Thursday, 31 May 2018

देवाच्या गोठण्यातली अक्षय्य तृतीया


मावशीच्या घरचे आंबे एक वर्षाआड यायचे.गोठण्यात दारात उभं राहिल्या राहिल्याच झाडाचे आंबे खुणावू लागत.
अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस माझ्यासाठी अक्षय्य आनंद घेउन भरून राहिला आहे.गोठण्यात देऊळवाडीत भार्गवरामाचं देऊळ आहे.मावशीच्या तळेवठारापासून वीस मिनीटं पायी अंतर!
तृतीया आमरसाच्या वाट्याच नजरेसमोर घेऊन उजाडायची.
सकाळी सड्यावरच्या ब्रह्मनदेवाचा नैवेद्य असे.घराघरातून आपटे मंडळींच्या गृहिणींची लगबग सुरु असे.माझाही सहभाग नव्हे लुडबुड असायचीच.पक्वानांनी भरलेली भांडी घेऊन पर्‍यातून रस्ता काढत आम्ही जायचो. आमचे काका वयाने सर्वात मोठे.त्यामुळे ते आधी नैवेद्य दाखवायचे.मग नारळी पोफळींनी भरलेल्या थंडगार  छायेत जेवणं व्हायची.स्वप्नाळू पेंगेतच घरी यायचो.दुपार उतरायला लागली की भार्गवरामाच्या जन्मोत्सवाला जायची लगबग सुरु होई.चालत ओढीने गप्पा करत देऊळवाडीत पोचायचो.दारातला पांढरा चाफा आपोआप स्वर्गीय भक्तिभावात नेऊन सोडत असे.देवळाला प्रदक्षिणा घालणारी पालखी,बुवांचं कीर्तन,जन्म,पाळणा सगळा साग्रसंगीत कार्यक्रम.घरी परतायला नऊ वाजायचे.चालत परतताना पुन्हा गप्पा पण मनात अजूनही जय जय रामकृष्ण हरी रुंजी घालत असे.रात्री घरासमोरच्या सारवलेल्या अंगणात झोपताना सड्यावरून जाणारी वरात ऐकू येई. एखादी  नवपरिणीत जोडी रात्री घरी येई आशीर्वाद घ्यायला.मग अख्खी वरात दारात.नवरीची ओटी भरली जाई.आशीर्वाद घेऊन मंडळी मार्गस्थ होत.पलीकडच्या गावात कुणीतरी गात असे खड्या आवाजात.नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची,तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची! एका जनार्दनी गवळण हसली! हरिचरणांशी मिठी तिने मारली!!
देवांचे आशीर्वाद घेऊन सुरु झालेली तृतीया कुट्ट अंधारात या भक्तिभावातच पेंगू लागे.दूरच्या जुवे बेटात कोणी एक वल्ली छोटी नाव घेऊन मासे पागायला निघे.त्याच्या नावेत लावलेल्या कंदिलाचा मिणमिणता उजेड आजही माझं मन उजळवून टाकतो केवळ स्मरणाने!!!आर्या.

नाव एक "बदलणं....


 आज मी माझ्या शाळेत गेले होते. कार्यक्रमाची अध्यक्षा म्हणून डाॅ.आर्या आशुतोष जोशी यांचा परिचय करून देण्यात आला. माझ्या सगळ्याच शिक्षिका माझ्या माहेरच्या अदिती याच नावाने हाक मारत होत्या आणि कुणाशीही ओळख करून देताना आमची "अदिती" असंच म्हणत होत्या.
विवाहात मुलीचं नाव बदललं जाण्याचे धर्मशास्रीय संकेत मला माहिती आहेत.तो आत्ताच विषय नाही. पण मी आज दिवसभर स्वतःला शोधत होते , अदिती आणि आर्या.
माझ्यापुरतं सांगायचं झालं तर आशुतोषने माझं  नाव बदलणं यात मला कोणताही तात्विक अपमान वाटला नव्हता.ती माझ्यासाठी गंमत होती.नवं नाव घेण्याची. पण माझी अट होती की मी तुला नावं शोधून देईन माझ्या आवडीची आणि त्यातलंच एक निवडायचं.त्याने ते मान्य केलं.
विसुभाऊंशी बोलून मी कोशातून शोधलेल्या नावांचे अर्थ एकदा पक्के करून घेतले आणि  तीन नावं आशुतोषच्या स्वाधीन केली. आर्या ठेव आवडेल मला हेही आवर्जून सुचवून ठेवलं होतं.
दिती म्हणजे मर्यादा,बंधन. जी त्याच्याही पार ती अदिती. आर्या म्हणजे प्रगती करणारी. अर् धातू आहे त्यात. noble  ,wise असा त्याचा इंग्रजी अर्थ.
आपलं नाव आपली ओळख असते. त्यामुळे बंधनरहित अदितीला जोडीदारही असा लाभला की ज्याने तिच्या अभ्यासाला कधीच बंधन घातलं नाही आणि त्यामुळे या नव्या आर्या नावाच्या अर्थाकडे माझी वाटचाल नक्कीच सुरु झाली.
माहेरचं नाव हे जास्त आत्मीय असतं.अलीकडे तर आडनावही बदलण्याची पद्धत लोप पावायला लागली आहे.मी यावर स्रीवादी दृष्टीकोनातून नक्कीच लिहीत नाही आहे.हे केवळ माझंच मनोगत आहे माझ्या नावापुरतं. पण तरी आज मला जाणवलं की नाव बदललं नसतं तरी फरक नसता पडला नक्कीच. मी अभ्यास करत राहिले असतेच. पण तरीही माझ्या सहचराने खूप विश्वासाने माझ्यावर ही नवी जबाबदारी सोपवली होती सहजीवनाच्या उंबरठ्यावर.ती पूर्णत्वाने नाही पण काही अंशी तरी जगण्याचा आणि सार्थ करण्याचा प्रयत्न मी नक्कीच केला.आईबाबांची आत्मीयता आणि सहचराचा विश्वास दोन्ही एकावेळी घेऊन जगता येणं तितकच अवघड पण स्वतःला बळ देणारं वाटलं मला!

पाण्यातले पहाता....




असं एक भावगीत आहे.पण इथे मला ते बालगीत म्हणून अभिप्रेत आहे.आमची  साधारण दोन तीन वर्षांची अंतरं असलेली पिल्लावळ पोहणं शिकण्यासाठी पाण्यात उतरलेली असते.काठावर बसून जणू काही आम्हीही तो थंडावा अनुभवतो आहोत अशा भावनेतून समोरची दृश्य समस्त आई मंडळ पहात असतं, ऐकत असतं. पाण्यात उतरलं की कुडकुडणारं लेकरू थरथरत्या अवाजात आईआई म्हणून मधेच हाक मारतं.त्या संबोधनातली ऊब जाणवत असावी तिला बहुधा! 
या नाठाळ आणि स्वतःला सगळं येतच आहे असं समजणार्‍या, गोजिरवाण्या आणि टोप्यांमुळे चेहरामोहराच पालटलेल्या बाळांना शिकवणारे त्यांचे लाडके रोहित सर! किती फेर्‍या मारायच्या सर? इथपासून ते पाण्याबाहेर येण्याची विविध नैसर्गिक कारणं शोधणार्‍या विद्यार्थ्यांचे हल्ले सर लीलया परतवून लावत असतात.टॅंकच्या सुदूर कोपर्‍यात असले तरी त्यांचं लक्ष प्रत्येकावर असतं. हात मार,पाय मर,वर बघ अशी सरांची घोषणाबाजी सुरु असते. अगदीच रागावले की या लहानग्यांवर ते पाण्याचीच ओंजळ सपकन् मारतात! विद्यार्थीही तो इशारा समजतात!!! 
खरं तर एकदा सरांना बाहेर जायचं होतं म्हणून ते त्या दिवशी पाण्यात उतरले नव्हते.पण दीपान्विता बुडते आहे हे पाहिल्यावर अंगातल्या जीन्सच्या जॅकेटसह त्यांनी पाण्यात उडी मारली आहे आणि आमच्या बहादुराला कळलच नाही की सर मला का पकडत होते म्हणून! मी काहीही घडलं नाही अशा आविर्भावात हे दृश्य अनुभवलं आहे कारण आमच्या लेकीला एक चांगला प्रशिक्षक लाभला आहे.त्याच्या हाती ती सुरक्षात आहे.
ओरडणारे सर जेव्हा छान पोहल्यावर पाण्यातच  तिला कुशीत घेऊन किंवा तिला पाठीवर घेऊन पोहत येतात हे अनुभवणच शब्दातीत आहे.गुरु शिष्याचं हे नातं! ते सगळ्याच मुलांशी असा दंगा करतात आणि मुलंही त्यांच्याशी!
आयुष्यातल्या अशा किती लाटा,हेलकावे अजून पोहून जायचं    हे हे या मुलांच्या खिजगणतीतच नाही! पण असं पोहायची वेळ दीपान्वितावर येईल तेव्हा मला आणि आशुतोषला सर्वात अधी रोहित सरच आठवतील!

ए जिंदगी गले लगा ले....


ताम्हाण्यात घराच्या छपराचं काम पूर्ण करून आमचे दोन सुतार सहकारी त्यांच्या गावी मार्गस्थ झाले.घरभरणीला आठवण ठेवा बरं असं म्हणूनही गेले.गावाच्या भंडार्‍याला आणि खेळ्यांना या बरं वहिनी असंही म्हणून गेले.याला आठवडा नाही झाला तो  वृत्तपत्र वाचताना आशुतोषने मला बातमी दाखवली. ती खरी असेल काय या शंकेने अस्वस्थ झालो.एका माणसाचा वडाचं झाड तोडताना मृत्यू. नाव, गाव, सगळं जुळणारं आणि वडाच्या झाडाचा संदर्भही.क्षणभर हललो आतून दोघेही. आणि नंतर कळलं की आमचं छप्पर पूर्ण करून गेलेला सुतारच होता तो निधन पावलेला.
घरासमोरचं वडाचं झाड तोडण्याच्या ईर्ष्येने पेटलेला,मांडव घालायचा आहे त्यासाठी ते मी तोडणारच असं आमच्या इथेही म्हणून गेला.गावाला परतला आणि शेवटी  वडाचं झाड तोडतानाच गेला.तपशील कळला नाही. मृत्यूने बोलावल्यासारखाच गावाला गेला असं म्हणून आम्ही सुन्न झालो.
इतकं सोपं आहे का हे सगळं? बडबड्या सुतारदादा आणि त्याची ईर्ष्या. रिबांचं काम करतानाची त्याची धांदल आठवली.एकत्र बसून सगळ्यांनी कलिंगडं खाल्ली, ऊन तापत होतं म्हणून शीतपेयही प्यायलो भल्यामोठ्या बाटलीतलं आणि त्याच्या इतर पुरूष सहकार्‍यांबरोबरच्या गप्पाही आठवल्या. स्थापत्यकार आणि मालकीण अशा दोन महिलांचं म्हणजे अनुज्ञाचं आणि माझं  साईटवर वावरणं याचं या गटाला अप्रूपच वाटतं.
तो दादा गेला पण माझ्या घराला छप्पर देऊन गेला.व्यवहार हा पैशाचा असतो आणि तो झालाही.पण जाताजाता मला दोनच दिवस घराच्या छपरावर उन्हात काम करणारा तो दादा कायम आठवत राहील.आर्या.

आईपण पेलताना

आई हवी मला! आई हवी मला!
खेळताना,झोपताना,पोहताना,जेवताना!
आई हवी मला!
आईच्या नावाची जपमाळ ओढत बसतो दिवसभर!
अशाने आता पुण्य जमा होईल दप्तरभर!
आईवर ओरडायचं,आईवर खेकसायचं!
असं असलं तरी रात्री आईच्याच कुशीत झोपायचं!
आईचं मी शेपूट,आईचा जणू अवयव!
 होऊ मोठे तेव्हा आणू मोठा खोटा आव!!
मला आता तुझी गरज नाही  मोठे होऊन म्हणाल
दूर कुठूनतरी तरी तुम्ही  नेहमी आम्हालाच शोधाल!!
तेव्हा आठवेल तुमचं हसणं लोभसवाणं!
आमच्या अयुष्यातलं तुम्ही शरदाचं चांदणं!!!
आर्या.

नूतन वर्ष शुभचिंतन काव्य

चैत्र प्रतिपदा लेऊन आली गंध आंबेमोहराचा!
उत्सव आला स्नेहाचा,भाग्याचा अन्  प्रेमाचा!!
भिन्न संस्कृती रोवत असती, रंगीत रंगीत काठी !
हिंदु संस्कृती गुंफत असते मनामनांच्या गाठी!! 
भगवा ध्वज हा मांगल्याचा, डौलतसे अंबरी!
अध्यात्माची ठेव जपूनी, होऊ वारकरी!!
नका शोधू हो याच सणाचा ,भूगोल अन् इतिहास!
अनन्यभावे जोडीत राहू , मनमनांची आस!!
मनःपूर्वक शुभेच्छा! दीपार्यातोष.

नवे घरकुल


आधी रचिला पाया आता चढेल  कळस!
घरकुलाच्या पूर्णत्वाची लागली आहे आस!
मातीच्या गंधाने भरले अंगण आणि परस!
ममत्वाचे हात माझे फिरतील त्यावर खास!!
सोनकेशरी उन्हात हसतील वास्तूच्या या भिंती!
खिडक्यांमधूनी वाकून बघतील हिरवी पिवळी पाती!
याच ठिकाणी सजेल आता वात्सल्याचा हिंदोळा!
निसर्ग आणि मानवाच्या ममत्वाचा जिव्हाळा!!!
हेच  मागणे आता तुजला कर्त्याधर्त्या परमेशा!
घरकुलाच्या परिसस्पर्शे उजळो जीवन —आकांक्षा!!!
आर्या

त्याच्यासाठी मनमोर...

कधी कधी भेटतात माणसं आयुष्यात, स्वतःच्याच बेहोशीत जगणारी!
त्यांना नसते तमा दुसर्‍याच्या मनाची.... असं समजतो आपण!
पण चुकुन कधीतरी अनुभवाला येतो अशांच्या मनाचा हळवा कोपरा...
थक्क होतो आपण आपल्याच नकळत अनुभवून असं काही!
मनातलं नकळत दिसतं जेव्हा डोळ्यात,खोल गहिर्‍या डोहात..
त्या डोहातल्या काळ्याकुट्ट भासणार्‍या जळात हळूच टपकतं एक फूल...फांदीवरुन
आणि होऊन जातो तो गंभीर डोह तरल,गंधीत आणि सांगून जातो मनीचं कूज!
कदाचित कृष्णाच्या पाव्याचाही असाच असेल का गहिरा रंग??? जो छेडत असेल सुमधूर तान गंधीत स्पर्शाने नटलेली??

'वन'वास

एक जंगल असंही आहे!
जिथे माणूस राहतो आहे!!
पशु — पक्ष्यांची जागा होती!
माणसाची त्यावर जडली प्रीती!!
तो माणूस वेडा झाला!
जंगलात घर बांधू लागला!!
माणूस तिथे वावरू लागला!
जंगलालाही आनंद झाला!
झाडे,पक्षी,गवत डुले!
चिमण्या हाती  रानफुले!!
माणसाची एक बायको वेडी!
तिच्या मनात शंभर खोडी!!
दोघे झाडांशी बोलतात काय!
मातीला तर दोघांची सय!!
अशी सगळी मज्जा झाली!
माणूस— जंगल मैत्री झाली!!
वसुंधरा खुदकन् हसली!
माणसाला हळूच सांगू लागली!
इथे मला सांभाळ छान!
मीही तुला देईन दान!
निसर्गाला करू सोज्वळ!!
तुझी माझी एकच ओंजळ!
घडतील पिढ्या फुलेल सृष्टी!
नाते जडेल व्यष्टी समष्टी!!
आर्या.


सौंदर्यखणी

 काळ्याभोर कुंतलाला मोगर्‍याचा सुवास!
लावण्यखणीला शुभ्र पैठणीचा साज!!
कपाळीची चंद्रकोर खुलवीत आली डौल!
दंडावरच्या वाकीला घुंगुरांचे डूल!!
कोमल नाजूक  कानात झुब्याचे घोस!
गळ्यातल्या सरीला मिरवण्याची हौस!!
पायात तुझ्या रुळल्या सोनेरी साखळ्या!
गालावर उमटल्या चंद्रनखी खळ्या!!
सौंदर्याची तुझ्या पडेल कुणा भूल!
सांभाळून टाक सखे मेंदी रेखिले पाऊल!!
आर्या.



श्रीमन् नारायण नारायण हरि हरि

ताम्हाण्याच्या पोतडीतून#
श्रीमन् नारायण नारायण हरि हरि।
तिन्ही सांजेची वेळ,नृसिंहाचा जन्म,कीर्तनकार बुवांच्या अभिव्यक्तीतून प्रत्यक्ष प्रकटलेला नृसिंहच जणू,फुलांची उधळण,कडकडला स्तंभ गडगडले गगनची आर्त साद,.... क्या गुजरी है शाम!
राजापूर जवळच्या केळवली गावातल्या नृसिंह मंदिरात आज आलो.जोश्यांचं कुलदैवत आहे हे.त्यामुळे स्वाभाविकच प्रभुदेसाई आप्तमंडळींसह आलो.बुवांचं ताल सूर लय युक्त कीर्तन,शंकरा रागातलं पूर्वरंगाचं भजन लांबपर्यंत ऐकू येत होतं.समस्त सप्रे कुटुंबांच्या गृहलक्ष्मी आणि कन्या नऊवार ते पाचवार पैठणी,मोत्याचे वेल,नथ अशा सजल्या होत्या. त्यांच्या केसात माळलेल्या अबोली आणि मोगर्‍याचा दरवळ पसरला होता.गाभार्‍यात उग्ररूप धारण केलेली लक्ष्मीसहित नृसिंहमूर्ती तुळशीच्या हाराने सजली होती.नृसिंहाच्या चरणी मोद करीत कमळ वहा अशी खुमासदार टिपण्णी करीत कीर्तन सुरु होतं.फार कमी वेळा अशी संवादिनी,तबला आणि गायकाची जाणयुक्त जुगलबंदी कीर्तनात अनुभवायला मिळते.ती पर्वणी आज लाभली.वसंतपूजेने ब्रह्मवृंदाचं आदरातिथ्य झालं.कोकणातला उत्सव म्हणजे ढोल ताशा हवाच.तीही धून रंगली.रात्रीच्या पालखीने तर शरीर मन डोलू लागलं.माझ्यासारख्या उत्सवप्रिय व्यक्तीला जगायला असे संदर्भ पुरेसे असतात.लळीताच्या कीर्तनाला पहाटे येऊ या रे! अशी माझी मागणी आमचे नवोदित शेतकरी पुरवतात का ते पाहते आता!!
पण खरच! काय हवं असतं आणखी आयुष्यात! उत्सवात भक्तिरसाने भरलेल्या वातावरणात,हिरव्या निसर्गात स्वतःला विसर्जित करणं यापेक्षा अपार सुख काही असेल का???? आर्या.

my clicks








नव्या वळणावर...

शाश्वताच्या गूढगर्भी नीलमेघी पुंजका
प्राण आले ओठंगुनी कासावीस हुंदका!
मनतळाच्या कोठडीतून हुंकार ये आक्रंदुनी
अंतरीच्या वादळाचा थांग ना लगे जनी!!
सांजवेळी कातरे मन भाबडे वेडेपिसे!
सोमदर्शी कवडसा झावळीतून येतसे!!
कोण कुठला जन्म माझा,जायचे कोठे असे?
गर्द झाडीतूनी वारा दाह शांत करीतसे!!
सावल्या या नाचताती लहर वायूची असे!
मन्मनीच्या प्रश्नमाला थांबवू रे कायसे!!
गुंफुनी हातात हाती चाललो रे सहचरा!
भविष्याच्या गूढगर्भी दडले काय योगेश्वरा??
आर्या.

चाफा फुललेला...

उमललेल्या चाफ्याने गंध झुळकीतून दिली हाक,ओळखीची!!
माझ्या डोळ्यातून पाझरणार्‍या अनंत अश्रूंचा होता साक्षीदार तो!!
वार्‍यावरून येणार्‍या गंधाळलेल्या झुळकीतून स्पर्शून म्हणाला मला !
तुझी माझी आठवण न पुसता येणारी
तुझं आर्त माझ्या पाकळी पाकळीत सामावतो आहे मी!!
तू वेचलीस इथली फुलं देवासाठी कोनाड्यातल्या!
भरलस भरभरून माझं अस्तित्व तुझ्या ओंजळीत!
ती भिरकावलीस कधीतरी स्वप्नांच्या गावात!
कधी सजवली मी तुझी तिपेडी लांबसडक वेणी!!
हे सगळं बंद करतो आहे मी माझ्या गंधाळलेल्या कुपीत!
पुन्हा पुन्हा उमलीन असाच आसुसून तेव्हा आठवीन तुला!
जगरहाटी चुकली आहे का कधी कुणाला???
तू लांब होतीस पण आता आहेस माझ्या तुलनेने जवळ!
तुझ्या आठवणी,तुझे अश्रू आणि तुझ्या भावनांच्या कप्प्यात मी ही दडलो आहेच की!!आर्या.

चाहूल... माझ्या पावसाची

खरं तर तू येणार होतासच!
ढगांनी रंगमंचही सजवला होता,
पण तू थांबला होतास वार्‍याच्या इशार्‍यासाठी!
तो तुझा सांगाती,तुझ्यासारखाच!
पाहत होतात तुम्ही आसुसलेल्या तिला,योजनगंधा होण्यासाठी!
पण  तुम्हीही निसर्गाच्याच आधीन नं!
शेवटी पडघम वाजले,म्हातारीने दळण सुरु केलं आणि तू आलास अखेरीस!
पण काय हे बरसणं! हसून सामोरं येण्याऐवजी वीजकल्लोळ घेऊनच कोसळणं!!
तीही खुलली,उमलली,योजनगंधा झाली!!
मनामनांना पालवत, सुखावत थेंबाथेंबाने मोहरली!!
पण काय हे विभ्रम तुमचेही!
तू, तुझा वारा आणि तुझी धरित्री!
तुमचे संकेत तुम्हीच जाणणारे
आम्ही मर्त्य मानव इथे पाहत असतो वाट तुमच्या या नाट्याची!
कारण माहिती असतं आम्हालाही की हे केवळ नाट्य नाही तर ती आहे अनुभूती शाश्वत निर्मितीची,अंकुरणार्‍या कोंबांची आणि सृजनाच्या सोहळ्यात स्वतःलाही विसरायला लावणारी अत्तराच्या कुपीची!!

आर्या.

कृतज्ञता....

काही माणसं अशीही असतात.... एक कृतज्ञता#
काही माणसं अशी असतात की ज्यांना आपल्या आयुष्यातलं वास्तव माहिती असतं.मग त्याचं स्वरूप काहीही असेल. अशी माणसं आपल्याशी आपला आधार बनूनही असतात आणि काहीवेळा लांब राहून किंवा मूक  राहून आपल्याला ताळ्यावरही अणतात.
आपल्या वास्तवाचे ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षही साक्षीदार असतात. सरळपणे ते वास्तव जगायला कदाचित ते आपल्याला नाही मदत करू शकत पण तरीही अशी माणसं आपल्या नकळत आपल्याला सांभाळतात,गेलेला तोल सावरतात, पुन्हा उचलून उभंही करतात.हळव्या कासावीस क्षणांचेही ते साक्षीदार असतात तर कधी जहाल पिळवटून टाकणार्‍या आक्रंदाचेही.
ही माणसं नक्की कशाची बनलेली असतात? असा प्रश्न मनात येतच राहतो!!!

अशांप्रती ही कृतज्ञता.अशी माणसं कोण असतात हे आपापल्या ठिकाणी आपल्याला माहिती असतच.
.पण तरी जगातल्या अशा सर्वच माणसांना सलाम! तुम्ही आहात म्हणून अनेक नाती सावरली आहेत,अर्थपूर्ण झाली आहेत,जगण्याच्या आनंदात स्वतःला न्याय देत इतरांनाही समृद्ध करत आहेत.

आठवण... शाळेची

प्रेमामृत हे सेवूनी गेलो,तृप्त जाहलो मनी!
लीला अमुच्या बालपणाच्या आठविती क्षणोक्षणी!
विठ्ठलकृपे पावन झालो संस्कारित ही झालो!
दास आम्ही या वास्तूच्या, परत फिरूनी आलो!!
कन्या आम्ही ज्ञानमंदिरी वसा घेऊनी जमलो!
शाळा नसे हे तर आमुचे माहेर समजुनी आलो!
आमुच्या बाई आता अमुच्या मैत्रिणीच हो असती!
मनामनातून जोडू आता  हृदयस्पर्शी नाती!
स्नेहबंधी या अमुच्या असूदे आशीष तुझचे परमेशा!
वात्सल्याच्या विद्यामंदिरी फुलूू दे जीवन आकांक्षा!!
अदिती ओगले-डाॅ.आर्या जोशी

अधिक अधिक अधिक


पुरुषोत्तमाच्या नावाने प्रसिद्ध पावलेला महिना.जावई मंडळींचा खास आग्रहाचा. मधे एक विनोद आला होता की घरात तोफखाना सांमाळण्याची किंमत जावयाला दर तीन वर्षांनी एकदा मिळते म्हणे! विनोदाचा भाग सोडला तर बाहेरून आलेली मुलगी तोफखाना आणि यांच्या घरातल्या  महिला काय थंडगार वाहणार्‍या नद्या!!!
मुळातच चांद्र आणि सौर कालगणनेमध्ये तेहतीस दिवसांचं पडलेलं अंतर भरून काढणारी ही शास्रीय योजना आहे.त्याचा आणि जावयाच्या वाणाचा काय संबंध?
आपले धर्मशास्रकार विचारी होते.पूर्वी लहान वयात मुलींची लग्न होत असत. अशावेळी त्यांच्या घरातल्या मंडळींनी विशेषतः मोठ्या वयाच्या नवर्‍याने त्यांना समजून घ्यावे यासाठी ही एक विनंतीच असावी.जिला नंतर वाणाचे महत्व दिले गेले.
सच्छिद्र म्हणजे फुटक्या कानाचे असू नका.कानगोष्टींवर विश्वास न ठेवता जे समोर अनुभवाला येते ते पहा असाही संदेश असावा.पूर्वी ज्या गोष्टी उदा.अनारश्याचे पीठ तयार मिळत नसे.त्यामुळे घरी असे पदार्थ होणे आणि ते दानात देणे ही अपूर्वाई वाटत असावी.
अलीकडे जागतिक बाजारपेठेच्या सुबत्तेत आणि चकचकाटी दुनियेत अर्थाला भरपूरच मान आहे.विकत घेणारे आहेत म्हणून विकणारेही असणारच नं.
पण याचा सारासार विचार आधुनिक शिक्षित पिढीने करायला हवा.जावयांनीच म्हणायला हवं की हे मला देण्याऐवजी गरजूला द्या.मला तुमचे आशीर्वादच पुरेसे आहेत.
दानाचे,तीर्थयात्रांचे महत्व सांगताना या काळात केलेले वाढते ,अधिक फळ मिळते. मग अभ्यास करा तोही वाढेल.चांगला उपक्रम करा त्याचंही पुण्य मिळेल.
या "अधिकाकडे" जितक्या " अधिक"  सकारात्मकतेने पाहू तितकं फल नक्कीच " अधिक" मिळेल.

आर्या.

माझं गोकुळ भरलं आहे...

सजावट सौजन्य:स्वाती कडू

Wednesday, 30 May 2018

गिलावा ... चार ओळी

लिंपियल्या भिंती, बुजविले तडे
मातीमऊ स्पर्शात आनंद सापडे !
मातीलाही किती मातीचीच भूक
माती पिऊनच तिला लाभले हो सुख !!
आर्या 

रात्र काजव्यांची ....

सजली आहेत झाडं माझ्या अंगणातली
लखलखत्या हिऱ्यांची पखरण लेवून!
ग्रीष्माच्या परतण्याची चाहूल घेऊन!!

पाहते आहे मी चांदणचु-याने  माखलेले आकाश
माझ्या आणि त्याच्या अस्तित्वाचाच प्रकाश !!

तेजाळली आहेत हिरवीगार झाडं
भिजणार आहेत आताच ती झिम्माड  झिम्माड !!

छोटे छोटे देवदूत भेटले आज अवचित!
माझ्या आणि  त्यांच्या अस्तित्वाचे चमचमणारे संचित !!

आर्या 

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...