आज दापोलीच्या परतीच्या प्रवासात आयपाॅड वर गाणी ऐकण्याचा निवांत उद्योग केला मी.अचानक एक गाणं लागलं माझ्या माहितीतलच पण खूप दिवसात न ऐकलेलं.धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना! वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना! त्या चित्रपटाची कथा आठवलीच पण त्याचबरोबर आठवले काही क्षण ज्यांचा भागीदार होण्याचा आनंद मला लाभला आहे.पौरोहित्य वर्गात एक ताई यायच्या.छान मोकळ्या स्वभावाच्या.त्यांच्या यजमानांबद्दलही खूप सांगायच्या काय काय.एके दिवशी कळलं की त्यांचे यजमान अचानक गेले आणि त्या वेळी ताई त्यांच्यासोबत नव्हत्या. आम्ही मंडळी भेटून वगैरे आलो पण नंतर भेट नाही झाली दीडेक वर्ष. एके दिवशी मला ताईंचा फोन आला की तुझ्याशी जरा बोलायचयं. आम्ही संत्रिकेतच भेटलो. आधी त्यांनीमला मिठी मारली कडकडून आणि मग म्हणाल्याकी अगं मी प्रेमात पडली आहे! मला नक्की काय react व्हावं तेच उमजेना.यांचं वय 70. आता या पडल्या प्रेमात 77 वर्षाच्या त्यांच्या मित्राच्या. ज्येष्ठ नागरिकांच्या गटात ते भेटले.आणि त्या आजोबांनी यांना propose केलं.मुलांशी बोलून दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि ते विधिवत व्हावं अशी ताईंची इच्छा होती.नंतर त्या त्यांच्या मित्राला घेऊन आल्या आणि आम्ही तिघांनी मस्त गप्पा मारल्या. वयोज्येष्ठ अनुभवी पुरोहित येतील अशी व्यवस्था केलीआणि मी शुभेच्छा द्यायला येईन असं म्हटलं.त्यानंतरही ते दोघे स्वतःहून भेटायला आले लग्नाआधी. माझ्यासाठी एक सुंदर भेट घेउन.कारण त्यांच्या भावनांची खिल्ली न उडवता मी त्यांना समजून घेतलं अशी त्यांची भावना होती.खरंतर आयुष्याच्या संध्याकाळी असा निर्णय हीमाझ्यासाठी अपूर्वाई होती. त्या दोघांना पाहिलं की वाटे की हेआधीच का नाही भेटले एकमेकांना तरुणपणातच.त्यावर ते काका मला म्हणाले होते की आयुष्याची वर्तुळं पूर्ण झाल्यावर आता केवळ भावनिक पातळीवर एकमेकांचे राहण्याचे हे क्षण आहेत.. ते निघताना मी त्या दोघांनाही घट्ट मिठी मारली आणि नमस्कार केला.खालपर्यंत सोडायलाहीगेले पण ते रीक्षात बसतानाही मला नीट दिसले नाहीत कारण माझेच डोळे नकळत भरुन आले होते,..,.
Wednesday, 17 May 2017
Friday, 12 May 2017
पिंपळपान
उन्हाच्या काहिलीने कोमेजलेल्या मोगर्यावर वळीव बरसावा.... ध्यानीमनी नसताना कोणीतरी आपली ओंजळ चाफ्याच्या गंधाने भरुन टाकावी इतकं लोभसवाणं हसू,... लहान मुलाच्या हसण्याइतकच निरागस निर्लेप.... माझ्या मनातला आनंद त्या चेहर्याला मी जाऊन सांगितला. तो चेहरा कुणाचा हे गौण आहे... महत्वाचं आहे ते त्या चेहर्यावर उमटलेलं लाघवी हास्य.कोणत्यातरी वेगळ्या विचारात असलेला तो गंभीर चेहरा माझ्या आनंदाने एका निमिषात उत्फुल्ल होतो.त्याचे सामान्यतः मोहक न भासणारे डोळे क्षणात आनंद पाझरु लागतात. आणि ते भासतात मखमली पेटीत ठेवलेले टपोरे मोती.असं निर्व्याज निरपेक्ष आणि शब्दांशिवाय खूप बोलणारं हास्य माझ्या मनाच्या खोल आत उमटलं आहे. कधीतरी त्याचं पिंपळपान होईल...... 30 डिसेंबर 2016
भटकंती सह्याद्रीतली
अमृतेश्वराच्या मंदिराचं गाजर दाखवून आशुतोषने मला रतनगडला जायला अखेर पटवलचं. एका चांदण्या रात्री आम्ही प्रवास करत भंडारदर्याला पोहोचलो.वाटेत गाडी नादुरुस्त झाल्यावर तिचं बाळंतपण होईपर्यंत आम्ही मारलेल्या गप्पा हा मजेशीर आठवणींचा खजिनाच आहे. दुसर्या दिवशीचा रतनगडाचा ट्रेक निवांतपणे अनुभवत शिडीची वाट चढून गडावर दाखल झालो. नेढ्यात बसून अनुभवलेला भणाणता वारा, चुलीवर केलेली गरम गरम मॅगी, रात्री गुहेत झोपण्याची तयारी या आठवणी न विसरण्यासारख्या.अंधार पडू लागल्यावर मी गायलेलं सांज ये गोकुळी... पुन्हा इतकं छान कधीच जमून आलेलं नाही अद्याप.पूर्ण अंधारात लांबवर दिसणार्या एकमेव दिव्याची वाटलेली सोबत आजही अंतर्मुख करते. माकडांच्या अवतरण्याने उगवलेली सकाळ..सकाळी आपले आदिम पूर्वज भेटायला आले.एक माकड आमची एक पिशवी पळवून घेऊन गेलं पण त्याला हवं ते न सापडल्याने त्याने ती पिशवी परत आणून दिली....... आणखी एक पिलू दोन पायांवर उभं राहून आपलीच शेपटी हातात घेउन चाललं होत.... मी आत्ताही हसण्यापासून थोपवू शकत नाही स्वतःला.ते माकडचाळे त्यांनी बंद करावेत म्हणून स्वातीने त्यांना एक उपदेशाचा डोसही पाजला आहे. खूपच धावपळीत असताना मनाला आनंदाची अनुभूती देणारा हा प्रवास..... संस्मरणीय.
दिल चाहता है
प्रबोधिनीच्या समाजमान्य होत असलेल्या पौरोहित्य उपक्रमाचं काम असो वा श्राद्ध या विषयातलं माझं संशोधन असो. ते पाहून लोकांना वाटतं की मी प्रबोधिनीची विद्यार्थिनी आहै की काय.... पण माझी शाळा कोणाच्या खिजगणतीतही नसलेली अशी आहे.माझ्या या सगळ्या कामात माझ्या शालेय जीवनातील या कार्ट्यांचा खूप मोठा सहभाग आहे. बीजगणित भूमिती भूगोल हे विषय मी या मुलींमुळेच निभावू शकले. चित्रकला आणि शिवणाच्या माझ्या गुणांची जबाबदारी जणू काही यांचीच होती. जीवशास्राच्या प्रयोगवहीतल्या त्या बेडूक वगैरे आकृत्या माझ्याऐवजी यांनीच काढल्या आहेत.एकाग्रपणे अभ्यास करणारी दीपाली, छोटुकली नाजूक साधना आणि तिची सवंगडी मीनल,फॅन्सी ड्रेस जिंकणारी मीनू, नव्याने उशिराने आलेली पण सहज मिसळलेली कल्याणी, विजेच्या चापल्याने लवलवत कबड्डी जिंकणार्या कुसुम आणि प्रतिभा. दरवेळी धांदरटपणा करणारी धनश्री... ती प्रबोधिनीत असती तर तिच्या उद्योगीपणाला छान खाद्य मिळालं असतं..... आई गेल्यावर कोमेजलेल्या माझ्या मनावर या सर्वांनीच हळुवार फुंकर घालून मला पुन्हा माणसात आणलं आहे.माझा एक पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या मनोगतात मी माझ्या या मैत्रिणींना तो अर्पण केला आहे. लौकिकार्थाने आपापल्या क्षेत्रात स्थिरावलेल्या,संसारात रमलेल्या आम्ही सार्याजणी.तरीही शालेय जीवनाची अमीट गोडी आठवली की मन भरुन येतचं
माझे सुट्य्यांमधील उद्योग
दहावीच्या परीक्षेनंतर मला बाबांनी जवळच्या खाजगी ग्रंथालयात काकांना मदत करायला पाठवलं होतं.मानधन महत्वाचं नसून कामाचा अनुभव मिळेल म्हणून रोज दोन तास जायचचं असा वटहुकुमच बाबांनी काढला होता. उरलेल्या वेळात मैत्रिणींबरोबर धम्मालही केली मी पण पुस्तकांच्या सहवासाची गोडी लागली. 12 वी च्या सुट्टीत मावशीने मला छोट्या मुलांच्या उन्हाळी शिबिरात मदतनीसम्हणून पाठवलं.त्या चिंगुल्यांसोबत मस्त मज्जा यायची आणि स्व कष्टानै मिळवलेले पैसैही.... काकांकडे कायदेशीर कागदपत्र यायची त्यावेळी typing शिकल्याने ते मला काम करायला सांगत with मोबदला! काॅलेजच्या सुट्यात गरवारे बालभवनलाही मदतनीस ताई म्हणून मी गेले आहे.मावशीच्या एका वयस्क मैत्रिणीला पुस्तक वाचून दाखवायला जाणं असो वा कुणाच्या पुस्तकाचं proof reading असो. सुट्टीतली माझी ही कामं मला स्व कष्टाच्या पैशाचं मोल शिकवून गेली.माणसं जोडली गेली आणि लहान वयात अनुभवांची समृद्धीही जमा झाली.गरोदरपणात वाहन चालवायला मनाई होती आणि शरीराने नऊ महिने अन्नाविरुद्ध बंडच पुकारलं होतं, याहक्काच्या सुट्टीतही मी SSY च्या art of patenting course च्या सर्व इंग्रजी साहित्याचं मराठी भाषाँतर करुन दिलं. अशा माझ्या सुट्ट्या! मजेच्या गंमतीच्या आणि जोडीने जिवंत जीवनानुभव देऊन माणूस म्हणूनही घडवणार्या.
अ-भंग-अभंग
अ—भंग अभंग
आमच्या घराजवळ दरवर्षी या दिवसात सप्ताह होतो.आजही जाग आली ती टाळ— मृदुंगाच्या आवाजाने. पक्ष्यांच्या आवाजात सूर मिसळले गेले भैरवचे. शब्द कळत नव्हते पण भक्तिरस झिरपत होता मात्र. एकादशीला रात्रीही असेच सूर ऐकु येतात.दिवसभर शिणलेल्या शरीर मनाला ते लपेटतात आणि थोपटतातही.त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री आम्ही राजमाचीचा ट्रेक करायला गेलो त्यावेळी लगूना हाॅटेलच्या लगतच्या रस्त्यावरुन जाणार्या वाटेवर असेच जवळच्या मंदिरातले सूर रेंगाळत आलेले अनुभवले आहेत. हे अभंग गाणारे आवाज कधी खडे पहाडी तर कधी चिरके. काहीवेळा तर बुवांच्या गळ्यात औरँगजेब बसला आहे काय असं वाटतं. पण सच्चा असतो तो भाव. टाळ मृदुंगाच्या साथीवर खुलतो भक्तिभाव. साथीदारांच्या गळ्यातूनही पाझरतो तो सूर.अनन्य शरणतेने गायले जाणारे अभंग शाश्वत सुखाची अनुभूती देतात आणि माझे हात नकळत जोडले जातात मनाला हुरहुर लावणार्या त्या अ- भंग आनंदाप्रती.
आमच्या घराजवळ दरवर्षी या दिवसात सप्ताह होतो.आजही जाग आली ती टाळ— मृदुंगाच्या आवाजाने. पक्ष्यांच्या आवाजात सूर मिसळले गेले भैरवचे. शब्द कळत नव्हते पण भक्तिरस झिरपत होता मात्र. एकादशीला रात्रीही असेच सूर ऐकु येतात.दिवसभर शिणलेल्या शरीर मनाला ते लपेटतात आणि थोपटतातही.त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री आम्ही राजमाचीचा ट्रेक करायला गेलो त्यावेळी लगूना हाॅटेलच्या लगतच्या रस्त्यावरुन जाणार्या वाटेवर असेच जवळच्या मंदिरातले सूर रेंगाळत आलेले अनुभवले आहेत. हे अभंग गाणारे आवाज कधी खडे पहाडी तर कधी चिरके. काहीवेळा तर बुवांच्या गळ्यात औरँगजेब बसला आहे काय असं वाटतं. पण सच्चा असतो तो भाव. टाळ मृदुंगाच्या साथीवर खुलतो भक्तिभाव. साथीदारांच्या गळ्यातूनही पाझरतो तो सूर.अनन्य शरणतेने गायले जाणारे अभंग शाश्वत सुखाची अनुभूती देतात आणि माझे हात नकळत जोडले जातात मनाला हुरहुर लावणार्या त्या अ- भंग आनंदाप्रती.
Thursday, 11 May 2017
Subscribe to:
Posts (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...