Thursday, 11 July 2019

आषाढी

एक अनामिक ओढ#आषाढी एकादशी#
माझ्या आजोळच्या कुटूंबात वारीची परंपरा आहे. माझे पणजोबा ज्यांना "राया" म्हणत असत ते वारीला जायचे असं ऐकलं आहे. कितीही पाऊस असला तरी ते वडाळ्याच्या विठोबाच्या दर्शनाला जात असत ही मावशीने सांगितलेली आठवण.
दादरला बालपण गेल्यामुळे आषाढी आणि वडाळ्याचा विठोबा जो प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जातो त्याचं दर्शन हे समीकरणच जुळलेलं!
ती जत्रा आजही आठवते. मला तेव्हा विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा वर्षातून एकदा भरणार्‍या त्या जत्रेचीच ओढ जास्त असायची.
फुगे पिपाण्या,चित्र बदलणारा कॅमेरा,गुलाबी म्हातारीचे केस असं काय काय असायचं.लाकडी तलवार,गदाही असेच. त्यावेळी हीमॅन स्पायडरमॅन यांचे  कागदी मुखवटेही मिळत.
उपवासाची खिचडी प्रसाद म्हणून वाटली जाई.भर पावसातही रेनकोट छत्री वागवत अर्धवट भिजत आम्हीही जात असू.
मोठी झाल्यावर तुका म्हणे देह भरिला विठ्ठल हे बाबांच्या निरूपणात कधीतरी ऐकलं!
मग संतांच्या अभंगातून विठोबाला शोधत राहिले.
आणखीन समज आल्यावर वारीला जाणार्‍या वारकर्‍यांच्या स्वरात,मृदुंगात,डोळ्यात विठ्ठलाची ओढ दिसायला लागली. प्रबोधिनीत दरवर्षी होणार्‍या भजनांच्या सुरावटीतही विठ्ठल भेटू लागला.
काव्यातून,लेखनातून म्हणजे गद्यातून आणि पद्यातूनही पांडुरंग पाझरु लागला.
इतकी स्थित्यंतरं झाली तरीही आजही त्याला भेटण्याची ओढ अनिवार!
आषाढीच्या काळ्या ढगात तो भेटेल, भक्तिभावाचा वर्षाव करीत सर्व जग आनंदाने भरून टाकेल,भारून टाकेल.
तुमचीही विठ्ठलाची ओढ अशीच कायम राहो.
शेवटी काय काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ही चिरंतन आणि शाश्वत ओढ आहेच प्रत्येकासोबत...


Wednesday, 3 July 2019

मेघदूत

आषाढाचा पहिला मेघ
मनामनात बरसला
विरही जीवांना प्रेमाचा
दिलासा देऊन गेला!
त्याच्या दर्शने विरही यक्ष
आनंदित झाला
अलकानगरीतील प्रियेला
संदेश पाठविला!
सरुनी गेली शतके तरीही
प्रीत तीच आहे
आषाढाचा मेघही
तसाच बरसतो आहे!


चाळिशी

दर महिन्याला नियमित भेटणारी ती... आपली मैत्रीण... येते,भेटते.. काहीवेळा छान वाटतो सहवास तर काहीवेळा नकोशी वाटते तिची भेट!
आता मात्र ती नियमित भेटणं हळूहळू कमी करते! मनात येईल तेव्हा यायचं.. कधी कडकडून.. इतकं की जीव गुदमरावा तर कधी इतकी रूक्ष की तिच्या तटस्थपणाचं आश्चर्य वाटावं!
मग कळतं की अरे पाहता पाहता चाळिशीला आलो की आपण!!!
तरीच हिचे मूडस् आता हळूहळू बदलायला लागले आहेत.
पण या मैत्रीणीला सांभाळणं ही आता तारेवरची कसरत होऊ लागते!
काहीवेळा असतं नं एखाद्या जीवलगाबाबत! सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही! अगदी तस्सचं!
या टप्प्यात आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी,घरातली कामं,इतकंच काय लाडक्या लेकराचा आवाजही सहन करू देत नाही ती!
सतत तिचंच ध्यान करावं लागतं.
ती आली तेव्हाही अशीच आली आणि आता पुढच्या काही वर्षात मी निरोप घेणार तुझा असा सांगावा आता घेऊन आली आहे.
या मैत्रिणीने जाणीव करुन दिली कधी माझ्या मी पणाची!
स्वतःच्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावत तिने मला मोठ्ठं केलं.
पण आता मात्र ती मला नव्या वळणावर नेऊन सोडते आहे!! हळूहळू, चाहूल देऊ लागली आहे!
सांभाळ! अणखी काही वर्षांनी तुला तुझं अस्तित्वं नव्याने सिद्ध करावं लागेल.स्वतःला नवी ओळख द्यावी लागेल आणि ती स्विकारावीही लागेल!
मी मात्र जाईन निघून तुला पूर्णत्व बहाल करुन कायमचीच!


राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...