Friday, 12 May 2017

अ-भंग-अभंग

 अ—भंग अभंग
आमच्या घराजवळ दरवर्षी या दिवसात सप्ताह होतो.आजही जाग आली ती टाळ— मृदुंगाच्या आवाजाने. पक्ष्यांच्या आवाजात सूर मिसळले गेले भैरवचे. शब्द कळत नव्हते पण भक्तिरस झिरपत होता मात्र. एकादशीला रात्रीही असेच सूर ऐकु येतात.दिवसभर शिणलेल्या शरीर मनाला ते लपेटतात आणि थोपटतातही.त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री आम्ही राजमाचीचा ट्रेक करायला गेलो त्यावेळी लगूना हाॅटेलच्या लगतच्या रस्त्यावरुन जाणार्‍या वाटेवर असेच जवळच्या मंदिरातले सूर रेंगाळत आलेले अनुभवले आहेत. हे अभंग गाणारे आवाज कधी खडे पहाडी तर कधी चिरके. काहीवेळा तर बुवांच्या गळ्यात औरँगजेब बसला आहे काय असं वाटतं. पण सच्चा असतो तो भाव. टाळ मृदुंगाच्या साथीवर खुलतो भक्तिभाव. साथीदारांच्या गळ्यातूनही पाझरतो तो सूर.अनन्य शरणतेने गायले जाणारे अभंग शाश्वत सुखाची अनुभूती देतात आणि माझे हात नकळत जोडले जातात मनाला हुरहुर लावणार्‍या त्या अ- भंग आनंदाप्रती.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...