Tuesday, 23 April 2019

पुस्तक दिन

आज जागतिक पुस्तक दिन झाला.माझी एक मैत्रीण प्राची चितळे- जोशी हिने तिच्या पुस्तकांच्या आठवणी अतिशय सुंदर आणि प्रामाणिक शब्दात मांडून लिहून पाठवल्या.तिचं वर्णन वाचतानाच मलाही माझी पुस्तकं समोर दिसायला लागली आणि लिखाणाची सुरसुरी आलीच.
मला कुठल्याही लायब्ररीत गेलं की जन्मजन्मांतरीची उपाशी असल्यासारखंच वाटतं. लहानपणापासून पुस्तकांशी झालेली मैत्री अजूनतरी सुटलेली नाही आणि सुटण्याची शक्यताही नाही.
देवा म्हणून तरी मी कितीही पापी असले तरी मला प्लीज स्वर्गात पाठव.म्हणे तिथे देव राहतात.त्यांच्याकडे असलेले छान छान ग्रंथ मला नंतर पण मऊशार ढगांवर लोळत वाचायला मिळतील म्हणजे!
रामकृष्ण मठाची लायब्ररी हा एक खजिना आहे.आत घुसलं की बाहेर पडावंसं वाटत नाही.
भांडारकर आणि भारत इतिहासची लायब्ररी यावर स्वतंत्र लेखमाला होईल.
प्रबोधिनीची लायब्ररी आणि माझी हक्काची संत्रिकेची पुस्तकं पाहून तर आपण किती श्रीमंत आहोत असं वाटतं! लाॅकरला ठेवलेल्या धनाची तुलना मी याच्याशी करूच शकणार नाही असा हा अमूल्य ठेवा!
विकी व्यासपीठावर तर मी आॅनलाईन पुस्तकं वाचायला आणि वापरायला शिकले.
तरीही पुस्तक हे पुस्तकंच असतं.लेखकाचा कवीचा वैचारिक आरसा असतं!
मी स्वतः लिहायला लागल्यावर मला असं जाणवलच की गेली काही वर्ष आपलं बुद्धीत साठवलेलं संचित आता शाईतून कागदावर झरू लागलय.
  ते गो.नी.दांडेकर नावाचे आजोबा फार क्यूट असावेत.त्यांची मृण्मयी कादंबरी मी शाळेत असताना वाचली. फार नव्हती कळली मला तेव्हा ती.
पण कधीतरी कुणीतरी मला लक्षात आणून दिलं ध्यानीमनी नसताना की गोनीदांची मृण्मयी आणि माझ्यात काही साम्य आहे!!!
मग मी कविता करायला सुरुवात केल्यावर तेच टोपणनाव घेतलं स्वतःला! वडिलांची लाडकी,आई गेल्यानंतर वडिलांच्या सहवासात अध्यात्माची आणि आयुष्याची गोडी समजून घेणारी मनू मी ही आहेच की!
पुस्तकांच्या प्रदेशातली सफर न संपणारी आहे. तरीही आपले खास हळवे कोपरे असतातच की! ना.धों.महानोर,गो.नी.दा हे माझे खास जिव्हाळ्याचे आहेत. मला त्यांचं साहित्य वाचताना ते आपल्याशी गप्पा मारत आहेत असंच वाटतं.
धर्मशास्रासारखा विषय अभ्यासताना मी वाचलेलं थेंबाएवढंही नाही!अख्खा सागर रिचवायचा बाकी आहे.पण या एका चिमुकल्या आयुष्यात ते शक्यही नाही.
पण शेवटच्या श्वासापर्यंत पुस्तकांची सोबत कायम राहो आणि नंतर ढगावर लोळून वाचणं बाकी आहेच की! माझा मोक्ष तोच आहे!


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...