श्राद्धाच्या अभ्यासाच्या औचित्याने तीर्थक्षेत्र महत्व,तीर्थक्षेत्री श्राद्ध व त्याचे महत्व असे विषय वाचनात आले.त्याचा माझ्यापरीने मी अर्थ लावायचा प्रयत्न केला तो असा.या सर्व संकल्पना उदयाला आल्या त्यावेळी असलेली भौगोलिक परिस्थिती,निसर्गाची आणि माणसाची समरसता,भौतिक गोष्टींची (आजच्या तुलनेत)कमतरता,एकत्र कुटुंबजीवनशैली ,कृषीचे महत्व आणि विभिन्न समाजघटकांनी एकमेकांच्या हाती हात घालून पुढे जाणे.
भारतावरील बाहेरील आक्रमणे विचारात घेता यात ढवळाढवळ नक्की झाली पण तरीही हे सारं एकजिनसी असल्याने ते टिकून राहिलं.संघर्षातही जनमानसांच्या मनात जपलं गेलं.
पाप पुण्याच्या कल्पनांनी आणि कर्माच्या सिद्धांताने तीर्थस्थानांकडे जाण्याची ओढ वाढली.अपुर्या किंबहुना फारशा सुविधा नसताना वनातून,आडवाटातून,डोगरांमधून वाट काढीत इच्छित स्थळी पोहोचण्याची अनाम ओढ माणसाला व्यक्ती म्हणून नक्कीच समृद्ध करणारी ठरणारी असेल.आणि म्हणूनच कदाचित या सार्या दिव्यातून सुखरूप परतल्यानंतर मावंदं घालून ईश्वराप्रती कृतज्ञता व कुटुंबासह आनंद घेण्याची पद्धती रूजली असावी.
तीर्थावर श्राद्ध केल्याने गेलेल्याला काही मिळेल? माहिती नाही.पण माझ्या आप्तजनांसाठी काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मला मिळेल.स्थानिक पुरोहितांच्या उदरनिर्वाहात माझ्या दानाने,दक्षिणेने भर पडेल.दिवंगताचे श्राद्ध करताना माझं आयुष्य मी कसं घालवलं? आता कसं आहे? पुढे कसं जाईल?त्यासाठी मी काय करायला हवं? याचा हिशेब मांडण्याची संधीही मानवी मन घेत असेल!
तो वैनतेय! एक महत्वाची जबाबदारी त्याच्या पंखावर घेत उडला.त्या जबाबदारीला अर्थ होता.सद्गुणांच्या जोपासनेची एक भूमिका त्याला बजावावी लागली.तो ही कोणत्या तरी क्षणांना थकला! आणि मग त्याने एक क्षणांचा break घेतला.आपणही थकतो नं गरूडभरारी घेताना... मग एक pause हवाच.पण तो pause ही बहुजनमनाची श्रद्धा वाढविणारा,आस्था जपणारा ठरावा.समाजाला मूल्ये,परंपरा,आस्थांची जपणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणारा व्हावा.
दानं संविभागः। असं म्हणत धर्मशास्रकारांनी गृहस्थ आणि गृहिणीवर समाजव्यवस्थेची जबाबदारी सोपवली आहे.सामाजाच्या दूर दूर कोपर्यात आपल्या उपासना सांभाळत जीवन व्यतीत करणारे जे कुणी,त्यांच्याही जगण्याची काळजी काही अंशी मी घ्यावी.रोज नाही मला त्यांना भेटता येणार पण तीन चार वर्षातून एकदा मी जावं आणि पहावं की ते काय करतात! सरधोपट आयुष्याचा अनुभव घेताना हे असं काही पाहिलं की आपली कुरकुर बंद होते आणि आपण highly privileged आहोत हे ही समजतं.त्याने ते स्वेच्छेने स्वीकारलेलं असलं तरी ते सोपं नाही हे ही कळू लागतं.
विविध उपासनापंथांचं दर्शन घडणे,ज्या संसारी जगातून आपली सुटका अटळ त्यापासून काही दिवस मोकळीक व थोडे व्रतस्थ राहून स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी कुंभमेळा देत असावा!
अमावास्येचं महास्नान! ती काळी असते कारण त्या रात्री चंद्र आपल्याला दिसत नाही,पण तो असतो! त्यामुळे अशा काळ्यारात्रींच्या निमित्ताने दिवसा नदीमातेच्या कुशीत पावन व्हावं,दुसर्या दिवशीची प्रतिपदा मनात ठेवूनच!
ज्यांचं आयुष्यच पुण्यसलिलेकाठी जात असेल त्यांना नदीत स्नान रोजचंच! पण तीर्थाचं महत्व म्हणूनच अधोरेखित झालं असावं! नाव घेऊन तुमचा नावाडी तिथे येईल आणि तुम्ही तिथे नावेत बसाल ते तीर्थ,ती जोडणी.
मनामनांची,समाजघटकांची,जीवाशिवाची अशी जोडणी... आणि त्यासाठी महाकुंभ!
घटाकाशातून महाकाशात विलीन व्हायचंच आहे कधी ना कधी,आपलाही घडा फुटेलच आज ना उद्या पण त्यापूर्वी अमृताचे चार थेंब आपल्यावरही शिंपडून घेऊ! तो परमेश्वरी आशीर्वादाचा कुंभ सर्वांना पावन करो!



