माझ्या कवितेतली ती
माझ्या कवितेतला तो
आजूबाजूला सापडतात छानछान कथा
माझ्या कवितेतली ती
माझ्या कवितेतला तो
यांची जुळते गाथा!
कधी "ती" असते ओळखीची
कधी "तो"असतो अनोळखी
याचे व्यस्त होऊनही
कविता जुळत जाते अनोखी
कधी "तो"असतो झरा
झुळझुळत वाहणारा
कधी "ती" असते चांदणी
लोभसवाणा तिचा चेहरा
कधी तो असतो सागर
लाटालाटांतून उसळणारा
कधी ती होते वाळू
जिला व्यापून उरतो किनारा
Monday, 29 April 2019
ती आणि तो माझ्या कवितेतील
Saturday, 27 April 2019
आषाढीची जत्रा
विठूमाऊलीचा गजर
चंद्रभागेत स्नान
आषाढीच्या एकादशीला
भक्तिसागराला उधाण
विठुराया करी पंचामृती स्नान
रूक्मिणीचा शालू जरतारी छान
भीमेच्या काठी वैष्णवांचा मेळा
जत्रेच्या आनंदात बालगोपाळांचा मेळा
कुणी खाई रेवडी,कुणी फुगा खेळे
वाळवंटी नदीच्या फुगड्यांचे मेळे
दुकानांची आरास खरेदीचा उल्हास
एकादशीच्या दिवशी वैष्णवांचा उपवास
वाळवंटी चाले अशी मौज भारी
पांडुरंग पाही जत्रा राहून उभा विटेवरी
मी दरवळावे
कुंद वाटा कुंद हवा
पाऊस येईल नवा नवा
घेऊन येईल हळुवार माया
धरतीच्या काहिलीला देईल छाया!
माझ्या मनाही हवा विसावा
थेंबांच्या लडीतून उतरेल गारवा
त्या गारव्याने मोहरतील क्षण
आनंदघनाने थुईथुई नाचेल अंगण!
अंगणात तरारेल मोगरा
हासरा लाजरा अन् साजिरा
त्याच्या मऊशार अंगावरती
पाऊसथेंबांची उमटेल बुट्टी!
मी ही भिजावे
बहरून यावे
गंध मातीचा उरी भरूनी
मोगर्याप्रमाणे मी दरवळावे!
Thursday, 25 April 2019
तुझ्या निरागस देखणेपणास...
तुझ्या मऊशार कुंतलाला
स्नान घडले अनाघ्रात
शीतल जलाच्या परिसस्पर्शे
झालीस तू सुस्नात!
काळी कोवळी बट लडिवाळ
निरागस गाली घुंगुरमाळ
तुझ्या बटेतून जल ओघळता
पुन्हा बरसेल आभाळ!
असशील उभी सौधावरी
सुकवीत कुंतले पाठीवरी
करीत येईल कुणी मुशाफिरी
वेड लावशील त्यास!
तू माझी छाया
की हा माझाच मजला भास!!
Wednesday, 24 April 2019
असे जगावे
असे जगावे
सायंकाळी जुळे मारवा
शीतल वाही सांजगारवा
संध्याछाया लाल पसरता
रजनीच्या प्रेमात भिजावे
असे जगावे...
पहाट होता अवनीवरती
चिमणपाखरे किलबिल करती
ललत भैरव चारण गाती
असे जगावे..
असे जगावे पाण्यामधे
नितळ निवळ प्रतिबिंब डुलावे
आयुष्याच्या अंतिम समयी
भैरवीचे सूर घुमावे
असे जगावे...
Tuesday, 23 April 2019
पुस्तक दिन
आज जागतिक पुस्तक दिन झाला.माझी एक मैत्रीण प्राची चितळे- जोशी हिने तिच्या पुस्तकांच्या आठवणी अतिशय सुंदर आणि प्रामाणिक शब्दात मांडून लिहून पाठवल्या.तिचं वर्णन वाचतानाच मलाही माझी पुस्तकं समोर दिसायला लागली आणि लिखाणाची सुरसुरी आलीच.
मला कुठल्याही लायब्ररीत गेलं की जन्मजन्मांतरीची उपाशी असल्यासारखंच वाटतं. लहानपणापासून पुस्तकांशी झालेली मैत्री अजूनतरी सुटलेली नाही आणि सुटण्याची शक्यताही नाही.
देवा म्हणून तरी मी कितीही पापी असले तरी मला प्लीज स्वर्गात पाठव.म्हणे तिथे देव राहतात.त्यांच्याकडे असलेले छान छान ग्रंथ मला नंतर पण मऊशार ढगांवर लोळत वाचायला मिळतील म्हणजे!
रामकृष्ण मठाची लायब्ररी हा एक खजिना आहे.आत घुसलं की बाहेर पडावंसं वाटत नाही.
भांडारकर आणि भारत इतिहासची लायब्ररी यावर स्वतंत्र लेखमाला होईल.
प्रबोधिनीची लायब्ररी आणि माझी हक्काची संत्रिकेची पुस्तकं पाहून तर आपण किती श्रीमंत आहोत असं वाटतं! लाॅकरला ठेवलेल्या धनाची तुलना मी याच्याशी करूच शकणार नाही असा हा अमूल्य ठेवा!
विकी व्यासपीठावर तर मी आॅनलाईन पुस्तकं वाचायला आणि वापरायला शिकले.
तरीही पुस्तक हे पुस्तकंच असतं.लेखकाचा कवीचा वैचारिक आरसा असतं!
मी स्वतः लिहायला लागल्यावर मला असं जाणवलच की गेली काही वर्ष आपलं बुद्धीत साठवलेलं संचित आता शाईतून कागदावर झरू लागलय.
ते गो.नी.दांडेकर नावाचे आजोबा फार क्यूट असावेत.त्यांची मृण्मयी कादंबरी मी शाळेत असताना वाचली. फार नव्हती कळली मला तेव्हा ती.
पण कधीतरी कुणीतरी मला लक्षात आणून दिलं ध्यानीमनी नसताना की गोनीदांची मृण्मयी आणि माझ्यात काही साम्य आहे!!!
मग मी कविता करायला सुरुवात केल्यावर तेच टोपणनाव घेतलं स्वतःला! वडिलांची लाडकी,आई गेल्यानंतर वडिलांच्या सहवासात अध्यात्माची आणि आयुष्याची गोडी समजून घेणारी मनू मी ही आहेच की!
पुस्तकांच्या प्रदेशातली सफर न संपणारी आहे. तरीही आपले खास हळवे कोपरे असतातच की! ना.धों.महानोर,गो.नी.दा हे माझे खास जिव्हाळ्याचे आहेत. मला त्यांचं साहित्य वाचताना ते आपल्याशी गप्पा मारत आहेत असंच वाटतं.
धर्मशास्रासारखा विषय अभ्यासताना मी वाचलेलं थेंबाएवढंही नाही!अख्खा सागर रिचवायचा बाकी आहे.पण या एका चिमुकल्या आयुष्यात ते शक्यही नाही.
पण शेवटच्या श्वासापर्यंत पुस्तकांची सोबत कायम राहो आणि नंतर ढगावर लोळून वाचणं बाकी आहेच की! माझा मोक्ष तोच आहे!
माझ्या पुस्तकात
#माझ्या पुस्तकात
माझ्या पुस्तकात सुंदरशी कथा
खूप सारा आनंद थोडीशी व्यथा!
माझ्या पुस्तकात अनुभवांचा सागर
सुखदुःखांनी भरली खार्या पाण्याची घागर!
माझ्या पुस्तकात नात्यांची अक्षरे
भावनांचे शब्द मोत्यासारखे साजिरे!
माझ्या पुस्तकात आठवणींच्या ओळी
परिच्छेदांचे गुज विरामचिह्नांच्या सुकाळी
माझ्या पुस्तकात सापडेल पिंपळपान
काहीसे जुने पण तरीही ताजेतवाने छान!
Sunday, 21 April 2019
दरवळते ती
# दरवळते ती
दरवळते ती माझ्या शेतातल्या मातीच्या ओल्या गंधासह
ज्याची साक्ष देतं काजव्यानं लखलखलेलं झाड..
दरवळते ती माझ्या मातीतल्या धान्याच्या कणसात
हसतात जी वार्यावर डुलताना कोवळ्या उन्हात
दरवळते ती आंब्याच्या मोहरात
ज्यावर बसून कोकिळ गातो माझ्या अंगणात
दरवळते ती माझ्या घरात
जिथल्या मातीच्या भिंती लिंपल्या आहेत मी माझ्या अलवार मायेने..
"ती" म्हणजे "मीच" आहे!!
जी दरवळते माझ्याच मनात... अंगणात... आणि परसदारीही
Saturday, 20 April 2019
भान
#भान
हिमालयाच्या कुशीत
दरीतून येणार्या प्रतिध्वनीत
झुळझुळणार्या झर्याच्या अनाहत नादात
हरपलं आहे "भान"!
काळवेळचा पसारा दिगंती गाभारा
पसरला आहे मोरपिसारा ढगांचा आकाशी!
मऊशार कुरणावर रंगीत गंधित फुलांवर
बागडणार्या पाखरांवर अलवार नक्षी!
पाहताना विसरले अस्तित्व हरपले
निसर्गाशी नाते जुळता
सरले दिक्कालाचे "भान"!
मनस्ताप
#मनस्ताप
शरीर झाले आजारी! औषधे घेतली न्यारी!
होऊ लागले बरी! त्यांचिया गुणे!!
परि मनाचा "ताप" ना गेला!
चुकांच्या आठवणीने श्रांतावला
औषधाने ना गुण आला! माझिया मना!!
संवाद स्वतःशी करावा! घ्यावा भूतकाळाचा मागोवा!
वर्तमान सुधारावा! भविष्यालागी!!
Friday, 19 April 2019
एक पहाट मंतरलेली
भल्या पहाटे कोकीळ नावाचा भाट गाऊ लागतो
त्याच्या भैरवाचे सूर मनात रूंजी घालू लागतात थंडगार झुळुकांनी आम्रवृक्षांचा गंधित धूप दरवळू लागतो..
उगवत्या सूर्यबिंबाच्या मस्तकी टिळ्याने शुचिर्भूत आकाश अधिकच तेजस्वी दिसते
पक्ष्यांच्या कूजनाने काकडआरती होते
पुराणपुरुष डोंगरही आळस झटकून वेदऋचा म्हणण्यास ताजेतवाने होतात
आणि हा निसर्गाचा व्यापार पाहत मी जागी होते...
पौर्णिमेचे चंद्रबिंब उत्तररात्री डोळ्यात साठवून मिटलेल्या पापण्याही आता चांदणतेजाने माखून गेलेल्या असतात....
Thursday, 18 April 2019
हनुमंत
बुद्धीमंतात श्रेष्ठ
सात्विक कृतीशील भक्त
रघुरायाचा अन् त्याचा
जगावेगळा हृद्बंध
उत्तरेकडे झेपावता
योगसाधनेची कृतार्थता
भक्तास शिकवी सार्थता
अध्यात्माची
Tuesday, 16 April 2019
हसरी भिंत
टिनू आणि मिनी खूप घट्ट मित्र- मैत्रिणी.शेजारी रहायचे.खूप खूप खेळायचे. टिनूचं नाव तेजस आणि मिनीचं नाव मीनाक्षी. पण लाडाची नावंच जास्त आवडीची होती दोघांच्या.
टिनू सातवीत जाणार होता आणि मिनी पाचवीत जाणार होती. सुट्टीभरचा उद्योग ठरवला दोघांनी.त्या दोघांच्या घरामधे फक्त एक भिंतच होती.दोघांचे आई बाबाही भिंतीपलीकडून एकमेकांशी छान गप्पा मारत असत.
ही भिंत दोन्ही बाजूंनी रंगवायची असं ठरलं.आई बाबांकडून सामान मागून घेतलं. भिंतीवर चित्र काय काढायची हेही ठरलं.
टिनूच्या घराच्या बाजूच्या भिंतीवर पक्षी,झाडं असं काढायचं आणि मिनीच्या घराच्या भिंतीवर फुलं,पान,फुलपाखरं. टिनूला गाड्या,रोबो असंही काही काढायचं होतं पण ते जरा त्याला अवघड वाटत होतं.शेवटी रंग,ब्रश असं सामान दाखल झालं.
एकीकडे ही तयारी सुरु असतानाच त्यांच्या घरासमोरच रस्त्याचं काम सुरु झालं.भर उन्हात काम करणारी ती माणसं पाहून टिनू आणि मिनीला वाईट वाटलं.ते रहात होते ती घर म्हणजे रस्त्याच्या कडेला बांधलेले तंबूच होते.रस्त्यावरची खडी,मोठमोठी मशीन्स, सिमेंट कालविणारं यंत्र, डोक्यावर ते नेणार्या बायका,खडी पसरणारे पुरूष हे कष्ट करत होते उन्हात. त्यांची छोटी मुलं तिथेच रस्त्यात भर उन्हात खेळत होती.टिनू आणि मिनी त्यांना रोज पहात होते.
आता उद्यापासून भिंत रंगवायला घ्यायची तर... दोघांच्याही बाबांनी शनिवारी संध्याकाळी कोळशाने मुलांना चित्राच्या चौकटी काढायला शिकवलं.यातूनच पुढे रंग भरून भिंत सजणार होती. रस्त्याच्या कडेला खेळणारी दोन मुलं घराच्या फाटकातून हे पाहत होती.टिनू आणि मिनीला वाटलं की यांना पण बोलावलं तर?पण त्यांची आपली ओळख नाही.भाषाही येत नाही.आणि ती जरा शेमडी फाटक्या कपड्यातली वाटतात.पण टिनूची आजी हे पाहत होती.मुलांच्या मनातले विचार तिने ओळखले. संध्याकाळी कामं संपवून बाया बापडे बसले होते. आजी मुलांना घेऊन तिकडे गेली आणि कंत्राटदाराशी बोलू लागली.त्याला हिंदीत बोलता येत होतं पण कामगारांना हिंदी येत नव्हतं.मराठीही कळत नव्हतं.ते आपापसात वेगळ्याच भाषेत बोलत होते.
शेवटी कंत्राटदाराने त्यांना मुलांचा आणि आजीचा हेतू समजावून दिला...
रविवारची सकाळ गजबजली.कामगारांची सहा मुलं अंगणात आली.तीन टिनूकडे आणि तीन मिनीकडे. रंगाचे डबे,ब्रश अशी गंमत त्यांनी कधीच पाहिली नव्हती. पण काय कमाल . बाबांनी दाखवल्याप्रमाणे ती मुलं भराभर रंग भरू लागली.भिंत हसायला लागली.टिनूचीही आणि मिनीचीही.
ही मुलं आठवडाभर रोज आली न चुकता.त्यांची आणि टिनू मिनीची मैत्री झाली.कधी मिनीची आई पन्हं करून देई तर कधी टिनूची आई वाटीकेक देई. कधी पोहे तर कधी तिखट शेंगदाणे खाऊ.
टिनू आणि मिनी आपण भिंत रंगवणार आहोत हे विसरुनच गेले.या मुलांना भिंत रंगवताना हरखून गेलेलं पाहूनच त्यांना खूप आनंद झाला होता. दोन्ही भिंती या कामगारांच्या सहा मुलांनीच रंगवल्या. अधूनमधून संध्याकाळी कामगार आईबाबाही फाटकापलीकडे उभं राहून ही गंमत पाहून जात.
शेवटच्या दिवशी मिनीची मावशी आली होती.तिने या सहाही मुलांच्या हाताच्या अंगठ्यांना रंग लावून त्यांचे छाप चित्रांखाली उमटवून घेतले.जणू काही या निरागस चित्रकारांच्या सह्याच त्या!! मावशीने हे सर्व फोटो सर्वांना पाठविले.सर्वांनी टिनू आणि मिनीचं खूप कौतुक केलं.
काम संपलं आणि कामगारांनी पालं हलवली. निघताना ती मुलं आवर्जून या दोघांना टाटा करून गेली. मात्र त्यांची आठवण आता टिनू आणि मिनीच्या घरांच्या अंगणात भिंतीवर छान रंगून बसली आहे!
काव्य
घन बरसू लागले
आकाशी सूर्य तळपत होता
मोत्यासारख्या थेंबांतून
पाऊस गात होता!
त्याला साथ द्यायला
वाजू लागला नगारा
अवचित आकाशाने पाठविल्या गारा!
असा रंगला सोहळा
प्रतीक्षा इंद्रधनुची केली
नंतर आलं लक्षात
त्याला दडवून तुझी ओली पापणी शहारली!
रात्र थोडी सोंगं फार
कथेचे शीर्षक-रात्र थोडी सोंगं फार
पियू कमालीची उत्साही.तिला सारखं नवीन नवीन शिकायला आणि करून पहायला आवडायचं.शाळेत समजलेल्या प्रत्येक स्पर्धेत तिला भाग घ्यायचा असायचा.
आई बाबा मदत करायचे,प्रोत्साहन द्यायचे हे खरं.पण बाबा तिला नेहमी म्हणत की पियू अग आपल्या हातात वेळ किती आहे हे तरी आधी पहात जा. दिवसभर शाळा,मग दोन वार नाचाचा वर्ग,दोन वार बॅडमिंटन,दोन वार चित्रकला. शनिवार रविवारीही तिचं चालूच असे काही ना काही.
नवीन नवीन करून पहावं हे सगळं ठीक होतं.वेगवेगळ्या गोष्टी करता येतात याचाही आनंद होताच की पियुला! पण हातातला उपलब्ध वेळ आणि तिची हौस यांची मोट बांधताना दमछाक व्हायची आईची!
सातवीची वार्षिक परीक्षा सुरु व्हायच्या आधीच पियूने बाबांसमोर यादी ठेवली.या सुट्टीत मला चार छंदवर्ग करायचेत. मनालीच्या बाबांच्या गटाबरोबर जाऊन कात्रज सिंहगड ट्रेक करायचाय.
प्रेरणा या सुट्टीत झुंबा शिकणार आहे तिथेही मला जायचय आणि माधुरी मावशीकडे रांगोळी,मेंदी,म्यूरल्स पण शिकणार आहे मी!
“ही हल्लीची पिढीच अशी! तुम्ही आई वडीलही खतपाणी घालता!!। आजीचा इशारा!
“हो पण समजावून ऐकते कुठे ती! या सगळ्याला पैसेही भरावे लागतात आणि ने आण करायलाही मीच हवी असते तिला!” इति आई
पण बाबा म्हणाले की यावेळी हे सगळं तिला करून पाहू द्यायचं मी ठरवलय. तिलाच अनुभवातून शहाणं होऊ द्यावं आपण!
झालं.एप्रिल महिना संपायच्या आतच पियूची दमछाक झाली. दिवसभर घराबाहेर.भूक लागली तरी बकाबका खायचं कारण एक वर्ग संपला की पळ दुसरीकडे.
रात्री घरी परतताना आईच्या मागे स्कूटरवर पेंगायलाच लागे. घरी आल्यावर अंग टाकून उपाशीच झोपे.
भर उन्हाळ्यात केलेल्या ट्रेकमुळे मे महिन्यात पियुबाई चार दिवस झोपल्याच पार. छंदवर्गही बुडले चार दिवस.
मे संपत आल्यावर पियुलाच कळू लागलं की हातात असलेल्या थोड्या दिवसांमधे आपण जरा जास्तच उद्योग केलेत त्याचा हा परिणाम आहे! मजा मिळाली पण धावपळ आणि दगदगच जास्त झाली आपली. त्यामुळे पुढच्या सुट्टीपासून दोन महिन्यात मिळून एखादाच वर्ग केलेला बरा! नाहीतर या सुट्टीत झालं तसं होईल आपलं “रात्र थोडी सोंगं फार!
Monday, 15 April 2019
पाऊसओल्या गारा
घन बरसू लागले
आकाशी सूर्य तळपत होता
मोत्यासारख्या थेंबांतून
पाऊस गात होता!
त्याला साथ द्यायला
वाजू लागला नगारा
अवचित आकाशाने पाठविल्या गारा!
असा रंगला सोहळा
प्रतीक्षा इंद्रधनुची केली
नंतर आलं लक्षात
त्याला दडवून तुझी ओली पापणी शहारली!
Saturday, 13 April 2019
Cute Thirty
माझ्या चाळिशीपेक्षा माझी तिशी जास्त cute होती.
पीएचडी चं काम नारायणच्या करड्या शिस्तीखाली सुरु झालं होतं.पण तो अभ्यास करतानाही मी माझा बालिशपणा जपून ठेवला होता.
भारतीयविद्या उत्तम अभ्यासाने उत्तीर्ण झाले होते.प्रबोधिनीच्या कामामुळे टीव्हीवर झळकत होते. वृत्तपत्रांना मुलाखती देत होते. तात्पर्य सगळं काही मस्त चालू होतं.त्यातच दोन उत्तम पुरस्कार मिळाल्याने समाजातही ओळख स्थिर झाली होती.स्वयंपाकघरात लुडबुडण्याऐवजी दैनंदिन कामे "उरकून" पुस्तकात डोकं खुपसणार्या सूनबाईंबद्दल आता या पुरस्कारांमुळे घरातही जरा कौतुक वाढलं.हे सगळ्ळं लिहायचं कारण म्हणजे या सगळ्याबरोबर मी खुश होते माझ्या व्यक्तिगत चिमुकल्या विश्वात!!!
आशुतोषने मला एक दिवस एक त्यावेळचा भारी मोबाईल भेट दिला अचानक! त्यात ते पॅराशूट वगैरे उडायचं screen saver वर. मला फार मज्जा वाटायची! माझ्या संत्रिकेतल्या मैत्रीणींना पण त्या फोनची कोण अपूर्वाई वाटली होती!
माझ्याकडे लॅपटाॅप नव्हता तेव्हा ( कारण तेव्हा मी मराठी विकीवरची आघाडीची संपादिका डाॅ.आर्याजी वगैरे नव्हते नं! :) :) त्यामुळे मी आशुतोषचा लॅपटाॅप वापरत असे.आर्या अर्धा तास हं फक्त अशा अटीवरच तो मिळे!!
आणि उद्योग काय तर छान छान वाॅलपेपर शोधणे आणि ते काॅड लावून मोबाईलवर उतरवणे.असे शंभर एक शोधून उतरवले की तीन महिन्याची बेगमी! केवढं श्रीमंत झाल्यासारखं वाटे!
मग त्या नव्या मस्त मोबाईलवर रोज सकाळी एक गोंडस चित्र विराजमान होई.
परीकथेसारख्या त्या मुली,त्यांचे गोंडस आनंदी भाव,अवतीभवतीचा तितकाच निरागस निसर्ग ही माझी दिवसभराची पुंजी असे.मीही त्या चित्राचा भाग बनून जाई दिवसभर. आमची श्रद्धा रोज पाही संत्रिकेत की मी आज काय चित्र ठेवलय. आई बाबा कुर्ल्याला होते तेव्हा शनिवार रविवार गेलं की बाबासुद्धा मधेच माझा मोबाईल उचलून पाहत त्यावरचं चित्र! काय ध्यान आलय घरात! हा हा हा! असं त्यांना तेव्हा नक्की वाटत असणार माझ्याबद्दल!
माझे साॅफ्ट टाॅईजने भरलेले कपाट आणि ही चित्रांची दुनिया या काळातले माझे खरे सोबती होते. आशुतोषच्या अनुपस्थितीत मी या सोबत्यांनाच सांगून जाई की मला यायला उशीर होणार आहे वगैरे वगैरे!!
बरं नव्हे छान होतं ते असं आज फिरून वाटतं.
मोबाईलचं तंत्र सुधारलं.माझी डाॅक्टरेट झाली. एकूणातच संगणकातही क्रांती झाली.... पण या सगळ्यांमुळे माझ्या निरागस आयुष्यात खूपच उलथापालथ झाली.
शिक्षणातून येणारी जाणीव समाजापर्यंत पोचविण्याच्या इच्छेपायी तंत्रज्ञान आत्मसात केलं,वापरतेही खूप! लोकांना त्याचा पुरेपुर उपयोग होतो हेही लक्षात येऊन समाधान मिळतं.
पण या सगळ्यात माझी ती चिमुकली दुनिया हरवली.
माझी छोटी लेक आता माझ्या विश्वाचा भाग झाली असली तरीही मी माझी खेळणी आणि या चित्रांसोबतचं माझं प्रामाणिक पण निरागस जग हरवलं आहे... पून्हा शोध सुरु केला आहे मी.. पुढची दहा वर्ष व्यक्तीगतदृष्ट्या शारिरिक मानसिक कस लावणारी!!! त्यामुळे आता ही निरागस दुनिया पुन्हा खुणावू लागली आहे... येणार का माझ्या या दुनियेची सैर करायला?!!
आर्या
Friday, 12 April 2019
वेचले मी
#वेचले मी रामाला
रमणार्याला रमविणार्याला
मनमंदिराच्या गर्भगृही
स्थापित केले त्याला!
वाहिली धवल फुलांची अंजली
लावले शीतलतेचे गंध
त्याला "वेचूनी" "वेचला" मी
भक्तिफुलातील मकरंद!!
राम भेटवा
लहानपणची गोकुळाष्टमी आठवते तशीच रामनवमीही.
आजी रामाचा अध्याय वाचायची.रामाला सुंदर हार.घरातलं रामपंचायतन तर इतकी सुंदर तसबीर होती की नजर ठरायची नाही.त्यातच उपवासाचीही धांदल.सणच असायचा जणू.
नंतर काही वर्ष मी कोणत्यातरी रामाच्या मंदिरात दर्शनाला जायची. पण मग नंतर श्रीरामकृष्ण मठात जायला लागल्यावर तिथल्या उत्सवांची गोडी निर्माण झाली.
रामनवमीचा तिथला उत्सव मला पर्वणी वाटतो तो त्याआधीच्या सप्ताहभर होणार्या कार्यक्रमांसाठी.उत्तमोत्तम प्रवचनं,कसलेल्या कलाकारांचे रंगमंचीय आविष्कार यात देव नाही सापडला तर नवल!
विशेष म्हणजे चौदा एप्रिलच्या पार्श्वभूमीवर अगदी भिंतीला लागूनच धांगडधिंगा सुरु असताना मी एकाही स्वामीजींना कधी विचलित झालेलं पाहिलं नाही.
शिस्तीत कार्यक्रम सुरु होणार आणि शिस्तीत संपणार.श्रोते आनंदरसात चिंब न्हालेले.कधीतरी मोठे महाराज गायकांना एखाद्या अभंगाची विनंती पाठवत. मग आदरपूर्वक तोही सादर होई.
एकदा आरात्रिकाला गेलो असता नेमकीच एकादशी होती. आनंद महाराज आरतीनंतर गाऊ लागले शुद्ध ब्रह्म परात्पर राम...
त्यादिवशीपासून आम्ही दोघेही आवर्जून एकादशीला मठात जाऊ लागलो.आॅफिसातून थेट मठात.दिवसभर मी तर संध्याकाळचीच वाट पात्रत राही.
रामनवमीच्या दिवशी तर विशेष मजा.मंदिरातल्या नीटनेटक्या प्रसन्नतेतच चैतन्याचा भास होतो.त्यात भरीस भर धनुर्धारी रामराया सस्मित वदनाने सज्ज असे.
रामनामसंकीर्तन तर आताशा आम्हाला पाठच झालं होतं.म्हणायला सुरुवात केली तरी पुढचं काही तोंडातून अस्फुटही बाहेर पडल्याचं स्मरत नाही.भक्तगणांनी भरलेले आणि भारलेले मंदिर डोलू लागे.कुठेतरी वेगळ्या विश्वात पोचल्याचा तो अनुभव शब्दबद्धही करता येत नाही.
सुरु झालेलं संकीर्तन संपत असे.वाद्य काहीकाळ बंद होत.त्यानंतर कुणी स्वामीजी एखादं रामाचं भजन म्हणत.तल्लीनतेचा पूरच...
या सगळ्यातून बेगडी वास्तवात एका शणी परतावं लागेच.
ओळीतून बाहेर आलं की ऊन ऊन खिचडी आणि गरमागरम जिलबी, उपवास असणार्यांच्यासाठी साबुदाणा खिचडी नाहीतर राजगिरा लाडू.
रसनेचीही तृप्ती.तिथला प्रसादही कधीही बाधलेला नाही आजपर्यंत.आणि इतका सुंदर चवीला की जरा अंमळ भूक जास्तच लागल्यासारखं वाटत असे!
राम जनात पहावा विजनात पहावा हे खरं! माझा राम मात्र मला मठात भेटतोच!!
Sunday, 7 April 2019
आठवणींचं गाठोडं
#आठवणींचं गाठोडं
आठवणींचं गाठोडं
भिजत होतं पावसात
पाऊस आकाशातला नव्हे
तो झरत होता माझ्या मनात!
किती आठवलं किती साठवलं
किती असंच हसत सोडून दिलं
तरीही गाठोडं गच्च भरलं आहे
भावनांच्या गाठींनी करकचून बांधलं आहे!
थोडंसं ऊन थोडासा पाऊस
थोडंसं इंद्रधनु थोडंसं गुज
थोडे हळवे थोडे उदास
गाठोड्यातल्या आठवणींना
गाठी उकलण्याचीच आस!
तरीही आता मी गाठोडे
गच्च बांधणार आहे!
सुरेलशा आठवणीच त्यात
अक्षरशः कोंबणार आहे!
ठेवीन त्यात एक
अत्तराचा फाया
सुगंधित करील आठवणी
आणि कोंदट वास घालवील लया!
उघडीन जेव्हा अचानक गाठोडे
एका निवांत क्षणी
अक्षरशः घरंगळतील
आठवणींची गंधित गाणी!
Wednesday, 3 April 2019
नववर्ष स्वागत काव्य
सणाचा आनंद उत्साह मनात
साजरे होते नववर्ष माझ्या भारतात..
नव वर्षाचा हो सण वसंतात आला
नव्या हंगामाची स्वप्ने पाहत तरारला..
माझिया देशाची समृद्ध संस्कृती
तिच्या अंगाखांद्यावरी फुलून येते प्रिती
कुणी म्हणती उगादी कुणी म्हणती पाडवा
रूजे प्रत्येकाच्या मनी सणाचा गोडवा
कुणी सजवितो गुढी कुणी मांडती तबक
नववर्ष स्वागताचे प्रत्येका कौतुक
कुणी हिमालया कुशी कुणी नदाच्या किनारी
माझ्या देशाच्या मस्तकी सणासुदीच्या झालरी
कुणी ढोल वाजविती कुणी गाती अन् नाचती
कुणी पंचांग वाचून पूजिती देवमूर्ती
कुणी मंदिरात जाती देवदर्शन करिती
कुणी दानधर्म करूनी सत्कार्य करिती
कुणा दारी झुले हत्ती कुणा दारी हो तोरण
रांगोळीच्या रंगातूनी देती आनंदा आवताण
असा सण देशाचा,सूर्यऊर्जेचा सोहळा
मनांच्या मनांशी ,गुंफूनी जातो माळा
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...