किशोर तसा लहानपणापासून मनस्वीच! शाळा ही फक्त उनाडक्या करण्यासाठी असते असं त्याचं मत होतं! खरंतर शाळेतला फक्त चित्रकलेचा तासच त्याला आवडायचा त्यामुळे त्यात उत्तम शेरा मिळत असे पण अभ्यासात तो जेमतेम उत्तीर्ण होत असे.
आई वडील या सगळ्याकडे आता दुर्लक्ष करू शकत नव्हते! किशोरची दहावीची परीक्षा यावर्षी होती.
“किशू हे वर्ष फार महत्वाचं आहे जरा अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं आहे !” आईचा काळजीचा सूर.
“दहावीला चांगले मार्क मिळाले नाहीत तर बाहेरचा रस्ता पहा आपला आपण, तुला इतकी वर्ष सांगून थकलो आहे !” अर्थात बाबा . बाबा रागावत असले तरी त्यामागे मुलाच्या भविष्याची काळजी त्यांना सतावत होती हे आई समजू शकत होती पण किशोर मात्र बाबांचा राग राग करू लागला होता!
“ मोहन अरे मला अभ्यास आवडत नाही, माझं मन चित्रकलेत रमत हे तुला माहिती आहे न. तू चित्रकलेच्या वर्गाला जायचास म्हणून आईने मला तिथे पाठवलं पण मला कुणी सांगावं आणि मी तस्स हुबेहूब काढावं अस कधी वाटतच नाही! “
“बरोबर आहे किशु, पण तू ही समजून घे. हे आपलं वर्ष महत्वाचं आहे अरे. चांगला अभ्यास कर आणि पुढे चित्रकार हो ना !कोण नाही म्हणतंय तुला ! “ मोहन समजुतीच्या स्वरात म्हणाला.
पण शेवटी किशोरला अभ्यास आणि घरातले ताण सहन होईनात!
किशोरच्या आवडीचा आणखी एक विषय म्हणजे आदिवासीची चित्रकला ! निसर्गाची लेकरं असणारे हे बांधव किती सहज निसर्ग रेखाटतात याचं त्याला कौतुक आणि आश्चर्य वाटे!
मोहनशी तो याविषयावर नेहमी बोले, एकटा मोहनच काय त्याला समजू शकत होता मित्र म्हणून.
“ मोन्या मला खूप वाटतय की जंगलात जाऊन रहावं आणि मोकळा निसर्ग माझया कुंचल्यातून उतरवावा. इथे घरात कुणालाही त्याची किंमत नाही. तुला माहिती आहे का की मी काय चित्र काढली हे तुझ्याशिवाय कुणी पाहतही नाही अरे !” ते वनबांधव पहा. आपल्या जंगलातल्या रोजच्या आयुष्यतल्या गोष्टी किती सोप्या पद्धतीने रेखाटतात जमिनीवर, घरांच्या भिंतीवर! कुणाला काही दाखवायचं नसत त्यांना पण आपला आनंद यात शोधतात ते किती नशीबवान आहेत ! “
मोहनला खूप काळजी वाटायची की किशोरसारखा मनस्वी आणि हरहुन्नरी कलाकार एकदिवस या जगापासून लांब जाणार आहे ! आणि आपण त्याला शोधू शकणार नाही !”
दहावीच्या परीक्षेच्या चाचणी परीक्षेला मोहन आणि किशोर एकत्र शाळेत निघाले, शाळेत गेले खरे पण पेपर झाल्यावर मोहनने शेजारच्या वर्गात पाहिलं तर किशु नव्हता!
“ मोहन, अरे आज किशोर साबळे आला नाही पेपरला! आजारी आहे का ? “ सरांनी विचारलं.
मोहनला धस्स झालं. आपली भीती खरी ठरली नसेल !!!
तो धावतच किशूच्या घरी पोहोचला !
‘काकू, किशु आला का ?”
“अरे तुम्ही पेपरला गेला होतात ना ?”
“ हो, पण तो पेपरला नव्हता!!! “
आई चिंतेत पडली.
‘ठीक आहे, तू जा घरी. आला की मी फोन करते तुला”.
सरतेशेवटी रात्री आठ वाजता काकांचा फोन वाजलाच .
मोहन आणि त्याचे बाबा पोहोचले किशोरच्या घरी! एकच गोंधळ उडला होता. किशोरच्या काका काकू पण आले होते.....
किशु होता कुठे ?
किशु बसला होता पालघरच्या एसटीमध्ये.... त्याला ओढ लागली होती वारली आदिवासी आणि त्यांची चित्र समजून घेण्याची! नुकतंच मिसरूड फुटू लागलेला किशोर आपली वाट शोधायला निघाला होता....
राजा रविवर्मा कलादालन आज गर्दीने फुलून गेलं होतं! साधारण पंचवीस वर्षांचा एक युवक आणि चार वारली महिला आणि तीन पुरुष यांच्या चित्रांचं प्रदर्शन आज भरलं होत. त्याचं उदघाटन करायला महापौर येणार होते आणि छायाचित्र काढायला साक्षात मोहन हजर होता!
होय किशोरच होता तो !
दहा बारा वर्ष घरच्यांना आणि पोलिसांना हुलकावण्या देत किशोर आपली कला जगला! खूप कठीण दिव्यातून गेला ! सुरुवातीला आदिवासीना त्याला स्वीकारणं कठीण गेलं, भाषाही येत नव्हती!
पण अनाथ सीतामायने त्याला आपलंसं केलं. पोलिसांचा ससेमिरा चुकवीत किशोरला आपल्या ध्येयापर्यंत पोचायला तिने त्याला मदत केली होती, टायच्यावर मायेची पाखर घातली होती !
सात वर्षांनी आई वडिलांना ही नाईलाजाने त्याचा पाठलाग सोडावा लागला ! किशु जिथे असेल तिथे सुखी असेल अशी प्रार्थना मनात करीत मोहनही आपल्या दिनक्रमात व्यस्त झाला ! पण त्याचं मन मात्र किशोरची वाट पाहत होत.
अचानक मोहनच्या पत्त्यावर आलेलं पत्र वाचून मोहन ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर पोहोचला. त्याने किशुसाठी एक नवा मोबाईल फोन विकत घेतला होता भेट म्हणून…
“ कसा आहेस ? किती शोधला रे तुला ?” पण तू तुझया ध्येयाच्या शोधात गेला आहेस हे मला माहिती होत पण काळजी वाटत राहिली रे! “
“ आई बाबा कसे आहेत ? ही सीतामाई. माझी मानसआई”.
“ फार तपशील सांगत नाही आता पण आत ये , विश्रांती घे आणि मग बोलू”.
संध्याकाळी चार वाहिन्या आणि वृत्तपत्र यांचे वार्ताहर पोचले. किशोर साबळे आणि वारली समाजातील कलाकार यांच्या कलेविषयी जगाला माहिती द्यावी यासाठी ते आले होते.
“ मी किशोर, ख-या कलेच्या शोधत इथे पोहोचलो. या बांधवांनी मला त्यांची कलाच दिली असं नाही तर मलाही आपलंसं केले आहे. या वस्तीतला हिरव्या म्हशे मुंबईला गेला आणि जाताना आम्ही काढलेली चित्र सोबत घेऊन गेला. त्याचा मित्र चित्रकार आहे, कलेचा उपासक”.
ही चित्र पाहून तो धावतच आला आणि आमची कला त्याने जगापुढे आणायची ठरवली. ही कला मुळात आदिम पूर्वजांनी जपलेली आहे, टी आता माझीही आहे! ही चित्र निसर्गाची गुपितं उलगडतात, त्यांच्या रेषा कमालीच्या प्रामाणिक आहेत, साध्या सरळ आयुष्याची मांडणी ती करतात. आमच्या देवभोळेपणाला नावं ठेवली जातात पण आमचा देव असा कलेतूनही जगतो आम्ही. या चित्रात काय नाही ? यात लग्नाचा चौक आहे, तारपा वाजविणारा आमचा दोस्त आहे , वाघोबा आहे, आणि आमचं घरातलं धान्याचं कोठारही आहे. आमचे पाळीव प्राणीही आहेत आणि जंगली प्राण्यांची शिकरही !”
हे आमचं रोजचं जगणं आता तुमच्या साड्या, भांडी, कपडे , वस्तू यावर आम्ही चितारलेले आहेत. आमच्या शेणामातीच्या भिंतीपलीकडचा canvas यांना मिळाला आहे आणि हे आमचं भाग्य आहे”
इतकी वर्ष जंगलात आदिम बांधवात राहूनही आत्मविश्वासाने आपली कथा मांडणारा किशोर सर्वांच्या चर्चेचा विषय झाला !
“मला जे मिळालं आणि ज्यांच्याकडून मिळालं त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला माझे आईवडीलही हवे आहेत पण मी या माझया नव्या कुटुंबालाही अंतर देऊ शकणार नाही ! “ ही बातमी पसरताच पुण्याच्या कलोपासक संघाकडून आमंत्रण आलं आणि प्रदर्शन मांडण्याचा विषय निघाला. या माध्यमातून हे कला आणि ती जगणारे आदिवासी बांधव यांना जगाचं व्यासपीठ खुलं झालं !
‘’ किशु, घरी येणार आहेस ना ?” आईचा कातर आवाज !
अधूनमधून येत जाईन आई”
बाबांचे पाणावलेले डोळे !
“ मोहन, आम्हला पुढच्या आठवड्यात दिल्लीला जायचय आणखी एका प्रदर्शनाला “ तिथून आलो की घरीच येईन.”
पुढच्या आठवड्यात घरात लावायला एक सुंदर वारली चित्र घेऊन किशु येतो, बाबा स्वतःच्या हाताने खिळे ठोकून त्या चित्रासाठी भिंतीवर जागा तयार करतात! किशूच्या घरी मांडीत लेकराला घेऊन बसलेली आई आणि मोहनच्या खोलीतल्या भिंतीवर सामुहिक नृत्य करणारे वारली युवक युवती हसतमुखाने विराजमान झाले आहेत !