Sunday, 30 March 2025

तुझी -माझी चैत्रगौरी

आयुष्यातल्या असंख्य चढ-ऊतारांच्या झळा सोसून जीवाची काहिली झालेली ती...कितीही झालं तरी भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ अशा तीन टप्प्यांमधे झुलणारा तिचा झोका, तिच्या मनातले असंख्य आवर्त,सुख दुःखांच्या फेर्‍या,मनातलं फारसं कुणापाशी बोलता न येणारं सासर आणि म्हणूनच मनातला हळवा कोपरा माहेर! 
ग्रीष्माच्या साथीने ती येते,भाद्रपदातही ती येते! पण भाद्रपदातला तिचा पाहुणचार अगदीच तीन दिवसांचा! अनुराधा,ज्येष्ठा व मूळ नक्षत्रांवरचा! पण चैत्र पांघरून ती येते महिनाभर! मागचे सारे पाश मागेच सोडून आयुष्यातली काहिली सुसह्य करायला माहेर तिला बसवतं झोक्यावर! कपाळी थंडगार चंदनी टिळा! आज्ञाचक्र ऊर्जित करणारा! 
निसर्ग भरभरून देत असतो कैर्‍या,आंबे,कलिंगडं,ऊस आणि बरंच काही! सारं सारं तिच्या पाहुणचाराला साजेसं!
सारं थंडावा देणारं,शीतलता देणारं! 
चटकदार कैरी चिरता चिरता कधी तोंडात टाकून पहावीशी वाटली तरी भरल्या घरातल्या सासवा,जावा,नणंदा हटकुन काहीतरी म्हणणारच! मग ही हौस पुरवायची माहेरी यथेच्छ! झोपाळ्यावर बसायला आता काय परकरी पोर आहेस का? असं म्हणत तिचं प्रौढत्व तिला आठवून देणारा तो काळ! मग ये माहेरी आणि घे वारा झूलतानाचा!कुण्णी काही म्हणणार नाही तुला!
कैलास पर्वतावर काय चाललं आहे हे पाहू देत त्यांचं त्यांना! त्यातून तिची दोन्ही लेकरं म्हणजे वल्लीच आणि पती परमेश्वरांचं काही विचारू नका! मनात असेल तर बसतील सारीपाटाला नाहीतर आहेच तिसरा डोळा उघडलेला! आणि त्यांची सारी प्रजा आणि सैन्य! सार्‍यांची काळजी वहात ती बसलेली असतेच सदासर्वकाळ! मग तिलाही विश्रांती!
मग ती पौराणिक साहित्यातली देवी असो मध्ययुगातल्या अगदी परवापर्यंतच्या एकत्र कुटुंबातली सासुरवाशीण! कुणालाच चुकलं नाही हे! मग तिने आनंद कुठे शोधावा?
तो असा चैत्रात! शेणाने सारवलेलं चैत्रांगणाने सजलेलं संस्कृतीचं पावित्र्य पहात पहात तिने डोलावं! सुवासिनींच्या हास्यविनोदात रमावं! समोर मांडलेल्या डाळ पन्ह्यात आणि सजावटीत तृप्त व्हावं आणि अक्षय्य समृद्धीचं पात्र आपल्या माहेराच्या ओंजळीत अलगद रीतं करून वैशाखात स्वगृही परत जावं! पुन्हा तो वैशाख वणवा वाट पाहत असतोच! पण त्यावर आता ती मात करेल कारण चैत्रातला हा गारवा तिने लपेटला आहे! त्याचा थंडावा सरेल न सरेल तोच येईल वर्षा..... झडझडून पुन्हा सर्जन आणि वर्षन घेऊन!
आपण आणि ती वेगळे नाही आहोत! हे अद्वैतच आहे हे ध्यानी आलं की मग हे सारे उपचारही तिच्यासाठी नसून माझ्यासाठीच होतात! आणि माझ्या मनातला चैत्र हसतो,बहरतो,खुलतो...
©आर्या जोशी

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...