मासिक पाळी म्हटलं की कोणत्याही स्रीला पटकन् आईच आठवते. उमलत्या अल्लड वयाचं हे गुज आईशिवाय दुसर्या कुणाशी बोलणार?
पण माझी गोष्ट जरा वेगळी होती. तेराव्या वर्षी माझी डाॅक्टर आई गेली. माझ्यासोबत बाबा होते.
शाळेत अधूनमधून माहिती मिळे कारण आमची मुलींची शाळा होती.पण तरीही पहील्या दिवशी.. मी क्लासहून घरी आले आणि जाणवलं काहीतरी वेगळं घडतय...
आई दोन महिने आधीच गेलेली होती. त्या धक्क्यातून मी अजून पुरती सावरलेही नव्हते.
त्यात आई असताना वर्षभर आधीच तिची चिंता मला जाणवत असे.ती बाबांना म्हणे की दिलीप मुळात आपली मुलगी अपुर्या दिवसांची छोटी जन्माला आलेली. त्यात बारावं वर्ष पूर्ण झालं तरी अजून हिची काही चाहूल दिसत नाही. ती डाॅक्टर असल्याने माझ्या आसपासच्या बर्याच मैत्रीणींची ही बातमी तिला लागलेली होती त्यामुळे माझा उशीर तिला सतावत होता!!!
आता आई गेलेली आणि मी भांबावलेली.तसंही आईपेक्षा बाबा लेकीला जवळचा तसाच तो मलाही होता... त्यामुळे ही गोष्ट बाबांना मिठी मारून हक्काने सांगितली आणि रडायलाच लागले.आता माझा बाबा त्या क्षणापासून माझी माऊलीही झाला.
मला ते क्षण विसरणं शक्य नाही.
शाळेत मिळालेला सॅनीटरी नॅपकीनचा नमुना पूडा मला बाबांनी कपाटातून काढायला सांगितला आणि त्यावर दाखवलेल्या चित्राप्रमाणे ते कसं वापरायचं ते शिकवलं. मला जमलं पण तरीही प्रचंड भिती वाटत होती.हे काय होतं आहे आपल्या आयुष्यात??? सगळ्यांनाच होतं नं? मग तरी कधी नं अनुभवलेलं हे काहीतरी!! आईची उणीव पदोपदी जाणवत होती. बाबा मला झोपवून माझ्या उशाशी बसलेले.पण त्यांची कामं,प्रवचनं त्यांना होतीच.
घरी नामस्मरण केंद्र असल्याने साधकांची ये जा असे. पण बाबांनी त्याक्षणी ठरवलं की याचं स्तोम करायचं नाही.आंदूला वावरू द्यायचं सहज घरात. आणि शेवटी तो तिचा नैसर्गिक धर्मच आहे!!!
चार दिवस त्यांनी मला शाळेत पाठवलं नाही कारण मी प्रचंडच घाबरलेली होते कारण आईची उणीव आणि एकूण परिस्थिती.
स्वच्छता हा या दिवसांमधला आवश्यक भाग.आश्चर्य वाटेल पण त्यावेळेला कोणताही यूट्यूबचा विडीओ नसताना बाबांनी मला स्वतः ही स्वच्छता करायला शिकवली. मुलीचं वयात येणं खूप वेगळंच असतं.तिची स्वच्छता,काळजी,कपड्यांमधे होणारा बदल हे सर्व बाबांनी खूप जवळून अतिशय शांतपणे माझ्यासाठी केलं.
वयात आल्यावर जाणवणार्या वेगळ्या कपड्यांची गरज ओळखून ते मला लक्ष्मीरोडला घेऊन गेले.दुकानाबाहेर उभं राहून त्यांनी तिथल्या ताईंशी काय बोलायचं ते मला सांगितलं!!!मला अर्थातच एकटीला आत पाठवलं आणि त्या ताईंना मी बाहेर बोलावलं.बाबांनी त्यांना शांतपणे गोष्ट सांगितली आणि थोड्या वेळात मी आवश्यक व योग्य कपडे घेऊन बाहेर आले.
आई गेलेली असल्याने मी रोज बाबांजवळ झोपत असे.पण माझे पहिले चार दिवस झाल्यावर पाचव्या दिवशी त्यांनी मला जवळ घेतलं. मला घट्ट खूप घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आंदू ही मी तुला मारलेली शेवटची मिठी.मी तुझा बाप आहे पण आता तू खर्या अर्थाने मोठी झाली आहेस त्यामुळे बाबांपासूनही अंतरावर रहायचं.आणि आजपासून एकाच खोलीत आपण झोपलो तरी तू दुसर्या पलंगावर वेगळं झोपायचंसं!!!
परिचित,नातलग महिला असूनही बाबांनी माझं वयात येणं आईच्या अनुपस्थितीत फार संवेदनशीलपणे हाताळलं.आज एका मुलीची आई झाल्यावर मला ते प्रकर्षाने जाणवतयं.
मुलगी वयात आली की आजीचं गुपित तिची आई तिला सांगते पण दीपान्विता वयात येईल तेव्हा माझ्याकडून आगळ्यावेगळ्या आजोबांचं गुपित ऐकत तिचं वयात येणं साजरं करेल.आणखी काय हवं??!
Tuesday, 28 May 2019
मासिक पाळी जागृती दिवस
Monday, 20 May 2019
बदलणारे दिवस
सूर्य उगवतो रोज मावळतोही रोज
पण प्रत्येक दिवसाचं वेगळंच असतं गुज!
बदलणारे दिवस निसर्गाचा खेळ
ऊन पाऊस वारा झेलत पुढे जाते वेळ!
आषाढ श्रावणात दिवस पिवळं ऊन नेसून येतो
क्षणात अचानक कधीतरी पाऊसशाल पांघरून बसतो!
कोजागिरीचं चंद्रबिंब बदलून टाकतं दिवसाला
वेध लागतात त्या संध्येचे शरीराला अन् मनाला!
ग्रीष्माच्या काहिलीत दिवस बदलून जातो
हिरव्यागार छायेखाली काहीवेळ पसरतो!
बदलणारे दिवस पाहत राहते मी
त्या दिवसांच्या विभ्रमात शोधत राहते ऊर्मी!
Sunday, 19 May 2019
ओठांवरचे हास्य
#ओठांवरचे हास्य
ओठांवरच्या हास्यात लपतात भावनांच्या छटा
त्यातूनच फुटतात आनंदसागराला लाटा!
कधी ते हास्य गोजिरवाण्या बाळाचं
दुधाच्या उबदार थेंबांतून झिरपणार्या वात्सल्याचं!
कधी ओठांवरचं हास्य सौंदर्य उधळीत येतं
मनातलं गुज डोळ्यांवाटे ओठांपर्यंत येतं!
कधी ते हास्य स्वतःच खूप बोलतं
पाहणार्याला अलगद वेड लावून जातं!
ओठांवरचं हास्य कधी गुलाबपाण्याने भिजतं
दोन डोळ्यांच्या पाकळ्यांमधून थेंबाथेंबातून पाझरतं!
हे हास्य कधीतरी स्वेदगंगा होतं
राबणार्या श्रमिकाला समाधानाची झालर देतं!
Friday, 17 May 2019
तुझ्याकडे उरले काही
#तुझ्याकडे उरले काही
माझ्यापाशी उरले फक्त
चतकोर आकाशाचे तुकडे
मात्र तुझ्याकडे उरले काही
दिगंताचे अनंत गाठोडे!!!!
चांदणचुरा झेलीत फिरलो
आकाशाला पांघरुन निजलो
आजही तुझ्या अंगणी माझ्या
आकाशगंगांचे रोजच सडे!
बुद्ध पौर्णिमा
मी अनुभवली तुझी चिरनिद्रा
सर्वच दुःखमय असं जगाला सांगत तू निघून गेलास सुखाच्या वाटेने अज्ञाताच्या प्रवासाला.... आणि झालास बद्धातून मुक्त.... बुद्ध.....
मी पाहिलं तुला कधी हातात अबोध मुकी कलिका घेऊन
तर कधी तू घेतलंस हातात कठोर वज्र
कधी पाहिला मी तुझा जन्म कुशीतून होताना
काळ्याभिन्न खडकात छिन्नी हातोड्यांच्या घावांनी साकारलं तुझं भूतलावरचं अस्तित्व
कधी तू झालास इतका मोठा की तुझ्या अर्धांगिनीच्या दोन डोळ्यातही सामावू शकला नाहीस तू!! ती मात्र तुझी वाट पाहत उभी निष्पाप लेकरासह!!!
अनुभवला तुझा उपदेश मी मृगशावक होऊन
तुझं धर्मचक्र फिरत आहेच अजून
पण या सगळ्यापेक्षा तू मला सापडतोस त्या पौर्णिमेच्या पूर्णचंद्रात... जिच्यामधे सामावलं आहे तुझ्या अतर्क्य जन्माचं गुपित...
Thursday, 9 May 2019
कूनू गाणं शिकते
कुनू गाणं शिकते
कुनू एक छोटी गोड मुलगी. तिला गाणी म्हणायला खूप आवडायचं.गाणी ऐकायलाही खूप भारी वाटायचं तिला.
आई म्हणायची,"कुनू तुझा आवाज फार छान आहे गं.मधेच गुणगुणतेस तेव्हा किती छान वाटतं ऐकायला. मला आणि बाबांना वाटतं की तू गाणं गायला शिकावंसं." पण कुनू मात्र मुळीच तयार होईना असं गाणं शिकायला.
"छे मला असं एकाजागी बसून गायला मुळ्ळीच आवडत नाही. गाणं म्हणताना मला नाचायला पण आवडतं.आणि तुम्ही ते करू देत नाही मला. मला नाही शिकायचं ताईसारखं सा रे ग म. ताईची टीचर घरातच बसून तिला सारखं सारखं तेच तेच म्हणायला लावते. मला नाही आवडत एकाच भिंतीकडे बघत बसून गाणं म्हणायला!"
या गप्पांमधेच मे महिन्याची सुट्टी लागली.कूनू सुट्टीत आजोळी रहायला गेली. यावेळी ती आता सहा वर्ष पूर्ण झाली होती.त्यामुळे आपण आता मोठे झालो आहोत असं तिला वाटायला लागलं होतं!
आजोबांच्या आमराईत कोकिळ पक्ष्याचं गाणं ऐकून कुनू खूपच खुश झाली.कुनूने आंब्याच्या झाडामागे लपलेल्या कोकिळ पक्ष्याला शोधायचं ठरवलं. पण तो काही केल्या सापडेना. भल्या पहाटे कुहू कूहू आवाजाने कोकिळ कुनूला हाक मारत असे.कुनूची झोपमोड होई. एक दिवस कुनू कोकिळ पक्ष्याला म्हणाली,"आता पुन्हा झोपमोड केलीस माझी तर खबरदार! कट्टीच करेन तुझ्याशी!" पण कोकिळ मात्र रोज पहाटे गातच राही. कुनूला वाटे की याला म्हणावं सगळेच कौतुक करतात याच्या गाण्याचं.आपण शिकावं का गाणं याच्याकडे? " तिने एकदा पहाटे उठून कोकिळ पक्ष्याला हाक मारली."कोकिळ पक्ष्या... मला शिकवतोस का गाणं तुझ्यासारखं? आवडेल मला असं झाडाच्या फांदीवर बसून गायला तुझ्यासारखं."
कोकिळ काही बोलेचना. नुसता रोज गातच राहिला.. आपल्याच नादात..
सुट्टीत आजोबांकडे गावाला गेलेली कुहू एक दिवस डोंगरावर फिरायला गेली.भणाणता वारा तिच्या कानात शिरला. वार्याची शिट्टी तिला ऐकू आली." "वारा दादा,मला पण शिकव नं अशी शिट्टी वाजवायला". वारा तिला धावतच म्हणाला की "त्यासाठी असं सैरावैरा इकडेतिकडे पळावं लागतं,डोंगरांशी गप्पा माराव्या लागतात.मगच येते शिट्टी वाजवता!"
कूनू जरा हिरमुसली पण ओठांचा चंबू करून शिट्टी वाजवायचा प्रयत्न करायला लागली.
आजोबांच्या गावी घरामागे पर्ह्याचं पाणी वाहत असे. डोंगरातल्या ओहळातून पाणी वाहताना ते कानाला फोर गोड वाटे ऐकायला आणि जिभेला गोड वाटे प्यायला!
ओहळाला कूनू म्हणाली" ओहोळकाका मला शिकव नं रे गाणं म्हणायला तुझ्यासारखं! आणि तुझ्या गाण्याला तर छान नादही आहे".
ओहोळकाका म्हणाला, अग वाटेतल्या दगडधोंड्यांशी मैत्री करायला लागते त्यासाठी. मग तेही तबला वाजवून माझ्या झुळझुळ आवाजाला साथ करतात."
डोंगरावरच्या सड्यांवर गवतात लोळण घेत छोटी छोटी रानफूलं मजेत डोलायची. ते पाहून कूनूला खूप आनंद होई.
"फुलांनो, मला शिकवां नं असं छान डोलायला.वार्यावर नाचायला, मज्जा करायला!" कूनू त्यांना म्हणाली.
फुलं गोंडस हसून म्हणाली. "त्यासाठी जमिनीच्या पोटात लपून बसावं लागतं वर्षभर. आत बसून अभ्यास करायचा आणि मग जमीन आईच्या पोटातून बाहेर आलं की लगेच नाचायला डुलायला सुरुवात करायची. वार्याशी मैत्री करायची त्यासाठी"!
कोकिळ पक्षी, वारा, ओहोळ ,फुलं यांच्याकडून गाणं शिकायची,नाच शिकायची इच्छा कुनूला स्वस्थ बसू देईना. पण ते जमणं तसं सोपं नाही हे ही तिला समजायला लागलं होतं.
आता काय करायचं बरं??!!
सूट्टी संपून कूनू घरी परत आली खरी पण आईला कळलं होतं की कुनूला काय वाटतय ते!
आईची मैत्रीण होती शालन मावशी. तिने शालन मावशीच्या घरी कूनूला नेलं.
शालन मावशी गायिका होती. तिच्या घरी मोठी बाग होती. शालन मावशी भल्या पहाटे आपल्या बागेत बसून तंबोरा घेऊन गात असे. पक्षी पण मधेच बडबड करून मावशीच्या गाण्यात आपलंही गाणं म्हणून घेत. सकाळचा थंड वारा कानात शिरे आणि गप्पा मारत असे.बागेतली फुलं सकाळी ताजीतवानी होऊन उठत आणि मावशीचं गाणं ऐकत बसतं.काही कळ्या तर पेंगतच ऐकत शालन मावशीचं गाणं!
कुनूला हे भारीच आवडलं... शालन मावशी तू मला शिकवशील गाणं?
मावशी हसून म्हणाली" हो शिकवेन की. पण तुला तर सा रे ग म शिकायला नाही नं आवडत??
" हो गं.मला नं घरात बसून सा रे ग म परत परत म्हणायला मुळ्ळीच आवडत नाही.पण तू मला इथेच बागेत बसून शिकवलस नं तर मी नक्की शिकेन." मला नं कोकिळ पक्ष्याचा आवाज ऐकत, वार्याशी गप्पा मारत, फुलांबरोबर बसून मज्जा करत गाणं शिकायचय... आणि तुझ्या बागेत हे सगळे मित्र मैत्रिणी आहेतच की! तुलाही छान वाटत असेल नं यांच्यासारखं गायला यांच्याबरोबर बसून??"
मावशी म्हणाली, "अगदी खरं आहे बघ कुनू. फूलं,वारा,पक्षी यांच्य सहवासात मला छान छान गायला सुचतं.पण एक गोष्ट मात्र खरी बरं का कूनू,, सगळ्यांनाच असं गायला आणि गाणं शिकायला मिळतं मोकळ्या निसर्गात असं नाही.त्यामुळे जेव्हा बंद घरात गाणं म्हणायला लागेल तेव्हा डोळे मिटून कल्पना करायची की हे सगळे सोबती आपल्याबरोबर आहेत. मग असा आनंद चार भिंतीच्या आतही मिळू शकतो".
कुनूला फारसं काही समजलं नाही पण मावशीचं म्हणणं तिला पटलं असावं.त्यामुळे
कुनूचं गाणं तर सुरु झालं... चला तर मग तुम्ही कधी जाताय वार्याची शिट्टी,ओहोळाचा खळखळाट ऐकायला?? आणि गाणं शिकायला??!
आयुष्याच्या कॅनव्हासवर
कुंचला हाती घेतला तेव्हा समोर होता शुभ्र कागद
त्याआधी मी रेखाटला होता माझा भूतकाळ पेन्सिलीच्या अस्फुट शाईने...
त्यावर उमटवले मी रंग अस्पष्ट फिके माझ्या भावनांचे
आणि प्रयत्नपूर्वक मिसळले मी ते एकमेकात...
इतके बेमालूम की त्या रंगांनाही कळलं नसावं आपण विरघळलो एकमेकात...
त्या विरघळण्यातून उमटला एक वेगळाच रंग.... जो नव्हता मलाही दिसलेला....
पण अधोरेखित झाला तो माझ्या अस्फुट आरेखनात ...
नंतर मी भरत गेले फिके दाट आणि खूप गडद रंग
माझं चित्र बोलू लागलं,हसू लागलं,नाचू लागलं...
रंगांचे नाद,कुंचल्याचे आघात लीलया पेलत आकाराला आलं ते....
कुणीतरी नंतर म्हणालंं... किती सुंदर दिसतो आहे हा शुभ्र ठिपका... रंगांच्या इंद्रधनु कल्लोळातही स्वतःला सांभाळणारा...
मी नीट पाहिल्यावर जाणवलं... की ही कुंचल्याची किमया की माझं कौशल्य...
मग मीच हसले माझ्याशी...
तू ही असाच आहेस माझ्या आयुष्याच्या चित्रात...
भावनांच्या सप्तरंगी जगात स्वतःचं अस्तित्व माझ्या नकळतही तू ठेवून गेला आहेस एका ठिपक्याच्या रूपाने....
शुभ्र, तजेलदार आणि रंगांच्या गर्दीतही स्वतःचा आब सांभाळत.....
Wednesday, 8 May 2019
गुज अलवार
एक नातं हळुवार परस्परांच्या मनात
एक नातं फुंकर घालतंपरस्परांच्या हृदयात
म्हणावं त्याला मैत्र
की म्हणावं त्याला प्रेम
जग काय अर्थ काढील
याचा नाही नेम!
पण ते नातं
गहिवरून जातं
त्याला आणि तिला
एक कोंदण देतं!
परस्परांचा स्नेह
परस्परांचा आधार
आपल्या जीवलगाशी
इमान राखत
परस्परांचं गुज अलवार!
असं सुंदर नातं विधात्याने बांधलेलं
त्याला तिला समृद्ध करत आयुष्य बहरलेलं!
त्यात नसतो अहंकार त्यात नसते ईर्ष्या
परस्परांच्या मनात कायम जागती ठेवतं आशा!
Monday, 6 May 2019
एक कुंचला
एक कुंचला हिरव्या रंगाने भिजलेला
लपेटून जातो हिरवाईच्या छटा
एक कुंचला तपकिरी रंगाने माखलेला
रेखतो झाडाचा कणखर बुंधा
एक कुंचला केशरी छटेत न्हालेला
उजळवून टाकतो आसमंत भोवतालचा
एक कुंचला तजेलदार गुलाबी गर्द छटेत रंगलेला
थेंबाथेंबातून फुलांची आरास उधळणारा
एक कुंचला माझ्या बोटांशी गुज करणारा
माझ्या मनाचं प्रतिबिंब कागदावर चितारणारा...
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...