Friday, 30 March 2018

बहाव्याचा घोस
नाजुकशा मऊसूत पाकळ्यांना बहरण्याची हौस!
झळाळत्या सोन्याने  दिला आपला रंग!
वार्‍यावर डोलताना स्वतःतच हा दंग!!
पोपटी हिरव्या पानांची याला आहे सोबत!
निसर्गाच्या हळवेपणाची हीच तर आहे गंमत!!
  बहर याचं संपूच नये असं दाटतं उरी!
निसर्गाच्या कलाकृतीची ही तर माया खरी!!
घोस साजिरा डुलतो आहे देता देता आनंद!
सृजनाच्या नवपंखी उदरी दडला स्वानंद!!!
आर्या

Wednesday, 28 March 2018

पुस्तकांच्या सहवासात


खूप खूप दिवसात अभ्यासाखेरीज पुस्तक वाचलं नव्हतं.म्हणजे असं पुस्तक वाचलं नव्हतं की जे वाचून जीवाची काहिली,बुद्धीची  रस्सीखेच आणि शरीराची धावपळ थोडी थंडावेल.आमची प्रबोधिनीची लायब्ररी मस्त आहे.तिथले ओंकारदादा आणि सीमाताई मला पुरते ओळखून आहेत.खंडीभर पुस्तक नेणारी लबाड ताई आली असं बहुधा मला पाहून त्यांना वाटत असणार.पण ते व्यक्तिशः माझ्या वाचनप्रेमातले महत्वाचे वाटेकरी आहेत.

वेगळं काहीतरी हवं आहे म्हटल्यावर गोनीदांचं कृष्णवेध दादाने हाती ठेवलं.गोनीदा हे साहित्यिक पेक्षाही मला एक गोड आजोबाच वाटतात नेहमी.कधी आपल्याला गडकिल्ल्यांवर फिरवतात तर कधी नर्मदा परिक्रमेला नेतात.त्यांच्या पुस्तकांची पारायणं केली आहेत मी.त्यांची मृण्मयी तर शाळकरी वयातच माझी मैत्रीण झाली नव्हे कोण्या एका  साजिर्‍या क्षणी तिच्या माझ्यात असलेल्या साम्याबद्दलही कोणी मला जाणीव करून दिली आहे! आपण किती नशीबवान आहोत की अशी मंडळी आपल्या लेखनातून आपल्याला भेटतात.त्यांची पुस्तकं दरवेळी नव्यानेच भेटतात आणि नवं काहीतरी शोधायला मदत करतात आपल्यातलचं! गुगल बुक्सच्या जमान्यातही हाती असलेलं असं पुस्तक वाचण्याची गंमत न्यारीच आहे.ती यांत्रिक पुस्तकं "बोलत"नाहीत असं वाटतं मलातरी.त्यामुळे दुर्गा भागवत,पुल,गोनीदा अशा आजीआजोबांच्या कुशीत बसून त्यांचे हात डोक्यावर फिरत असल्याचा भास व्हायचा असेल तर त्यासाठी हाती पुस्तक घेऊनच वाचायला हव. शेवटी आईच्या हातचा  साजूक तुपातला शिरा आणि तयार विकत पिझ्झा यात फरक असतोच की!आर्या जोशी

माझी कविता

कधी कधी भेटतात माणसं आयुष्यात, स्वतःच्याच बेहोशीत जगणारी!
त्यांना नसते तमा दुसर्‍याच्या मनाची.... असं समजतो आपण!
पण चुकुन कधीतरी अनुभवाला येतो अशांच्या मनाचा हळवा कोपरा...
थक्क होतो आपण आपल्याच नकळत अनुभवून असं काही!
मनातलं नकळत दिसतं जेव्हा डोळ्यात,खोल गहिर्‍या डोहात..
त्या डोहातल्या काळ्याकुट्ट भासणार्‍या जळात हळूच टपकतं एक फूल...फांदीवरुन
आणि होऊन जातो तो गंभीर डोह तरल,गंधीत आणि सांगून जातो मनीचं कूज!
कदाचित कृष्णाच्या पाव्याचाही असाच असेल का गहिरा रंग??? जो छेडत असेल सुमधूर तान गंधीत स्पर्शाने नटलेली??

होळीची कविता


गोकुळातल्या कृष्णसख्याला राधा देते हाक!
होळी करूनी दुर्जनांची स्री मर्यादा राख!!
बेचिराख ती होऊनी जावो जगतातील लाचारी!
भ्रष्टाचारे जगती त्यांची जळू दे मक्तेदारी!!
अग्नीच्या त्या पावन स्पर्शे मन बुद्धी होई शुद्ध!
त्या लखलखत्या तेजतपाने करू स्वतःला सिद्ध!!
पवित्र रक्षा माखूनी घेऊ दुसर्‍या दिवशी होळीच्या!
त्या रक्षेने कृतार्थ होऊ रोवू पताका कीर्तीच्या!!
‌वसंतातला रुतू सुखाचा माखून  येईल रंग!
शीतलकारी जलाभिषेके जीव होऊदे दंग!!
रास अशी ही तुझी रचाया पाच दिवस सौख्याचे!
पौर्णिमेच्या चंद्रसाक्षीने जीवन उजळवण्याचे!!आर्या.

महिला दिनानिमित्त


अचानक वाटेवर पडलेलं दिसलं लाल चाफ्याचं फूल!
भर उन्हातही त्याच्या लाल गुलाबी  अन्  गंधाळलेल्या कांतीने पाडत होतं भूल!!
महिला दिन आला आहे नं असं म्हणालं मला!
आश्चर्यच वाटलं मला त्याच्या या प्रश्नाचं?
का गं? पेचात पडलीस? म्हणालं मला!!
मी पहा,झाडापासून गळून पडलो ,लांब येऊन पडलो कुठेतरी
पण माझा रंग गंध पोत आजही टिकून आहे!
निसर्ग त्याची किमया दाखवेलच आता माझ्यावर त्यामुळे माझं कोमेजणं अपरिहार्यच गं!
पण तरीही झाडाला बिलगलेलं असतानाचं माझं अस्तित्व आजही तसच आहे माझ्या हृदयात!
‌त्यामुळे निसर्गाचे आघात,रस्त्यावरची वाहनं,गर्दी,मला तुडवून जाणारी माणसं या सगळ्यातही मी सांभाळलं आहे माझं "मी"पण!!!
केवळ एक दिवसच स्वतःचं आत्मभान जगण्यापेक्षा मी रोजच जगेन माझं मीपण! माझ्याच आनंदात आणि असच मिसळून जाईन मातीत अलगद! पण तेव्हाही त्या मातीला देईन माझा मऊ कोमलसा आणि गंधाळलेला नाजूक गुलाबी रंग!!! जो राहिल कायम धरित्रीच्या कुशीत! तिचीही कूस गंधाळून टाकत!! आर्या.


राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...