Monday, 23 November 2020

व्रते आणि दाने

 व्रते आणि दाने# माझा विचार माझी कृती


एक अभ्यासक म्हणून आपण समृद्ध होत जातो तसं तो विचार आपल्या दैनंदिन जीवनातही उतरायला लागतो. काही वेळा त्याला विरोध होतोही पण जर आपल्या कृतीमागच्या विचाराची स्पष्टता आपल्याला असेल तर आपण निश्चयाने आपल्या गोष्टी करू शकतो.

माझ्या लग्नानंतरची पाच वर्ष मी शिवामूठ वाहिली. पण घरच्या देवाला शास्र म्हणून दोन दाणे धान्य वाहून उरलेले धान्य मी कुणातरी गरजूला द्यायचे ठरविले.

 त्यावेळी ज्ञानप्रबोधिनीची नवीन वास्तू जिथे आज उभी आहे तिथे परांडे वाडा होता आणि प्रबोधिनीचा वाहनतळही तिथे होता. वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक दादा तिथे असत.मी धीर करून त्यांना विचारलं की मी शिवामूठ वाहण्याऐवजी प्रत्येक श्रावणी सोमवारी जे धान्य असेल ते तुम्हाला दिलं तर घ्याल का?ते मला ओळखत असल्याने हो म्हणाले आणि नंतर पाचही वर्ष मी देवापुढे घरी ते धान्य ठेऊन त्यातले अक्षरशःदोन दाणे पिंडीवर वाहत असे आणि वाहनतळावर गाडी लावली की एक किलो धान्य दादांना देऊन त्यांना नमस्कार करत असे. वाया जाण्यापेक्षा मुखी पडलेले कधीही उत्तम!

आजही आधुनिक पिढीतल्या मुली संपर्क करतात. याबद्दल विचारणा करतात तेव्हा मी त्यांना हेच सांगते की चातुर्मासातील कहाण्यांकडे सामाजिक दृष्टीकोनातून पहा. गृहस्थाश्रम हा समाजाचा आधार आहे हे या कथांमधून वारंवार दिसून येते. त्यामुळे समाजातील गरजू ओळखा आणि त्यांना सहाय्य करा.

असे वेगवेगळे उपक्रम समाजात सुरू आहेत. दानं संविभागः । याचाच अर्थ मी जे कष्टाने कमवते आहेत्यातील काही भाग हा मीज्या समाजाचा घटक आहे त्या समाजाचाही आहे. यातून समाजाचे  आपल्यावरील ऋण फेडण्याची संधी अवश्य घ्यावी.

यावर्षी तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना अन्नधान्याची, सुविधांची गरज आहेच. ती पूर्ण करण्याची संधी या श्रावणात अवश्य घेऊया.

आपण अशा नव्या कालसंगत कथा लिहूया, समाजाला उपयोगी पडतील अशी कामे करूया... खुलभर दुधाची कहाणी ही हेच सांगते हे वारंवार मनात ठसवूया आणि श्रावणाचे इंद्रधनुष्य सामाजिक जाणिवा विस्तारत आपल्याच मनाच्या क्षितीजावर उमटवूया!!!

मा. यशवंतराव शुभेच्छा

 मा.यशवंतराव#नव्वद वर्षे पूर्ण# माझ्या काव्यमय शुभेच्छा


ठरवायचे असो कामाचे धोरण

वा लावायचे असो उत्सवी तोरण

संत्रिकेत तुमचा वावर असावा

आशीर्वाद नेहमी पाठिशी रहावा।

असो मनातली घालमेल

वा जुळवावा कामाचा ताळमेळ

तुमचा सल्ला कायम मिळावा

आशीर्वाद नेहमी पाठिशी रहावा।

संशोधनाचे आयाम

वा कामातला क्षणभर विराम

तुमच्याशी  सहज संवाद घडावा

आशीर्वाद नेहमी पाठिशी रहावा।

जुळलेले असोत तानपुरे

वा मात्रेचे शब्द पडोत अपुरे

समेवर आणायला तुमचा हात मिळावा

आशीर्वाद नेहमी पाठिशी रहावा।

कधी समाजाची काळजी

कधी नेता मारतो बाजी

तुमच्याशी बोलायला कुठलाच विषय वर्ज्य नसावा

आशीर्वाद नेहमी पाठिशी रहावा।

मुंगीएवढ्या अक्षरात पर्वताएवढे ज्ञान

कुठल्याही कामात उत्तमतेचेच ध्यान

जन्मदिनी तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव व्हावा

आशीर्वाद नेहमी पाठिशी रहावा।

आर्या.

आत्मतृप्ता

 आजचा दिवस खासच असतो. " ही"""जी तीन दिवसासाठी आली आहे ती सुरेख दिसते की जिच्या घरी आली आहे '""ती"""गृहलक्ष्मी अधिक साजिरी दिसते हे ठरवणंच महाकठीण असतं.

देवीचं एक रूप तिच्याच दुसर्‍या रूपाचं स्वागत करतं.तिच्या आतिथ्यात काही उणीव राहू नये म्हणून झटणारी "तीच" असते. खरंतर हे अद्वैतच आहे.ईश्वर आणि भक्तामधलं... पण काहीवेळा हे तत्वज्ञान बाजूला ठेवावंसं वाटतं आणि द्वैतभावाने गौरीपूजनाकडे पहावंसं वाटतं.

"हिच्या"येण्यासाठी  "तिची" लगबग

"हिच्या" स्वागतासाठी " तिचा"उत्साह

सजतात दोघीही... एक भक्तिभावात न्हाऊन निघते. कुणी कणखर ताठ मानेने उभी राहते तर कुणी विनम्रतेने शालीनतेत सजते. दोघीही गौरीच... पण तिचीच दोन्ही रूपं...

समाजात वावरताना कधी कणखर बाणा दाखवून विकृतीला इंगा दाखवावा लागतोच तर कधी मातृरूपात गृहस्वामिनीच्या रूपात तिची अदबही दिसतेच. कधी कसं वागावं याचेही संकेत असताततेही " ही" "तिला" नकळत शिकवून जातेच!!!

उदंड धन,उदंड धान्य, उदंड दुधदुभतं सोबत घेऊन "ही" येते आणि " तिला"आत्मतृप्ता करून जाते.

मला कायमच एक स्री म्हणून कुठल्याही स्री चं "आत्मतृप्ता" हे रूप अधिक भावतं.

जग पादाक्रांत करताना किंवा आकाशाला गवसणी घालताना अशीच रहा.... "हीचं" "तिला" सांगणं.

"ही"येते अनुराधेवर. जेवते ज्येष्ठेवर आणि भरल्या डोळ्यांनी परतते मूळ नक्षत्रावर...निघताना "" तिला""" आश्वस्त करून जाते...निश्चिंत रहा. सर्व सामर्थ्य तुझ्याठायी आहे." तू " आणि "मी" एकच आहोत.

द्वैतात पूजा स्विकारली... आता पुनश्च अद्वैतात प्रवेश.." ही आणि ती आता एकाचईश्वरीय तत्वात विरघळून जातात....पुढच्या व्रतापर्यंतचं अद्वैतात.... जगण्यासाठी... जगवण्यासाठी....

आर्या.

कोकणातला गणेशोत्सव

 कोकणातला गणेशोत्सव#

मुळातच सभोवतालच्या हिरवाईने मन प्रसन्न झालेलं असतं आणि त्यातच गणरायाचे वेध लागतात.

भातलावणी झालेली असते, नाचण पेरून होते, कुठे वरईही पेरतात आणि आता गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहही दाटायला लागतो.

हिरव्यागार भातशेतीतून छोटी रोपं वाकुल्या दाखवायला लागतात आणि त्याच शेताच्या बांधावरुन वा मधल्या पाऊलवाटेवरून गणराया पाटावर विराजमान होऊन भक्ताच्या डोक्यावर बसून घरी यायला निघतो. ढोल ताशाच्या आवाजावरूनच समजतं की अमक्या वाडीतल्या तमक्या घरात बाप्पा येतोय किंवा वाडीतले तीन चार गणपती एकत्रच आणले जात आहेत.

घराघरातली गडबड, एकवीस मोदकांचा नैवेद्य, लायटिंग करण्यासाठी, सजावट करण्यासाठी एकमेकांना मदत करणे, वाडीवाडीत घरोघरी संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत (किमान)होणारी आरती, भजने यांचा आवाज दूरवर ऐकू येतो. कोरोनाच्या काळातही दरवर्षीइतका नसला तरीही काही प्रमाणात हा आनंद अनुभवता आला.

साग्रसंगीत नैवेद्याचं वाढलेलं पान पाहून केवळ देवच नाही तर भक्तही खुश होतो. दारच्या केळीच्या पानावर मांडलेले,हळदीच्या पानावर वाफवलेले सुबक शुभ्र मोदक पाहूनच आणि वासानेच तबियत खुश हो जाती है! 

सभोवताली उमललेले तेरड्याचे रोप गौरीचे एक रूप म्हणून घरोघरी येते. महिला उत्साहाने कामाला लागलेल्या असतात. तीन चार जावा मिळून गौरीसाठी अगदी सामिष नैवेद्यही अवघ्या दोन तासात करून गौरीसह घरच्या गणोबांनाही तृप्तीची ढेकर द्यायला लावतात.

विसर्जनाच्या दिवशी  पुन्हा ढोल ताशा.... शेजारीपाजारी जाऊन एकमेकांच्या बाप्पांचं विसर्जन, त्याआधीची आरती, देवाला शिदोरी देणं...  त्यातून ज्या गावालगत समुद्र असेल तिथे तर  विसर्जनासाठी समुद्राच्या दांड्यावर उडालेली रंगीबेरंगी झुंबडही मन मोहून टाकते. तर ज्यांच्या घरात विहीर असते ते एखादे दादा किंवा काका स्वतःच्या विहीरीत उतरून गणपती विसर्जन करतात ते पाहण्याची मज्जा औरच!

सात दिवसाची ही लगबग आज शांत होते, तरीही कानात आरतीचे शब्द घुमत राहतात, प्रसन्न बाप्पा  अजूनही

नजरेसमोर दिसत राहतो, बाप्पाचा कोनाडा रिता होतो , गौरींची आरास उदास वाटू लागते...पण मन मात्र पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात कधीच पोहोचलेलं असतं.... 

मी हे सगळं या सात दिवसात तुकड्या तुकड्याने वेगवेगळ्या ठिकाणी कोकणातच अनुभवलय... एक छान चित्र जोडलं गेलं आहे त्यातून... 

कधीतरी हे अनुभवायला एकदातरी कोकणात यायलाच हवं बरं का!!!

मी स्री आहे म्हणून....

 #सहसा बोललं न जाणारं पण दरवेळी मनात नक्कीच येणारं...

आज हे चित्र पाहिलं. प्रत्येक स्रीच्या मनात जे येऊन गेलं ते माझ्याही आलंच.

मला Kamakshi Joglekar Barveने गप्पा मारताना विचारलं की अभ्यास आणि कुटुंब याची सांगड तू कशी घालतेस? याचं उत्तर माझ्या दृष्टीने होतं की माझ्या माहेरी मला शिकवलय की आपलं कुटुब प्राधान्यात असावं. पण त्यामागे हा विचारही मनात येत होतं की माझा अभ्यास हाही कधीतरी माझ्या कुटुंबाच्या प्राधान्यात असला तरी चालेल ना?

मी हे फक्त माझ्या कुटुंबाबद्दल नोंदवत नसून ते सार्वत्रिक आहे. नोकरी करून दमून पुन्हा घरी येऊन ओट्यापाशी उभं राहणारी, उत्सवी काळात छान नटूनथटून आणि तरीही नैवेद्याचे उत्तम पदार्थ करून देवाला नव्हे तर कुटुंबातल्या ज्येष्ठ महिलांना खुश करणारी स्री अधिक कौतुक मिळवून जाते. आणि हे सगळं करूनही अभ्यास करणारी सून मात्र कौतुकास पात्र ठरली तरी तिची गुणवत्ता ही असंख्य वेळेला स्वयंपाकघरातील गुणवत्तेवरच ठरवली जाते.

स्री आहे म्हणून नटायला हव, स्री आहे म्हणून घरी सगळं करायला हवं, आई आहे म्हणून मूल मोठं झाल्यावरही तिचं केंद्र कायमच तिचं मूलच असायला हवं?!!

हे जिथे तिथे दिसतंच... कोणत्याही पिढीत हे आहेच. हे पुरुषसत्ताक पद्धतीमुळे नाही तर स्रियांच्या शतकानुशतकं न बदललेल्या मानसिकतेमुळे असावं.

परवाच घरात उंच माझा झोकाचे जुने भाग पहाणं सुरू होतं त्यात मी ऐकलं की त्यात त्या ताईसासूबाई रमाला म्हणतात की इंग्रजी शिकून संसार होणार आहे का?त्यावर ती म्हणते की मी माझी कामे करून आले होते.पण त्याने काही ताईसासूबाईंचं समाधान झालं नाही.आणि रमाबाई रडू लागल्या. हे तेव्हा होतं तसंच आत्ताही आहेच.काळ बदलला पण मानसिकता नाही बदललेली!

याची जबाबदारी कुणाची? कोशात "समाधान" शब्द सर्वांच्यायच असायला हवं.कुटुंब, घर ही अशी जबाबदारी आहे की ती न संपणारी आहे. मग भरारी घ्यायला उत्सुक घरातल्या स्रीचे पंख पसरायला मदत करायची आणि कधीतरी संधी मिळाली की ती सगळं सोडून कशी निघून जाते हे इतरांना सांगायचं... हे असं खूप खूप ऐकायला पहायला अनुभवायला मिळतं.

तिलाही तिच्या मर्यादा आहेत, तिलाही तिचे छंद आहेत... अखंड ती फक्त चूल आणि मूलच करत राहिली तर अशी भरारी तिला कधीच घेता येणार नाही.

उकडलेल्या बटाट्याच्या फोडी मध्यम होतात की बारीक होतात यावर जर तिचं सर्वांगीण कौशल्य ठरत असेल तर अजूनही काळ बदललेला नाही हेच अधोरेखित होतं...यावर सर्वच महिलांनी विचार करून तसं वागण्याची गरज आहे....

 अवतीभवती उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी वावरलं की आपलं मर्यादित जग लक्षात येतं.खरंतर फेसबुक हे माध्यम वापरतानाच मला विविध गटांवर हे पहायला नव्हे अनुभवायला मिळालं की या माध्यमावर विविध प्रकारची लोकं भेटतात.. ओळखीची तर असतातच पण अनोळखीही तितकीच भेटतात. अनेक प्रकारचे छंद, कला, आवडी ही माणसं जपत असतात, आपल्या क्षमतेनुसार आपापल्या ठिकाणी प्रयत्न करत असतात.मग ती एखादी पाककृती असो, रांगोळी असो वा लहान लेकराने काढलेलं चित्र असो. पण याचं कौतुक करण्यासाठी मनही तितकंच मोठं असावं लागतं. आणि त्याआधी हे स्विकारण्याचीही क्षमता असावी लागते की या जगात मीच केवळ परिपूर्ण नाही. माझ्या विशिष्ट वर्तुळाच्या बाहेर जाऊन मला हे स्विकारतं येणं की माझ्यापेक्षाही कुणीतरी सरस आहे आणि त्याचं ते मोठेपण मान्य करण्याचा मनाचा मोठेपणाही माझ्याकडे असला पाहिजे. जगाच्या कानाकोपर्‍यात प्रत्येकच माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडतो. आपल्याला जे सर्वांसमोर मांडावंसं वाटतं ते मांडतोही...  

मधे कुठेतरी वाचनात आलं की एका व्यक्तीने आपल्याला लाईक देणारे कोण आहेत याचा आढावा सातत्याने घेतला आणि लक्षात आलं की बाहेरची माणसं मनमोकळं आणि निरपेक्ष कौतुक करतात पण नेहमीची अवतीभवती वावरणारी माणसं दखलही घेत नाहीत. हा मानसशास्रीय विचार आवडला आणि विचार करायला प्रवृत्तही करून गेला.

माझं वर्तुळ मला मोठं करता आलं आणि दुसर्‍यात जे माझ्यापेक्षा चांगलं आहे त्याचं मनापासून कौतुक करण्याची क्षमता माझ्यात आली तर आपलंही आयुष्य उजळेल. नुकताच मी फर्जंद चित्रपट पाहिला. (चित्रपट आणि त्याची कथा,  खरा खोटा इतिहास याबद्दल मी नोंदवत नाही आहे.)पण त्यात काहीतरी सापडून गेलं. त्यात तीन प्रकारची शस्र वापरणारी माणसं आपणच कसे श्रेष्ठ हे सांगत एकमेकांवर कुरघोडी करत होते. पन्हाळ्याच्या मोहिमेचे नेते कोंडाजी फर्जंद त्यांना जाणीव करून देतात की आपल्याला आपल्या क्षमता एकत्रितपणे स्वराज्यासाठी वापरायच्या आहेत.आणि चित्रपटात युद्धाच्या प्रसंगात ती पूरकता दिसलीही आहे. चित्रपटात आपण मनोरंजन म्हणून जे ऐकतो ते सोडून देतो पण हा विचार जरी चित्रपटातला असला तरी मला त्यातनं खूप काही विचारधन मिळालं...  थोडीशी प्रगल्भता आयुष्यात सर्वांनाच जगता आली तरी आयुष्याचं सोनं होईल...

आठवणी " आपट्यांच्या"

 खरंतर दोन योग जुळून आले आणि म्हणून हे लिहावसं वाटलं.माझ्या दोन्ही मुलाखतींमधे( Kamakshi Joglekar Barve Apoorva Varun Kulkarni) माझ्या मावशीकाकांचा उल्लेख आला आहे. ज्यांना ते माहिती नाहीत त्यांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं आणिशारदीय नवरात्र आणि आम्ही तिघे अशी एक अनेक वर्षांची संगीतमय आठवणही आहे.

माझी आई बहिणींच्यात धाकटी आणि जिच्याकडे मी होते ती माझी मावशी सगळ्यात मोठी.त्यामुळे मावशी आणि आई यांच्यात मायलेकीसारखंच नातं. माझ्या आईवर मनोहर काकांचा फार जीव. आईचं कन्यादान त्या दोघांनी केलं तर माझं कन्यादान मावशीने एकटीने.(काकांची त्यावेळी मला खूप उणीव जाणवलीच. पण आशुतोषच्या आणि त्यांच्या काही भेटी झाल्या होत्या पूर्वी ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे.त्या दोघांची सामाईक आवड क्रिकेट त्यांनी एकत्र पाहिली आहे.)

माझ्या बालपणापासूनच मावशीकाकांचा खूप सहवास मला लाभला.आम्ही हिंदू काॅलनीत आणि ते वडाळ्याला. त्यामुळे सतत जाणं येणं असे. इंदू मावशी जात्याच टापटीप आणि जरा अतीच नीटनेटकी. तर काका आनंदाने आयुष्य जगणारे! असं जोडपं मी पाहिलं नाही. अक्षरशः कुरुपता आणि सुरूपता हे परस्परविरोधी शब्द म्हणजे या दांपत्याचं बाह्य रूप. अर्थात या संकल्पना समाजातल्या संकुचितांच्या असतात! अंतःकरणापासूनच्या प्रेमाला "दिसणं" हे महत्वाचं नसून एकमेकांचं " असणं" अधिक महत्वाचं असतं हा धडा मी त्यांच्या सहवासातच गिरवला.सवाई गंधर्व महोत्सवासाठी हे दोघे मुंबईहून मावशीची शाळा आणि काकांचं कोर्ट(ते वकील होते)यातून आवर्जून सुट्टी घेऊन येत.

माझं तिच्याकडे येणं याचे बरेच कंगोरे होते पण त्यातल्या महत्वाचा म्हणजे अर्थातच माय मरो अन् मावशी उरो!

त्यांचं दोघांचं वय सत्तर आणि मी सोळा! म्हणजे मी नातीच्या वयाची खरं तर!  पण त्यांच्या सुखसुविधांनीयुक्त घरात मला कमतरता जाणवली नाही. वयाचं खूपच अंतर असल्याने मतभिन्नता, रागवारागवी व्हायचीच, पण ती अपरिहार्य होती. त्यापलीकडे जाऊन आनंदाचे क्षण खूपच होते आमचे तिघांचे.

अनेक वर्ष सातत्याने शास्रीय संगीताच्या जुन्या तबकड्या काकांकडे होत्या! दुर्मिळ खजिना! रात्री झोपण्यापूर्वी तिघंही ते बसून ऐकायचो आणि न बोलता खोलीत जाऊन झोपायचो. सकाळच्या काॅलेजला मला उठवताना काका हमखास माझ्या पावलांना गुदगुल्या करूनच उठवायचे! फाजील लाड करू नका तिचे... लहानपणापासून लाडावली आहेत तिला तुम्ही... मावशी कायम त्यांना रागवे. मला घरी यायला संध्याकाळी उशीर झाला तर सायकलवरून मी गल्लीच्या कोपर्‍यावर वळले की गॅलरीत झोपाळ्यापाशी फक्त एक ठिणगी दिसे... काका सिगरेट ओढत माझी वाट पहात असत!

मावशी म्हणजे संस्कृत, साहित्य, संंगीत आणि कुठल्याही विषयावर मनमुराद गप्पा मारणारी माझी मैत्रीण! अनेक वर्षांची मुलीची तिची सुप्त इच्छा माझ्यामुळे पूर्ण झाली. त्यांना मूल झालं नाही पण नियतीने माझं दान तिच्या पदरी असं सोपवलं! त्यामुळे मग माझे कपडे, दागिने अशी तिची हौशी खरेदी सुरू झाली! काकांनी तिला कधी अडवलं नाही!मी अठरा वर्षपूर्ण झाले त्यावेळी माझ्या वाढदिवसाला सुंदर कांजिवरम् त्यांनी मला भेट दिली आणि अदिती तू साडीत जास्त छान दिसतेस तेव्हा जमेल तेव्हा साडीच नेस हा सल्ला काकांचा! 

सहकारनगरला रहात असल्याने तिथल्या शारदीय नवरात्रात संगीत महोत्सव होई. आम्ही रात्र रात्र जागून ते कार्यक्रम पाहिलेत, ऐकलेत. पुण्यात कुठेही गाण्याचा, मैफलीचा कार्यक्रम असला की आम्ही जायचो. शंकर अभ्यंकरांची व्याख्यानमाला असो वा नवे नाटक, मी आणि मावशी तर हमखास जायचोच जायचो.

त्यांच्या सहवासात मी खूप गोष्टी शिकले. माझ्यामुळे खरंतर ते हाॅटेलात जायला लागले.त्या पिढीची ती आवड नाही पण माझ्या हट्टासाठी यायचेच. 

आजही ताम्हाण्याची आमची वास्तू आणि त्यासाठी मी आशुतोषला दिलेली साथ ही अनेकांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिह्न उमटवते. उत्तम पदाची नोकरी तू नवर्‍याला सोडू दिलीस? होय मी ते केलं कारण याच मावशी काकांच्या देवाच्या गोठण्याच्या घरात, आंबे काजूच्या सहवासात माझं तरूणपण गेलं आणि हा आनंद कशाहीपेक्षा मोठा हे मला तेव्हाच कळलं.झाडांवर प्रेम करणारा माणूस म्हणून मी काकांना जवळून पाहिलय. ते रोपांशी गप्पा मारायचे, त्यांना गाणी ऐकवायचे!

त्यामुळे माझ्या तरूणपणावर जशी आजी, आई, बाबा यांची छाप आहे तशीच माझ्या लग्नानंतरच्या आयुष्यावर मावशीकाकांचा ठसा उमटला आहे!!,

कल्पवृक्ष कन्येसाठी...

 कल्पवृक्ष कन्येसाठी#

आज माझ्या बाबांचा चोविसावा स्मरणदिन. स्मरणाची पंचवीस वर्षे असंही काही असू शकतं असा काही विचार नाही यामागे. मात्र अनेक वर्ष बाबांबद्दल सविस्तर लिहायची संधी आज घेते आहे.

शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य, वक्तृत्व, संगीत,संघटना,लेखन, लोकसंग्रह आणि बरंच काही....

तत्कालीन शिक्षणमंत्री कै.आ. अनंतराव नामजोशी यांचे स्वीय सचिव, युवाकाळात गिरगावची शाखा घेणारा कुशल दादा, वासुदेव बिल्डिंगच्या नाटकांसाठी नाटके लिहिणारा, कविता रचणारा, उत्तम अभिनय करणारा माझा बाबा....

बाबांच्या गिरगावातल्या शाळेत त्यावेळी बाबांचा फोटो लावला होता... शाळेला हमखास पारितोषिके मिळवून देणारा विद्यार्थी... जिथे कमी तिथे मी ही उक्ती सार्थ लागू पडणारी...आपले शारीरिक व्यंग कुठेही आड येऊ न देता हा प्रवास सुरूच राहिला. अपंगांसाठीचे काम असेल, त्यांची आयुष्य सावरणं असेल, पुण्यात प्रवचनाला येणार्‍या वयस्करांना धार्मिक सहलीला नेणं असेल किंवा माझ्या मैत्रिणींशी इतकंच नाही तर मित्रांशीदेखील मोकळेपणाने वागणं असेल....

बाबांची प्रवचनं, बाबांच्या स्वरचित आणि स्वतःचालीत लावलेल्या कविता... शृंगारापासून ते भक्तीपर्यंत आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत सबकुछ " दिलीप"!

माझ्या काकाला नेहमी वाटतं की दिलीपला आणखी आयुष्य लाभायला हवं होतं! मी जेव्हा प्रज्ञावंतता हा शब्द ऐकते त्याक्षणी माझ्यासमोर बाबाच येतात... एका व्यक्तीत दडलेले किती गुण असावेत.....

मुलगी आणि बाप यांचं एक विलक्षण नातं असतं! मी बाबांना अशा खूप टप्प्यांवर पाहिलं... त्यांच्या प्रवचनानंतर गुरुपौर्णिमेला त्यांच्या पायावर डोकं ठेवणारा साधकवर्ग त्यांना रूचत नसे. ते प्रति नमस्कार करीत.... ही शिकवण वारकरी संप्रदायाची... बाबांबरोबर जुने ग्रंथ शोधत मी आळंदी देहूच्या गल्ल्या पालथ्या घातल्या आहेत! आपल्या वडिलांना मिळणारा मान म्हणजे नेमकं काय हे कळण्याचं ते वय नव्हतं, पण ते आज समजतं आहे!लिहावं तर बाबांनीच! अक्षर म्हणजे मोत्याचा दाणाच जणू!

वारीची दिंडी पुण्यात येणं असो वा एखाद्या अपंग कुटुंबाला मदत असो, राजकीय वर्तुळातलं वावरणं असो वा कधीतरी स्वयंपाकघरात एखादा वेगळा पदार्थ करणं असो... 

ही यादी न संपणारी आहे... आज जे लोक मला आर्या जोशी म्हणून ओळखतात त्यांच्यासमोर मी मारे शूर असते पण बाबांची व्याख्यानं ऐकलेली जुनी खोडं जेव्हा दिलीपकाकांची लेक व्याख्यान देणार आहे म्हणून मला ऐकतात तेव्हाचं दडपण हे वेगळंच असतं!

त्यांचा वारसा नकळत मला मिळाला... तो टिकवण्याची क्षमता माझ्यात खचितच नाही. पण जमेल तसं करीत राहणं, स्वतःला घडवणं हाही त्यांचाच वसा!


तुमच्या खांद्यावरून जग पाहिलं

त्या जगाचा मी अंश होते

पण  एका हळव्या क्षणासाठी

तुमची लेक म्हणूनच " जगते"

अदिती!

तुळशीचं लग्न

 

एका रोपाचं आणि देवाचं लग्न? लहानपणी न उमजलेली गोष्ट. माझ्या दाक्षिणात्य मैत्रिणींच्या घरात खास करून तुळशीच्या लग्नाला बोलवत असत. छान परकर पोलकं वगैरे घालून, नटून आम्ही जात असू. नंतर मिळणारं छान जेवण आणि गोडधोड हे त्यामागचं खरं आकर्षण असे.

महाविद्यालयात असताना कृष्ण मंदिरांमधे तुळशीविवाह पाहण्याचा योग आला. त्रिपुरी पौर्णिमेला पाताळेश्वराला किंवा ओंकारेश्वराला जायची दांडगी हौस. मला त्यावेळी ते उजळणारे त्रिपुर, सभोवताली पणत्यांचा झगमगाट याचंच जास्त कुतूहल वाटे. लक्ष लक्ष तेजात उजळलेले भाविकांचे चेहरे निरखायला मला आवडे. त्यावेळी धर्मशास्र नावाचं गारूड मनावर अजून चढलेलं नव्हतं त्यामुळे मी उत्सवी आनंदातच रमलेली असे. नंतर मात्र हळूहळू वाचन वाढलं... मग आख्यायिका, तुलसी महात्म्य, शालिग्रामाचं महत्व, वैष्णव सप्रदाय असं काही वाचून मग माझी समज थोडी वाढत गेली. त्रिपुरी पौर्णिमेला पर्वतीवर आम्ही शाहू काॅलेजच्या मैदानातून मागून जात असू. पुढच्या पायर्‍यांवरची गर्दी त्यामुळे कधीच आड आली नाही. तिथल्या विष्णु मंदिरातही सोहळा सुरू असे आणि कार्तिकस्वामीही दर्शनासाठी रात्रभर जागते असत.नटूनथटून आलेल्या महिलांची लगबग पर्वती जागती ठेवत असे. लांबून कुठून फटाके उडताना दिसत... अवर्णनीय नेत्रसुखद अशी ती रात्र असे.

एकेवर्षी दिवाळीनंतर  आम्ही सहकुटुंब कोस्टल कर्नाटक फिरायला गेलो. अन अचानक कार्तिकातल्या त्या रात्री फुलून आल्या. दूरची ठिकाणे पाहून अगदी जंगलातल्या रस्त्याने बस येतानाही वाटेवरल्या छोट्या वाड्यांमधे दारातल्या वृंदावनात नववधू सजलेली असे. लग्न झालेलं असे किंवा काही ठिकाणी पूजा सुरू असे. केळीच्या खांबांना मधे छिद्र पाडून त्याच्या इडव्या पट्ट्यांवर पणत्या लावून दारोदारी लग्नघराची सजावट दिसे. पारंपरिक पोशाखातल्या कुटुंबांना पाहून मजा येई.

एकदा आम्ही त्रिपुरीच्या इदल्या रात्री जुन्नरास पावतें झालो. दुसर्‍या दिवशी पहाटे चावंड चढाई होती. एक बस मुंबईहून निघाली आणि आम्ही पुणेकर मित्रमंडळी जुन्नरला राहिलो. जून्नरला रात्री जेवणानंतर एका डेअरीमधे मलई भरपूर घातलेले गरम दूध पिताना समोर एक मोठ्ठा फलक दिसला. तुलसी दामोदर विवाहाचा. आपण लग्नपत्रिका छापतो नं अगदी तस्संच सगळं लिहिलेलं! मला ते पाहून अगदीच जाणवलं की जसा मी तसा माझा देव!

 एकवर्ष तुळशीचं लग्न नंतर मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी लावल तिन्हीसांजेला आणि रात्री नऊला लगेच लोणावळा लोकलने आम्ही सातआठ मैत्रिणी निघालो एका समूहासोबत... राजमाचीच्या पायी यात्रेला...त्रिपुरीचा तो चंद्र आणि आमची उत्तररात्रीची ती पायपीट... लोणावळा स्टेशनहून पुढे चालताना वाटेत एका मंदिरात तुळशीचं लग्न सुरू होतं. मंगलाष्टका ऐकू आल्या आणि नंतर अभंगांचे सूर खूप दूरपर्यंत रेंगाळत येत राहिले.

आजही तुळशीचं लग्न जवळ आलं की या आठवणी मन तृप्त करून जातात!

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...