Wednesday, 27 March 2019

दुधावरची साय

दुधावरची साय

स्थळ- कोकणातल्या छोट्या गावातलं टुमदार कौलारू घर.

आजी- अरे थांब रे माझ्या राजा,एकदम घरात येऊ नकोस आत..

यश-Why mumma?

आई-Its our local tradition yashu.

आजी, यश आणि त्याची आई मनाली यांच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळते. तो बाहेरच टाकून देते.पायावर पाणी घालून त्यांना घरात यायला सांगते.

यश-(आजीला मिठी मारत) आजोबा कुठे आहेत?

आजी-तुझी केव्हापासून वाट पहात होते.अरे आपल्या गोठ्याची भिंत सारवायला काढली आहे नं.तिथेच आहेत ते.

यश-गोठा??? इथे गाय बैल आहेत?? घरात??

आई(हसून) अरे वेड्या,गाय बैल काय घरात राहणार का आपल्याबरोबर? त्यांच्यासाठी वेगळं घर असतं.त्याला गोठा म्हणतात.

आजी- चला दमून आला आहात.आधी विमानप्रवास.मग मुंबईहून इथपर्यंचा गाडीचा प्रवास.तसं आपलं अणसुरं लांबच पडतं….

यश- मी आईला म्हणत होतो की तुम्हालाच बोलवूया कॅनडाला.पण तिने आणि बाबाने ऐकलच नाही.इथे मला खूप कंटाळा येणार आहे आजी.,. खेळायलाही कुणी नाही… टीव्ही नाही...व्हिडिओ गेम नाही..

आजोबा- आलं का आमचं छकुलं बाळ?

यश आजोबांना मिठी मारतो…

आजोबा- अरे आत्ता तर आलास आणि लगेच कंटाळा…

असा रमून जाशील की परत जावंसं वाटणार नाही.

यश- नो आजोबा...तिकडे ख्रिसमसची मजा सुरू आहे आणि मी इकडे आलोय.

आजी- अरे तू लहान होतास तेव्हा नव्हतं कधी आणलं तुला इथे.पण आजोळघराची पण गंमत असते बरंका यशोबा…

आजोळ means...माझा एक मित्र पुण्याहून कनडाला आलाय.तो जायचा आजोळमधे..

आई- यश ,ते त्याच्या डे केअरचं नाव होत.हे  तुझं खरं आजोळ आहे.म्हणजे माझ्या आई बाबांचं घर…

यश- आई तू पण इथेच रहायचीस या छोट्याशा गावात?

आई - हो यश.

आजोबा- चला अंघोळी करूया,..

कंटाळलेला यश कसाबसा आजोबांच्या मागे जातो

यश- wowww what is this ajoba?

आजोबा- अरे याला पायरहाट म्हणतात.बघ मी कस पायाने हलवून पाणी काढतोय विहीरीतून..

यश- मी काढू आजोबा…???

आजोबा- चिमण्या जरा मोठा झालास आणखी की जमेल…

यश- पण तेव्हा मी कुठे येणार इथे??

आजोबा- म्हणजे काय? हे घर आपलंच आहे.तुझ्या तिथल्या जगापेक्षा या जगाची मज्जा वेगळी आहे.त्यासाठी यायचं अधूनमधून इथेही..

आजी- काय चालल्यात गप्पा??? चल बाळा अंघोळ घालायला आई थांबलीये..

यश-आई हे भांडं कसलं? इथे बादली शाॅवर स्प्रेअर काही दिसत नाही?

आई- हीच तर कोकणातली गंमत.ती नं पाणचूल आहे.त्यावर हंडा ठेवलाय.त्यातलच पाणी या घंगाळ्यात ओतून घेतलय मी अंघोळीसाठी.. तू पाहिलस का की ती चूल कशी पेटवली आहे…

यश- ohhh ok. कित्ती मस्त वाटतय आई…

आई- आणि ते बघ.. आजोबांनी हे पाणी बाहेर जाईल तिथे केळीचं झाड लावलय, अबोली फुलली आहे…

आजी- चला चला आटपा….

सगळेजण जेवायला बसतात..

यश- हे काय leaf ठेवलय इथे आजी? प्लेटस् नाहीत का तुमच्याकडे??

आई- यश आगाऊपणा नको.तुमच्याकडे काय? आजी आजोबा आहेत ते तुझे.

आजी-असू दे गं.लहान आहे तो..

आई- अग आई पण हे आत्ताच शिकवायला नको का? आम्ही कायम परदेशी राहणार.तिथे हेच पाहणार नं तो की आजी आजोबा हे परके असतात...कधीतरी भेटणारे…,

आजीच्या डोळ्यात पाणी तरळतं….

आजोबा- बरं पुरे आता… ये बाळ… बस..

यश- मला खाली नाही बसता येणार!!! खुर्ची दे नं आजी..

आजी- अरे एवढासा आहेस.आम्ही म्हातारेही बसतोय अजून खाली जमिनीवर, बैस बैस.जमेल तुला..

सर्वजण जेवायला सुरुवात करतात.

आई- बापरे आई मी तर हे विसरुनच गेली आहे.बिरड्यांची उसळ,कुळथाचं पिठलं…. मज्जा आली..

आई- यश जेव अरे… आईने किती छान स्वयंपाक केलाय.

यश-  I dont like this food…. आजी तू अजून काय केलं आहेस??? म्हणजे पास्ता,मॅगी असं काहीतरी..

आजी- राजा खीर केली आहे शेवयांची तुझ्यासाठी.. खा आवडेल तुला…

जेवणं झाल्यावर सगळेजण थोडे लवंडतात. यश झोपाळ्यावर जाऊन लोळत राहतो.

आजोबा- यश नारळ उतरवायला गडी आलाय.चल येतोस का मज्जा पहायला????

यश- म्हणजे??

आजोबा - चल तर……

काही वेळानंतर घरात आल्यावर

यश- मम्मुडी that uncle is so active and strong… ते त्या झाडावर चढले होते coconut tree वर… its interesting….

आजी- तुझी आई हे सगळं आवडीने पहायची हो यश.एकदा पाठीसच लागली यांच्या की मलाही झाडावर चढायचय म्हणून… आणि जो हैदोस घातला पोरीने….

आजोबा- यश आता आमराईत जाऊया.

आई - म्हणजे Mango Grove

यश - Mangos…. yummy…

आजी- अरे आताशी मोहोर येतोय रे. अजून आंबे कुठले इतक्यात..काजूही हळूहळू फुलतोय.काजू म्हणजे कॅशुनट हो तुमचा..मे महिन्यापर्यंत रहा आणि आंबे खाऊनच जा परत...

यश- आजी तुला इंग्लिश येतं?

आजी- छे रे…  मी कुठली इंग्रजी बोलायला?? चार दोन शब्द माहिती आहेत एवढंच…

यश- पण आम्ही तर हे  सगळं सुपर मार्केटमधून आणतो…

( सगळे हसतात)

आजोबा- अरे हेही सुपर मार्केटच आहे निसर्गाचं….

चल पटकन्.

( घरात आल्यावर)

यश- आजी भूक लागली.. आई पाणी दे..

आई- बाॅटल ठेवली आहे स्वयंपाकघरात.

आजी- अग पिऊ दे इथलं पाणी.तुझा पिंडही याच पाण्यावर पोसला नं गधडे??? ( आई हसते)

आजी- घे खा…

यश- काय आहे हे??

आजी- आंब्याचं साठं आणि फणसपोळी आणि हे फणसाच गरे., आपल्या घरचं आहे हं हे यश…

यश- Yummy मला हे आवडलय.लंचपेक्षा मी हेच खात जाईन रोज…

आई- तिथेही हेच आणि इथेही तेच,.. जेवणावरून रोज ओरड आहे बघ,,.

यश- आजी, आजोबांनी मला पक्षी दाखवले… मला नावं नाही लक्षात, हं वन इज खंड्या….सेकंड इज सुतारपक्षी..

उद्या मी आणखी बर्डस पहायला जाइन हं.

आजी हे काय आहे??

आजी- अरे हिला चूल म्हणतात… ही मातीची असते…

यश-पण हिचा स्मोक होत होता मगाशी.. आमच्याकडे तर लगेच अलार्म वाजतो….

आजी- इथे नाही हो वाजत अलार्म बाळा… इथे फक्त सकाळी कोंबडाच आरवतो…

यश-आणि हे काय आजी???

आजी- याला बळद म्हणतात.इथे भिंतीत केली आहेत ही.तुझ्या पणजीने!!!

यश-पणजी म्हणजे गोव्याचं capital??? माझ्या मित्राने सांगितलं मला की त्याचा काका पणजीला राहतो...

आई- वेडू पणजी म्हणजे my grandma. ती तुझी झाली पणजी…

यश- ओ…. के…..

यश- पण यात काय आहे??

वाकून पाहतो.. salt and rice?

आजी- हो रे.म्हणजे उंदीर घुशी लागत नाहीत.वर्षानुवर्ष टिकून राहतं चांगलं…

यश- रॅटट.. इथे रॅट पण आहेत???

आजोबा- रॅटच काय कॅट पण आहेत… गेली असेल हुंदडायला.रात्री येऊन बसेल चुलीपाशी..

यश-कोण??

आजी- अरे आपली मांजर…

आजी- अहो यशोदीला निरोप द्यायचीच विसरले सकाळी यांच्या धांदलीत.खळ सारवायला ये म्हणावं…

रग्गड शेण गोळा झालय..

आई- मी पण सारवेन…

आजी- मने, राहू देत हो.तू आता झालीस आहेस साहेबीण…

यश- ते काय असतं आजी??

आजी-अरे  जमीन मातीची आहे नं आपली,, ती सारवावी लागते.नाहीतर उखडते ती…

यश- शेण म्हणजे काय??

आई - Cowdung..

यश- please आई…

आई- I am not joking pilu.

यश- ते हातात घेतात??? गाईची शी???

आजोबा- अरे त्यामुळे जमिनीवर माशा,चिलटं येत नाहीत,.. गारवाही राहतो.. जमीनही मऊसूत होते बघ..

यश- बाबाला हे कळलं नं तर मला पाठवणार नाही तो इथे…

आजोबा- चिरंजीव.. तुझा बाबा येऊन गेलाय इथे.दोन दिवसासाठी आला आणि आठवडाभर रमला… कामासाठी दूरदेशी गेला असला तरी भारतीयच आहे तो.. त्यातून पक्का कोकणी...

तुझे तिकडचे आजोबा...म्हणजे आपटे आजोबाही देवाच्या गोठण्यातलेच आहेत...पण तिथे आता कुणी नाही...असो.कालाय तस्मै नमः।

आई- बाबा चला नं खाडीवर फेरफटका मारून येऊ..

यश- आजी चल नं तू पण..

आजी- तुम्ही तिघे जाऊन या…

थोड्यावेळाने..

आजी- यश इकडे ये.हे पहा..

यश- हे काय मीठ आणि…

आजी- गप रे,,

दुष्ट मिष्ट चांडाळांची.. भुता खेतांची.. आल्या गेल्याची.. पारोशा केराची दृष्ट चुलीत पडो…

जा आता.. आणि नंतर अंगारा लावायला ये..

आई- यश बाबाचा whatsapp call…

आई- हॅलो,, अरे जिओचं नेटवर्क काम करतय… तू कसा आहेस?? हो हो आई बाबा मजेत… अरे नेटवर्कच्या गोंधळात तुझी माझी वेळ जुळेलच असं नाही रे. पण जमेल तेव्हा फोन करीन…

यश- hey pops...मी आत्ता आजोबांबरोबर नदीवर गेलो होतो. सनसेट पाहिला.. बाबा कसलं मस्त वाटलं रे.. दोन छोट्या शिप्स पण होत्या.. आम्ही जाणार आहोत एक दिवस त्यात बसून राईडला पाण्यात.. चल बाय..

आई- रमलाय तो.मलाही सकाळी टेंशन आलं होतं पण आता स्वारी खुशीत आली आहे..चल बाय.टेक केअर…


आजोबा-  बरं चल यश… कपिला वाट पाहते आहे.आणि रंगूही..

यश- who is kapila and rangu?

आजी- जाऊन तर पहा..

आजीने ओतलेल्या धारोष्ण दुधाचा पेला घेऊन यश आईकडे येतो.

यश- आई…. इथे एक काऊ आणि एक बफेलो आहे…  किती cute आहेत… काऊ व्हाईट आहे आणि बफेलो ब्लॅक.. this milk is very testy….

आई- हो यश. हीच तर गंमत आहे इथली.ही गंमत करत इथे मी आणि जयूमामा लहानाचे मोठे झालो.मी तुला उद्या आमची शाळा दाखवीन नेऊन.आम्ही पायवाटेने चालत जायचो… मस्त मज्जा करत… पुढे काॅलेजला रत्नागिरीला गेलो आणि मग स्काॅलरशीप मिळवून दोघेही परदेशात.. तिथे मला बाबा भेटला.. मग आम्ही लग्न केलं… आणि मग आमचा बच्चू आला…

असं म्हणत आई यशच्या ओठांवर आलेल्या दुधाच्या मिशा पुसते..

आजोबा- काय कसं वाटलं दूध??

यश- मस्त होतं…

आजी- चला आता…

रात्रीच्या जेवणानंतर…

आजोबा झोपाळ्यावर बसतात..त्यांच्या मांडीत यश लोळतोय..

आजोबा -  बरं का यश उद्या सकाळी कोंबडा आरवेल.. तेव्हा उठ हं.म्हणजे माझ्याबरोबर पुन्हा गोठ्यात यायला मिळेल…

यश- आजोबा तुम्ही पण बाबासारखा जाॅब करता की दादा आजोबांसारखं दुकान चालवता??

आजोबा- माझा जाॅब हाच बाळा… मी गायी म्हशी सांभाळल्या आहेत.. पण आता झेपेनात म्हणून दोनच ठेवल्या आहेत. मी भातशेती करतो.काजू आंबे सुपारी नारळ केळी मिरी असं सगळं पिकवतो आणि विकतो.सोलं म्हणजे कोकम पण आहेत…

आजी उन्हाळ्यात गरे तळते,साठं करते…

यश- म्हणजे you are a farmer…

आजोबा- हो..

आई-- I am a proud daughter of a farmer…

बाबा मनालीला जवळ घेतात..

यश-आई तू का बरं proud feel करतेस?

आई- यश this is a very difficult task. Life is very hard here but its give us pleasure also.

आपण परदेशात राहतो तिथे काय शहरात पण याची कल्पना येणार नाही तुला….

यश- हं I understand… आई आपण every year येऊया इथे.का आपण मे महिन्यापर्यंत थांबूया…

आजी आजोबा मस्त माझे लाड करत आहेत,केवढी गंमत आहे इथे… मला इथे अजून खूप रहायचय….

आजी- चला अंगणात बसू.

यश अंगणात आजीच्या मांडीवर लोळत असतो...आजोबा त्याला चांदण्या,नक्षत्र दाखवत असतात…

आई त्या दृश्याकडे समाधानाने पाहत असते..

मागे रेडिओवर शास्रीय संगीताची मैफल सुरु असते..

गायिकेचा आवाज… बलमवा तुम क्या जानो प्रीत… मैं गई हार तुम्हरी जीत..


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...