Tuesday, 16 April 2019

हसरी भिंत

टिनू आणि मिनी खूप घट्ट मित्र- मैत्रिणी.शेजारी रहायचे.खूप खूप खेळायचे. टिनूचं नाव तेजस आणि मिनीचं नाव मीनाक्षी. पण लाडाची नावंच जास्त आवडीची होती दोघांच्या.
टिनू सातवीत जाणार होता आणि मिनी पाचवीत जाणार होती. सुट्टीभरचा उद्योग ठरवला दोघांनी.त्या दोघांच्या घरामधे फक्त एक भिंतच होती.दोघांचे आई बाबाही भिंतीपलीकडून एकमेकांशी छान गप्पा मारत असत.
ही भिंत दोन्ही बाजूंनी रंगवायची असं ठरलं.आई बाबांकडून सामान मागून घेतलं. भिंतीवर चित्र काय काढायची हेही ठरलं.
टिनूच्या घराच्या बाजूच्या भिंतीवर पक्षी,झाडं असं काढायचं आणि मिनीच्या घराच्या भिंतीवर फुलं,पान,फुलपाखरं. टिनूला गाड्या,रोबो असंही काही काढायचं होतं पण ते जरा त्याला अवघड वाटत होतं.शेवटी रंग,ब्रश असं सामान दाखल झालं.
एकीकडे ही तयारी सुरु असतानाच त्यांच्या घरासमोरच रस्त्याचं काम सुरु झालं.भर उन्हात काम करणारी ती माणसं पाहून टिनू आणि मिनीला वाईट वाटलं.ते रहात होते ती घर म्हणजे रस्त्याच्या कडेला बांधलेले तंबूच होते.रस्त्यावरची खडी,मोठमोठी मशीन्स, सिमेंट कालविणारं यंत्र, डोक्यावर ते नेणार्‍या बायका,खडी पसरणारे पुरूष हे कष्ट करत होते उन्हात. त्यांची छोटी मुलं तिथेच रस्त्यात भर उन्हात खेळत होती.टिनू आणि मिनी त्यांना रोज पहात होते.
आता उद्यापासून भिंत रंगवायला घ्यायची तर... दोघांच्याही बाबांनी शनिवारी संध्याकाळी कोळशाने मुलांना चित्राच्या चौकटी काढायला शिकवलं.यातूनच पुढे रंग भरून भिंत सजणार होती. रस्त्याच्या कडेला खेळणारी दोन मुलं घराच्या फाटकातून हे पाहत होती.टिनू आणि मिनीला वाटलं की यांना पण बोलावलं तर?पण त्यांची आपली ओळख नाही.भाषाही येत नाही.आणि ती जरा शेमडी फाटक्या कपड्यातली वाटतात.पण टिनूची आजी हे पाहत होती.मुलांच्या मनातले विचार तिने ओळखले. संध्याकाळी कामं संपवून बाया बापडे बसले होते. आजी मुलांना घेऊन तिकडे गेली आणि कंत्राटदाराशी बोलू लागली.त्याला हिंदीत बोलता येत होतं पण कामगारांना हिंदी येत नव्हतं.मराठीही कळत नव्हतं.ते आपापसात वेगळ्याच भाषेत बोलत होते.
शेवटी कंत्राटदाराने त्यांना मुलांचा आणि आजीचा हेतू समजावून दिला...
रविवारची सकाळ गजबजली.कामगारांची सहा मुलं अंगणात आली.तीन टिनूकडे आणि तीन मिनीकडे. रंगाचे डबे,ब्रश अशी गंमत त्यांनी कधीच पाहिली नव्हती. पण काय कमाल . बाबांनी दाखवल्याप्रमाणे ती मुलं भराभर रंग भरू लागली.भिंत हसायला लागली.टिनूचीही आणि मिनीचीही.
ही मुलं आठवडाभर रोज आली न चुकता.त्यांची आणि टिनू मिनीची मैत्री झाली.कधी मिनीची आई पन्हं करून देई तर कधी टिनूची आई वाटीकेक देई. कधी पोहे तर कधी तिखट शेंगदाणे खाऊ.
टिनू आणि मिनी आपण भिंत रंगवणार आहोत हे विसरुनच गेले.या मुलांना  भिंत रंगवताना हरखून गेलेलं पाहूनच त्यांना खूप आनंद झाला होता. दोन्ही भिंती या  कामगारांच्या सहा मुलांनीच रंगवल्या. अधूनमधून संध्याकाळी कामगार आईबाबाही फाटकापलीकडे उभं राहून ही गंमत पाहून जात.
शेवटच्या दिवशी मिनीची मावशी आली होती.तिने या सहाही मुलांच्या हाताच्या अंगठ्यांना रंग लावून त्यांचे छाप चित्रांखाली उमटवून घेतले.जणू काही या निरागस चित्रकारांच्या सह्याच त्या!! मावशीने हे सर्व फोटो सर्वांना पाठविले.सर्वांनी टिनू आणि मिनीचं खूप कौतुक केलं.
काम संपलं आणि कामगारांनी पालं हलवली. निघताना ती मुलं आवर्जून या दोघांना टाटा करून गेली. मात्र त्यांची आठवण आता टिनू आणि मिनीच्या घरांच्या अंगणात भिंतीवर छान रंगून बसली आहे!


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...