##दशक्रियाच्या निमित्ताने##-
आपल्या आवडीचा
आणि अर्थातच ज्या विषयावर आपण काही काळ सातत्याने अभ्यास करीत आहोत असा विषय
जेंव्हा काही निमित्ताने समाजात अधिक चर्चेत येतो तेंव्हा त्यावर स्वस्थ बसवतच
नाही.त्यामुळे थोडं त्याविषयी-
“ दशक्रिया”
चित्रपट मी पाहिलेला नाही किंवा मूळ कादंबरीही वाचलेली नाही.तथापि एकूण
दूरचित्रवाणीवरील चर्चा ऐकली. लोकांचे विविध माध्यमांवरचे पडसाद वाचले आणि त्यानिमित्ताने
–
ज्ञान
प्रबोधिनीच्या विज्ञाननिष्ठ पद्धतीचा उल्लेख या चर्चेत झाल्याचे ऐकले.या परंपरेचा
प्रतिनिधी म्हणून मला काही भाष्य करावस वाटल. त्यावर मला चर्चा अपेक्षित नाही हे
ही तितकच खरं आहे.
मृत्यू हा जीवनाचा अटळ भाग. आयुष्य जितक्या आनंदाने जगाव तितक्याच उत्तमतेने
मृत्यू यावा आणि त्यानंतरचे सोपस्कारही
तितक्याच आत्मीयतेने पूर्ण व्हावेत ही खरी जीवनाची गुणवत्ता. अशा संकल्पनेकडे आपण
गूढ,उत्सुक आणि तितक्याच भयानेही काही वेळा पाहतो कारण शरीरातून चैतन्य बाहेर
पडल्यावर आपल्या समोर असलेला अचेतन देह हा आपल्याला या सर्व भावनांची जाणीव करून
देतो.असे असताना या सर्वाची सार्वजनिक दृष्टीनेही योग्य ती व्यवस्था होणे असाही
महत्वाचा भाग ज्याला आपल्या परंपरेने नाव दिले अंत्येष्टी. दहाव्या
दिवशी केला जाणारा काकस्पर्श विधी हा अशाच हृद्य भावनेचे प्रतीक आहे असे वाटते.
जिवंतपणी मनात असलेल्या इच्छा अपूर्ण
राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्याचा एक उपाय या विधीद्वारे आपल्याला मिळतो.आपल्या
जवळच्या व्यक्तीच्या इच्छा त्याच्या निधनानंतरही पूर्ण करण्याची संधी आपण घेणे व
त्यानिमित्ताने दिवंगताला आपली श्रद्धांजली अर्पण करणे महत्वाचे आहे.
या सर्वात महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे पुरोहित.समाजाच्या अग्रभागी राहून
जो समाजाला मार्गदर्शन करतो ती व्यक्ती म्हणजे पुरोहित. अंत्येष्टी संस्कारासाठी जे पुरोहित मार्गदर्शक म्हणून कार्यरत असतात
त्यांना समाजात एक वेगळे स्थान होते. आजही ते आहे. मला व्यक्तिश: असे काम करणा-या
व्यक्तींबद्दल आदरच वाटतो. ज्या ठिकाणी जायला आपण स्वाभाविक कचरतो,स्मशान किंवा
स्मशान घाट आपण सहज न वापरणारे शब्द ही मन्डळी अक्षरश: रोज जगत असतात. त्यांचे
मानसिकता,चरितार्थ या सर्वाचा विचारही सुज्ञ म्हणून आपण केला पाहिजे.वाराणसी
सारख्या ठिकाणी गुलाबबाई या महिलेनेही असेच कार्य अनेक वर्षे केले आहे.मंगला
आठलेकर यांचे “गार्गी अजून जिवंत आहे” हे पुस्तक या विषयालाच समर्पित आहे.आनंदाच्या
प्रसंगी कोणीही सहाय्य करतेच पण अशा विशेष निमित्ताने जे मदत करतात त्यांचा आदरही
महत्वाचा. अर्थात त्याच वेळी या पुरोहित गटानेही आपल्याकडे येणा-या किंवा आपल्या
मार्गदर्शनाची गरज असलेल्या लोकांना योग्य तो सल्ला द्यावा आणि त्यांना कमीत कमी
त्रास होईल असे पहावे कारण येणारी व्यक्ती ही शोकाकुल अवस्थेतच असते हेही समजून
घ्यायला हवे. त्या त्या समाजरचनेचे पडसाद हे तत्कालीन कलाकृतीत उमटतात. हा नियम
अगदी प्राचीन धर्मशास्त्रीय ग्रंथांनाही लागू आहेच. अशावेळी एखादी कलाकृती म्हणून असा
विषय समोर येतो त्यावेळी ती कोणत्या काळातील समाज व्यवस्थेवर भाष्य करते हेही
पहायला हवे.
तत्कालीन प्राचीन भारतीय परंपरेत
पुरोहित (ब्राह्मण) व्यक्ती ही अध्ययन,
अध्यापन व पौरोहित्य अशा गोष्टी करीत असे.त्यामुळे तिच्या चरितार्थासाठी तिला
नेमून दिलेले काम हे महत्वाचे असे.समाजव्यवस्था सुस्थिर होण्यासाठीच खर तर
वर्णांची योजना झालेली दिसते.या सर्वात आपल्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर
करून कोणी जर समाजाची व्यवस्था असंतुलित करीत असेल तर ते योग्यच नाही. ज्याने
रक्षण करायचे तोच जर समाजावर संकटे घालू लागला तर ते ही अविवेकीच म्हणावे लागेल.
एकूण काय तर माझा अनुभव असा सांगतो की माणसाच्या मनात अन्य कोणत्याही
विधीपेक्षा मृत्यू आणि संबंधित विधीच्या बद्दल एक भीतीयुक्त,गूढ आस्था आहे, आणि जो
जन्मला त्याला मृत्यू येणारच या न्यायाने अन्य संस्कार विधींच्या तुलनेत या
संस्कार विधीला मागणी नक्कीच अधिकच! अशावेळी समाजानेही “विवेकाचा” विचार ज्यातून
स्थापित होईल त्या संकल्पना आत्मसात
केल्या पाहिजेत, तर हा तिढा सुटेल.शेवटी
काय तर जी सत्य हाती देते ती श्रद्धा ! त्यामुळे अशी विवेकनिष्ठ श्रद्धा मनात धरून
आपण सर्वजण या प्रक्रियेकडे पाहू तर ते अधिक औचित्याचे ठरेल.
No comments:
Post a Comment