तुझ्या येण्याची चाहूल..
तुझ्या येण्याची चाहूल अवचितच होती
घनघोर मल्हाराची जणू बरसात होती
तुझ्या अस्तित्वाची नोंद मी घेतलीच नव्हती
धुक्यातल्या हिरवाईने खरंतर
आधीच कुणकुण दिली होती
झालं नव्हतं असं कधी
झाले वेडीपिशी
माझा जीवलग होता तेव्हा
कुण्या गावच्या वेशी
तुझ्या नि माझा 'दोन' जीवांचा
सुरु झाला "एक" प्रवास
सोबत होती सुरेख वळणे
काळ होता 'नव'मास
कुणी म्हणे बहरेल "मोगरा"
कुणी म्हणाले उमलेल "जाई"
मला मात्र म्हणणार होते
ते चिमुकले फूल "आई"
कुणी सिंचले त्या बीजाला
हळुवार नितळ पाणी
कुणी लावली माया आणिक
कुणी गायली गाणी
माझ्या "गर्भ"गृही पूजिली एक साजिरी मूर्ती
निसर्ग अन् प्रेमांकुराने झळाळूनी उठली ती!
नवमासाचा प्रवास झाला साजिरा गोजिरा
आता उत्कंठा शिगेला "जाई" की "मोगरा"!
तुझे नि माझे नाते घडले
जोडूनी गेली "नाळ"
आता वेगळे होशील तरीही
तू तर माझेच बाळ
संघर्षाची रात्र संपली
तेजाळली सकाळ
गभस्तीच्या चाहुलीने
माझे मन वेल्हाळ
आक्रंदच तो माझा होता
आनंदाची झूल
भर माध्याह्नी अमुच्या वेली
उमलले साजिरे फूल
"जाई"चा दरवळ घुमला
हुंकारला सः अहम् चा नाद
नाळेपासूनी विलग होऊनी
जीवाला जीवाची "साद"
त्याच क्षणाने दोन जीवांना
जन्म दिला कोवळा
मातृत्वाच्या आनंदाने
विसरुन गेले कळा..
तुझा नि माझा प्रवास आता
प्रगल्भ होतो आहे
रूजलेल्या रोपाला आता
पालवी फुटते आहे
Saturday, 30 March 2019
तुझ्या येण्याची चाहूल
Thursday, 28 March 2019
मोगरा फुलता....
मुंबईच्या दादर परिसरातला उच्चभ्भू परिसर... भर मे महिन्याचे दिवस. आजी संध्याकाळच्या दिवेलागणीची तयारी करत असतानाच रोज काका यायचे. मोगरे वासवाल्ले....... बंगल्याच्या टोकाशी हाक ऐकू आली की मनूला कोण आनंद होई... आजी... काका आले.....
बंगल्याच्या वरच्या मजल्यावर मनू राही.मनू आजी,बाबा आणि आई. आजी म्हणजे मनूच्या आईची आई.
आई आणि बाबा अजून घरी यायचे असत.मनूला हाका मारून मारून आजी थकून जाई.चला घरी.दिवसभर हुंदडणं झालय रोजचंच तुम्हा मुलांचं.
चला आता तिन्हीसांजेला घरात या.... काहीशा नाराजीनेच मनू घरात येई.हात पाय धुते न धुते तोच काकांची हाक कानी पडे...
धावत मनू गॅलरीत येई आणि काकांना अंगणाच्या फाटकापासून घरापर्यंत येताना पाहत राही.
पांढरं धोतर,वर सदरा,डोक्याला पागोटं,कपाळी गंध,पायात वहाणा आणि गळ्यात तुळशीची माळ.
काकांच्या पांढर्या फक्कडबाज मिशा पाहून तिला गंमत वाटे.
चैत्रात गुढीपाडव्यानंतर काका यायला लागत.गौरीच्या सजावटीसाठी आणि हळदी
कुंकवासाठी कधीतरी जास्त गजरे आई आधी सांगून ठेवत असे.सगळ्यांना अत्तर लावून एकेक
गजरा द्यायला मनूला फार आवडे.
काका आले की दारातच हातातली पाटी ठेवत.मनू रोज त्यांना तांब्यात पाणी देत असे.तांब्यातून वरूनच पाणी पिताना काकांचा हलणारा गळा आणि पाणी घशात उतरतानाचा आवाज पाहताना मनूला मज्जा वाटे... गालांवर आलेले ओघळ पंचाला पुसत काका आजीला विचारत,काय आई काय हवं! आजी नेहमीप्रमाणे म्हणे बाळकृष्णाला गजरे आणि माझ्या लेकीच्या भल्याधोरल्या वेणीत माळायलाही....
ही माझी नात तर भुंड्या केसांची... फार तर एखादा गजरा दोन्ही कानांवरून डोक्याच्या मधोमध बांधेल कधीतरी.. पण रोजचे तीन गजरे दे हो....
काका मग पाटीवर घातलेला ओलसर पंचा काढत.छोट्या बाळांसारखे ते गुबगुबीत गजरे ओळीने मांडून ठेवलेले असत.तसंही काका अंगणात शिरलेत याची वर्दी देणारा मोगर्याचा मन प्रफुल्लित करणारा सुवास घर अंगण व्यापून टाकी.पण ते बाळसेदार टपोरे गजरे पाहून मनूला त्या वासाची अधिक गंमत वाटे. गटगट पाणी पिऊन तहान भागवावी तस्सं रोज मनू गटगट तो सुवास मनमुराद नाकात भरून घेई.
आजी रागावे... मनू देवाला वहायचय गं...
आजी मीच तुझा देव आहे ना ग???मनू म्हणे.
झालं... रोजचं भांडण काकांनाही माहिती झालं होतं. काळपट पसरट पानात काका तीन गजरे अलगद ठेवत. जणू काही ते त्यांच्या बाळांना निरोपच देत असत. मग पानांची चार टोकं मुडपून पुडा बांधला जाई. कसल्याशा पानाच्या सोपटाच्या दोरीनेच काका तो पुडा बांधत... आणि मनूच्या हातात देत.
ती तीन सुवासिक बाळं आजीच्या हातात देताना मनूचा चेहराही फुलून येई.काकाही पाटी उचलत आणि उद्या यायचं कबूल करत निघून जात.काका गेले तरी जिन्यात रेंगाळणारा सुवास मनूच्या मनाचा ठाव घेई. उन्हाळ्यातल्या गरम झळांनी उबदार हवेत रेंगाळणारा मोगर्याचा दरवळ तिला रात्रभर आठवत राही.
दुसर्या दिवशी पुन्हा काका येत. पुन्हा तीच सारी मज्जा...
काका महिन्यातून एकदाच पैसे नेत असत महिन्याच्या शेवटी.सुट्टीत घरी पाहुण्या आलेल्या ताया,मावश्या,काकू,आत्या यांच्यासाठीही गजरे घेतले जात.
काका मनूच्या घराच्या जोडीनेच आणखीही कुठे कुठे गजरे द्यायला जात.
जूनच्या सुरुवातीला शाळेची तयारी सुरु होई.मग एक दिवस काका सांगत की आता बहर संपत आला आहे.फारतर आठवडाभर येईन.
मनू उदास होई.आता काका कधी भेटणार??? पुढच्या वर्षी बाळा...
पण मोगर्याचा मोसम संपला तरी तीन महिन्यातून एकदा काका सहज येऊन जात.दारातच बसून चहा पाणी पीत.मनूशी गप्पा मारत..
काका गजरा नाही आणलात???
अग आता फुलं उमलत नाहीत.उन्हाळ्यातच बहर असतो ना मोगर्याचा...
वर्षभर मोगरा का येत नाही हे शाळकरी मनूला कोडच पडे.कारण मोगरा नाही की काका येणार नाहीत... ते येणार नाहीत की मग तो मोगर्याचा दरवळही नाही.......
नंतर मनू मोठी झाली आणि पुण्याला गेली.तिला तिच्या मामीने सांगितलं की ते काका थकले होते आणि गेले वृद्धापकाळाने.
ते काका कुठून येतात? काय करतात? कुठे राहतात हे मनूला तेव्हाही माहिती नव्हतं.. आजही माहिती नाही... पण तिच्या मनात "मोगरेकाका" कायमच दडले आहेत.
मनू आणखी मोठी झाली.यथावकाश प्रेमातही पडली,. लग्न झालं....
दरम्यान तिने बाजारात मिळणारे गजरे पाहिले,विकत घेतले,माळलेही.पण ते गजरे तिला आपले वाटलेच नाहीत कधी...
मनूचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. मीनाक्षी मंदिराच्या बाहेरच्या फुलवालीकडून मोगर्याच्या गजर्याची लडच विकत घेऊन विमानात बसला. घरात शिरल्याशिरल्या त्याने मनूच्या हातात केळीच्या पानात बांधलेला तो मोठ्ठा पुडा ठेवला..... मनूला सुवासाची आठवण झाली...आता जाणत्या मनूचे केसही लांब होते गजरा माळण्याइतके... तिने न राहवून आधी पुडा उघडला... मोठ्ठा गजरा... संपेचना..... आणि तसाच गच्च गुंफलेला..... तिला क्षणात मोगरेकाका आठवले.....
त्यानंतर कधीतरी मनूच्या नवर्याने हौसेने घरच्या बागेत लावलेल्या मोगर्याला पहिली कळी आली..... कळी उमलली.....
मनूला त्या फुलात मोगरेकाकाच दिसले. मनूने ते फूल अलगद खुडलं... आणि आपल्या लग्नात माहेराहून मिळालेल्या बाळकृष्णाच्या लोभसवाण्या चिमुकल्या मूर्तीवर वाहिलं... तिचे मोगरेकाका कृष्णाच्या चरणी तिने अर्पण केले होते... तिचं सुवासाचं जग त्या उन्हाळ्यात पुन्हा उजळून निघालं.....
,
Wednesday, 27 March 2019
दुधावरची साय
दुधावरची साय
स्थळ- कोकणातल्या छोट्या गावातलं टुमदार कौलारू घर.
आजी- अरे थांब रे माझ्या राजा,एकदम घरात येऊ नकोस आत..
यश-Why mumma?
आई-Its our local tradition yashu.
आजी, यश आणि त्याची आई मनाली यांच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळते. तो बाहेरच टाकून देते.पायावर पाणी घालून त्यांना घरात यायला सांगते.
यश-(आजीला मिठी मारत) आजोबा कुठे आहेत?
आजी-तुझी केव्हापासून वाट पहात होते.अरे आपल्या गोठ्याची भिंत सारवायला काढली आहे नं.तिथेच आहेत ते.
यश-गोठा??? इथे गाय बैल आहेत?? घरात??
आई(हसून) अरे वेड्या,गाय बैल काय घरात राहणार का आपल्याबरोबर? त्यांच्यासाठी वेगळं घर असतं.त्याला गोठा म्हणतात.
आजी- चला दमून आला आहात.आधी विमानप्रवास.मग मुंबईहून इथपर्यंचा गाडीचा प्रवास.तसं आपलं अणसुरं लांबच पडतं….
यश- मी आईला म्हणत होतो की तुम्हालाच बोलवूया कॅनडाला.पण तिने आणि बाबाने ऐकलच नाही.इथे मला खूप कंटाळा येणार आहे आजी.,. खेळायलाही कुणी नाही… टीव्ही नाही...व्हिडिओ गेम नाही..
आजोबा- आलं का आमचं छकुलं बाळ?
यश आजोबांना मिठी मारतो…
आजोबा- अरे आत्ता तर आलास आणि लगेच कंटाळा…
असा रमून जाशील की परत जावंसं वाटणार नाही.
यश- नो आजोबा...तिकडे ख्रिसमसची मजा सुरू आहे आणि मी इकडे आलोय.
आजी- अरे तू लहान होतास तेव्हा नव्हतं कधी आणलं तुला इथे.पण आजोळघराची पण गंमत असते बरंका यशोबा…
आजोळ means...माझा एक मित्र पुण्याहून कनडाला आलाय.तो जायचा आजोळमधे..
आई- यश ,ते त्याच्या डे केअरचं नाव होत.हे तुझं खरं आजोळ आहे.म्हणजे माझ्या आई बाबांचं घर…
यश- आई तू पण इथेच रहायचीस या छोट्याशा गावात?
आई - हो यश.
आजोबा- चला अंघोळी करूया,..
कंटाळलेला यश कसाबसा आजोबांच्या मागे जातो
यश- wowww what is this ajoba?
आजोबा- अरे याला पायरहाट म्हणतात.बघ मी कस पायाने हलवून पाणी काढतोय विहीरीतून..
यश- मी काढू आजोबा…???
आजोबा- चिमण्या जरा मोठा झालास आणखी की जमेल…
यश- पण तेव्हा मी कुठे येणार इथे??
आजोबा- म्हणजे काय? हे घर आपलंच आहे.तुझ्या तिथल्या जगापेक्षा या जगाची मज्जा वेगळी आहे.त्यासाठी यायचं अधूनमधून इथेही..
आजी- काय चालल्यात गप्पा??? चल बाळा अंघोळ घालायला आई थांबलीये..
यश-आई हे भांडं कसलं? इथे बादली शाॅवर स्प्रेअर काही दिसत नाही?
आई- हीच तर कोकणातली गंमत.ती नं पाणचूल आहे.त्यावर हंडा ठेवलाय.त्यातलच पाणी या घंगाळ्यात ओतून घेतलय मी अंघोळीसाठी.. तू पाहिलस का की ती चूल कशी पेटवली आहे…
यश- ohhh ok. कित्ती मस्त वाटतय आई…
आई- आणि ते बघ.. आजोबांनी हे पाणी बाहेर जाईल तिथे केळीचं झाड लावलय, अबोली फुलली आहे…
आजी- चला चला आटपा….
सगळेजण जेवायला बसतात..
यश- हे काय leaf ठेवलय इथे आजी? प्लेटस् नाहीत का तुमच्याकडे??
आई- यश आगाऊपणा नको.तुमच्याकडे काय? आजी आजोबा आहेत ते तुझे.
आजी-असू दे गं.लहान आहे तो..
आई- अग आई पण हे आत्ताच शिकवायला नको का? आम्ही कायम परदेशी राहणार.तिथे हेच पाहणार नं तो की आजी आजोबा हे परके असतात...कधीतरी भेटणारे…,
आजीच्या डोळ्यात पाणी तरळतं….
आजोबा- बरं पुरे आता… ये बाळ… बस..
यश- मला खाली नाही बसता येणार!!! खुर्ची दे नं आजी..
आजी- अरे एवढासा आहेस.आम्ही म्हातारेही बसतोय अजून खाली जमिनीवर, बैस बैस.जमेल तुला..
सर्वजण जेवायला सुरुवात करतात.
आई- बापरे आई मी तर हे विसरुनच गेली आहे.बिरड्यांची उसळ,कुळथाचं पिठलं…. मज्जा आली..
आई- यश जेव अरे… आईने किती छान स्वयंपाक केलाय.
यश- I dont like this food…. आजी तू अजून काय केलं आहेस??? म्हणजे पास्ता,मॅगी असं काहीतरी..
आजी- राजा खीर केली आहे शेवयांची तुझ्यासाठी.. खा आवडेल तुला…
जेवणं झाल्यावर सगळेजण थोडे लवंडतात. यश झोपाळ्यावर जाऊन लोळत राहतो.
आजोबा- यश नारळ उतरवायला गडी आलाय.चल येतोस का मज्जा पहायला????
यश- म्हणजे??
आजोबा - चल तर……
काही वेळानंतर घरात आल्यावर
यश- मम्मुडी that uncle is so active and strong… ते त्या झाडावर चढले होते coconut tree वर… its interesting….
आजी- तुझी आई हे सगळं आवडीने पहायची हो यश.एकदा पाठीसच लागली यांच्या की मलाही झाडावर चढायचय म्हणून… आणि जो हैदोस घातला पोरीने….
आजोबा- यश आता आमराईत जाऊया.
आई - म्हणजे Mango Grove
यश - Mangos…. yummy…
आजी- अरे आताशी मोहोर येतोय रे. अजून आंबे कुठले इतक्यात..काजूही हळूहळू फुलतोय.काजू म्हणजे कॅशुनट हो तुमचा..मे महिन्यापर्यंत रहा आणि आंबे खाऊनच जा परत...
यश- आजी तुला इंग्लिश येतं?
आजी- छे रे… मी कुठली इंग्रजी बोलायला?? चार दोन शब्द माहिती आहेत एवढंच…
यश- पण आम्ही तर हे सगळं सुपर मार्केटमधून आणतो…
( सगळे हसतात)
आजोबा- अरे हेही सुपर मार्केटच आहे निसर्गाचं….
चल पटकन्.
( घरात आल्यावर)
यश- आजी भूक लागली.. आई पाणी दे..
आई- बाॅटल ठेवली आहे स्वयंपाकघरात.
आजी- अग पिऊ दे इथलं पाणी.तुझा पिंडही याच पाण्यावर पोसला नं गधडे??? ( आई हसते)
आजी- घे खा…
यश- काय आहे हे??
आजी- आंब्याचं साठं आणि फणसपोळी आणि हे फणसाच गरे., आपल्या घरचं आहे हं हे यश…
यश- Yummy मला हे आवडलय.लंचपेक्षा मी हेच खात जाईन रोज…
आई- तिथेही हेच आणि इथेही तेच,.. जेवणावरून रोज ओरड आहे बघ,,.
यश- आजी, आजोबांनी मला पक्षी दाखवले… मला नावं नाही लक्षात, हं वन इज खंड्या….सेकंड इज सुतारपक्षी..
उद्या मी आणखी बर्डस पहायला जाइन हं.
आजी हे काय आहे??
आजी- अरे हिला चूल म्हणतात… ही मातीची असते…
यश-पण हिचा स्मोक होत होता मगाशी.. आमच्याकडे तर लगेच अलार्म वाजतो….
आजी- इथे नाही हो वाजत अलार्म बाळा… इथे फक्त सकाळी कोंबडाच आरवतो…
यश-आणि हे काय आजी???
आजी- याला बळद म्हणतात.इथे भिंतीत केली आहेत ही.तुझ्या पणजीने!!!
यश-पणजी म्हणजे गोव्याचं capital??? माझ्या मित्राने सांगितलं मला की त्याचा काका पणजीला राहतो...
आई- वेडू पणजी म्हणजे my grandma. ती तुझी झाली पणजी…
यश- ओ…. के…..
यश- पण यात काय आहे??
वाकून पाहतो.. salt and rice?
आजी- हो रे.म्हणजे उंदीर घुशी लागत नाहीत.वर्षानुवर्ष टिकून राहतं चांगलं…
यश- रॅटट.. इथे रॅट पण आहेत???
आजोबा- रॅटच काय कॅट पण आहेत… गेली असेल हुंदडायला.रात्री येऊन बसेल चुलीपाशी..
यश-कोण??
आजी- अरे आपली मांजर…
आजी- अहो यशोदीला निरोप द्यायचीच विसरले सकाळी यांच्या धांदलीत.खळ सारवायला ये म्हणावं…
रग्गड शेण गोळा झालय..
आई- मी पण सारवेन…
आजी- मने, राहू देत हो.तू आता झालीस आहेस साहेबीण…
यश- ते काय असतं आजी??
आजी-अरे जमीन मातीची आहे नं आपली,, ती सारवावी लागते.नाहीतर उखडते ती…
यश- शेण म्हणजे काय??
आई - Cowdung..
यश- please आई…
आई- I am not joking pilu.
यश- ते हातात घेतात??? गाईची शी???
आजोबा- अरे त्यामुळे जमिनीवर माशा,चिलटं येत नाहीत,.. गारवाही राहतो.. जमीनही मऊसूत होते बघ..
यश- बाबाला हे कळलं नं तर मला पाठवणार नाही तो इथे…
आजोबा- चिरंजीव.. तुझा बाबा येऊन गेलाय इथे.दोन दिवसासाठी आला आणि आठवडाभर रमला… कामासाठी दूरदेशी गेला असला तरी भारतीयच आहे तो.. त्यातून पक्का कोकणी...
तुझे तिकडचे आजोबा...म्हणजे आपटे आजोबाही देवाच्या गोठण्यातलेच आहेत...पण तिथे आता कुणी नाही...असो.कालाय तस्मै नमः।
आई- बाबा चला नं खाडीवर फेरफटका मारून येऊ..
यश- आजी चल नं तू पण..
आजी- तुम्ही तिघे जाऊन या…
थोड्यावेळाने..
आजी- यश इकडे ये.हे पहा..
यश- हे काय मीठ आणि…
आजी- गप रे,,
दुष्ट मिष्ट चांडाळांची.. भुता खेतांची.. आल्या गेल्याची.. पारोशा केराची दृष्ट चुलीत पडो…
जा आता.. आणि नंतर अंगारा लावायला ये..
आई- यश बाबाचा whatsapp call…
आई- हॅलो,, अरे जिओचं नेटवर्क काम करतय… तू कसा आहेस?? हो हो आई बाबा मजेत… अरे नेटवर्कच्या गोंधळात तुझी माझी वेळ जुळेलच असं नाही रे. पण जमेल तेव्हा फोन करीन…
यश- hey pops...मी आत्ता आजोबांबरोबर नदीवर गेलो होतो. सनसेट पाहिला.. बाबा कसलं मस्त वाटलं रे.. दोन छोट्या शिप्स पण होत्या.. आम्ही जाणार आहोत एक दिवस त्यात बसून राईडला पाण्यात.. चल बाय..
आई- रमलाय तो.मलाही सकाळी टेंशन आलं होतं पण आता स्वारी खुशीत आली आहे..चल बाय.टेक केअर…
आजोबा- बरं चल यश… कपिला वाट पाहते आहे.आणि रंगूही..
यश- who is kapila and rangu?
आजी- जाऊन तर पहा..
आजीने ओतलेल्या धारोष्ण दुधाचा पेला घेऊन यश आईकडे येतो.
यश- आई…. इथे एक काऊ आणि एक बफेलो आहे… किती cute आहेत… काऊ व्हाईट आहे आणि बफेलो ब्लॅक.. this milk is very testy….
आई- हो यश. हीच तर गंमत आहे इथली.ही गंमत करत इथे मी आणि जयूमामा लहानाचे मोठे झालो.मी तुला उद्या आमची शाळा दाखवीन नेऊन.आम्ही पायवाटेने चालत जायचो… मस्त मज्जा करत… पुढे काॅलेजला रत्नागिरीला गेलो आणि मग स्काॅलरशीप मिळवून दोघेही परदेशात.. तिथे मला बाबा भेटला.. मग आम्ही लग्न केलं… आणि मग आमचा बच्चू आला…
असं म्हणत आई यशच्या ओठांवर आलेल्या दुधाच्या मिशा पुसते..
आजोबा- काय कसं वाटलं दूध??
यश- मस्त होतं…
आजी- चला आता…
रात्रीच्या जेवणानंतर…
आजोबा झोपाळ्यावर बसतात..त्यांच्या मांडीत यश लोळतोय..
आजोबा - बरं का यश उद्या सकाळी कोंबडा आरवेल.. तेव्हा उठ हं.म्हणजे माझ्याबरोबर पुन्हा गोठ्यात यायला मिळेल…
यश- आजोबा तुम्ही पण बाबासारखा जाॅब करता की दादा आजोबांसारखं दुकान चालवता??
आजोबा- माझा जाॅब हाच बाळा… मी गायी म्हशी सांभाळल्या आहेत.. पण आता झेपेनात म्हणून दोनच ठेवल्या आहेत. मी भातशेती करतो.काजू आंबे सुपारी नारळ केळी मिरी असं सगळं पिकवतो आणि विकतो.सोलं म्हणजे कोकम पण आहेत…
आजी उन्हाळ्यात गरे तळते,साठं करते…
यश- म्हणजे you are a farmer…
आजोबा- हो..
आई-- I am a proud daughter of a farmer…
बाबा मनालीला जवळ घेतात..
यश-आई तू का बरं proud feel करतेस?
आई- यश this is a very difficult task. Life is very hard here but its give us pleasure also.
आपण परदेशात राहतो तिथे काय शहरात पण याची कल्पना येणार नाही तुला….
यश- हं I understand… आई आपण every year येऊया इथे.का आपण मे महिन्यापर्यंत थांबूया…
आजी आजोबा मस्त माझे लाड करत आहेत,केवढी गंमत आहे इथे… मला इथे अजून खूप रहायचय….
आजी- चला अंगणात बसू.
यश अंगणात आजीच्या मांडीवर लोळत असतो...आजोबा त्याला चांदण्या,नक्षत्र दाखवत असतात…
आई त्या दृश्याकडे समाधानाने पाहत असते..
मागे रेडिओवर शास्रीय संगीताची मैफल सुरु असते..
गायिकेचा आवाज… बलमवा तुम क्या जानो प्रीत… मैं गई हार तुम्हरी जीत..
पौरोहित्य पुरस्कार
मंत्र म्हणून कंटाळा यायचा
अवघड उच्चारांनी जीवच जायचा
तरीही त्यातून सारं जमलं
आम्हाला त्याचं बक्षीस मिळालं...
रोज वर्गात बसायचं,तत्वज्ञान ऐकायचं
ते डोक्यात साठवण्याचं
तंत्र हळूहळू सरावात आलं
त्याचं आम्हाला बक्षीस मिळालं..
थंडी वारा ऊन पाऊस
या सगळ्याची आम्हाला हौस
ती कसरत करायला जमलं
त्याचं आम्हाला बक्षीस मिळालं...
यशवंतराव शांत बसतात
विसुभाऊ समजावून सांगतात
त्यांच्या शिकवण्याचं चीज झालं
त्याचं आम्हाला बक्षीस मिळालं...
आर्या ओरडते जोरजोरात
मनिषाताई हसते गालात
या सार्याचं गणित जुळलं
त्याचं आम्हाला बक्षीस मिळालं...
उजूताईचे वागणे मधाळ
रमाताईची रोजच धमाल
आम्ही मात्र आमचं काम सांभाळलं
त्याचं आम्हाला बक्षीस मिळालं...
Tuesday, 26 March 2019
ग्रीष्माची अलवारता
ग्रीष्माचा वारा
सांजेला वाहता
त्याच्या झळांनी
मन कोमेजून जाता..
क्षण कोवळे तुझ्या
आठवांना स्मरता
सांजेच्या झुळुकांनाही
गारवा लाभता...
सापडे माझे मीपण
लेखणीतून झरता
ओलेत्या आठवांनी भिजते
तुझी स्मरणगाथा
तुझ्या माझ्या संचिताचा
ऋतू कोवळा उमलता
तुझ्या माझ्या भेटीची
अलवार सहृदयता....
Sunday, 17 March 2019
निशब्द
निशब्द रानात
मौन पाऊलवाटात
माझे मन दडले
एका कोटरात
कुणाचे हे घर
कुणाचे निजले बाळ कुणाच्या पंखांनी पेलले
निशब्द आभाळ?
Wednesday, 13 March 2019
होळी
फाल्गुनाचा चंद्र घेऊनी येईल अग्नीची ज्वाळा
घाई झाली डोळ्यांना पाहण्या उत्सवी सोहळा
रंगांच्या उधळीने होईल आनंद बाळगोपाळा
निसर्गही कौतुके उमलवील केशरी फुलांचा झेला
Tuesday, 12 March 2019
माझा वात्सल्याचा झरा
माझा वात्सल्याचा झरा
विसुभाऊ नं तुझं सगळं ऐकतात तेव्हा तूच बोल... संत्रिकेतला आमचा नेहमीचा संवाद आहे. पण ते माझं का ऐकतात त्याचं हे गुपित उलगडावंसं वाटतय.
माझा चुलतभाऊ प्रबोधिनीत विसुभाऊंचा विद्यार्थी.आजही अनुपदादाला विसुभाऊ आवडतात कारण त्यांनी संस्कृतची गोडी लावली म्हणून.
माझी कौटुंबिक पार्श्वभूमी त्याने विसुभाऊंना सांगितली.मी संत्रिकेत यायला लागले होतेच पण माझ्या भविष्याच्या दृष्टीने मला इथे रूजवावे असा दादाचा हेतू होता.त्या हेतूच्या बीजाचं आता झाड झालय .हळूहळू कोवळी पालवीही दिसायला लागली आहे.
विसुभाऊ संत्रिका प्रमुख होण्याआधी पौरोहित्य वर्गाला येऊन बसत.चाॅकलेटी राखाडी पिशवीतून पोथ्या काढत. मी शिकवत असे. प्रार्थना झाल्या झाल्या लगेचच निघत.
मला दोन महिन्यांनी समजलं की ते आता संत्रिकेचे प्रमुख होणार आहेत!!!
मी मावशीला सांगितलं की तिथे वेगळी व्यक्ती प्रमुख म्हणून येते आहे.मला ठेवतील का नाही माहिती नाही.
एक दिवस त्यांनी संत्रिकेतच बोलावलं.ते संवादिनी घेऊन बसले. माझ्या श्लोकांच्या मंत्रांच्या चाली त्यांनी बदलल्या.उच्चारण सुधारलं. मी अक्षरशः शंभर शंभरदा एकेक ऋचा म्हटली असेल...
नंतर कधीतरी सराव झाल्यावर पद्य,अभंग असं शिकणं झालं.कालांतराने त्यांचं स्वरयंत्राचं आॅपरेशन झालं पण त्यांनी पेटीवर नुसते सूर वाजवले तरी मला चाल समजू लागली... ती आमचं सुरांची समजूत जुळली होती.
संत्रिकेच्या हिशोबाच्या व्हाऊचर्सची नोंद मध्यवर्तीत जाऊन करणे,ट्रायल बॅलन्स मांडणे,संत्रिकेचा अर्थसंकल्प वार्षिक बैठकीत मांडणे इथपासून पौरोहित्य वर्गाचे नियोजन,धारिणीकरण अशा खूपच गोष्टी त्यांनी मला शिकवल्या.त्यांच्यासह बसून पौरोहित्य शिकवण्याचा अनुभव मला तीन वर्ष सतत मिळाला.गुरुजवळ बसून शिकणे हे तेच होते.मी वाचून कमी आणि त्यांची मांडणी "ऐकूनच" शहाणी झाले आहे!
माझ्या औपचारिक लेखनातही त्यांच्या लेखनाचा भास होतो असे प्रबोधिनीत लोक म्हणतात ते यामुळेच असावं.
आशुतोष माझ्या आयुष्यात आल्यानंतर लग्नाबद्दल त्याला विचारण्यासाठी मी लिहीलेलं पत्रही मी आधी विसुभाऊंना वाचायला दिलं होतं यातच काय ते समजावं!
नव्या वास्तूत संत्रिका जाणार हे त्यांनी मला सांगितलेला क्षण आठवतो. मग आम्हा सर्वांपुढे ते नकाशा घेऊन बसले आणि आम्हाला ती रचना त्यांनी समजावून दिली.
माझ्या लग्नानंतर कौटुंबिक आयुष्यातले चढऊतारही ते ऐकत होते. घरी अभ्यास होत नसेल तर संत्रिकेत बसून करत जा.अगदी कामाच्या वेळातही माझा एम फील, पीएचडीचा,भारतीय विद्येचा अभ्यास त्यांनी मला करू दिला.
आमच्या घरी ते नृसिंह जयंतीला आले तेव्हा आशुतोषच्या मोठ्या काकांना स्वतः हाताला धरून ते घेऊन आले.सांगितल्यावर कळलं सगळ्यांना की ते माझे विभागप्रमुख आहेत!
एक टप्पा आमच्या आयुष्यात असाही आला की मूल होण्यासाठी किती वाट पहावी.सर्व रिपोर्टस् नाॅर्मल असूनही होत नसेल तर मूल दत्तक घ्यायच्या निर्णयातही विसुभाऊ माझ्याशी बोलले होते.पण तशी वेळ आली नाही.पण अशा नाजूक प्रसंगातही ते माझं मनोधैर्य वाढवत राहिले,
नव्या वास्तूत संत्रिका आली हे मला मुळीच आवडलं नाही कारण त्यानंतर त्यांचं मध्यवर्तीतलं काम वाढलं आणि संत्रिकेत त्यांचं येणं कमी झालं.क्वचित ते येत आणि मग कधी आम्ही अरविंद वाचले,उपनिषदं चाळली.तो आनंदही फार मोठा असे.
आपल्या अनुपस्थितीत एक असा विभाग ज्यात ये जा पुष्कळ आहे,ज्यात आर्थिक उलाढालही असते असा कुणावर सोपवणे यात विसुभाऊंचा वाटा आहे.मला घरात ज्या गोष्टी आजही करण्याचं स्वातंत्र्य नाही किंवा माझा सहभाग घ्यावा असं वाटत नाही अशा सर्व प्रकारच्या गोष्टी करण्याची मोकळीक मला विसुभाऊंनी संत्रिकेत दिली.त्यांच्या आजारपणात ते नसताना मला संत्रिकेत एकटं वाटे कारण ते प्रबोधिनीत आहेत आलेले एवढाही आधार खूप असतो माझ्यासाठी.
विकीपिडियाच्या जागतिक विश्वात कुणीतरी मला विचारलं How you are such a vibrant and confident intelligent enthusiastic girl?? मला ही विशेषणे लावणार्या त्या ज्येष्ठ विकीपीडियन व्यक्तीला मी म्हटलं... यामागे एक व्यक्ती आहे Mr. Vishwanth Gurjar.
दीपान्विताच्या घडणीबाबतही मला आणि आशुतोषला ते नेहमी सांगतात. तुला जे वाटतय त्यापेक्षा तिला जे आवडतय ते करण्याचा तुझा प्रयत्न असला पाहिजे असं ते मला नेहमी शिकवतात.नियमीत न भेटणारे तरीही आठवणीत असलेले विसुआजोबा आले तर त्यांच्याबरोबरच मला गणपतीबाप्पाची आरती करायची आहे हा तिचा हट्ट होता!तो ही पूर्ण झाला.
त्यांचं हे एक वेगळं रूप आहे. प्रबोधिनीच्या औपचारिक वातावरणापलीकडचं त्यांचं माझं नातं.
पौरोहित्य व्रत संस्कारात त्यांना पाहिलं आणि आठवणींचा पट जागा झाला...
असा हा वरून रूक्ष आणि शिस्तप्रिय असलेला, प्रबोधिनीत मध्यवर्तीमुळे सर्वांच्याच काहीशा रोषाचा पण तरी आदराचा विषय असलेली व्यक्ती माझा वात्सल्याचा झरा आहे.तो असाच वाहत राहू दे!
आर्या,
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...