Thursday, 3 December 2020

जागतिक अपंग दिन

 या अस्मादिक आहोत...वैतागलेल्या...वय वर्षे सहा म्हणजे इयत्ता पहिली. मागे जी हिरव्या साडीत आहे ती यमूताई म्हणजे माझी दुसरी आईच! तिचा साखरपुडा त्यादिवशी होता. ते रामचंद्र नावाचे काका आता यमूताईला घरी घेऊन जाणार या कल्पनेनेच मी प्रचंड वैतागलेली होते....यमूताईबरोबर तुला पण नेईन मी घरी... असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा हा फोटो निघाला! पण आजही अगदी माझ्या लग्नातसुद्धा रामचंद्रकाका आले तेव्हा मी आशुतोषला हळूच म्हटलं... या काकांनी माझे लाड केलेत... खाऊ आणलाय, खेळणी आणली पण मला ते मुळ्ळीच आवडले नाहीत.... का तर यमूताईला घेऊन गेले कायमस्वरूपी !

तर आता या सगळ्याचा संबंध पुढच्या सर्व मनोगताशी आहे....
या छायाचित्रात जो छोटा दादा दिसतो तोही आमच्या घरी मदतनीस होता. माझा खेळगडी आणि मला शाळेत सोडणारा, आणणारा, घरात आजीला मदत करणारा आणि यमूताई तर माझा जीव की प्राण! आज यमूताईही आजी झाली आहे तरी माझ्या मनात ती माझी आईच आहे.... कारण माझ्या आई वडिलांच्या शारिरिक मर्यादा...
आपल्या सारख्याच व्यंग असलेल्या जोडप्यांना जेव्हा निर्व्यंग बाळ होतं तेव्हा ते त्याला कसं सांभाळत असतील? त्यांना मनासारखा सह अनुभूतीने वागणारा जोडीदार, कुटुंब मिळेल का? असे प्रश्न माझ्या जन्मानंतर त्यांना भेडसावले आणि त्यातून जन्म झाला " अपंग संजीवनीचा". आई मला कधी कडेवर घेऊन फिरू शकली नाही, ना माझ्याशी धावाधावी खेळू शकली पण तिचं वात्सल्य आणि यमूताईने घेतलेली माझी काळजी यामुळे आज मी जी आहे ती दिसते आहे. आईच्या आईने तर मला तळहाताच्या फोडासारखं जपलं! माझं बालपण लाडाकोडात (जोशीबुवांच्या भाषेत-फाजीललाडात!!)गेलं पण तो हेहीमान्य करतो की सामाजिक जाणिवा समृद्ध असलेली आणि इतरांबद्दल आत्मीयता असलेली मुलगी त्याच्या सासूसासर्‍यांमुळे त्याला जोडीदार म्हणून मिळाली आहे! पण ते श्रेय माझं नव्हेतर त्याचं गुपित माझ्या अनोख्या बालपणात दडलंय!
1983 साली अपंग संजीवनीचा जन्म झाला.यमूताईच्या पुढे पळता पळता मी पहात होते की कुणी दोन डोळे असलेले पण तरीही पांढरी काठी आपटत आपटत आपला जिना एक काका चढत आहेत.
एक मावशी येते तिच्या आईबरोबर पण तिला एका हाताला पंजाच नाही...
एक दादा येतो तो आपल्या बाबांसारखाच चालतो. विजय गुप्ते काका येतो.... आपल्याबरोबर जेवतो, बसून खेळतो पण त्याचे पाय कुठे आहेत?? तो हातावर चालतो आणि हातात चप्पल घालतो.
रविमामा येतो, सुजाता मावशी येते, आपण सगळे मिळून राजा शिवाजी विद्यालयात जातो.तिथे असे खूप लोक असतात...मग यमूताईच्या कडेवर बसलेल्या मला ही सर्व मंडळी भेटायला येत...
अमर सिंह मामा येई... पण तो काय बोलतो ते मला समजत नसे... फक्त त्याच्या हातून फाईव्ह स्टार घेणे माझ्या आवडीचे.
आणि कुणी येई मावशी तिचं नाव हिरामणी वाधवा... ती मला मांडीवर घेऊन बसे आणि हाताने चाचपत ती माझे लाड करत असे...तिच्या पर्समधली काॅम्पॅक्ट मला लावून म्हणे... अदिती तू मुळातच गोरी गोरी पान ग.... पण तरी मी लावते हं तुला पावडर....!! हिला तर दिसत नाही मग ही कसं म्हणत्ये मला की तू गोरी पान आहेस?? काही मंडळी एकत्र जमत आणि तोंडातून अस्फुट हुंकार काढत बोटांच्या हालचाली करत आपापसात बोलत, हसत आणि भांडतसुद्धा!!!!
हे मी आज शब्दबद्ध करू शकते आहे कारण ते मनःपटलावर कोरलं गेलं आहे म्हणूनच..नाहीतर ते वय हे सर्व समजण्याचं नव्हतं!!!
कळू लागलं तसं समजू लागलं की आपल्या मित्र मैत्रिणींचे आई बाबा चालू शकतात पण आपल्या आई वडिलांची शरीरं वेगळी आहेत. तिची आई तिच्यामागे धावते पण माझ्यामागे यमूताई, विलास धावतात, त्याचे बाबा त्याच्याबरोबर लंगडी घालतात पण माझे बाबा नाही करत..... पण आजही त्याचं शल्य वाटत नाही मुळीच! अपार प्रेम ,स्नेह, वात्सल्याने भरलेलं बालपण! माझं विश्व नकळत्या वयापासून असं भरलेलं, भारलेलं!
आम्ही खाली खेळताना असंच कुणी आलं की नंतर मी धावत त्या व्यक्तीला भेटे आणि स्वतःहून हात धरून घरी वर नेई..... हे मला कुणी सांगितलं नाही... आई बाबांनीही नाही... पण जाणिवेतूनच मला हे उमगायला लागलं!
अशा सर्वांचे विवाह जुळवणं, त्यांना गरज असेल तर संसारासाठी आर्थिक सहाय्य, अल्प दरात विवाहाचे कार्यक्रम करणं, प्रसंगी त्यांच्या लग्नाचं पौरोहित्य करणं... माझं कन्यादान करायला आई बाबा नव्हते पण त्यांनी अशा तेवीस अनाथ अपंग मुलींचं कन्यादान केलं आहे!!! लिहीतानाही डोळे चटकन् पाणावले माझे!!! काय विलक्षण पाहिलं आहे मी हे सर्व. आणि हे सर्व आमच्या तिघांच्या आयुष्याचाच भाग होतं!
अंधांच्या क्रिकेटच्या स्पर्धांना जाणे, अपंगांच्या तीनचाकी सायकल स्पर्धा, मेळावे, अपंग साहित्य परिषद, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आमच्या घरातला आणि आमचा त्यांच्या घरातला वावर, अपंगांच्या सहली, त्यामधे ते घेत असलेला निकोप आनंद, एखाद्या अंध मामीला बाळ होणार आहे हे कळल्यावर माझ्या डाॅक्टर असलेल्या आईने तिच्या प्रसूतीसाठी शब्दशःधावणं, नंतर ते बाळ बघायला मला घेऊन जाणं...... this is endlesss...
अपंग दिनाच्या निमित्ताने मला माझं उजळलेलं बालपण शब्दबद्ध करावंसं वाटलं कारण ते फार कमी मुलांना लाभत असेल!!!
मी तत्वनिष्ठ आहे, मला नियमांची पायमल्ली केलेली खपत नाही, मी फटकळ आहे पण तरीही माझ्या जवळच्या मंडळींना माहिती आहे की प्रेम करावं एखाद्यावर तर ते अदितीनेच! कुठे शिकले मी हे?????? यात जी सहजता आहे ती इतरांना पोचते पण मला असं कधीच वाटत नाही की मी प्रेमळ बिमळ आहे, काळजीवाहू आहे... फिरून बालपणात मुशाफिरी केली की लक्षात येतं.... अपंगांच्या आयुष्यात एक टोकेरीपण कदाचित व्यंगामुळे येतं ते त्यांच्या सहवासात माझ्यामधे आलं असेलही पण जर मी आत्मीय आहे असं कुणी आवर्जून म्हणत असेल तर त्याचं श्रेय या सर्वांचं आहे... वेदनेच्या मुळाशी एक हुंकार येतोच..... आई गं!!! माझ्यासाठी तर वात्सल्य आणि वेदना या दोन्हीचा हुंकार हा एकच आहे! जीवाला जीव लावणारी प्रसंगी out of the way जाऊन इतरांसाठी धडपडणारी माझी शरीराने अपंग पण मनाने खंबीर तितकीच मायाळू आई आणि बाबा आणि त्यांचे हे सर्व मित्र मैत्रिणी!!!!!
त्यामुळे माझ्यातलं जे न्यून आहे ते माझं आहे आणि जे चांगलं आहे , रसरशीत आहे ते या सार्‍या सार्‍यांचं आहे!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...