Sunday, 21 October 2018

तांबडं फुटंलं....

आज जरा उगीचच वाटलं.आपल्या टीपीकल बायको  भूमिकेतून बाहेर येऊया. कुणाची तरी मैत्रीण ,कुणाची तरी बहीण अशा निरनिराळ्या भूमिकेतून पुरुषांकडे पाहूया.
हे पुरूष कोण आहेत? विविध समाजगटांचे प्रतिनिधी आहेत.
काही बुद्धीजीवी,काही कलासक्त,काही उद्योगात रमलेले तर काही अन्य कशात...
नवरा म्हणून,वडिल म्हणून,मुलगा म्हणून जगत असताना किती कसरत होत असणार यांची???
लग्न झालेल्या स्रीला बाहेर पडून काम करणं आणि घर सांभाळणं ही कसरत करावी लागते,मुलांचं संगोपन,कुळधर्म,आलेला पै पाहुणा हे सगळं सांधावं लागतं म्हणून तिची कुरकुर.
पण हे सगळंच एका वेगळ्या उंचीवरून पाहणार्‍या त्याला काय वाटत असेल???
अनेकदा मी आजूबाजूला असं अनुभवलं आहे की संसाराच्या रहाटगाडग्यात पुरुषालाही प्राधान्य ठरवावी लागतात. घरातल्या आर्थिक योजनांची आणि भविष्याची चिंता वाहताना त्यालाही आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात.
मनासारखा जोडीदार ही कल्पना त्यांच्या चष्म्यातूनही पहायला हवी नं! माझ्या नवर्‍याला नाही कळत मला काय म्हणायचय ते तसंच माझ्या बायकोलाही नाही कळत की माझी passion नक्की काय आहे ती!!! असं असणार नं!
आई आणि बायकोच्यात त्याची होणारी कात्री तर सर्वदूर प्रसिद्ध आहेच...
कधीतरी बदलावा म्हणते चष्मा... पाहूया का त्यांच्याकडेही जरा....
त्याची आवड कधीतरी माझी व्हावी,त्याला आवडतं म्हणून मी एखादा त्याचा हट्ट पुरवावा, मला न आवडणारा पण त्याला  सिनेमा मी ही पहावा... काय केलस तू आज दिवसभर हे बौद्धिक पातळीवरही समजून घ्यावं.... कधीतरी  म्हणावं नं की कळतय मला तुझ्या मनातलं.... उजाडायला वेळ लागेल कदाचित.... पण हळूहळू तांबडं फुटू लागलं आहे माझ्या मनात.... तुझ्या भावनांविषयी,आकांक्षाविषयी.
तुझ्याइतकं बळ माझ्या पंखात नसेलही... पण तू गगनभरारी घेताना तुझी पहिली झेप पाहण्यातही माझा मोठा आनंद दडला आहे... जग जिंकून कोटरात येशील तेव्हा असेन मी तिथे तुझ्यासाठी उभी... तू तुझ्या स्वप्नांना गवसणी घालून आलेला पहायला....

Thursday, 11 October 2018

उत्सव आदिमायेचा – जागर स्त्री शक्तीचा



वाच.आर्या जोशी

शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात  विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रात्री  ज्ञानाचा अखंड नंदादीप  तेवता ठेऊन ज्ञानरूपी घटातच ती साधना करते, शक्तीसंचय करते आणि झळाळत्या ज्ञानाने व मूर्तिमंत पौरुषाने निघते जग जिंकायला!
 कुंठित विचारांच्या सीमा आत्मविश्वासाने ओलांडत दिग्विजय साधते ही आदिमाया आदिशक्ती ! ज्ञानाचा समृद्ध ठेवा विश्वाच्या कल्याणासाठी वाटण्याची तिची इच्छा तिला सतत कार्यमग्न ठेवते.... आणि तेजाने रसरसलेल्या चंद्राला साक्षी ठेवत ती हाक घालते –“ कोण जागे आहे? जो ज्ञानपिपासू,  विजिगीषु  आहे त्याला माझी शक्ती मी संक्रमित करायला उत्सुक आहे. सुजलां सुफलां भूमी सृजनाने न्हावून निघालेली असताना नव्या वर्षाच आगमन औचित्यपूर्ण असच असे. देवीच्या नवरात्रीचा हा सोहळा  अतिशय सूचक असाच आहे. हे  केवळ नऊ रात्री करण्याच देवीच पूजन नाही ; तर विविध रूपे धारण करणार्या लक्ष्मीचे गुण आपल्यातही  यावेत यासाठी प्रयत्न करण्याचे हे दिवस आहेत.
मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे-  “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत  देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास  सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि  धनधान्याने परिपूर्ण होते. (८९.११.१२)
 देवीचे महात्म्य वर्णावे तेवढे  थोडेच ! या देवीने काय काय व्यापिले आहे ?
 या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता , नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: /
 नवरात्रीमधे आदिमायेचा उत्सव साजरा करताना  प्रत्येक स्त्रीने स्वत्वाचा जागर करण्याचाही संकल्प करावा. देवी जशी आईमध्ये वसत आहे तशीच ती निद्रा, बुध्दी,  तृष्णा , क्षुधा यामध्येही आहे.पोषण करणारी तहान –भूक, विचार करणारी बुध्दी, विश्रांती देणारी झोप, मन:स्वास्थ्य देणारी शांती ही प्रत्येक व्यक्तीची आवश्यक गरज ! या सर्वांमध्ये आदिमाया आहे तशीच ती आहे लज्जा, दया, क्षमा  या भावनांमध्येही !
प्रत्येक जीवाच्या इंद्रियांना व्यापणारी ही शक्ती नवरात्रीत भक्ताच्या पूजेचा स्वीकार करते.
दैनंदिन आयुष्य जगत असताना  प्रत्येक स्त्री- पुरुषाने या शक्तीचा आदर केला पाहिजे आणि आयुष्याला सकारात्मक वळण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.
बदलत्या गतिमान जीवनशैलीत आपल्या परंपरा जपताना त्यांना आधुनिक काळाच्या कसोटीवरही तपासून पाहिले पाहिजे. अन्याय, अत्याचार,भ्रष्ट व्यवस्था , अधर्म. अनाचार यांनी जेंव्हा  समाज सैरभैर  झाला त्यावेळी  या आदिमायेने  कालीरूप  धारण केले आणि दुष्टांचा पराभव केला.  शुंभ- निशुम्भासारख्या दैत्यांचा पराभव करताना रणांगणावर चौसष्ट योगिनींचे  सैन्य सामूहिकपणे  धावून आले आणि चामुंडारूपी देवीला त्यांनी सहाय्य केले. महिषासुर हा सहजतेने विविध रूपे धारण करून सुजानांना त्रास देणारा दैत्य. आधुनिक काळातही  असे मानवरूपी असुर स्त्रीजातीला त्रास देताना दिसतात. स्त्रियांनी एकत्रितपणे अशा दुष्टंचा संहार करून पुरुषार्थ गाजविला पाहिजे.
 देवीचे स्तवन करताना समर्थ रामदास म्हणतात-  नवरात्रीमधे निर्माणकर्ता ब्रह्मा, रक्षणकर्ता विष्णु , आणि प्रलयकर्ता  शिव मातृरूपातील देवीचे पूजन करतात प्रतिपदेला. द्वितीयेच्या दिवाशी उग्ररूप धारण केलेल्या  योगिनी शेंदूर भरून,  कस्तुरी  लेवून दुर्जनांचा पराभव करण्यासाठी धावून जातात. मातेच्या वात्सल्यात  आणि पराक्रम –पुरुषार्थात सामावलेली अष्ट्भुजा देवी तृतीयेला स्त्रीसुलभ  मनमोहक  रूप धारण करून सजतेही !  अलंकारांनी स्वत:ची शोभा  वाढविते. विश्वाला  व्यापणारी  जगन्माता , वर देणारी ललिता  ही सुद्धा  देवीची साजिरी रूपे ! षष्ठीला जोगवा मागताना ही देवी षडरिपूंचा  त्याग करून  लीन व्हायला शिकविते. सप्तमीला  भक्तांच्या हाकेला  धावून जाते. अष्टमीला आठ भुजांमधे प्रत्येकी  खड्ग, चक्र,गदा, धनुष्य-बाण , शूल, भृशुण्डी, मस्तक, व शङ्ख धारण करून  नारायणाच्या साहचर्याने  विशवाचे  कल्याण करते.
नऊ दिवसातील देवीचे  प्रत्येक  रूप स्त्रियाना प्रेरणा देणारे आहे.- त्यात मातृत्व, वात्सल्य , स्त्रीसुलभ शृंगार या जोडीने  पराक्रमाची , दुष्ट निर्दालनची  अभिव्यक्तीही आहेच.!
त्यामुळे एकीकडे देवीचे पूजन करतानाच दुसरीकडे स्वत:तील सत्वगुणाच्या शक्ती वाढविण्याचा संकल्प नवरात्रीच्या  निमित्ताने  व्हायला हवा.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

Monday, 8 October 2018

नवरात्रींचा उल्हास


झेंडूच्या गेंदांना ,दवाची साथ
आशीर्वाद देणारे ,आदिमायेचे हात!!
जागर आणि आनंद ,स्रीत्वाच्या शक्तीचा!
उत्साह पसरला, उत्सव दुर्गामातेचा!!
घटात बसली, माय भवानी उल्हासे
तपवूनी शरीरा ती ,दुरितांना हरवितसे!!
संबळाचा हुंकार!कवड्यांची माळ
भवानी देई, दुष्ट निर्दालना बळ!!
कन्येच्या पावली, कोमल निरागसता!
प्रसन्न होई शक्ती ,होऊनी ललिता!!
अष्टमीची रात्र ,गंभीर होतसे
उदाधुपांच्या घागरींनी, प्रांगण शोभतसे!!
  अंबा महिषासुरासी, क्रोधाग्नीने जाळितसे!
सवे गणेश सरस्वती, कार्तिकेय शोभतसे!!
टिपर्‍यांच्या नादे ,घुमतसे आकाश!
घटाच्या छिद्रांतूनी, पसरवून प्रकाश!!
शस्रांचे पूजन,ज्ञानदीप सांभाळूया!
विचारांच्या मर्यादांना, उल्लूंघूनी जाऊया!!
अपूर्व सोहळा! पल्लवीत शेतीभाती
अंबेच्या आशीर्वादे, उजळो शरीर मन मती!!
आर्या.

Saturday, 6 October 2018

गोवा प्रशिक्षण दिवस दुसरा


सकाळ समुद्राच्या गाजेने झाली.निवांत पहुडलेल्या होड्या,कोळ्यांची जाळी , वाळूवर पसरलेला निवांतपणा याने दिवसाची प्रसन्नता वाढवली.आमच्या प्रशिक्षणाचा दुसरा दिवस हा मुख्यतः सामाजिक प्रश्नांवर आधारित होता.केवळ संपादक म्हणून विकी व्यासपीठावर काम करण्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा महत्वाचा आणि जबाबदार घटक म्हणून आपण संवेदनशील असायलं हवं आणि अशा प्रकारचे प्रश्न समजून घेऊन त्यांची उत्तरं शोधायला हवीत.त्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक,सामाजिक,वांशिक पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तींनी समानधर्मी होऊन काम केलं पाहिजे.
प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीचा आणि विचारप्रणालीचा हा अविभाज्य भाग असल्याने मला ही उजळणी होती.पण त्यातही मजा आली.संध्याकाळीही आम्ही समुद्र किनार्‍यावर बसून सूर्यास्त अनुभवत सामाजिक प्रश्नांवर बोललो.


या सर्व चर्चेनंतर मोकळ्या वेळात वाळूत उनाडलो. अंधारात समुद्राची गाज अनुभवणं,दूरच्या दिव्यांच्या अज्ञात प्रदेशाकडे पाहणं असं सगळं होत होतं आम्ही आमचा दिवस संपवला... आता ऊत्सुकता उद्याच्या सूर्योदयाची,समुद्राच्या नव्या लोभसवाण्या रूपाची...

जिथे सागरा....

तुला अशी कधी भेटलेच नव्हते रे यापूर्वी...
हळूहळू जागा होत होतास तू....
किनार्‍यावरच्या होड्या तुझ्याकडे डोळे भरून पाहत होत्या...
आकाशाची निळाई तुझ्यात मिसळून गेली होती...
तुझं हिरवं निळेपण कसं गहिरं अथांग....
लाटांमधून पोचवलंस तुझ्या अंतरातलं खोल खोल खूप काही... माझ्यापर्यंत..
माझ्या पावलांशी लोळणच घेतली त्या भावनेने जणू,
मी निःशब्द उभी तुला अनुभवत,
तुझे अथांग,गहिरे आणि खोल खोल निळेपण स्वतःमधे सामावून घेत....
क्षितीजाला टेकलेली माझी नजर आणि वाळूत रूतलेली पावलं....

Friday, 5 October 2018

गोमंतक

गोमंतक एक आठवण एक प्रशिक्षण#
उत्सुकता घेऊन सकाळ उजाडली.  वेगळ्या जगात नव्या लोकात जाण्याचे वेध लागले होते. तशीच विमानतळावर आले उत्सुकतेने. मला माणसं पहायला नव्हे वाचायला आवडतात.बरं आहे ते. आधी माणसं पाहिली,सगळीच्या सगळी मोबाईल नाहीतर लॅपटाॅपमधे अडकलेली...  कुठे नाविन्य सापडेना काही !!!!मग मी शांतपणाचा फायदा घेत बॅगेतून पुस्तक काढलं आणि त्यात विरघळून गेले.

विमानातून खाली पाहताना ढग खुणावत होते.खिडकीची जागा बसायला हवी म्हणत आनद घेतला.क्षितीजापर्यंतचे ढग बोलावत होते.खाली समुद्र आणि नारळीच्या बागा हिरवाई खुणावत होती.
विमानतळावर आले आणि संचित भेटला. गोव्यातला हिंदू तरुण चक्रधर. गप्पिष्ट आणि मदतीला तय्यार.बाकीच्या मैत्रिणी उशीरा येणार असल्याने तो आणि मी निघालो.त्याच्या गप्पात आदब होती. मी काहीतरी वेगळे फोटो काढते आहे लक्षात आल्यावर त्याने आवर्जून अशा ठिकाणांना गाडी थांबवत मला संधी दिली.दोन तासांचा सुंदर प्रवास. मुख्य रस्त्यापेक्षा मधली गावच जास्त सुशेगात! पोर्तुगीज धाटणीची घरं,गावातलं चॅपेल,भातशेताच्या पलीकडचं भडक रंगातलं चर्च, गणेशपुरीमधला ब्राह्मणी निवास असं सगळं पाहत गप्पा करत आले. गोव्यात पोर्तुगीज आले इथपासून ते पर्रीकरांचं शासन अशी भरपूर रेंज होती गप्पांची.
सुखरूप पोचले.डुलकी घेऊन ताजीतवानी झाले.
बुकशेल्फवरची पुस्तकं, शांतपणा आणि कुठेही बसायला सुंदर सजवलेले कोपरे... काय हवं असतं आणखी आयुष्यात सुंदर पुस्तक हातात आल्यावर???
आर्या

Tuesday, 2 October 2018

निरोपाचा क्षण


कठीण असतं नं किती निरोपाचा क्षण जवळ यायला लागल्यावर...
तो ही घालतो आहे थैमान हलत्या डुलत्या झाडांवर!
कोसळतो आहे वेड्यासारखा सैरभैर झाल्यावर!
ती मात्र स्वस्थ आहे वाट पाहील की रे वर्षभर!!

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...