Saturday, 26 October 2024

दीपावली शुभचिंतन(२०२४)

 सर्वांना दीपावली शुभचिंतन#


दिवाळीच्या दिवसांमधे पाठोपाठ संदेश येत राहतात शुभेच्छांचे! त्यामुळे हे थोडंसं आधीच!


तीनसांजा घरी परतणं झालं अन् एका चौकात कंदिलांच्या रांगांनी सजलेला अवकाश अनुभवला...काही क्षणच!!! अहाहा!!!मला ते पतंगाच्या कागदाचे केलेले झिरमिळ्यांचे कंदील आवडतात आणि हे ही तस्सेच होते! त्यातल्या प्रत्येक कंदीलांच्या कागदाचे रंग लेवून प्रकाश बाहेर पडत होता आणि परिसराला उजळवत होता! ते सारं एकजिनसी होऊन गेलं होतं! सहसा असे क्षण कॅमेर्‍यात टिपणारी मी पण स्तब्धच होऊन पहातच राहिले... एक अनामिक हुरहुर मनात दाटली!

दरवर्षी असं होतं माझं!भावना,संवेदना यांची जाणीव ज्या वयापासून झाली त्या वयापासूनच विशेषतः दिवाळीच्या पूर्वतयारीपासूनच हे काहुर माजायला सुरुवात होते! पण त्याला आनंदाची झालर असते! एक अनाम ओढ असते त्यात दडलेली!


रंगांची उधळण अनुभवायची तर दिवाळीसारखा सण नाही! यक्षरात्रीच ती! दरवर्षी दिसणारे रांगोळी आणि रंगांचे ते ढीग! त्यांच्या छटा प्रत्येकवेळी तितक्याच लोभसवाण्या वाटतात! 

टोपल्यांमधे भरून ठेवलेल्या प्रत्येक पणतीची एक गोष्ट असते! नीट ऐकलीत तर ती ऐकू येईल! कुणी साधीशी तर कुणी नक्षीने सजलेली!कुणी भरपूर तेल सामावून घेईल तर कुणी इवलुश्या जीवाच्या ज्योतीला तेजाळत राहील.


यात आणखी एक मनाच्या जवळचा कोपरा म्हणजे छोट्याशा आकारात असूनही आपल्या भरदार मिशांना पीळ देत उभा कुस्तीगीर,चिमुकल्या जिरेटोपात सजलेले आपले शिवराय,हातातल्या पंखाने त्यांना वारा घालणारा मावळा किंवा मातीच्या छोट्या दर्‍याकपारीत लपून बसायला उत्सुक शूरवीर! कुणी घागर डोईवर घेऊन पदर सावरते तर कुणी भाजीची टोपली घेऊन बसलेली! आपापल्या तंद्रित ते निवांत उभे किंवा बसलेले असतात!किंवा टोपल्यांमधे चक्क लोळत असतात!

 हे सारे अचानक जिवंत झाले तर काय बहार येईल! स्वराज्य याची देही याची डोळा मला अनुभवता येईल महाराजांच्या सुराज्यातला एक नागरिक होऊन मला! असं दरवर्षीच वाटतं!


सजलेली दुकानं,खरेदी करणारे ग्राहक,वीजांची रोषणाई हे सारं एकमेकांत मिसळून गेलेलं असतं कारण सर्वांनाच तिच्या आगमनाचे वेध लागलेले असतात!


घरात आता सारं येऊन दाखल झालेलं असतं!भिंतींनाही आता अंघोळ करावीशी वाटते.कोपर्‍यात दडलेले कोळीदादाही आपलं बस्तान आता आवरतात आणि घरही हसायला लागतं!


 झोंबणार्‍या पहाटवार्‍यात जाग येण्यापूर्वीची ती रात्र!मला कधीच झोप येत नाही या आदल्या रात्री! अवतीभवतीच्या घरांमधून लखलखणार्‍या माळा आणि कंदील हाका देत असतात! कितीतरी वेळ खिडकीतून मी तेच पहात असते! मधेच दूरवरून एखादा फटाका मोठ्ठ्याने साद घालतो आणि दचकतेच मी! मला कायम दूरच्या दिव्यांचं आणि दूरवर वाजणार्‍या फटाक्यांचं आकर्षण आहे! कोण बरं जागं आहे आत्ता? माझ्यासारखंच खुळं होऊन?पहाटेची वाट पहावी असाही धीर निघत नाही बहुधा याला!


शेवटी घड्याळ पहाण्यापूर्वीच आजूबाजूला आवाज घुमू लागतात आणि मांगल्याची पहाट उजाडते!

खरंतर प्रत्येक सकाळ सारखीच असते की! पण दिवाळीची पहाट आणि सकाळ काहीतरी वेगळंच उदरात दडवून उजाडतात!


यमदीपदानाची पणती अर्पण करताना मनातल्या काहुराला डोळ्यांतल्या आसवांची साथ लाभते! तुळशीपुढे पहिला दिवा लावतानाही रमा एकादशीला असेच डोळे पाणावतात! पण दुःखाने नव्हे...


ती भावना नक्की काय असते हे मलातरी गवसलेलं नाही! पण ती अनुभवण्यात वेगळी गंमत आहे!!!शब्दात मांडता न येणं पण तरीही आत कुठेतरी खोल खोल रूतणं म्हणजे काय हे अनुभविण्याची संधी मला दिवाळी देते.तुम्हालाही ती तशीच देत असेल....

आगामी दीपावलीच्या खूप शुभेच्छा!

©आर्या


Wednesday, 16 October 2024

फुलवंती


 प्रेम..,अव्यक्त,अस्फुट..कधी डोळ्यातून पाझरणारं कधी गालांवरच्या लालिम्यातून उमलणारं..कधी विद्वत्तेतून ओसंडून वाहणारं तर कधी काहीच नाही... एका अबोल क्षणातूनही खूप काही बोलणारं!

फुलवंती मूळ कादंबरी वाचली नव्हती पण चित्रपटाविषयी उत्सुकता निश्चित होती कारण संगीताच्या जोडीने नृत्य हा ही हृदयाजवळचा विषय! कथानक आदरणीय बाबासाहेबांचं त्यामुळे तिथेही शंकेला वाव नव्हता.चित्रपट माध्यमात काही सवलती घेतल्या जातात पण तरीही मुळातून भावलेलं प्रेम आणि त्यातून झालेलं अहंकाराचं विसर्जन!ही ताकद फक्त प्रेमाचीच आहे.प्रत्येक वेळी ते शारीरिकच असावं या गैरसमजुतीतून बाहेर पडायला लावणारा हा चित्रपट असं मी म्हणेन!

तिच्यातल्या उत्तमतेवर तो भाळला आहे,रंगरूप आहेच पण ते गौण आहे हे समजायलाच लागतं हळूहळू पण चित्रपटाच्या शेवटी!

त्याच्या विद्वत्तेची कीर्ति दिगंतात पसरलेली आणि तिचीही! "कशावरून ती तिच्या क्षेत्रातली पंडिता नसेल?" असा त्याच्या गुरुंचा प्रश्नही खूप काही सांगून जातो.

तरीही समाजव्यवस्थेचा,कुटुंबरचनेचा,राजकीय प्रभावाचा,वैयक्तिक अस्मितांचा प्रगल्भ विचार करत तिला  घडविणारा तो! तिच्यातल्या अहंकाराचं विसर्जन करायला लावणं त्याला औचित्याचं वाटतं कारण पुन्हा प्रेमच! ते बोलून दाखवायला लागत नाही,उथळपणा न करताही प्रेम gracefully सुद्धा व्यक्त होतंच नं! 

सारं काही मान्य करूनही सारं काही शेवटी सोडून तो ही जातो आणि त्याच्या सहचरीलाही ते समजलं आहे! पण त्यातली स्वीकारशीलताही प्रचंड प्रगल्भ आणि संयत आहे.

आपल्याला मनात ठेवूनच तो दूर गेला आहे हे तिलाही समजल्याने तुळशीवृंदावनाभोवती शेवटी ती ही तितकीच उत्फुल्ल  होऊन बेभान होऊन नाचते आहे!

एकमेकांचं,एकमेकांसाठी केवळ दोघांच्या नजरेतून दिसणारं .... प्रेम... ते आपल्या थेट काळजाला भिडल्याशिवाय राहात नाही....

असंच असावं ते! त्याला आणि तिला आयुष्यभरासाठीचं प्रेमाचं वरदान देत त्या कोंदणातच स्वतःला शोधत रहायला प्रोत्साहित करणारं! त्या दोघांमधे तिसरं येतं फक्त प्रेम!

निखळ दृष्टीने पाहिलं तर कथानक आवडेल.पात्र हा चित्रपट आणखी जिवंत करतातच! मला तंत्रातलं फारसं समजत नाही पण कथानक अनपेक्षित कलाटणी घेतं असं सार्‍यांना वाटेल पण मला चित्रपटाच्या पहिल्याया पंधरा मिनिटातच त्याचा अंदाज आला कारण त्यांच्या लांबूनच एकमेकांवर खिळलेल्या नजरा एक सुंदर फ्रेममधे टिपल्या गेल्या आहेत!! खूप बोलते नजर फक्त ती समजली पाहिजे,उमजली पाहिजे आणि तरलपणे मनावर कोरूनही ठेवता आली पाहिजे!

Tuesday, 1 October 2024




स.प.महाविद्यालयाचा संस्कृत विभाग... तास संपायला दहा मिनिटे बाकी असताना आमच्या कात्रे मॅडमना काय वाटलं कोण जाणे!"अदिती गा ग जरा" असं म्हणून त्यांनी विभागाच्या खोलीचं दार आतूनच टकटक करुन वाजवलं.

मुळात आमच्या विभागात संख्या कमी त्यामुळे आमचा विभाग चिमुकल्या खोलीतच भरायचा! आता त्या चिमुकल्या खोलीच्या चिमुकल्या दारावर टकटक हा संकेत मला समजला आणि मी गायला सुरुवात केली.आमचं काॅलेज म्हणजे सांस्कृतिक खजिनाच आहे आजही! त्यावेळी तर गाण्याच्या स्पर्धा,नाटकाच्या स्पर्धा ,नाट्यवाचन असंच सतत सुरु असे.त्यातून आम्हाला मराठी पद्य विभाग शिकवायला डाॅ.नीलिमा गुंडींसारख्या रसिक मार्गदर्शिका लाभलेल्या! प्रत्येक गाणं गाताना त्याची मूळ कविता आधी पहा..त्याचं नंतर गाणं कसं होतं हे मला माझ्या गाण्याच्या काकूंनी शिकवलेलं! त्यामुळे आहट झाल्याची ती टकटक सूचक होती कारण नुकतीच मी स्पर्धेला हे गाणं गायले होते आणि ते कात्रे मॅडमना ऐकायचं होतं!


हकीकत.... मी पाहिलेला नाही आजतागायत... इतकं गाणं हृदयाजवळचं असताना न जाणो चित्रपट पाहून मलाच दुःख आणखी होईल अशा भीतीने मी तो पाहण्याचं धाडसच केलेलं नाही!

एक दोनदा गाणं फक्त पाहिलं आहे पण मला शब्द आणि भावना अधिक महत्वाची वाटली.

ती वाट पाहते आहे.... तो कुठेतरी दूर त्याच्या ध्येयाप्रती.. अर्थातच देशासाठी (धर्मेंद्र दिसलेही फार उमदे आहेत असं मला कुणीतरी सांगितलं आहे).... पण तिला त्याची चाहूल पक्की ठावकी आहे... कल्पनेतही वेध घेण्यात ती कुठेच चुकत नाही... त्याच्या सवयीही तिच्या इतक्या अंगवळणी आहेत की तो अवतीभवती नसतानाही तिला त्याचेही आभास होत आहेत! प्रत्यक्ष अनुभविल्यासारखे! 

ज्यांनी कट्यार काळजात घुसली नाटक पाहिलं असेल त्यात झरिनाचा आणि उमाचा असाच एक उत्कट संवाद आहे... वाट पाहत राहणं आणि चाहुलीचाही भास होणं! 

अवघड असतं नं ... कितीतरी कठीण! अगदी वाहणारा वाराही त्याला घेऊन येतो आहे की काय! त्याने यावं असं अध्याहृत आहेच या गाण्यात!

या गाण्याचे शब्द आणि त्यातलं सहज सुंदर स्वीकारशीलता असलेलं प्रेम! सोपं,सरळ,साधं आणि तितकंच हळवंसुद्धा! कातरही...

त्याला माहितीही नाही आहे... ती त्याची वाट पाहत उभी आहे... तो नाही आला तरी त्याची चाहुलही तिला पुरेशी आहे... अशी ती अनंत काळही उभी राहील वाट पहात.. माझ्या मनात.....

©आर्या


राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...