Wednesday, 26 August 2020

आली गौराई अंगणी

 आजचा दिवस खासच असतो. " ही"""जी तीन दिवसासाठी आली आहे ती सुरेख दिसते की जिच्या घरी आली आहे '""ती"""गृहलक्ष्मी अधिक साजिरी दिसते हे ठरवणंच महाकठीण असतं.

देवीचं एक रूप तिच्याच दुसर्‍या रूपाचं स्वागत करतं.तिच्या आतिथ्यात काही उणीव राहू नये म्हणून झटणारी "तीच" असते. खरंतर हे अद्वैतच आहे.ईश्वर आणि भक्तामधलं... पण काहीवेळा हे तत्वज्ञान बाजूला ठेवावंसं वाटतं आणि द्वैतभावाने गौरीपूजनाकडे पहावंसं वाटतं.

"हिच्या"येण्यासाठी  "तिची" लगबग

"हिच्या" स्वागतासाठी " तिचा"उत्साह

सजतात दोघीही... एक भक्तिभावात न्हाऊन निघते. कुणी कणखर ताठ मानेने उभी राहते तर कुणी विनम्रतेने शालीनतेत सजते. दोघीही गौरीच... पण तिचीच दोन्ही रूपं...

समाजात वावरताना कधी कणखर बाणा दाखवून विकृतीला इंगा दाखवावा लागतोच तर कधी मातृरूपात गृहस्वामिनीच्या रूपात तिची अदबही दिसतेच. कधी कसं वागावं याचेही संकेत असताततेही " ही" "तिला" नकळत शिकवून जातेच!!!

उदंड धन,उदंड धान्य, उदंड दुधदुभतं सोबत घेऊन "ही" येते आणि " तिला"आत्मतृप्ता करून जाते.

मला कायमच एक स्री म्हणून कुठल्याही स्री चं "आत्मतृप्ता" हे रूप अधिक भावतं.

जग पादाक्रांत करताना किंवा आकाशाला गवसणी घालताना अशीच रहा.... "हीचं" "तिला" सांगणं.

"ही"येते अनुराधेवर. जेवते ज्येष्ठेवर आणि भरल्या डोळ्यांनी परतते मूळ नक्षत्रावर...निघताना "" तिला""" आश्वस्त करून जाते...निश्चिंत रहा. सर्व सामर्थ्य तुझ्याठायी आहे." तू " आणि "मी" एकच आहोत.

द्वैतात पूजा स्विकारली... आता पुनश्च अद्वैतात प्रवेश.." ही आणि ती आता एकाचईश्वरीय तत्वात विरघळून जातात....पुढच्या व्रतापर्यंतचं अद्वैतात.... जगण्यासाठी... जगवण्यासाठी....

आर्या

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...