Tuesday, 17 February 2026

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. 
प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी 

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र  हा भारतीय इतिहासातील मानबिंदू समजला जातो. त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेण्याच्या कार्यात अनेक अभ्यासकांनी संपूर्ण जीवन समर्पित केले आहे.  अजूनही नवनवीन अभ्यासक शिवचरित्रातील नवनवीन दुवे  शोधून त्यावर संशोधन करीत आहेत.  महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा पट विचारात घेणे ही एक प्रदीर्घ साधन आहे त्यामुळे ज्या घटनेमुळे शिवाजी महाराज छत्रपती झाले त्या राजाभिषेकाच्या निमित्ताने दिसून येणारे त्यांचे काही पैलू सदर निबंधात मांडण्याचा  प्रयत्न  केला आहे.यासाठी राजभिषेक पोथीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि नेतृत्व या विषयाचे पैलूही अभ्यासले आहेत.

 नेतृत्व ही एक सशक्त संकल्पना आहे. समाजाचे आणि राष्ट्राचे भवितव्य घडविणाऱ्या नेतृत्व पद्धतीवर अलीकडे विशेष अभ्यास केला जात आहे.  नेतृत्व या संकल्पनेमध्ये वेगवेगळे पैलू सामावलेले आहेत जे छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात.  त्यामुळे तरुण पिढीतील युवक -युवतींना मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी असे जे शिवरायांचे पैलू राजाभिषेकाच्या निमित्ताने दिसून येतात तेवढ्याच पैलूंचा विचार या निबंधात केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वश्रुत आहे तो समाजासमोर ठेवण्यासाठी अनेक अभ्यासकांनी उपलब्ध ऐतिहासिक साधनांचा पुरेपूर वापर केला आहे आणि शिवरायांचा जीवनपट नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे.  या ऐतिहासिक पुराव्यांमध्ये काही त्रुटी, दोष असू शकतात अशी शक्यताही अभ्यासकांनी गृहीत धरली आहे त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या, पुस्तक रूपाने प्रकाशित साहित्याचाच वापर सदर अभ्यासासाठी केला आहे. 

राजाभिषेकाच्या घटनेचे परिशीलन  करण्यापूर्वी शिवपूर्व काळातील परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.  प्राचीन भारतातील शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक संपन्नता यामुळे विविध वंशाचे विदेशी लोक भारतात प्रवेश करते झाले.  तत्कालीन सामाजिक व्यवस्थेनुसार चातुर्वर्ण्यात ते कोठे ना कोठे सामावले गेले असतील पण इस्लामी परंपरेचा भारतात प्रवेश झाला आणि भारतवर्षात उलथापालथ झाली.

इसवीसन १५२६ च्या आसपास मुगल सम्राट बाबर याने साम्राज्य स्थापन केले. अकबराकडून साम्राज्याचा विस्तारही झाला.  या साम्राज्य विस्तारात भारतीय हिंदू प्रजेवर अत्याचार झाले.  हिंदू धर्म संकटात आला.  मोगलांनी आपल्या नावाची नाणी प्रचारात आणली.  आपल्या नावाचा खुलता मशिदीत वाचण्याचे बंधन घातले.  प्रादेशिक राज्य नष्ट करून स्वतःचा सर्वत्र अंमल प्रस्थापित केला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याला आव्हान देणारे एकही स्वतंत्र राज्य हिंदुस्थानात नव्हते. शिवजन्मावेळी विजापूर गोवळकोंडा व अहमदनगर या तीनच शाही अस्तित्वात होत्या.  निजामशाहीसाठी शहाजीराजांची  धडपड चालू होती.  या सर्वात मोगलांचे वर्चस्व निर्विवाद होते.  मुघल सत्ता मदांध आणि असहिष्णु  होती .  तिच्यासमोर हिंदुस्थानातील प्रजा केविलवाण्या परिस्थितीत जगत होती. त्यामुळे या विपरीत संघर्षमय  परिस्थितीचा  अत्यंत धीरोदात्तपणे व आत्मविश्वासाने सामना करून धर्म संस्थापनेसाठी स्वराज्य स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य शिवरायांनी केले आहे आणि त्यामुळेच कृष्णाजी अनंत सभासद यांनी म्हटले आहे “या पृथ्वीवर सर्वत्र बादशहा असताना एक मराठी राजा छत्रपती झाला ही सामान्य गोष्ट झाली नाही.”

आनंद नाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ म्हणजेच६ जून १६७४  रोजी झालेली राजाभिषेकाची घटना ही एक केवळ धार्मिक विधीशी संबंधित घटना नाही. सार्वभौम स्वराज्याला अधिकृत नेतृत्व उपलब्ध करून देणारी ती एक क्रांतिकारक घटना म्हणावी लागेल.  अशा नेतृत्वाचे काही पैलू मानले जातात ते असे- मानव समूहाच्या दुःखाने अस्वस्थ झालेल्या मनाने त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी नव्या जीवन पद्धतीचा विचार रुजवावा ती पद्धत स्वीकारणार यांचे जीवन सुखी व आनंदी व्हावे यासाठी स्वतःच्या चिंतनातून प्रवचनांमधून स्वतः निर्माण केलेल्या सुसूत्र संघटनेमधून जो कामाला लागतो तो नेता. 
दडपशाही व जुलुमाने त्रस्त झालेल्या मराठी माणसाला स्वतःविषयी अभिमान वाटावा, त्यांना स्वतंत्रपणे मानाने जगता यावे याची तीव्र तळमळ शिवरायांना लागली होती.  त्यातूनच बालवयापासून त्यांनी उत्तम -उत्तम माणसे हेरून समाजातल्या सर्व स्तरातील सदस्यांना सोबत घेऊन संघटना निर्माण केली व बाह्य परिस्थितीशी प्रयत्नपूर्वक झुंज देत समाजावर नियंत्रण मिळविले.  पण ते नियंत्रण जाचाचे नसून त्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या आचारानुसार वागण्याचे स्वातंत्र्यही त्यात होते.

नेत्यांमध्ये आवश्यक गुणांमध्ये संवेदनशीलता, आकलन शक्ती, स्मरणशक्ती, प्रतिभा शक्ती ,दृष्टेपणा, विवेक, निर्णय शक्ती, निर्भयता, आस्था, निष्ठा, धैर्य, साहस, न्यायप्रियता, नम्रता, कृतज्ञता इत्यादी विविध पैलू असणे अपेक्षित असते. शिवरायांच्या संपूर्ण आयुष्यात हे पैलू विविध प्रसंगातून दिसतात व या सर्व पैलूंचा समुच्चय म्हणजे अंतिमतः स्वराज्य स्थापना आणि त्या निमित्ताने शिवराय छत्रपती होणे. 
परित्राणाय साधूनां विनाशाय  च दुष्कृतां। धर्म संस्थापनार्थाय संभावामि  युगे युगे।। यामध्ये 
श्रीकृष्णांनी सांगितलेले धर्म संस्थापनेचे सूत्र वास्तवात येण्यासाठी शिवचरित्रातील राजाभिषेकाची  घटना महत्वाची ठरते. 


शेतकरी ज्याप्रमाणे गवत काढून टाकून धान्य देणाऱ्या रोपांचे रक्षण करतो त्याप्रमाणे राजाने विरोधकांचा उच्छेद करून राष्ट्राचे रक्षण करावे हे स्मृति वचन शिवरायांनी तंतोतंत आचरणात आणले.  बाह्य परिस्थितीचे अचूक आकलन करून त्यादृष्टीने प्रजाहितासाठी  स्वराज्य स्थापनेचा शिवरायांचा विचार राजाभिषेकामागे दिसतो. भागवत धर्माच्या प्रसारामुळे मराठी प्रदेशात धर्म आचरण्यासाठी एकत्र येण्याची जी प्रथा सुरू झाली त्यामुळेच तो धर्म परकियांपासून रोखण्यासाठी एकजुटीने तोंड देण्याची कल्पनाही त्यातून निघाली.  एकत्र आलेल्या लोकांना चिरकाल एकजुटीने राहायचे असेल तर त्यांच्यात परस्पर विश्वास निर्माण व्हावा ज्यात  सर्वांचे कल्याण असेल.  शिवरायांनी स्वराज्य स्थापनेतून हे केले.  महाराष्ट्रातील जनतेला शिवरायांबद्दल नितांत आदर होता. असे असले तरी लहान-मोठे वतनदार जहागीरदार हे शिवरायांना राजा म्हणायला तयार होतेच असे नाही.  प्रजेच्या मनातील शंका दूर करून प्रजेला एकछत्री साम्राज्य देणे आवश्यक आहे हे शिवरायांनी अचूक ओळखले होते.  महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय, एकात्मतेसाठी छत्र सिंहासनाची  अधिकृत स्थापना ही आवश्यक बाब आहे हे शिवरायांनी हेरले व त्यातूनच राजाभिषेकाची कल्पना पुढे आली असावी.


राज्यकारभारातील काही तांत्रिक अडचणी पूर्णपणे सोडवण्यासाठीही एकछत्री अंमल गरजेचा होता. उदाहरणार्थ ब्राह्मण गुन्हेगाराच्या दंड शासनाचे वाद उपस्थित झाले तर शिवराय त्याचा निवाडा  करू शकत नसत कारण परंपरेनुसार अभिषेक्त राजा ते नव्हते . त्यामुळे अशा निवाड्यांच्या आज्ञाही ब्रह्मवृंदांच्या नावे निघत.  सारांश छत्र सिंहासनाची स्थापना करून सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अधिकार प्राप्त करणे हाही शिवरायांचा हेतू असावाच. या सर्व विचारातून परंपरेविषयी आस्था , आदर बाळगणारे सारासार विवेकशक्ती असणारे,  प्रजेप्रती निष्ठा असणारे आणि न्यायप्रिय शिवराय आपल्याला दिसतात. 

शिवरायांना राजाभिषेक करून घेण्याबाबत काही जाणकार मंडळींनी किंवा खुद्द विश्वेश्वर उर्फ गागाभट्ट यांनी सुचवले असे उल्लेख इतिहासात सापडतात. तथापि स्वराज्य विषयी प्रत्यक्ष आणि जागरूक असणाऱ्या शिवरायांच्या मनातही आधीपासूनच हा विचार असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. केवळ ऐतिहासिक पुराव्याअभावी त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही.  परंतु राजकारणात व समाजकारणात धोरणी व सजग  असलेल्या राजांनी हा विचार स्वतःपुरताच ठेवला असावा व योग्य  वेळ येताच आपल्या सहकाऱ्यांच्या विचारानुसार त्याची अंमलबजावणी केली असावी. शिवरायांचा राजाभिषेक ही केवळ एक लहानशी धार्मिक घटना नाही त्याला राजकीय व सामाजिक संदर्भही आहेत हेही विचारात घेणे आवश्यक आहे. कोणत्याही साम्राज्य सार्वभौम होण्यासाठी गरज असते छत्र, चलन व शकाच्या प्रारंभीची.  या तिन्ही गोष्टींवर राजांनी बराच काळ आधीपासून नक्कीच विचार केला असणार व नंतर योग्य संधी पाहून तो प्रत्यक्षात उतरविला असणार राजाभिषेकाच्या अधिकृत माध्यमातून.



राजाभिषेक विधीसाठी काशीचे विद्वान पंडित विश्वेश्वर उर्फ गागाभट्ट यांचे मार्गदर्शन घेण्यात आले यामध्येही काही प्रवाह आढळतात. शिवरायांची कीर्ती ऐकून स्वतः गागाभट्ट त्यांना भेटायला आले व त्यांनी महाराजांना
 राजाभिषेकाबद्दल सुचवले. राजाभिषेक करण्याचे निश्चित  झाल्यावर महाराजांनी धर्मशास्त्र पारंगत गागाभट्टांना अत्यादराने काशी येथून  पाचारण केले. राजाभिषेक विधीचे विविध पर्याय धर्मशास्त्रीय ग्रंथातून सांगितलेले आहेत. परंतु गागाभट्टांनी शिवरायांच्या कौटुंबिक, धार्मिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून मगच राजाभिषेक विशेष विधी तयार केला याबाबत अभ्यासकात एकमत आहे.  वस्तुतः स्वतः विद्वान पंडित असल्याने गागाभट्टांनी विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांचा साकल्याने अभ्यास करून शिवरायांचे  मौंजीबंधन , विवाह,प्रायश्चितरूप तुलापुरुषदान   व नंतर प्रत्यक्ष राजाभिषेक अशी योजना केलेली दिसते. यासाठी त्यांना याविषयीचा अभ्यास करण्यास पुरेसा अवधी लागला असेल हे गृहीत धरावे लागेल.  त्यामुळे राजाभिषेकाची कल्पना मांडली जाणे व ती प्रत्यक्षात येणे यामध्ये निश्चितच एक मोठा कालखंड गेला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही असे अभ्यासक म्हणून नोंदवावेसे वाटते. 
शिवरायांना राजाभिषेक होण्यापूर्वी त्यांच्या क्षत्रियत्वासंबंधी काही पेच प्रश्न पुढे झाल्याचे इतिहास सांगतो. यावेळी क्षत्रियांचे कलियुगात अस्तित्व नाही असे प्रतिपादन करणारा शूद्राचार्य शिरोमणी हा कृष्ण नृसिंह शेषाचा ग्रंथ व त्यातील विचार पुढे आला. शिवराय हे जिज्ञासू चौकस व नीतीप्रिय असल्याने आपले  क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी  शिवरायांनी उत्तर हिंदुस्थानात उदेपूर इत्यादी ठिकाणी  माणसे पाठविली व त्या प्रांतातील राजाभिषेक समारंभाची माहिती व भोसले कुलाची पूर्व पीठिका मागविली . 

स्वराज्याची जी गोष्ट करावयाची ती धर्मसंमत मार्गाने करण्याचा शिवरायांचा स्वभाव यातून दिसतो.गागाभट्टांनी आपल्या कायस्थ धर्म प्रदीप ग्रंथात म्हटले आहे की मोगलांच्या दक्षिणेतील  स्वारीत हिंदू स्वारही येत .. त्यांना रजपूत म्हणण्याचा प्रघात होता त्यामुळे सिसोदे वंशातील शिवाजी हे क्षत्रिय होत व त्यामुळे त्यांचा राजाभिषेक होऊ शकतो.  मात्र राजाभिषेकापूर्वी शिवरायांचा व्रतबंध (ब्रह्मचर्य आश्रम प्रवेश) त्याचे प्रायश्चित्त  कारण क्षत्रियाचे उपनयन बाविसाव्या वर्षापर्यंत होत असल्याने म्हणून तुलापुरुष दानविधी व नंतर पत्नीशीच पुन्हा एकदा विवाह  करून गृहस्थाश्रम स्वीकार व त्यानंतरच छत्रपती पदासाठी राजाभिषेक अशी योजना केली गेली. गागाभट्ट व पैठणचे त्यांचे गुरुबंधू अनंत देवभट्ट यांच्या या निर्णयांना अन्य ब्रह्मावृंदांनीही मान्यता दिलेली दिसते. गागाभट्ट हे केवळ पौरोहित्य करणारे भिक्षुक नसून ते धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक होते त्यामुळे त्यांचे निर्णय अन्य ब्रह्मावृंदांनी स्वीकारणे कठीण झाले नाही. एखादी महत्त्वपूर्ण घटना संपन्न करताना त्याचे कार्यवाही करण्यासाठी अचूक व्यक्तीची पारख करण्याची शिवरायांची हातोटी राजाभिषेक व गागाभट्ठ भेटतो या योजनेतही दिसून येते.

गागाभट्ट यांनी  तयार केलेल्या योजनेनुसार भोसल्यांचे कुलपुरोहित प्रभाकरभट्ट बाळंभट्ट आर्वीकर यांनी 
राजाभिषेकाचे पौरोहित्य केल्याची नोंद आढळते.

 शिवरायांनी राजधानीसाठी रायरी म्हणजे रायगडाची निवड केली हे वैशिष्ट्यपूर्णच आहे भौगोलिक प्रदेशाची बारकाईने माहिती, संरक्षण विचार गडाची अभेद्यता या सर्व बाबींचा शिवरायांनी पूर्णतः अभ्यास करून मगच रायगडाची निवड राजधानीसाठी केली.  सातारा व पुण्याच्या सीमेवरच्या सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशातील हा भाग या प्रदेशातील सर्वात उंच टापू !
या जोडीने राजाभिषेकादरम्यान कोणतेही संकट स्वराज्यावर येऊ नये याची काळजी ही शिवरायांनी घेतलेली दिसते. कोकणात दिलेरखान उतरणार होता परंतु शिवाजीने ठिकठिकाणी डोंगरातील वाटा मोडून अवघड ठिकाणी कडक पहारे ठेवल्यामुळे तो परत फिरला असा उल्लेख नारायण शेणवी यांच्या पत्रात मिळतो.  सावधपणाने व सजगतेने भविष्यकालीन संकटे ओळखून त्यावर मात करण्याची शिवरायांची योजना यातून दिसते.
मराठ्यांचे राज्य हे शास्त्रनियम, नीतीसंस्कृती संपन्न व घटनाबद्ध शासन संस्था असेल याची सर्वतो परि योजना शिवरायांनी राजाभिषेकाच्या निमित्ताने केली.  आपल्या सार्वभौमत्वाची चिह्ने म्हणून छत्रधारण, नाणी व चालू करणे या महत्त्वाच्या गोष्टी शिवरायांनी केल्या. 
प्रतिपद चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता।: शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

अशी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत तयार केली. मोगलांच्या वर्चस्वामुळे उर्दू व  फारसीचा सर्वत्र प्रसार असताना परंपरागत संस्कृत भाषेत आपली मुद्रा तयार करणे असे अभिमानास्पद कार्य करून शिवरायांनी आपली पारंपरिक अस्मिता जपली आहे. राराज्यविषयक  नंतरच्या सर्व कागदपत्रांमध्ये स्वस्तिश्रीने पत्रांची सुरुवात महाराजांनी केली आहे व स्वतःचे नाव श्री राजा शिवछत्रपती असे वापरले आहे.  राजाभिषेकाच्या निमित्ताने शिवरायांनी स्वतःची नाणी वापरात आणली त्यांना शिवराई म्हटले जाते. तांब्याच्या या नाण्याच्या एका बाजूला श्री राजा शिव असा मजकूर असून दुसऱ्या बाजूला छत्रपती असा मजकूर आहे. देवनागरी लिपीतील या नाण्यांच्या मजकुरातून महाराजांचे महाराष्ट्र भाषेचे प्रेम स्वराज्याचे सार्वभौमत्व दिसून येते महाराजांनी आपल्या राजाभिषेकाबरोबर सुरू केलेला व हिंदवी स्वराज्याची धर्मप्रतिष्ठा कायम करणारा राजाभिषेक शक. या शकाचे वैशिष्ट्य आहे की त्याला महाराजांनी स्वतःचे नाव दिले नसून राजाभिषेकाच्या प्रसंगाचे उचित असे नाव दिले आहे स्वराज्यासाठी अपारंपार तळमळीने कार्यरत राजांनी यामध्ये स्वतःकडे मोठेपणा घेतलेला नाही. 

 नेत्याच्या अंगभूत असे विनयशीलता व नम्रता असे महाराजांचे पैलू यातून दिसतात. राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांचे निधन झाले. राजांच्या पत्नी काशीबाई देवाघरी गेल्या.  परंतु या दोन्ही दुःखी घटनांचा  धीराने सामना करून वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवून शिवरायांनी राजाभिषेकाची सिद्धता केली. प्रजाहितार्थ घडणाऱ्या महत्वपूर्ण प्रसंगात राजांनी वैयक्तिक दुःखाला महत्त्व न देता स्वराज्याच्या  कार्याला अधिक महत्त्व दिले यातून त्यांची धर्म संस्थापनेची तळमळ व प्रजेवरील प्रेम दिसून येते.या निमित्ताने  हिंदू धर्मामध्ये महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या भगव्या झेंडाला त्यांनी राजचिह्न म्हणून स्थान दिले. मुस्लिम अमदानीत फारसी व उर्दूचा वापर व्यवहारात सर्वत्र होत असे.  महाराजांच्या विशेष सू चनेनुसार रघुनाथ पंत हणमंते यांनी कर्नाटकातील धोंडीराज लक्ष्मण व्यास यांच्याकडून राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. त्याद्वारे संस्कृत परिभाषा प्रचारात आणली. 

मराठी मनाची  आद्य भाषा म्हणून संस्कृतचा आग्रहाने वापर केला गेला.  शिवरायांची  भारतीय परंपरागत अस्मिताच यातून दिसते.  स्वराज्यातील प्रजेच्या जवळ जाण्याचा हा एक मार्ग होता. याद्वारे प्रजेला स्वराज्य हे आपले वाटावे असा शुद्ध हेतू प्रकट होतो.  शिवरायांना स्वतःसाठी राज्य नको होते तर ते सर्वसामान्य जनतेच्या सुखासाठीच हवे होते. 

 मनुस्मृती मध्ये  म्हटले आहे-
 त्रैविद्येभ्यस्त्रयीं विद्यां दण्डनीतिं च शाश्वतीम् ।
आन्वीक्षिकीं चात्मविद्यां वार्तारम्भांश्च लोकतः ॥७.  ४३ ॥

तिन्ही वेदांचे ज्ञान असणाऱ्याकडून उपयुक्त ज्ञान, दंडनितीतील शाश्वतत्वे इत्यादी ज्ञान राजाने जाणकाराकडून घ्यावे. राजाभिषेकाच्या निमित्ताने  तयार करून घेण्यात आलेला धार्मिक विधी,  राज्यव्यवहारकोश रचना या शिवरायांनी करून घेतल्या. 
शिवरायांनी स्वराज्याच्या व्यवस्थापनासाठी अष्टप्रधान मंडळ नेमले. चांगली परंपरा असलेले, शास्त्र जाणणारे ध्येयवादी, कुलवंत, चांगले पारखून घेतलेले असे आठ सदस्य नेमून त्यांच्या पदांची नावे ही महाराजांनी संस्कृत अशी ठेवली.

मुसलमानी साम्राज्य प्रभावाच्या शिखरावर असताना छत्रपती शिवरायांनी राजाभिषेक करून स्वतःला छत्रपती व प्राप्त करून घेतले ते भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच. वैयक्तिक सत्तेची लालसा त्यांच्या मनात नव्हती बालवयापासून स्वतःच्या आई-वडिलांच्या सहवासात त्यांनी मुघल सत्ताधिशांकडून झालेला रयतेचा जो छळ पाहिला होता त्याची सकारात्मक भरपाई त्यांनी स्वराज्य स्थापनेतून केली व त्यामुळे शतके लोटली तर या प्रजा पालक नेतृत्वाला महाराष्ट्र मन विसरू शकणार नाही.  हा शिवाजीराजांचा माणूस म्हणून विशेष पैलू मानावा लागेल. 

निश्चल पुरीच्या सांगण्यावरून इसवीसन १६७४ ललिता पंचमीच्या दिवशी शिवरायांचा तांत्रिक राज्याभिषेक संपन्न झाला गागाभट्टांसारख्या वेदपरायण व्यक्तीने केलेल्या राज्याभिषेकात निश्चलपुरींनी काही दोष दाखविले होते आदर्श राजा या नात्याने प्रजेतील सर्व लोकांच्या मतांचा यथायोग्य आदर करणे व आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे सर्वांची मने सांभाळणे हे चातुर्याचे धोरणही शिवरायांनी अवलंबलेले दिसते.

आधुनिक व भावी काळात समाजात उत्कृष्ट नेतृत्व घडणे ही काळाची गरज आहे.  भौतिक सुविधांची रेलचेल घेऊन अनेक परकीय साम्राज्य भारतात रुजू पाहत आहेत.  शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन ही आक्रमण थांबवण्याची गरज आज देशात निर्माण झाली आहे.  समर्थांच्या स्वप्नातील आनंदवन भारतात पुन्हा साकारण्यासाठी शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करून तो आदर्श जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे असे नमूद करावे असे वाटते. 
प्रा. डॉ. आर्या जोशी

Friday, 5 December 2025

चला परंपरा समजावून घेऊ

विरोधकांकडे दुर्लक्ष करुन चला परंपरा समजावून घेऊ#

सनातन वैदिक संस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मौखिक परंपरा.ज्यावेळी सारे काही मनात साठवून आयुष्यभरासाठी सांभाळायचे तो हा काळ.वेदांनाही श्रुती म्हटले जाते कारण कानांनी ते ऐकणे आणि मुखाने कंठस्थ करणे.
हे सारे पाठांतर करण्यासाठीच निरनिराळ्या पद्धती विकसित झाल्या ज्याला जटा,क्रम,घनपाठ म्हटले जाते.शद्धता सांभाळणे आणि पाठांतर नीट होणे यासाठी या रचना!
यामधेही गुरू आणि शिष्य यांचे एक नाते असते.गुरू विद्यार्थ्याच्या क्षमता पाहून त्यानुसारच त्याला ज्ञान देत असे.त्याचे टप्पे ठरवत असे.
उपनयनानंतर गुरूगृही केलेला शिष्य समावर्तन संस्कारानंतर म्हणजे सोडमुंज होउनच घरी परत येई.
हे सारे काही विशिष्ट समाजगटापुरते मर्यादित होते याचे कारणसमाजव्यवस्थेमधे प्रत्येकाला आपापल्या क्षमतेनुसार,स्वभावानुसार कामांची विभागणी करून दिलेली होती.कुणी कमी कुणी जास्त ही गडबड पुरूषसूक्तातील एका मंत्राने झाली हे दुर्दैव.ज्यांनी तो अर्थ मोठ्या प्रमाणात प्रचलित केला त्यांनी ते सहेतुक केले असण्याची शक्यता दाट!
खरंतर सारे त्या विराटपुरूषाचेच घटक.कुणी मुखातून,कुणी पायातून,कुणी उदरातून,कुणी खांद्यातून.पण हे सारे एकाच शरीराचे अवयव नं हे मात्र पुढे येऊ न देता तिथे मात्र मुख श्रेष्ठ आणि पाय कमी दर्जाचे हे ज्याने प्रसृत केले तो धन्यच!आणि तेच जोखड घेऊन आपण शतकानुशतके मार्गक्रमणा करीत आहोत.
कंठस्थीकरण म्हणजेच पाठांतरवरच जे ज्ञान आधारित आहे ते त्याच पद्धतीने शिकले जाणार आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.Miss World, Miss Universe सारखे देशाची आर्थिके गणिते व हितसंबंध सांभाळत लागणारे हे निकाल नसतात.
ज्या काळात अगदी म्हणाल की भेदाभेद झाला म्हणून काही गट ज्ञानापासून वंचित राहिला.पण मग आता तर शिक्षणाची द्वारे मुक्त आहेत.ब्राह्मण कुटुंबातील मुलगा सैन्यात जातो,क्षत्रिय कुटुंबातील मुलगा शास्रज्ञ होतो,वैश्य व्यापार सोडून कला जगतो...तसं मग आता यावं नं पुढे त्यांनी जे टीका करत आहेत त्यांनी...आणि करुन पहावं कंठस्थीकरण.
वेदांना अपौरूषेयत्व दिलं ते याचसाठी.एक शब्द चुकला तरी अर्थाचा अनर्थ होणारी उदाहरणं यात दिली गेली ती या रचनांचे पावित्र्य सांभाळण्यासाठी.
मला कलेची आवड आहे आणि मला कुणी तू गणितच शीक आणि जगाला शिकव असं सांगितलं तर चालेल का?
बारा बलुतेदारांची कला ही वंशपरंपरागत पद्धतीने चालत आली आहे.त्यात कुणी हस्तक्षेप केला तर ते आहे त्याच सुंदर पद्धतीने समोर येईल का?
चौसष्ट कलांमधे धातुकाम,स्थापत्य,सुतारकाम यांचा समावेश होतो हे किती जणांना माहिती आहे?
आपल्या क्षमतेनुसार,धारणेनुसार आपण काही ना काही शिकावे आणि चरितार्थ चालवावा.घोकून जे शिकलो आहोत ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम म्हणजे संस्कृतीचा वारसा पुढे हस्तांतरित करणे.
आता दुर्दैवाने गुरुकुल पद्धती जवळजवळ नामशेष झाली परंतु ब्राह्मणाचे कर्तव्य अध्ययन अध्यापन यजन याजन हे होते व त्यातून त्याचा चरितार्थ चाले.क्षत्रिय प्रजेचा सांभाळ करी.सारा वसूल करुन त्यातून प्रजापालन होई.वैश्य व्यापार करुन समाजाच्या गरजा पुरवीत असे.याखेरीज समाजासाठी आवश्यक आणि समाजाला मदत करणारी जी कामे होती ती करण्यासाठीही एक गट होता पण म्हणून त्यांना कमी लेखण्यात पटाईत आहेत टोपीकर! त्यांच्या कमरेला झाडू बांधून त्यांना रस्त्याने फिरण्याची सक्ती झाली हे खरे! पण आता काळ बदलला नं! त्याचं काय?
 छत्रपतींच्या स्वराज्यातील शिलेदारांची नामावली पाहिली तर तिथेही वाचून पहा आडनावांसकट! शिवरायांनीही क्षमतेनुसार कामे वाटून दिली आहेत.गडावरच्या कचेरीत कुणी काम करावे आणि हाती शस्र घेऊन कुणी धावावे? इतिहास मुळातून नुसता वाचून उपयोग नाही,तो समजून घ्यायला हवा! स्वराज्यात सार्‍यांना मान होताच.
जो राजा असतो त्याला कुणी निंदणार,कुणी वंदणार हे ठरलेले! पण विधायक बदलांना सकारात्मक प्रतिसाद द्यायला काय हरकत आहे आजच्या काळातही? त्यात कशाला आणखी राजकारण करायचं?
शेवटी क्षमता,वकुब,आवड आणि ज्याला Aptitude म्हणतात असाही काही भाग निश्चितच आहे.
एक ब्राह्मण मुलगा श्लोक पाठांतर करुन जगभरात पुढे जातो आहे याचा आदर्श त्याच्या आडनावापलीकडे जाऊन घेण्याचा विचार कुणाच्या मनात आला आहे का?
यांच्या आरक्षणापायी आमची मुलं क्षमता असूनही जात्यात भरडली जात आहेत...
काही वेळा अनुल्लेखाने मारणे हेच अशांच्या बाबतीत करायला लागेल.त्यांच्या वाढत्या संख्येला थोपविणे आपल्याला शक्य नाही कारण आपण आपल्या संस्कृतीला विसरत चाललो आहोत.ते त्यांची संस्कृती जी काही आहे,जशी आहे ती जगतात हे आपणही लक्षात घ्यायला हवंय!त्यातूनच त्यांचे अभिनिवेश जन्म घेतात!!
मूळ मुद्दा जे पठणातूनच साध्य करायचे आहे ते संगणकाला अनुकूल आहे की अन्य कुणाला? यापेक्षा खुल्या मनाने मानवी क्षमतेचे व प्रयत्नांचे  कौतुक करा व जे घडले त्याकडे सकारात्मक रीतीने पाहून अनुसरण्याचा प्रयत्न करा.
©आर्या

Wednesday, 17 September 2025

उदो बोला उदो








उदो बोला उदो !

डॉ. आर्या आशुतोष  जोशी


शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात  विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रात्री  ज्ञानाचा अखंड नंदादीप  तेवता ठेऊन ज्ञानरूपी घटातच ती साधना करते, शक्तीसंचय करते आणि झळाळत्या ज्ञानाने व मूर्तिमंत पौरुषाने निघते जग जिंकायला!


आश्विन शुक्ल  प्रतिपदेला होणारी घटस्थापना ह एक काम्य व्रत आहे. काळाच्या ओघात या व्रताला अनेक कुटुंबात कुलाचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीचे नवरात्र हे वसंत(चैत्र) आणि शरद(आश्विन) या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी शारदीय नवरात्री याविषयी हा संक्षिप्त परिचय-

देवीची उपासना करणा-या भक्तगणांचे हे एक महत्वाचे व्रत मानले गेले आहे. नऊ दिवस देवीची पूजा करून दहाव्या दिवशी या व्रताची सांगता केली जाते. 

शाक्त म्हणजे शक्तीची उपासना करणारी आणि महत्व सांगणारी जी पुराणे आहेत त्यामध्ये कालिका पुराण, देवी पुराण, बुह्न्नंदिकेश्वर पुराण यांचा समावेश होतो. दुर्गापूजा आणि तिचे महत्व या पुराणांनी सांगितलेले आहे. मार्कंडेय पुराण देवीचे माहात्म्य विशेषत्वाने वर्णन करते. समाजात माजलेल्या अनाचाराने त्रस्त देवांनी दुष्टांचा संहार करणयासाठी देवीला आवाहन केले.  विष्णू, शिव, अग्नी अशा देवांच्या तेजापासून देवी उत्पन्न झाली, देवांनी तिला आपापली आयुधे आणि शक्ती दिल्या आणि त्याच्याआधारे  देवीने महिषासुर, शुंभ-निशुंभ, रक्तबीज, चंड अशा घोर राक्षसांचा पराभव केला. 

या व्रताचे महत्व देवी पुराणात असे सांगितले आहे की जो कोणी हे व्रत करेल त्याला महान सिद्धी प्राप्त होतील. त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होईल. हे व्रत समाजातील सर्वांसाठी विहित आहे.  

शरद ऋतूत केल्या जाणा-या देवीच्या नवरात्री व्रताविषयी शूलपाणी रचित दुर्गोत्सव विवेक, किंवा रघुनंदन रचित दुर्गार्चनपद्धती, विद्यापती लिखित दुर्गाभक्तीतरंगिणी, दुर्गापूजा प्रयोगतत्व असे काही ग्रंथ भाष्य करतात. 

हिंदू धर्मामध्ये देवतेचे महत्व सांगणा-या विविध आख्यायिका प्रसिद्ध आहेत. नवरात्र व्रताचे महत्व सांगणारी  रामायणाशी संबंधित  एक आख्यायिका अशी सांगितली जाते- वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेले. शोकग्रस्त राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधता फिरू लागले. या काळात नारदांनी रामाला सांगितले की सीतेच्या पूर्वजन्मात ती एका मुनींची कन्या होती.  रावण तिच्यावर मोहित झाला. पण सीतेने त्याला नकार दिला. त्यामुळे रावण चिडला आणि त्याने सीतेवर बळजबरी करून तिला तो ओढत नेऊ लागला. त्यावेळी चिडलेल्या सीतेने त्याला शाप दिला की तुझा नाश करण्यासाठी मी पुढचा जन्म घेईन आणि त्यावेळी श्रीरामाच्या हातून तुझा वध होईल. 

या कथेला अनुसरून रामाने रावणाचा वध करावा यासठी नारदांनी रामला नवरात्रव्रत करायला सांगितले. ते व्रत रामाने केल्यावे देवी त्याला प्रसन्न झाली आणि अष्टमीच्या रात्री देवीने रामाला आशीर्वाद दिला की “तुझ्या हातून रावणाचा वध होईल.” त्यानंतर रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध  केला  आणि सीतेची मुक्तता केली. 

देवीच्या कृपेने दुष्ट प्रवृत्तीचा संहार करण्याचे सामर्थ्य श्रीरामाला उपासनेने प्राप्त झाले हा बोध या कथेतून घेण्यासारखा आहे. या नवरात्री व्रतामुळे देवीची कृपा होते आणि भक्ताला धन, धान्य, समृद्धी आणि विजय प्राप्त होतो असे या व्रताचे फल सांगितले गेले आहे. 

देवीच्या नवरात्रीचा हा सोहळा  अतिशय सूचक असाच आहे. हे  केवळ नऊ रात्री करण्याच देवीच पूजन नाही ; तर विविध रूपे धारण करणा-या  लक्ष्मीचे गुण आपल्यातही  यावेत यासाठी प्रयत्न करण्याचे हे दिवस आहेत.


सुजलां सुफलां भूमी सृजनाने न्हावून निघालेली असताना नव्या वर्षाचे आगमन औचित्यपूर्ण असच असे. देवीच्या नवरात्रीचा हा सोहळा  अतिशय सूचक असाच आहे. हे  केवळ नऊ रात्री करण्याच देवीच पूजन नाही ; तर विविध रूपे धारण करणा-या  लक्ष्मीचे गुण आपल्यातही  यावेत यासाठी प्रयत्न करण्याचे हे दिवस आहेत. 

मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे-  “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत  देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास  सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि प्रत्येक जीवाच्या इंद्रियांना व्यापणारी ही शक्ती नवरात्रीत भक्ताच्या पूजेचा स्वीकार करते.


 देवीचे महात्म्य वर्णावे तेवढे  थोडेच ! या देवीने काय काय व्यापिले आहे ?


 या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता , नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: |


 नवरात्रीमधे आदिमायेचा उत्सव साजरा करताना  प्रत्येक स्त्रीने स्वत्वाचा जागर करण्याचाही संकल्प करावा. देवी जशी आईमध्ये वसत आहे तशीच ती निद्रा, बुध्दी,  तृष्णा , क्षुधा यामध्येही आहे.पोषण करणारी तहान –भूक, विचार करणारी बुध्दी, विश्रांती देणारी झोप, मन:स्वास्थ्य देणारी शांती ही प्रत्येक व्यक्तीची आवश्यक गरज ! या सर्वांमध्ये आदिमाया आहे तशीच ती आहे लज्जा, दया, क्षमा  या भावनांमध्येही !


प्रत्येक जीवाच्या इंद्रियांना व्यापणारी ही शक्ती नवरात्रीत भक्ताच्या पूजेचा स्वीकार करते.


   नवरात्री व्रताचे स्वरूप असे- घरातील पवित्र जागेवर किंवा देवघरात घटस्थापना करावी. एक वेदी तयार करून स्वस्तिवाचन म्हणजे कल्याणकारी मंत्र आणि श्लोकांचे पठन करून तिथे सिंहावेर बसलेल्या अष्टभुजा देवीची स्थापना करावी. मूर्ती उपलब्ध नसेल  तर नवार्ण यंत्राची स्थापना करावी. देवीच्या शेजारी एक कलश म्हणजे घट ठेवावा, अखंड नंदादीप चेतवावा आणि त्याची नऊ दिवस पूजा करावी. या नऊ दिवसात चढत्या क्रमाने देवीला झेंडूच्या फुलांच्या माला बांधतात. दुरडीमध्ये सात किंवा नऊ प्रकारची धान्य घेवून ती मातीत पेरतात. ही दुरडी देवाशेजारी ठेवली जाते. नऊ दिवस या दुरडीत पाणी शिंपडले जाते. दहाव्या दिवशी तरारलेल्या रोपांचे पूजन केले जाते. ती देवीला वाहिली जातात आणि पुरुष पागोटा किंवा फेट्यावर हे धान्य देवीचा प्रसाद म्हणून खोचतात. महिलाही आपल्या केशरचनेत हे वाढलेले अंकुर माळतात. 

घट किंवा कलश हा पावित्र्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. दुर्गार्चनापद्धती या ग्रंथात घटाच्या स्थापनेचा विधी सांगितला आहे- मातीची वेदी तयार करावी. ती शेणाने सारवावी. तिच्यावर गहू इत्यादी धान्ये पसरावी. त्या ठिकाणी सोने, चांदी, तांबे यापैकी जो उपलब्ध असेल तो कलश ठेवावा. तो पाण्याने भरावा. त्या पाण्यात चंदन, दूर्वा, फळे, रत्ने, सोने घालावे. कलशाभोवती वस्त्र  बांधावे. त्यावर एक पूर्णपात्र किंवा ताम्हन ठेवून त्यात तांदूळ भरावेत. या ठिकाणी जलदेवता वरुणाचे पूजन केले जाते आणि देवीचे आवाहनही या कलशावर केले जाते. सोळा उपचारांनी तिची पूजा, अभिषेक आणि प्रार्थना केली जाते. 

देवीच्या नवरात्री व्रतात सप्तशती ग्रंथाचे पठन, श्री सूक्ताचे पठन,होम हवन आणि काही प्रांतात देवीला बळी अर्पण करतात. भक्ताने नऊ दिवस उपवास करून हे व्रत करावयाचे असते. काही वेळा धान्य भाजून त्याचे शिजविलेले पदार्थ खाल्ले जातात किंवा एकभुक्त राहून हे व्रत केले जाते. 

देवीचे स्तवन करताना समर्थ रामदास म्हणतात-  नवरात्रीमधे निर्माणकर्ता ब्रह्मा, रक्षणकर्ता विष्णु , आणि प्रलयकर्ता  शिव मातृरूपातील देवीचे पूजन करतात प्रतिपदेला. द्वितीयेच्या दिवाशी उग्ररूप धारण केलेल्या  योगिनी शेंदूर भरून,  कस्तुरी  लेवून दुर्जनांचा पराभव करण्यासाठी धावून जातात. मातेच्या वात्सल्यात  आणि पराक्रम –पुरुषार्थात सामावलेली अष्ट्भुजा देवी तृतीयेला स्त्रीसुलभ  मनमोहक  रूप धारण करून सजतेही !  अलंकारांनी स्वत:ची शोभा  वाढविते. विश्वाला  व्यापणारी  जगन्माता , वर देणारी  पंचमीला पूजिली जाणारी ललिता  ही सुद्धा  देवीची साजिरी-गोजिरी  रूपे ! षष्ठीला जोगवा मागताना ही देवी षडरिपूंचा  त्याग करून  लीन व्हायला शिकविते. सप्तमीला  भक्तांच्या हाकेला  धावून जाते. अष्टमीला आठ भुजांमधे प्रत्येकी  खड्ग, चक्र,गदा, धनुष्य-बाण , शूल, भृशुण्डी, मस्तक, व शङ्ख धारण करून  नारायणाच्या साहचर्याने  विश्वाचे कल्याण करते.

देवीची उपासना करण्यासाठी महत्वाचे मानले गेले आहे ते वैदिक श्री सूक्त. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलाच्या परिशिष्टात ते आले आहे. यामध्येही देवेचे जे गुणवर्णन आले आहे ते प्रत्येक स्त्रीला आदर्श वाटावा असेच आहे. उपासक देवीला प्रार्थना करतो की माझे मालिन्य आणि लोभ, मोह तू दूर कर. पण ही प्रार्थना वस्तुतः प्रत्येक स्त्रीने करावयास हवी. 

श्रीसूक्त हे देवीची विविध रूपे आपल्यासमोर मांडते. यातील देवी ही आत्मतृप्ता, गंधयुक्त , नेहमी संतुष्ट,अशी आहे. 

चिक्लीत आणि कर्दम म्हणजे चिखल आणि मातीचा ओलावा यांच्यामुळे लक्ष्मी ही पुत्रवती झाली आहे. भारतातील कृषी संस्कृतीत लक्ष्मीच्या या रूपाचे वर्णन अतिशय महत्वाचे ठरते. लक्ष्मी म्हणजे केवळ भौतिक संपत्ती नाही तर मला धान्य देणारी माझे भूमी ही सुद्धा माझी लक्ष्मीच आहे. देवीपाशी पेरलेली धान्ये ही जणू पुढील काळात शेतीसाठी वापरावयाची अंदाज घेण्याची पद्धती असावी. जे धान्य सर्वात जास्त तरारेल ते पुढील रब्बी हंगामात शेतात लावावे असेही सूचन यामागे आहे. 

नवरात्री काळात साजरा होणारा कुमारिका मुलींचा भोंडला हे कृषी संस्कृतीचे प्रतीकच मानला जातो. हस्ताचा पाऊसपडल्याने सुजला सुफला झालेली भूमी मन आल्हादित करणारी आहे त्यामुळे भोंडला करताना हत्तीच्या भोवती फेर धरला जातो. 

आपल्या परंपरेत २७ नक्षत्रे मानली गेली आहेत आणि हस्त हे  त्यापैकीच  एक नक्षत्र आहे . या  हत्तीची आठवण मनात ठेवत त्याची पूजा करण्याची एक मजेशीर कल्पना आहे आणि त्याला म्हणतात भोंडला . यालाच हादगा असेही म्हणतात .


छोट्या मुली आपापल्या घरी भोंडला करतात ते देवीच्या नवरात्री उत्सवाच्या काळात . याच वेळी आजूबाजूला  खास करून शहराबाहेर हादगा या फुलांची रोपेही दिसतात . ही फुले  भोंडला करताना हत्तीला वाहिली जातात म्हणून याला हादगा असेही म्हणतात .


भारतात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते . पाऊस थोडासा कमी झाला की  शेतात डोलणारी पिके कापणीला येतात . गावागावात, घराघरात कापणीची लगबग सुरु झालेली दिसते . भरपूर हाती आलेली धान्य  ही शेतकऱ्याची  श्रीमंती ! त्यातूनच बहु  उंडल  असा शब्द तयार झाला आणि त्याचे बदललेले रूप म्हणजे भोंडला .


पाटावर  चंदनाने किंवा कुंकवाने हत्तीचे चित्र काढले जाते . त्याला फुले वाहिली  जातात. त्याची पूजा केली जाते . आईला सांगून एक वेगळा गमतीशीर खाऊ केला जातो आणि त्याचा नैवेद्य हत्तीला दाखविला जातो . या नैवेद्याला म्हणतात खिरापत . भोंडला करताना पाटावर काढलेल्या  हत्तीभोवती  मुली फेर धरतात आणि गाणी म्हणतात . पूर्वीच्या काळी ही गाणी म्हणजे घरातल्या आई , काकू, आत्या, मावशी रोज काय करतात , त्यांच्या अवतीभवती काय घडत असतं किंवा त्यांना काय करायला आवडेल  याचं  वर्णन करणारी असत . छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव करणारं एक  गाणं सुद्धा यावेळी म्हणतात  !गाणी म्हणून संपली की  खिरापत ओळखायची  असते . ज्या मुलीकडे भोंडला आहे तिचं  तेगुपित  असतं  ! जे आलेल्या इतर मुलींना ओळखायला सांगायचं असतं  आणि चट्कन  ओळखता येणार नाही असाच एखादा  वेगळा पदार्थ  म्हणूनच म्हणूनच  मुद्दाम खिरापत म्हणून करतात .

 


कुंठित विचारांच्या सीमा आत्मविश्वासाने ओलांडत दिग्विजय साधते ही आदिमाया आदिशक्ती ! ज्ञानाचा समृद्ध ठेवा विश्वाच्या कल्याणासाठी वाटण्याची तिची इच्छा तिला सतत कार्यमग्न ठेवते.... आणि तेजाने रसरसलेल्या चंद्राला साक्षी ठेवत ती हाक घालते –“ कोण जागे आहे? जो ज्ञानपिपासू,  विजिगीषु  आहे त्याला माझी शक्ती मी संक्रमित करायला उत्सुक आहे.”

कोजागरी पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे म्हटले जाते . भारतीय कृषी संस्कृतीत आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आता या काळात भाताचे पीक हाती आलेले असते . अशावेळी पहिल्या लोम्ब्या देवीला अर्पण केल्या जातात . अग्नीत त्याची आहुती दिली जाते आणि त्यांचा वापर करून घरातील स्वयंपाकही रांधला जातो . हातात आलेल्या सुगीचा हा उत्सव , धान्यलक्ष्मीचे स्वागत !

दैनंदिन आयुष्य जगत असताना  प्रत्येक स्त्री- पुरुषाने या शक्तीचा आदर केला पाहिजे आणि आयुष्याला सकारात्मक वळण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.

उपासक देवीला प्रार्थना करतो की माझे मालिन्य आणि लोभ, मोह तू दूर कर. पण ही प्रार्थना वस्तुतः प्रत्येक स्त्रीने करावयास हवी. नवरात्री काळात देवीची उपासना करताना तिचा एक तरी गुण माझ्यात यावा यासाठी प्रत्येक स्त्रीने प्रयत्न करायला हवा.



बदलत्या गतिमान जीवनशैलीत आपल्या परंपरा जपताना त्यांना आधुनिक काळाच्या कसोटीवरही तपासून पाहिले पाहिजे. अन्याय, अत्याचार,भ्रष्ट व्यवस्था , अधर्म, अनाचार यांनी जेंव्हा  समाज सैरभैर  झाला त्यावेळी  या आदिमायेने  कालीरूप  धारण केले आणि दुष्टांचा पराभव केला.  शुंभ- निशुम्भासारख्या दैत्यांचा पराभव करताना रणांगणावर चौसष्ट योगिनींचे  सैन्य सामूहिकपणे  धावून आले आणि चामुंडारूपी देवीला त्यांनी सहाय्य केले. महिषासुर हा सहजतेने विविध रूपे धारण करून सुजानांना त्रास देणारा दैत्य. आधुनिक काळातही  असे मानवरूपी असुर स्त्रीजातीला त्रास देताना दिसतात. स्त्रियांनी एकत्रितपणे अशा दुष्टंचा संहार करून पुरुषार्थ गाजविला पाहिजे.

देवीची हे नऊ दिवसांची उपासना ही व्यक्तीविकासाला बळ देणारी, समाजमन जोडणारी अशीच आहे. त्यामुळे नवरात्री काळात देवीची उपासना करताना तिचा एक तरी गुण माझ्यात यावा यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुष भक्ताने प्रयत्न करायला हवा. देवीची उपासना न करता ज्ञानाचा नंदादीप अखंड आपल्या मनात तेवत रहावा आणि देवीच्या विविध सामर्थ्यांचे प्रकटीकरण आपल्यातून ही व्हावे ही खरी उपासना ठरावी. 

**********************************************************************************





 



 



 










 


 


------------------------------------------------------------------------------------------------


 


 


 









Wednesday, 30 July 2025

ज्येष्ठा गौरी

मातीशी जोडलेल्या संकल्पना मातीपासून दूर जाऊ लागल्या की विचार करावासा वाटतो...
मागील वर्षी मी याच विषयावर लेखन केले होते.अनेकांना ते रूचले नाही असाही अभिप्राय आला.तो मी खूप गांभीर्याने नाही घेतला कारण जेव्हा आपण समाजाला संबोधित करीत असतो तेव्हा वर्षानुवर्षे रूळलेल्या वाटा बदलणे सोपे नसते हे एक आणि आधुनिक काळात माध्यमांच्या रेट्यामुळे आणि आर्थिक संपन्नता असलेल्या ठिकाणी एक नवी संकल्पना कुणी करुन पाहिली की ती आचरण्याची एक नवी संस्कृती तयार होते आहे.
हा रेटा थांबवणे विविध कारणांनी कठीण आहे पण समाजातील विचारी माणसांनी थोडा प्रयत्न केला तर हे फारसे अवघड नसावे.
ज्येष्ठा गौरी व्रत म्हणजे भाद्रपदात केले जाणारे व्रत हे पृथ्वीतत्वाचे पूजन आहे.सर्जनाशी त्याचा संबंध लोकपरंपरेत मानलेला आहे.त्यामुळे मुलींनी,महिलांनी नदीवर किंवा जवळच्या पाठवठ्यावर जाऊन तेथील खडे आणणे,तेरड्याची रोपे आणणे व त्यांचे पूजन करणे असे सांगितले आहे.मुखवट्यांचीही विविध प्रकारची रूपे आपल्याला पहायला मिळतात.
खडे हे जसे निसर्गातून आले आहेत तसेच ओबडधोबड रूपात त्यांची पूजा ही निसर्गाला धरूनच आहे.Value addition किंवा सुशोभीकरण करून काय साधते? असा   प्रश्न मला पडतो आहे कायमच.जशी मी तशी माझी देवी म्हणून त्या खड्यांना चेहरा रंगवला जातो पण मग उरलेल्या शरीराचे काय? गौरी ही सर्जनशक्ती आहे तर मग नुसतं नाक डोळे कुंकू एवढंच पुरे का??? सर्जनाचे ते अवयव रंगवले जातात का खड्यावर?  असं स्पष्ट म्हटलं तर मग हे वाचायलाही अवघड वाटेल....
ही अपूर्णता आहे असं लक्षात येत नसेल का? आपण फक्त चेहर्‍याचाच विचार करत गुंतलोय!!!!!!!!
उभ्याच्या गौरी  आपण व्यवस्थित उभ्या करतो. त्यांच्या पोटात धान्य भरतात.
गंगागौर वगैरैमधेही कलशावर मुखवटा ठेवतो.कलशात पाणी असते.
यामुळे पूर्णत्व येते.
आपण उभ्याच्या गौरींसमोर त्यांची बाळेही ठेवतो.या सार्‍याला लोकपरंपरेतून आलेला एक विचार आहे तसाच तो खड्याच्या गौरींनाही आहे.
सुगडावरच्या गौरीही नुसत्या ठेवल्या जात नाहीत.त्यांनाही खाली आधाराला काही ठेवले जाते त्यामुळे पूर्णता येते.
ज्या ज्या प्रदेशात त्या त्या प्रथा आहेत त्याचाही सारासार विचार करणे आवश्यक आहे.
पृथ्वीतत्वातून आलेली संकल्पना असल्याने चांदीचे खडे,सोन्याचे खडे ज्याला मुखवट्याचा आकार दिला आहे ते ही हल्ली सर्रास जाहिरातींमधे दिसत आहे....
आपल्या परिसरात,जवळच्या टेकडीवर अशा ठिकाणी खडे मिळू शकतात.महानगरांमधेही कुठे ना कुठे अशा थोड्या जागा नक्की जवळपास सापडतील जिथून असे खडे आणता येतील.ते तुळशीत ठेवले तरी चालू शकतात.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे...
गणपतीमूर्ती हा विषय आता कक्षेपलीकडे गेला आहे....विविध पर्याय उपलब्ध आहेत पण उत्सवी रूपामुळे मूळ आशय मागे पडतो आहे.
सुज्ञांनी जरूर विचार करावा ही विनंती.

संत्रिका सुवर्णमहोत्सव

सुवर्णवर्षावाने भिजला देववाणीचा माथा
परंपरांनी, संस्कारांनी रचिली सुंदर गाथा!

गुरूकुलातील ऋषि- ऋषिकाही, आशीर्वच देती
सप्तसिंधुही वाहत उसळत, यशोगीत गाती।
राष्ट्रभक्ती अन् सुविचारांनी रंगुन गेली कथा
सुवर्णवर्षावाने भिजला देववाणीचा माथा। १

रामचरित्रे जगत् व्यापी ती,दिव्यत्वाचे अमोघ संकुल
संस्कारांचे पुनर्जागरण,तत्वविचारी विद्वत्मंडल
जुन्या- नव्याचा मेळ घालिती श्रद्धा अन्  आस्था
सुवर्णवर्षावाने भिजला देववाणीचा माथा।२

दीप उजळला तेजाचा अन् केले आरात्रिक्य
परस्परांचे कर करी जोडत साधीत गेले ऐक्य
उलगडली मज याच मंदिरी धारा  आणिक राधा
सुवर्णवर्षावाने भिजला देववाणीचा माथा।३
डाॅ.आर्या आशुतोष जोशी









मनभावन श्रावण

मनभावन श्रावण
डॉ . आर्या आशुतोष जोशी 


श्रावण म्हणजे  ऊन पाऊस , श्रावण म्हणजे व्रते, श्रावण म्हणजे शंकराची पूजा आणि श्रावण म्हणजे झाडाला बांधलेला झुला ! 


असा हा मनाला भावणारा श्रावण महिना . हिंदू धर्म आणि संस्कृतीत या श्रावण महिन्याला विशेष असे स्थान आहे . आपल्याकडे चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत वेगवेगळ्या सणांची , व्रतांची विशेष दिवसांची रेलचेल पहायला मिळते . केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत वर्षभर आनंद सोहळ्यांमध्ये रमलेला असतो . असं  असलं  तरीही मग श्रावणाचं विशेष महत्व का ?

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र असते त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे . स्कंद पुराणात या महिन्याला नभा असेही नाव आहे कारण आकाश जसे निर्मळ असते तसेच हा महिना निर्मळ राहण्यासाठी योजला गेला आहे -स्वच्छत्त्वाच्च नभस्तुल्यो  नभा इति तत :स्मृत :| स्कंद पुराण १. १९

 श्रावण महिन्यातील व्रते समाजातील सर्व समाजगटातील  सर्वांनी  करावी असेही सांगितले गेले आहे . 


स्कंद पुराण या ग्रंथामध्ये तीस अध्याय आलेले आहेत ज्यांना श्रावण माहात्म्य असे म्हटले जाते. यामधे  भगवान शंकर स्वतः: सांगतात -


द्वाद्श्वमपि मासेषु श्रावण : मे अति वल्लभ:|

श्रावणार्हं यन्माहात्म्यं  तेनासौ श्रवणो  मत :|| स्कंद पुराण १. ७

किं  बहुक्तेन  विप्रर्षे   श्रावणे विहितं तु यत् |

तस्य चैकस्य कर्ताsपि मम प्रियतरो भवेत् || स्कंद पुराण  श्रा . मा . ३०. ३६


सनत्कुमार यांनी प्रत्यक्ष शिवाला विचारले त्यावेळी शिवाने सांगितले की श्रावण महिना  मला अत्यंत प्रिय आहे . या काळात  जे करणे योग्य आहे असे सांगितले आहे त्याचे  आचरण जो  मनापासून करेल तो मला प्रिय होईल . त्यामुळेच भारतीय समाजमानत श्रावण महिन्याचे विशेष धार्मिक-आध्यात्मिक महत्व मानले गेले आहे . 


श्रावण महिन्यातच नाही तर चातुर्मासाचे चार महिने विविध व्रते करण्यासाठी सांगितले गेले आहे . भक्तांच्या मनातील आस्था सांभाळत त्यातून त्या व्यक्तीचा विकास होईल , समाजाचे कल्याण होईल असेही पाहिले गेले आहे . 


श्रावण महिन्यात खास करून नियम करून दररोज शंकराला अभिषेक करणे, फुले, फळे, धान्य यांचा लक्ष वाहणे , नक्त उपवास करणे, बिछान्यावर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपणे , आपल्याला आवडीच्या वस्तूचा त्याग करणे, दान देणे,खरे बोलणे, अशी विविध व्रते सांगितली गेली आहेत . 

श्रावणातील सोमवारी शिवपूजन , मंगळवारी शिव मंगळागौरी पूजा , बुधवारी बुधाची पूजा, गुरुवारी बृहस्पती आणि विष्णू पूजन, शुक्रवारी जिवतीची पूजा , शनिवारी हनुमान आणि रविवारी सूर्याची पूजा अशी व्रते सांगितली आहेत . त्याच्याशी संबंधित कथाही आहेत . याखेरीज गौरीव्रत , श्रीधर पूजा ,सूपौदन व्रत ,श्रावणी कर्म  अशी विविध व्रतेही  सांगितली गेली आहेत . या सर्वांमुळे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी एका व्रताचे पालन केल्याने आपल्या आचरणाला शिस्त लागते , नेमस्त होण्याची सवय अंगी बाणवली जाते हे महत्वाचे !


श्रावण जसा व्रतांचा राजा तसाच तो सणांचा राजाही आहेच . नागपंचमी , राखी पौर्णिमा , गोकुळाष्टमी  हे सारे सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरे होतात . 


हरियाली तीज 


श्रावण तृतीयेला पंजाब, राजस्थान येथे हा सण महिला साजरा करतात . तीयन , शिंगार  तीज अशीही हिची वेगवेगळी नावे आहेत . नवविवाहित मुलीला तिच्या सासरच्या कुटुंबाकडून नवे कपडे,बांगड्या , सिंदूर,मेंदी आणि गोड  पदार्थ भेट म्ह्णून दिले जातात . तीज माँ  म्हणजेच देवी पार्वतीला उद्देशून स्त्रिया निर्जळी उपवास करतात . आपल्या पतीच्या  सुखी  आयुष्यासाठी  हे व्रत केले जाते . आपल्या माहेरी जाऊनही हे व्रत स्त्रिया करतात . १६ शृंगार केल्याने पतीचे कल्याण होते अशी भावना यामागे आहे . 


नागपंचमी


 महाराष्ट्रात शेणा- मातीचा नागोबा करून ,त्याची पूजा करून पंचमी करून साजरी केली जाते . मुली आणि महिला वारुळावर जाऊन त्याची पूजा करतात . झाडाला झोके बांधून आनंद घेतात . मराठी मातीतल्या ओव्याही या सणाचे महत्व गातात-


आखाडा मासी  एकादसी ,नागार पंचीम कोण्या दिसी ।

पंचमी आली बुधवारी पुस  नक्षत्रावरी ।।


कर्नाटकात महिला वारुळापाशी जाऊन निरांजन लावतात आणि दुधाचा नैवेद्य दाखवितात . 


केरळ आणि तामिळनाडू येथे या दिवसाला आदि  पंचमी म्हटले जाते . दारात आणि अंगणात या दिवशी कुंकवाने किंवा हळदीने नाग काढले जातात . नाग मंदिरात जाऊन अभिषेक केला जातो . या दिवशी शेतीची कामे बंद ठेवली जातात .

 

आसाम , झारखंड आणि बंगाल प्रांतात विशेषतः  कुमारतुली येथे  या दिवशी सर्प देवता मनसा देवी हिचे पूजन होते . श्रावण, भाद्रपद या महिन्यांमध्ये हे पूजन करतात . सर्पदंशापासून रक्षण होण्यासाठी मनसा देवीला प्रार्थना केली जाते . शिवाचे विषापासून (हलाहल )तिने रक्षण केले अशीही लोक परंपरा येथे मानली जाते . 


राखी पौर्णिमा 

महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा आणि कोळी बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय यामुळे नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो . कोळी बांधवांच्या सुरक्षेसाठी सागराला विनंती केली जाते. याच दिवशी बहीण भावाला राखी बांधते. पूर्वी या दिवशी प्रजेचे रक्षण करणा-या राजाला रक्षासूत्र बांधले जात असे. 

राजस्थान भागात बहिणी फक्त भावाला राखी बांधत नाहीत तर वहिनीला सुद्धा धागा बांधतात . हिला लुम्बा  राखी असे म्हणतात . ही राखी वहिनीच्या बांगडीला बांधली जाईल अशी असते . 


गुजरात मध्ये या दिवशी रक्षा बंधन होतेच पण त्याच जोडीने शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध, दही , तूप याने स्नान घातले जाते . आपण केलेल्या चुकांची कबुली दिली जाते अंडी देवाचे आशीर्वाद घेतले जातात . 





ओरिसा, बंगाल या राज्यात या दिसवही झुलन पूर्णिमा साजरी होते . राधा आणि कृष्णाला झोपाळ्यात बसवून हा दोलोत्सव मंदिरात साजरा केला जातो . हरी भक्ती विलास या ग्रंथात या उत्सवाचा उल्लेख सापडतो . भागवत पुराणातील गोपी आणि कृष्ण यांच्या प्रेमावर आधारित गीते या दिवशी गायली जातात , नृत्य केले जाते .


जन्माष्टमी 


जन्माष्टमी म्हणजे कृष्णभक्तीने  भारलेली पवित्र रात्र . कृष्ण जन्म वृंदावन येथील मंदिरात भक्तिभावाने संपन्न होतो . जगभरातून भाविक या उत्सवासाठी येतात . नंदगाव येथे या दिवशी नंदोत्सव होतो ज्यामध्ये कृष्णय्याच्या मूर्तीला दूध, दही, तूप यांचा अभिषेक करतात . चंदन , केशर, हळद यांचे लेपन मूर्तीला केले जाते . नंद या गवळ्यांचा  राजा असल्याने नंदगावात  या उत्सवाचे महत्व विशेष आहे . आपल्या बासरीने गाईंनाही मोहवून टाकणारा कृष्ण आणि त्याचा हा जन्मोत्सव !


असा हा आपल्या संपूर्ण देशाला आनंदाच्या , प्रेमाच्या सूत्राने बांधून ठेवणारा , भक्तिभावाने ओथंबलेला मन भावना श्रावण !


येत्या श्रावणात एखादा छानसा संकल्प करूया आणि तो कृतीतही आणूया !

स्वधर्माचे सिंहावलोकन-श्रावणी /उपाकर्म संस्कार



डाॅ.आर्या आशुतोष जोशी

श्रावणी हा संस्कार सर्वांना परिचित आहेच असे नाही .याचा तपशील सर्वांपर्यत  पोहोचविणे हे एक महत्वाचे काम आहे . तथापि सर्वसमावेशक गटाला समजेल असा एक प्राथमिक स्वरूपाचा परिचयात्मक लेख असावा या हेतूने हा लेखनप्रपंच !


चला समजून घेवूया  काय  आहे श्रावणीचा संस्कार ?

भारतीय ज्ञान परंपरेत शिक्षण अर्थातच वेदांच्या शिक्षणाचे स्थान आदराचे आहे असे आपल्याला दिसून येईल. लेखनकला अस्तित्वात येण्यापूर्वी मौखिक परंपरेने चालत आलेले हे ज्ञान शतकानुशतके टिकवून ठेवणारी रचना म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती .
आधुनिक काळात शाळांमध्ये , महाविद्यालयात सत्रांची  विभागणी असते . काही विशिष्ट निमित्तांचे  औचित्य साधून सुट्टी दिली जाते . यालाच वैदिक परंपरेत अनध्याय  म्हटले जाते . कोणत्या कारणाने वेदांच्या अभ्यासातून सवलत घ्यावी याविषयीही सविस्तर मार्गदर्शन गृह्यसूत्रे,स्मृतिग्रंथ यांनी केलेले आपल्याला दिसून येईल. 

उपनयन किंवा मुंज हा धार्मिक विधी नसून तो शिक्षणाच्या आरंभीचा महत्वाचा संस्कार आहे . मुले आणि मुली दोघांचेही उपनयन होत असे . त्यानंतर गुरुकुलात जाऊन गुरूंच्या सानिध्यात पुढील शिक्षणाचा आरंभ होई . 

गुरुकुलात रहात असताना ब्रहमचर्य  व्रताचे पालन करावे लागे . ब्रहमचर्य  , गृहस्थ , वानप्रस्थ आणि संन्यास  अशा चार आश्रमांची रचना भारतीय जीवन परंपरेत दिसून येते . प्रत्येक आश्रमाची स्वतः:ची कर्तव्ये सांगितली गेली आहेत व त्यानुसार व्यक्तीचे आचरण असणे अपेक्षित मानले गेले आहे . 

काळाच्या ओघात गुरुकुल पद्धतीचा लोप झाला . काही ठिकाणी  विशेषतः  वेदांचे अध्ययन करणा-या वेदपाठशाळा  आजही गुरुकुल पद्धतीने शिक्षण देतात असे दिसून येते . परंतु अन्य आश्रमाच्या स्वरूपात काळाच्या ओघात बदल झाले . विवाह संस्कार आजही संपन्न होतात ज्यामुळे गृहस्थाश्रमात प्रवेश होतो . 

 आपले व्यक्तिमत्व घडवून आयुष्याला विधायक दिशा देणारा संस्कार उपनयन . यानंतर वयाच्या साधारण २५ वर्षांपर्यत  गुरूंच्या घरी राहून अभ्यास केला  जाईल आणि त्यासाठीचे जे नियम त्यातील एक रचना म्हणजे उपाकर्म  अर्थात श्रावणी ! 

 ज्ञानप्राप्तीची सुरुवात हिरव्यागार श्रावणात करावी हे सांगणारे आपले धर्मशास्त्रकार! ऋतू हिरवा आहे कारण नव्या वनस्पती आता उगवल्या आहेत . अशा प्रसन्न काळात श्रावण नक्षत्र असताना किंवा पंचमीला हस्त  नक्षत्र असताना ज्ञानग्रहणाचा आरंभ करावा ! याज्ञवल्क्य  स्मृतीच्या आचाराध्याय विभागात स्नातकांसाठी जे नियम सांगितले आहेत त्यामध्ये याचा समावेश होतो . 

अध्यायानां  उपाकर्म श्रावण्यां  श्रवणेन वा |

हस्तेनौषधी भावे वा पञ्चम्यां श्रावणस्य  तु || आचाराध्याय : १४२

( उमेशचंद्र पांडेय ,(संपादक) याज्ञवल्क्य स्मृती , काशी संस्कृत ग्रंथमाला ,२०२१, चौखम्बा  प्रकाशन  ),२०२१)

अथात उपाकरण उत्सर्जने व्याख्यास्याम :|श्रवणा पक्ष  ओषधीषु  जातासु हस्तेन पौर्णिमास्यां वा ध्यायोपाकर्म ||(सत्याषाढ  हिरण्यकेशी स्मार्त  संस्कार रत्नमाला द्वादश प्रकरण ।।) यामध्ये विविध गृह्यसूत्रातील  श्रावणी विधीचे उल्लेख सापडतात . 

पौष महिन्यातील रोहिणी नक्षत्रावर किंवा अष्टमी तिथीला जलाशयाजवळ बसून  आपापल्या शाखेनुसार असलेल्या गृह्यसूत्रात सांगितल्याप्रमाणे वेदांच्या अभ्यासाची काही काळापुरती सांगता करावी . याला उत्सर्जन विधी म्हटले जाई.आजच्या परिभाषेत शैक्षणिक सत्राची सांगता किंवा विश्रांतीचा काळ.

भट्ट गोपीनाथ दीक्षित यांच्या संस्काररत्नमाला  ग्रंथातही श्रावणीचे विवेचन आढळते . धर्मशास्राशी संबंधित विविध ग्रंथ श्रावणी विषयी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करतात असे आपल्याला आढळून येईल.


ऋग्वेद , यजुर्वेद, सामवेद यापैकी आपण ज्या संहितेशी संबंधित आहोत त्यानुसार आपली शाखा निश्चित होते . आपापल्या शाखेनुसार अध्ययन केले जाते व त्याला असनुसरूनच विविध संस्कार केले जातात .  

श्रावणी संस्कार ऋग्वेद शाखेसाठी श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्रावर यजुर्वेद शाखेसाठी  पौर्णिमा तिथीला ,सामवेद शाखेसाठी हस्त  नक्षत्र असताना करावा असे नियम सांगितले गेलेले दिसून येतात . 

हा विधी केवळ विद्यार्थी नव्हे तर गृहस्थ , वानप्रस्थ स्वीकारलेल्या व्यक्ती , यांनीही  करावा.  प्राचीन काळी गुरुकुलात गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यांच्या उपस्थितीत हा विधी केला जात असे . 


श्रावणीच्या विधीमध्ये जुने जानवे बदलून नवे धारण करायचे असा संकेत प्रचलित आहे . परंतु या विधीचा एवढाच अर्थ नाही . ब्राह्मण  क्षत्रिय आणि वैश्य यांना हा काळ हक्काच्या विश्रांतीचा असे. भारतीय संस्कृती शेतीप्रधान असल्याने घरातील शेतीची कामे आषाढातील पावसात आटोपून घ्यावी लागत . त्यावेळी चिखलाने माखलेले कपडे , जानवे यांचा त्याग करून नवे धारण करणे याला एक व्यावहारिक जोड दिसते . आजही आपण पाहतो की भातशेतीची मुख्य कामे आटोपली की श्रावण भाद्रपद  महिन्यात  पिकावर लक्ष द्यावे लागते . मग या काळात व्रते करणे, सण उत्सवांचा आनंद घेणे ओघाने आलेच . विजयादशमीला देवीने सीमा ओलांडली की मग राजे युद्धासाठी बाहेर पडत कारण पावसाळा ! मोकळ्या मैदानातील युद्धे पावसाळ्यात शक्य नसत . व्यापारही थंडावलेला असे कारण नवे पीक अजून हाती आलेले नसे . ही व्यावहारिक कारणेही समजून घ्यावीत अशीच आहेत . 


ऋषी म्हणजे द्रष्टे ! या ऋषी परंपरेचा आदर म्हणून श्रावणीमध्ये ऋषी तर्पण केले जाते . 

सहा कर्मे , तीर्थ आवाहन , हेमाद्री संकल्प ,दश स्नान , जानवे बदलणे , तर्पण , पितरांचे स्मरण  अर्घ्य दान , नमस्कार, गायत्री देवतेचे स्मरण  या सर्व विधींना यज्ञाची जोड आहे . यज्ञामध्ये  वैदिक देवतांना आहुती दिल्या जातात . श्रद्धा , मेधा ,प्रज्ञा , धारणा या ज्ञान संपादनासाठी आवश्यक देवता होत . याचा संकल्प अतिशय विचार करण्यासारखा आहे- विष्णूचे स्मरण करून त्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करावा . त्यानंतर संकल्पात काय म्हणावे ? ज्ञात अज्ञात अशा कोणाचे मी काही घेतले असेल , चोरले असेल, खोटे  बोलले गेले असेल, पती आणि पत्नी यांच्याकडून व्रताचे उल्लंघन केले गेले असेल. चोरी केली असेल, कठोर बोलणे झाले असेल, कुणाचा विश्वासघात केला गेला असेल ,नियमांचे उल्लंघन केले गेले असेल, इंद्रियांवरील निर्बंध चुकीने मर्यादेबाहेर गेले असतील , स्वतः:वरील संयम सुटला असेल तर त्या सर्व चुकांची कबुली देणे , या दोषापासून मुक्तता होण्यासाठी संकल्प करावा असा विचार पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी मांडलेला दिसतो .
 श्रावणी म्हणजे श्रावण महिन्याचा आल्हाद अनुभवीत प्रसन्न मनाने आपल्या शिक्षणातील सत्राची सुरुवात उत्साहाने करणे होय.पण हे केवळ व्यावहारिक शिस्त म्हणून नाही तर याला देवतांच्या स्तुतीची,प्रार्थनेची जोड दिली गेली आहे.वर्षभरातील स्वतःच्या आचरणाकडेही प्रामाणिकपणे पाहून केलेल्या चुकांची कबुली व त्या चुका न करण्याचे दिलेले संकल्पपूर्वक वचन हे स्वतःच्या घडणीसाठी उत्तम माध्यम आहे.
दक्षिण भारतात विशेषतः तमिळनाडूमधे या विधीला अवनी अवित्तम म्हटले जाते. तिथेही आपापल्या शाखेनुसार श्रावणीचा विधी संपन्न केला जातो.
महाराष्ट्रातही सामूहिक पद्धतीने याचे आयोजन केले जाते.
अशी श्रावणी विधीपूर्वक सर्वांना करणे शक्य असेलच असे नाही.पण या विधीमधील आशय समजून घ्यावा व त्यानुसार आचरण करावे हे मात्र आपल्याला नक्की जमू शकेल.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...