Wednesday, 27 June 2018

शोध.... आपला

काय शोधते आहे,कुठे आणि का शोधते आहे  कळत नाही आहे मला!
हिरवाईच्या पात्यात सापडलास असं वाटलं पण जवळ गेले तर तो होता पावसाचा टपोरा थेंब!
विसावला माझ्या बोटाच्या पेरावर अलगद आणि क्षणात गुडूपही झाला तिथेच.
काळ्या ढगांच्या सोनेरी किनारीत सापडशील असं वाटलं!
पण तिथे पाहत राहिले तर.... पावसाच्या मोत्यांच्या लडीच सोनेरी झाल्या अणि तुझं असणं त्यातच विरघळलं!!
शोधलं मी तुला माझ्या मनाच्या खोल खोल आत!
निर्मळ गाभार्‍यात.. जिथे फक्त तूच आहेस असं वाटलं...
पण नाही... तिथेही तू नव्हतास....
आहेस तरी कुठे???
का शोधते आहे मी तुला???
माझं असणं हेच जणू तुझं असणं आहे हे उमगलच नव्हतं मला!!
मग कळलं की मीही होते पात्यावरच्या थेंबात... ढगांच्या सोनेरी किनारीत....
आर्या

Tuesday, 26 June 2018

वटसावित्री....

सात जन्मांचं गणित मांडण्यापेक्षा सात वड रुजवूया!
त्यांना जोपासत आपण निसर्गरक्षण साधू या!!
सावित्रीचे वर्तन खचितच अनुसरूया!
संपत्तीला भुलण्यापेक्षा गुणांवर भाळूया!!
आख्यायिका सांगून जाती नवल नवल ते ऐकूया!
त्यामधला सघनपणा आपण मनात बिंबवूया!!
परंपरांवर निष्ठा ठेऊनी धर्म संस्कृती जगवूया!
जगता जगता निसर्गाशीही एकरूप होऊया !!
योगी सांगून गेले असती सावित्रीची महती!
तत्वज्ञानी अर्थ उलगडत आपण प्रगल्भ होऊया!!
एक तरी वड लावूया!! एक तरी वड जगवूया!!
आर्या

आठवणी दूरदर्शनच्या

काल खूप दिवसांनी युट्युबवर चाणक्य मालिकेचा भाग पाहिला. मन बालपणात गेलं. हल्लीच्या मुलांना खूप वाहिन्यांची उपलब्धता आहे.आंतरजालाच्या जंजाळात खूप माहिती चुटकीसरशी मिळते. पण जेव्हा हे नव्हतं तेव्हाही आपण दर्जेदार कार्यक्रमांनी समृद्ध झालो.
या सर्व मालिकांची शीर्षकगीतंही चपखल असत.त्यातील शब्दांना अर्थ असे जो मालिकेचा सूत्रविषय सांगून जात असे.
नुक्कड,बुनियाद, हमलोग हे तर होतच. पण मला आठवतं आजीबरोबर डाॅ.सरोजिनी बाबर आणि शांताबाई शेळके यांच्या गप्पांचा कार्यक्रम "रानजाई". लोकगीते,लोकपरंपरा,लोकसंस्कृती हे शब्दही मला माहिती नव्हते त्यावेळी हे मी ऐकलं आहे जे कुठेतरी बुद्धीने साठवून ठेवलं.
बाबांबरोबर पाहिलेलं चाणक्य,भारत एक खोज, अईबरोबर पाहिलेलं रविवारचं रंगोली!  मी कौटिलीय अर्थशास्र शिकले तेव्हा चंद्रप्रकाश द्विवेदीच समोर येत! Discovery of India वाचलं मोठेपणी तेव्हाही असच झालं.
आणि या सगळ्यात कडी म्हणजे सुरभि. रेणुका शहाणेचं गोड विलोभनीय निवेदन आणि सिद्धार्थ काक यांचा आवाज. रेणुकाच्या साड्या आणि दागिने हेही तेव्हा लक्षात रहात असत. आशय तर समृद्ध करून गेलाच.
दूरदर्शनची मोहिनी आजही मनावर राहिली ती याचमुळे. रामायण, महाभारत आणि मिले सुर मेरा तुम्हारा यासाठी रविवारची वाट पाहिली जायची.त्यातही मज्जा होती. सातच्या बातम्यांची धून तर आजही कानात आहे.
एकूणातच ज्या दूरदर्शनला आता फारसं कुणी विचारतही नाही तो माझ्या मनात मात्र नक्की आहे.
आर्या.

Sunday, 24 June 2018

हिरवाईची काकणं


लाल मातीच्या ओल्याकंच स्पर्शात नांगर पहुडला आहे.त्याचीही आहे ही विश्रांतीची वेळ! आकाशातून कोसळणार्‍या सरींच्या सहवासात महिलांच्या हातातली काकणं वाजत आहेत. भातलावणीची लगबग सुरु आहे. चिखलात प्रसन्न मनाने काम करणार्‍या निळ्या इरल्यांच्या आत बसून हात चालवत  या मावशी मधेच काहीबाही बोलत आहेत,एकमेकींशी आणि मधेच आमच्याशी. वर्षभराच्या भाताची बेगमी.अपार कष्टातलं हे आयुष्य! पण निसर्गाच्या साक्षीने तेही साजिरं होतं.खुलून दिसतं.कष्ट करणारे हात त्याचा आनंदही घेतात.
हे सगळं मी लांबून पाहते किंवा माझ्या साहित्यिक आणि शहरी मनाने पाहते म्हणून मला ते फक्त पाहताना त्यातले कष्ट जाणवत नाहीत. मी अनुभवते फक्त तो सोहळा.सर्जनाचा, संस्कृतीचा आणि जगण्याचा!!
निसर्गाच्या कुशीत जगणं वाटतं तितकं सहज नाही याची प्रचिती यातून येते. फक्त या हंगामासाठीच वर्षभर बैलजोडी सांभाळणारी मंडळी इथे मी पाहिली. या सगळ्यात अख्खं घरदार दिवसभर शेतात राबतं. मला या सगळ्यात सापडत गेलं आहे निसर्गाचं हिरवेपण.गडद हिरवं,लुसलुशीत पोपटी. मावश्यांच्या हातातली हिरवी काकणं या हिरवाईत खुलतात!फुलतात!सजतात आणि नव्या पिकाची वाट पाहतात दरवर्षी नव्या उमेदीने....
आर्या


Tuesday, 19 June 2018

2017 ची आषाढी वारी

‌परब्रह्म भेटी लागी..... कालची सकाळ मी भवानी पेठेत घालवली.मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी करतात तरी काय ही उत्सुकता होती, ती काल पूर्ण झाली. शितलादेवी चौकापासून उभे असलेले दिंड्यांचे रथ गर्दीची जाणीव करून देत होते. दुतर्फा वारकरी महिला पुरुष फिरत होते. चौकाचौकात गप्पांचे फड रंगले होते.सेवेची संधी घेणारे काही डाॅक्टर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वारकर्‍यांचे उपचार करत होते.काही युवक दुखर्‍या पायांना मसास करुन देत होते आणि त्याचं समाधान वारकर्‍यांच्याचेहर्‍यावरच दिसत होतं.अनेक मंडळांनी न्याहरी,भोजन यांची व्यवस्था केली होती.दिंडीच्या ट्रकमधे काहीजण विश्रांती घेत होते. एके ठिकाणी दिंडीतील काही लोक एकत्र बसून हरिपाठ गात होते.किनरा आवाज,पखवाजची साथ,टाळांचा नाद यामुळे वातावरणात भारलेपणा होता.एका दिंडीच्या अधिपती एक महिला होत्या.त्यांनी फार हौसेने माझ्याकडून स्वतःचे फोटो काढून घेतले.निवडुंग्या विठोबा मंदिराच्या परिसरात एका पक्षातर्फे अभंग गायनाचा कार्यक्रम योजला होता.रस्त्यावर थाटलेल्या बाजारात तर काय मजा होती.गुलाल बुक्काविकणारे,तुळसीमाळा विकणारे,गुलशन कुमारच्या जुन्या भक्तिगीतांचा video दाखविणारे दुकानदार! बॅगेची चेन लावणे,चष्मा दुरूस्ती, बांगड्या भरणे,गोंदवून घेणे असं काय काय होतं त्या जगात!टोप्या आणि खणाची कापडं,रंगीबेरंगी माळा,पिशव्या अशी रंगांची दुनिया.हार तुरे फुलं गजरे यांचं सुगंधी आणि मन मोहवणारं विश्व, खेळणी फुगे यांचं चिमुकलं भावविश्व ! गंधाचं नाम लावणारे तर अनेक जण फिरत होते. वाळत घातलेले कपडे, अंघोळी,मुक्कामाच्या जागेची स्वच्छता अस बरच काही happening world  होतं ते.आणि या सगळ्यात कुठे होता तो पांडुरंग? मला दिसला तो..... कुठे माहिती आहे? एका चिमुकल्याच्या निरागस डोळ्यात.त्याला माहितीही नसेल की आपण कुठे चाललो आहोत?डोक्यावर रिबीनीच्या तुर्‍याचं  टोपडं घालून काजळभरल्याडोळ्यांनी तो हे जग अनुभवत होता.मला तो भासला पिंपळपानावरचा बाळकृष्णच!शेवटी तत्व एकच आहे नं व्यापून.परब्रह्माच्या भेटीला निघालेलं हे चिमुकलं परब्रह्म !!!!

Saturday, 16 June 2018

प्रिय बाबा

तुमच्या खांद्यावर बसवून उंच नेलंत तुम्ही मला
तिथून दिसायचं सगळं जग खुजं!
तुम्ही नेलत मला हाताला धरून समुद्रात
तिथे कधीच सरकली नाही माझ्या पायाखालची वाळू!!
तुम्ही न्यायचात मला मंदिरात नमस्कार करायला
पण देव तर साक्षात् माझं बोट धरूनच असायचा!!
तुम्ही शिकवलत मला अक्षरलेखन हाताला धरून
पण तुमचं अ-क्षर प्रेम कधीच शिकावं लागलं नाही मला!!
तुम्ही भरलेत सूर माझ्या कंठात
त्याच्या स्वर्गीय वर्षावात चिंब भिजले मी!!
तुम्ही दाखवलात मला 'समाज'
आणि वाढवलीत माझी "समज!!
तुमचं अस्तित्व गेलं आहे मिटून भूतलावरचं
पण माझ्या मिटलेल्या डोळ्यातल्या अश्रूत दडला आहात तुम्ही शाश्वत.... माझ्या मिटण्यापर्यंत
आंदू

ईद मुबारक


ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरीयत कायद्यातील मापदंड आहे.
विकिपीडियाच्या या लेखाच्या निमित्ताने मला थोडंफार समजलं हे.ते कदाचित चुकीचंही असू शकेल.पण शेवटी काय आनंद देणं आणि आनंद घेणं हेसर्वच ठिकाणी महत्वाचं मानलं आहे.सांप्रदायिकतेच्या तथाकथित विचारांच्या पलीकडे जिऊन आनंदाने केलेले परस्पर शुभचिंतन तुपात खमंग परतलेल्या सुकामेव्यासारखे आपले आयुष्यही समृद्ध करेल.

Tuesday, 12 June 2018

नितळ निवळ निखळ

मनतळाच्या आत  झिरपलं आहे संचित कोवळं
कधी शहाणं तर कधी खुळं!!
निखळ नितळ आणि निवळ!!!
त्या संचिताची फुलं झाली आणि निळ्याशार डोहात तरंगली!
त्यांचा गंध,त्यांचा रंग उमटला आहे मनावर अलगद!
 सांभाळायचा कसा हे मात्र नाही आहे उमगत!!!
आर्या

Sunday, 10 June 2018

पाऊसस्वप्न


पाऊस पडतोच आहे
झाडं त्याच्या थेंबात निथळत आहेत!
ढग खाली उतरले आहेत
झाडांशी गप्पा मारत आहेत!!
कसं वाटतय रे आता छान अंघोळ झाल्यावर??
मस्त तजेलदार!!
आणि तुम्हाला कसं वाटतय रे?
हलके झालो आहोत आणि भेटायला आलो आहोत तुम्हाला!!
हे छानच झालं बरं का आपलं!!
हा जो कोसळतो अहे नं आपल्या धुंदीत त्याचं निमित्त आपण दोघेही आहोत खरं तर!
त्यामुळे तोच घडवतो भेट आपली अशी दरवर्षी!
म्हणूनच या भेटण्यात गंमत आहे
आनंदाची ओलीशी ऊब आहे!!
तो येतो म्हणून सुखावतो आपण दोघेही!
तुम्ही अंघोळ करून आणि आम्ही तुम्हाला अंघोळ घालून!!
मी ऐकते आहे त्यांचं हे गुज!
पण फक्त मलाच ऐकू येतं आहे वाटतं ते!!
कारण मी ही आहे त्यांच्यातलीच एक.
एक मला सावली देतो छानशी आणि दुसरा देतो मऊमऊ कापसाची उशी!!
हे घेऊन मी सुस्तावते छान आणि पाहत राहते मग पाऊसस्वप्न!!
तेही नेतं मला मग पावसाच्या गार गार घरात
आणि तिथून पाहते मी धरित्रीच्या सुखावण्याचा सोहळा आणि ऐकते गुबगुबीत मऊशार कापूसलेल्या हिरव्याकंच गप्पा माझ्या ढगांच्या आणि माझ्याच झाडांच्या!!


Thursday, 7 June 2018

माती...


मातीलाही वळण लावावं लागतं!
तिच्या गारव्यात आपणही सामावायला लागतं!
लेपून तिला सारवायला लागतं!
थोडंसं कणखर होऊन दाबावंही लागतं.
तिचं मऊपण झेलतं हे सगळं सांभाळावं लागत.
अधूनमधून तिला गोंजारावही लागतं.
त्यानंतर उमटते तरल नक्षी
दिसत नाही थेट  पण जाणवते नेत्रस्पर्शी!
आरशासारखी प्रतिबिंबित करते आपलं असणं तिच्यामधे!
मृद्गंधाचे आवर्त उमटवते मनामधे!!!

Monday, 4 June 2018

फेसबुक कथास्पर्धा

स्वप्नभरल्या डोळ्यात नीज उतरली होती.हळूहळू ती नीज तिला स्वप्नांच्या राज्यात घेऊन गेली.एक उमदा युवक तिथे सामोरा आला.मऊमऊ बिछान्यावर एक शुभ्र मखमली पोशाख, सुंदरशा दोन अंगठ्या,स्वप्रांसारखाच गंधित पुष्पगुच्छ, आणि  सामावलेली नाजूकशी डबी!!
आश्रमाची पहाटेची घंटा झाली आणि तिला जाग आली.आज तिचा साखरपुडा होणार होता.आदिवासी आश्रमशाळेत राहून शिकलेल्या आणि जगाला शिकवण्याची इच्छा असलेल्या त्या युवतीला एक सुशिक्षित युवक आज त्याच्याआयुष्याची सहचरी म्हणून स्वीकारणार होता.
आर्या जोशी

आमचं पाऊसगाणं


झाली पिसे स्वच्छ,अंगधुणं झालं!
आकाशाच्या घराचं अंगण चिंब झालं!!
सूर्य आज आलाच नाही विचारून आलो त्याला!!
तुमच्या पिसातच लपलो आहे की म्हणाला तो आम्हाला!!
रोज बडबड आम्ही  करत असतो खूप!
आज तारेवर बसून पाऊस पितो आहोत गुपचूप!!
काही मित्र उडत आहेत,काही किडे शोधत आहेत!
आमचे मात्र सगळे उरकून ध्यान आता लागते आहे!!
डोळ्यासमोर दिसते आहे अथांग पावसाचं घर!
आमचंही मन भिजलं आहे भिजल्या रंगीत पंखभर!!
र्या

Sunday, 3 June 2018

विश्वकर्म्याचे वंशज


मी यापूर्वी कोणत्याही घराचं बांधकाम जवळून पाहिलेलं नाही.आता मी माझ्याच घराच्या बांधकामात व्यस्त आहे.यानिमित्ताने मला खूप भावलेली गोष्ट...
माझ्याभोवती आशुतोष आणि अनुज्ञा या दोनच उच्चशिक्षित व्यक्ती तिथे वावरत असतात.त्यांच्याशिवाय असणारी मंडळी तुलनेने अल्पशिक्षित पण हातात विलक्षण जादू असलेली.
आकारामदादाला तर सगळच येतं.विजेच्या उपकरणांपासून गिलावा करण्यापर्यंत सगळ्ळ्ं...
बाबूही तसाच.मुडी आहे पण करतो तेव्हा असं छान काम करेल!!
दोन दिवस सुतार काका आणि टीमने धम्मालच उडवली. ती सगळी धावपळ आणि पावसाच्या गोंधळात काम पूर्ण होण्याची धांदल शब्दातीत आहे.काय फिरत होते हात करवतींवर.मला साधा कागद कापता येत नाही कात्रीने आणि त्यांच्या हातातून निर्जीव लाकूड छान रूप घेऊन साकारतं! माझी त्यांच्या हातांच्या हालचालींवर नजरच ठरत नव्हती.
कोणतंही काम दुय्यम नसतं हे खरच आणि हे असं काही जवळून पाहिलं की समजतं की या अशा कामांचं आपल्या आयुष्यात केवढं महत्व आहे!!!
आमच्या मावश्याही छान गिलावा करतात.निर्जीव भिंत बोलायलाच लागते आपल्याशी.
जगण्याचं हे धर्मशास्र आता वाचायला मी शिकते आहे...
आर्या.

Saturday, 2 June 2018

संवाद पावसाशी


चहाचा गरम गरम घोट घेत मी निवांत बसली आहे खिडकीत
पावसात भिजणारी झाडं बघत.
घर भरलं आहे.
अंगण ओलेतं आहे.
परस भिजू भिजू आहे.
कुणी छतावर,कुणी वाशावर,
कुणी रंधा मारतं आहे.
कुणी मालकाशी घराच्या पावसाच्या गप्पा मारत आहे.कुणी माती भिजवीत आहे,कुणी लिंपण करीत आहे
मी या सगळ्या दृश्याकडे पाऊसभरल्या डोळ्यांनी पाहते आहे.
पाऊस पुन्हा सांगतो आहे मी आता रोज येणार आहे
तुला आणि मला रोज भेटायचं निमित्त मी शोधतो आहे!!
रोज रोज भेटू गप्पा मारू ओले होऊ थोडेसे!
तू मला आणि मी देईन तुला आभाभरले कानोसे!!!
आर्या

पाऊस पाऊस

नभ भरून भरून
आला पाऊस पाऊस!
वीज नाचते आकाशी
नको पाहूस पाहूस!!
आठवांचे क्षण झाले, ओलेते ओलेते!
माझ्या डोळ्यात भरून, सांडले वेडे ते!!
कसे त्यालाही कळले ,माझ्या मनीचे हे गुज!
आकाशीच्या चांदण्यांना ,त्याने लपविले आज!!
अशा पावसाला कसे, थांबवू कळेना!
आठवांच्या  वादळात ,कशी सावरू सुचेना!!
आर्या.

Friday, 1 June 2018

डोंबिवली पौरोहित्य व्रत संस्कार शुभेच्छा


स्वीकारिले व्रत! घेतलो तो ध्यास!
पूर्ण झाली आस! ईशकृपे!!
सातत्याची फलश्रुती! अभ्यासाची परिपूर्ती!
साफल्याची प्रचिती! आली आता!!
मार्ग नसे खचित सुकर! आचरू तो जोडूनी दोन्ही कर!
जीवाशिवाच्या मेळणीचा वर!! मिळवू आता!!
दीक्षित होऊ, होऊ आम्ही आर्य! सातत्याने पुढे चालवू हे कार्य! मनी धरू आज्ञा शिरोधार्य ! आचार्यांची!!
शुभेच्छांसह... आर्या.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...