं . त्यासाठी आपल्याला त्या त्या दुकानात जाव लागत.आपल्याला हवं तेव्हा आपण दुकानात जातो आणि हव्या त्या वस्तू अगदी सहज खरेदी करून येतो. पण लहान गावांमध्ये मात्र अजूनही अशी दुकान नाहीत त्यामुळे अशा गावांमधली माणसं वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी या गंमतशीर आठवडी बाजारावर अवलंबून असतात. चला तर मग आमच्या गावच्या आठवडी बाजारातून फेरफटका मारून येऊया...
हे पहा कुणीतरी भांडी विकत घेतो आहे तर कोणी दोन ताई नवे कपडे खरेदी करीत आहेत, कुणी काकू भेंडीचा एक वाटा विकत घेताना दिसते आहे तर कुणी आजोबा पान आणि चुना ठेवायची डबी आणि चंची विकत घेत आहेत.
पाचलचा रस्ता गर्दीने भरून वाहतो आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला तात्पुरता आसरा तयार करून छोटी छोटी दुकानं थाटली गेली आहेत. काय काय विकत आहेत बरं चला पाहूया. सुरी कात्री लाईटर, प्लास्टिकच्या खेळण्यांची दुकानं, चपला, रंगीबेरंगी चादरी, स्टील आणि अल्युमिनियमची भांडी, मुलींसाठी आणि महिलांसाठी छान छान बांगड्या गळ्यातलं कानातलं अगदी सेफ्टी पिनासुद्धा.लहान मुलांची पुस्तकं कुणी विकत आहे तर
काही दुकान छोट्या विजेरी विकत आहेत. काही ठिकाणी वेताची टोपली, पाखडायचे सूप ,केरसुण्या झाडू असा छान मांडून ठेवलं आहे. एक छोटासा दादा आई बरोबर बाजार फिरून दमला आहे आणि तो आईबरोबर उभा राहून गाडीवर आईस्क्रीम खातो आहे त्याच्यासाठी आजचा दिवस म्हणूनच गमतीचा असतो.
चला आता मुख्य रस्ता सोडून उजवी कडे वळूया. या मोठ्या मैदानात प्रत्येकाने आपापल्या शेतातून, बागेतून भाज्या, फळे, धान्य विकायला आणले आहे.
पहिल्या रांगेत मसाल्याचे पदार्थ, डोक्याला लावायचे तेल इथपासून ते धान्य विक्री करणारी दुकान थाटली आहेत आणि हे सगळे पदार्थ एकावेळी एकाच दुकानात मिळतात.दुसऱ्या रांगेमध्ये भाजी विक्रेते बसले आहेत. काहीजण तराजूमध्ये तोलुन वजन करून भाजी विकतात तर काहीजण छोट्या ताटलीत भाज्यांचे वाटे करून ठेवतात. हिरव्यागार तजेलदार तिखट मिरच्या, या दिवसांत भरपूर मिळणारा मटार फ्लॉवर आणि कोबी चे गड्डे, ताज्या रसरशीत पालेभाज्या असं सारं काही रंगीत साम्राज्य पसरलं आहे. त्याच्या थोड पलीकडे मासळी बाजार भरला आहे. त्याच्याही पुढे कपड्यांची दुकाने मांडली आहेत. पलीकडच्या बाजूला काय काय आहे माहिती आहे ?
बेकरीवालेदादा सायकलला पिशव्या लावून खारी बिस्किट, टोस्ट असं काही विकत आहेत. त्यांच्या बाजूलाच फळवाल्यांची अनोखी दुनिया आहे. बाजारातून फेरफटका मारला की वस्तू विकत घेणारे आणि त्या विकणारे यांच्या आवाजाचा सावळागोंधळ अनुभवायला मिळतो. त्या गर्दीतच आपणही घुसायचं आणि आपल्याला हव्या त्या वस्तू विकत घ्यायच्या.सगळीकडे फिरून आधी भाव म्हणजे किंमत काय आहे हे समजून घ्यायचं आणि मग स्वस्त आणि मस्त जिथे मिळेल ते घ्यायचं. यातही खूप मज्जा येते.
पुढच्या बुधवारपर्यंत घरात लागणाऱ्या सर्वच गोष्टी आज आठवणीने विकत घ्यायच्या असतात त्यामुळे पिशव्या भरभरून लोक खरेदी करत असतात. आठवडी बाजाराची आणखी एक मज्जा म्हणजे पंचक्रोशीतल्या गावांमधले ओळखीचे किंवा आपले नातेवाईक इथे भेटू शकतात मग त्यांचा गप्पांचा फड इथे जमतो. खरेदी करून थकलेले पाय चहाच्या टपरीकडे वळतात किंवा उसाच्या रसाच्या गाडीकडे.
ते जसे दमतात तसेच उन्हात बसून विक्री करणारे ही दमत असतीलच की. मग एखादा दादा त्यांच्यासाठी म्हणून ताक विकायला आणतो तर कोणीतरी अल्युमिनियमच्या किटलीत गरम गरम चहा घेऊन येतो. अशी सगळी गंमत इथे सुरू असते सूईपासून भांड्यांपर्यंत आणि रूमालापासून शर्ट पर्यंत सर्व काही इथे एकाच जागी एकाच वेळी विकत मिळतं . शहरात आता मोठ्या मोठ्या मॉल मध्येही आपण हेच अनुभवतो पण शहरात त्या सगळ्याला एक आधुनिक आणि व्यावहारिक स्पर्श आहे .गावातल्या आठवडी बाजाराला आजही निसर्गाचा हळूवार स्पर्श जाणवतो. गावकऱ्यांच्या गप्पांमधून प्रेमाचा ओलावा दिसतो ,आपलेपणा मनाला भिडून जातो.
गावांमध्ये अनेक घरांमध्ये वीज बरेचदा नसतेच. शहरासारखे इथल्या घरांमध्ये साठवणुकीसाठी फ्रीज असतातच असं नाही. त्यामुळे आठवडी बाजारातून नेलेला भाजीपाला नीट सांभाळून ठेवणे आणि पूर्णपणे वापरणे हीसुद्धा मोठी जबाबदारी असते
आपण शहरात खूप सहज आपली दुचाकी किंवा चारचाकी काढतो आणि खरेदी करून येतो पण गावात असं असतं असं नाही. त्यामुळे बाजाराच्या दिवशी शेअर रिक्षा, एसटी यातून माणसं खच्चून भरलेली असतात. येताना तरी त्यांच्या पिशव्या रिका म्या असतात पण घरी परतताना त्यात आठवड्याची सर्व बेगमी भरलेली असते.
आठवडी बाजाराच्या दिवशी सहसा गावात कामाला सुट्टीच घेतली जाते कारण आपल्या गावातून बाजाराच्या गावी जायला वेळ लागतो.
आठवडी बाजार ही अशी एक रंगीबेरंगी आणि लोभसवाणी दुनिया आहे. या बाजारात एखादा फकीर आपला मोरपिसाचा पंखा दुकानदाराच्या डोक्यावर ठेवत त्याच्याकडून आपल्या पोतडीत भाजीचा वाटा सहज घेऊन जातो .एखादी भाजी विकणारी आजी किंवा काका खरेदीला आलेल्या छोट्या मुलीला एक गाजर असंच खाऊ म्हणून पण देऊन जातात. ही आत्मीयता गावातल्या बाजारात अनुभवणं हा विशेष आनंदाचा ठेवाच आहे. त्यासाठी एकदा तरी एखाद्या छोट्या गावातल्या आठवडी बाजाराला भेट द्यायला हवी हे मात्र नक्की. कधी येताय मग? मंगळवारीच या हां. म्हणजे बुधवारी लवकर उठून बाजार मांडला जात असतानाची मजजा ही पहायला मिळेल. या नकी. वाट पाहते.
Saturday, 19 January 2019
कळत नकळत
रेवती एक चुणचुणीत मुलगी.. टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीत कामाला होती.सतत तिला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी बोलावं लागे,त्यांना माहिती द्यावी लागे.
रेवती स्वतः छान कविता करत असे आणि लिहीतही असे अधूनमधून हौस म्हणून.तिचं हे कौशल्यही आॅफिसमधे माहिती होतं.
तिच्या सहज बोलण्यातून अनेक लोक प्रभावित होत.कंपनीची मंडळीही तिच्या या स्वभावावर कौशल्यावर खुश होती.
तिचा कंपनीतला सहकारी मकरंद.दोघांची विशेष गट्टी आणि छान मैत्री होती. रेवतीचं लग्न ठरलं होतं आशिषशी. रेवती आणि आशिषच्या लग्नाची तयारीही घरात जोरात सुरु होती. रेवती अक्षरशः स्वर्गात वावरत होती.
आशिषची कौटुंबिक स्थिती उत्तम.उच्च पदावर लहान वयात नोकरीला असल्याने आर्थिक सुबत्ताही होती. स्वतःचं घर,गाडी,आई वडील आणि हा एकुलता एक. रेवती खुश नसेल तर नवल.. ओळखीतून स्थळ आलं आणि लगेच पसंतीही झाली.
आॅफिसमधली तिची आणि मकरंदची मैत्री आशिषलाही माहिती होती.कधीतरी तो साशंक होई पण रेवती त्याला विश्वास देत असे की तो तिचा फक्त चांगला मित्र आहे.
रेवतीचं काम तिला अनेक लोकांशी जोडून ठेवणारं असे. रेवती लिहीते छान हे माहिती असल्याने कंपनीने तिला एक वेगळं काम सोपवलं... प्रत्येक पर्यटनस्थळाचा छोटा माहितीपट तयार करायचा होता आणि कंपनी तिथे काय दाखवते,सुविधा काय,ठिकाणाची वैशिष्ट्य काय असं सारं काही अवघ्या तीन मिनीटात गुंफायचं होतं....
काम मोठं होतं म्हटलं तर पण रेवती खुश झाली... कंपनीने सुदर्शन मीडियाकडे हे काम सोपवलं पण लेखनासाठी रेवती काम करेल असं पहिल्या मीटींगमधेच सांगितलं...
सुदर्शनकडून अभिरामला हे काम दिलं गेलं होतं आणि त्यामुळे अभिरामचा रेवतीशी कामानिमित्त अधिक संपर्क येऊ लागला...
रेवतीचा बोलघेवडा स्वभाव,उत्साह,मदत करण्याचा स्वाभाविक छंद यामुळे अभिराम आणि तीही एकमेकांशी कामानिमित्त अधिक संपर्कात राहू लागले...
घरी लग्नाची तयारी,आशिषला भेटणं,अभिरामसह काम,आणि कंपनीची रोजची कामं यात तिला मकरंदशी बोलायला वेळच कमी पडे. भेटही फार थोडा वेळ होई.पण तरी बंध घट्ट होते दोघांचे. मकरंद हे सगळं पाहत होता...
लग्नाची तारीख जवळ येत चालली होती.केळवणं,हाॅटेलिंग,खरेदी या सर्वात अभिराम तिला अधूनमधून व्यक्तिगत संदेशही आता पाठवू लागला.सुरूवातीला तिनेही मोकळा प्रतिसाद दिला सहजपणे... पण नंतर लक्षात आलं की हे जरा अती होतं आहे....
तिने न राहवून आशिषच्या कानावर घातलं... त्याने फार मनावर घेतलं नाहि.अग एकत्र काम करताना घडतात अशा गोष्टी,,. तू मला सांगितलस हे ठीक... पण मनावर घेऊ नकोस...
अभिराम कंपनीतही येत असे.भेटत असे... संदेशही येत होते.चारचौघात दाखवता न येणारी अस्वस्थता आणि असुरक्षितता मोकळ्या पण तरी निरागस मनाच्या रेवतीला बोचू लागली... मकरंद पाहत होता... पण आशिषला सांगितलं आहे हे... आता मकरंदला वेगळं सांगावं का? असा प्रश्न तिला पडला होता....
माहितीपट तयार होऊ लागले.कंपनीत सादरीकरण होऊ लागले. छानच जमलं होतं सगळं....
अजून एकदोन महत्वाच्या गोष्टींसाठी चित्रीकरणाची परवानगी घ्यायला आता रेवतीला कंपनीतर्फे अभिरामसह अधिकार्यांना भेटायला जाणं भाग होतं... तिला ते केवढं मोठं संकट वाटतं आहे हे तिचं तिलाच समजत होतं....
हो नाही करत एकदोनदा टाळलं पण जाणं अटळ आहे हे तिला लक्षात आलं... अस्वस्थ मनाने तिने आशिषला फोन केला.... अग काय हे रेवती,.. मला नं या गोष्टीचा कंटाळा आला आहे. दुर्लक्ष कर आणि काम करून ये जाऊन पटकन.किती विचार करता तुम्ही मुली.... चल ठेवतो मी फोन......
पण तिच्या मनात काय चालू आहे आणि तिला अभिरामबरोबर जायला का असुरक्षित वाटतं आहे हे तिला शब्दात मांडणंही कठीण वाटत होतं...
पियू तिची मैत्रीण.... पियूला हे तिने सांगितलं होतं पण ती तरी दुसरं काय सांगणार....
रेवती तू मोकळी आहेस गं पण जग विचित्र आहे... आपणच सांभाळून रहायला हवं...
अग पण पियू ही माणसं सहज बोललेलंही किती चुकीच्या अर्थाने घेतात... मला नाही गं योग्य वाटत...
नाईलाजाने दहा वाजता तिने अभिरामला आॅफिसपाशी भेटायचं ठरवलं...
मी येतो बाईक घेऊन आपण एकत्र जाऊ....
तिने नकार दिला... मी कंपनीच्या गाडीने किंवा रेल्वेने येईन.आपण थेट तिथेच भेटू.
नंतर वेळ आहे का रेवती??? चहा तरी घेऊ..,
नाही अरे... मला परत आॅफिसला काम आहे....
उलघाल संपेना...
या सगळ्यात मकरंद कुठे होता???? मकरंद एका ज्येष्ठ नागरिकांच्या गटाला घेऊन सहलीला गेला होता कंपनीच्या..... फोन लागेल तरी का याचा???? शंका शंका,उलघाल....
योगायोगाने मीनिल भेटला तिला खालीच. अधिकारी यायला अजून अवकाश होता... मीनिलला दुसरीकडे त्याच इमारतीत काम होत... मीनिल मकरंदचा घट्ट मित्र. अभिराम अजून यायचा होता....
मीनिलच्या फोनवर अचानक मकरंदचा फोन वाजला.... कामासाठीच होता.पण मकरंदला कल्पना नसावी की मीनिल आणि रेवती सोबत असावेत.....
तिने बोलण्यावरून ताडलं आणि तो फोन सपल्याक्षणी तिला लक्षात आलं की मकरंद रेंजमधे आहे.तो पर्यटकांसह कामात असेल!गडबडीत असेल असा कुठलाही विचार न करता तिने त्याला फोन लावला..... काहीतरी बोलायचं निमित्त करून तिने बोलून घेतलं त्याच्याशी कारण तोही व्यस्त असणार याची तिला कल्पना होती.....
तिने फोन ठेवला आणि अभिराम समोर हजर झाला...
तिला जाणवलं की आता तिला अचानक खूप सुरक्षित वाटतय,.., तिची भिती कुठच्याकुठे पळून गेली आहे.अभिरामच्या तथाकथित मूर्खपणाला प्रतिसाद न देता,,, न घाबरता किंवा संकोचता आपण आज त्याच्यासोबत वावरू शकू......
काम झालं... चहाही झाला....
निघते मी.....
ती आॅफिसला पोहोचली आणि पियुला बिलगून रडायला लागली.... पियूलाही कळेना की काय झालं आहे....
पियू अग मला जो आधार आशिषशी बोलून मिळाला नाही तो मकरंदशी बोलून मिळाला.खरंतर मकरंदला हे माहितीही नाही पण आशिषला सगळं माहिती आहे... तरीही मकरंदचा केवळ आवाज ऐकून केवढं बळ मिळालं मला की मी अस्वस्थता दूर सारून अभिरामचा मूर्खपणा बाजूला ठेऊन त्याला भेटू शकले ...
एका प्रामाणिक स्रीचं मन कसं कुठे गुंतावं ग? आणि तिने नक्की कुठे आधार शोधावा गं???
मीनिललाही माहिती नसेल की तो भेटणं आणि त्यातून मकरंदशी बोलायची तरी शक्यता मला समजणं हे किती महत्वाचं होतं माझ्यासाठी!!!
केवळ शब्दांचा आधार... वस्तुस्थिती माहिती नसतानाचा... मैत्रीची आश्वासकता....
तुला खरं सांगू का पियु! आशिषला बहुधा हे कळणारच नाही आहे.तो माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे आता.. मकरंदच्या आयुष्यातही येईलच नं कुणीतरी त्याची हक्काची... प्रेमाची जिवलग...
पण तरीही त्याचा माझा हा बंध रेशमी आहे.... त्याला स्नेहाचा आणि खास करून विश्वासाच्या आधाराचा गोडवा आहे.... त्याच्या आणि माझ्याही नकळत.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...