Tuesday, 12 March 2019

माझा वात्सल्याचा झरा

माझा वात्सल्याचा झरा
विसुभाऊ नं तुझं सगळं ऐकतात तेव्हा तूच बोल... संत्रिकेतला आमचा नेहमीचा संवाद आहे. पण ते माझं का ऐकतात त्याचं हे गुपित उलगडावंसं वाटतय.
माझा चुलतभाऊ प्रबोधिनीत विसुभाऊंचा विद्यार्थी.आजही अनुपदादाला विसुभाऊ आवडतात कारण त्यांनी संस्कृतची गोडी लावली म्हणून.
माझी कौटुंबिक पार्श्वभूमी त्याने विसुभाऊंना सांगितली.मी संत्रिकेत यायला लागले होतेच पण माझ्या भविष्याच्या दृष्टीने मला इथे रूजवावे असा दादाचा हेतू होता.त्या हेतूच्या बीजाचं आता झाड झालय .हळूहळू कोवळी पालवीही दिसायला लागली आहे.
विसुभाऊ संत्रिका प्रमुख होण्याआधी पौरोहित्य वर्गाला येऊन बसत.चाॅकलेटी राखाडी पिशवीतून पोथ्या काढत. मी शिकवत असे. प्रार्थना झाल्या झाल्या लगेचच निघत.
मला दोन महिन्यांनी समजलं की ते आता संत्रिकेचे प्रमुख होणार आहेत!!!
मी मावशीला सांगितलं की तिथे वेगळी व्यक्ती प्रमुख म्हणून येते आहे.मला ठेवतील का नाही माहिती नाही.
एक दिवस त्यांनी संत्रिकेतच बोलावलं.ते संवादिनी घेऊन बसले. माझ्या श्लोकांच्या मंत्रांच्या चाली त्यांनी बदलल्या.उच्चारण सुधारलं. मी अक्षरशः शंभर शंभरदा एकेक ऋचा म्हटली असेल...
नंतर कधीतरी सराव झाल्यावर पद्य,अभंग असं शिकणं झालं.कालांतराने त्यांचं स्वरयंत्राचं आॅपरेशन झालं पण त्यांनी पेटीवर नुसते सूर वाजवले तरी मला चाल समजू लागली... ती आमचं सुरांची समजूत जुळली होती.
संत्रिकेच्या हिशोबाच्या व्हाऊचर्सची नोंद मध्यवर्तीत जाऊन करणे,ट्रायल बॅलन्स मांडणे,संत्रिकेचा अर्थसंकल्प वार्षिक बैठकीत मांडणे इथपासून पौरोहित्य वर्गाचे नियोजन,धारिणीकरण अशा खूपच गोष्टी त्यांनी मला शिकवल्या.त्यांच्यासह बसून पौरोहित्य शिकवण्याचा अनुभव मला तीन वर्ष सतत मिळाला.गुरुजवळ बसून शिकणे हे तेच होते.मी वाचून कमी आणि त्यांची मांडणी "ऐकूनच" शहाणी झाले आहे!
माझ्या  औपचारिक लेखनातही त्यांच्या लेखनाचा भास होतो असे प्रबोधिनीत लोक म्हणतात ते यामुळेच असावं.
आशुतोष माझ्या आयुष्यात आल्यानंतर लग्नाबद्दल त्याला विचारण्यासाठी मी लिहीलेलं पत्रही मी आधी विसुभाऊंना वाचायला दिलं होतं यातच काय ते समजावं!
नव्या वास्तूत संत्रिका जाणार हे त्यांनी मला सांगितलेला क्षण आठवतो. मग आम्हा सर्वांपुढे ते नकाशा घेऊन बसले आणि आम्हाला ती रचना त्यांनी समजावून दिली.
माझ्या लग्नानंतर कौटुंबिक आयुष्यातले चढऊतारही ते ऐकत होते. घरी अभ्यास होत नसेल तर संत्रिकेत बसून करत जा.अगदी कामाच्या वेळातही माझा एम फील, पीएचडीचा,भारतीय विद्येचा अभ्यास त्यांनी मला करू दिला.
आमच्या घरी ते नृसिंह जयंतीला आले तेव्हा आशुतोषच्या मोठ्या काकांना स्वतः हाताला धरून ते घेऊन आले.सांगितल्यावर कळलं सगळ्यांना की ते माझे विभागप्रमुख आहेत!
एक टप्पा आमच्या आयुष्यात असाही आला की मूल होण्यासाठी किती वाट पहावी.सर्व रिपोर्टस् नाॅर्मल असूनही होत नसेल तर मूल दत्तक घ्यायच्या निर्णयातही विसुभाऊ माझ्याशी बोलले होते.पण  तशी वेळ आली नाही.पण अशा नाजूक प्रसंगातही ते माझं मनोधैर्य वाढवत राहिले,
नव्या वास्तूत संत्रिका आली हे मला मुळीच आवडलं नाही कारण त्यानंतर त्यांचं मध्यवर्तीतलं काम वाढलं आणि संत्रिकेत त्यांचं येणं कमी झालं.क्वचित ते येत आणि मग कधी आम्ही अरविंद वाचले,उपनिषदं चाळली.तो आनंदही फार मोठा असे.
आपल्या अनुपस्थितीत एक असा विभाग ज्यात ये जा पुष्कळ आहे,ज्यात आर्थिक उलाढालही असते असा कुणावर सोपवणे यात विसुभाऊंचा वाटा आहे.मला घरात ज्या गोष्टी आजही करण्याचं स्वातंत्र्य नाही किंवा माझा सहभाग घ्यावा असं वाटत नाही अशा सर्व प्रकारच्या गोष्टी करण्याची मोकळीक मला विसुभाऊंनी संत्रिकेत दिली.त्यांच्या आजारपणात ते नसताना मला संत्रिकेत एकटं वाटे कारण ते प्रबोधिनीत आहेत आलेले एवढाही आधार खूप असतो माझ्यासाठी.
विकीपिडियाच्या जागतिक विश्वात  कुणीतरी मला  विचारलं How you are such a vibrant and confident intelligent enthusiastic  girl?? मला ही विशेषणे लावणार्‍या त्या ज्येष्ठ विकीपीडियन व्यक्तीला मी म्हटलं... यामागे एक व्यक्ती आहे Mr. Vishwanth Gurjar.
दीपान्विताच्या घडणीबाबतही मला आणि आशुतोषला ते नेहमी सांगतात. तुला जे वाटतय त्यापेक्षा तिला जे आवडतय ते करण्याचा तुझा प्रयत्न असला पाहिजे असं ते मला नेहमी शिकवतात.नियमीत न भेटणारे तरीही आठवणीत असलेले विसुआजोबा आले तर त्यांच्याबरोबरच मला गणपतीबाप्पाची आरती करायची आहे हा तिचा हट्ट होता!तो ही पूर्ण झाला.
त्यांचं हे एक वेगळं रूप आहे. प्रबोधिनीच्या औपचारिक वातावरणापलीकडचं त्यांचं माझं नातं.
पौरोहित्य व्रत संस्कारात त्यांना पाहिलं आणि आठवणींचा पट जागा झाला...
असा हा वरून रूक्ष आणि शिस्तप्रिय असलेला, प्रबोधिनीत मध्यवर्तीमुळे सर्वांच्याच काहीशा रोषाचा पण तरी आदराचा विषय असलेली व्यक्ती माझा वात्सल्याचा झरा आहे.तो असाच वाहत राहू दे!
आर्या,


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...