खूप खूप दिवसात अभ्यासाखेरीज पुस्तक वाचलं नव्हतं.म्हणजे असं पुस्तक वाचलं नव्हतं की जे वाचून जीवाची काहिली,बुद्धीची रस्सीखेच आणि शरीराची धावपळ थोडी थंडावेल.आमची प्रबोधिनीची लायब्ररी मस्त आहे.तिथले ओंकारदादा आणि सीमाताई मला पुरते ओळखून आहेत.खंडीभर पुस्तक नेणारी लबाड ताई आली असं बहुधा मला पाहून त्यांना वाटत असणार.पण ते व्यक्तिशः माझ्या वाचनप्रेमातले महत्वाचे वाटेकरी आहेत.
वेगळं काहीतरी हवं आहे म्हटल्यावर गोनीदांचं कृष्णवेध दादाने हाती ठेवलं.गोनीदा हे साहित्यिक पेक्षाही मला एक गोड आजोबाच वाटतात नेहमी.कधी आपल्याला गडकिल्ल्यांवर फिरवतात तर कधी नर्मदा परिक्रमेला नेतात.त्यांच्या पुस्तकांची पारायणं केली आहेत मी.त्यांची मृण्मयी तर शाळकरी वयातच माझी मैत्रीण झाली नव्हे कोण्या एका साजिर्या क्षणी तिच्या माझ्यात असलेल्या साम्याबद्दलही कोणी मला जाणीव करून दिली आहे! आपण किती नशीबवान आहोत की अशी मंडळी आपल्या लेखनातून आपल्याला भेटतात.त्यांची पुस्तकं दरवेळी नव्यानेच भेटतात आणि नवं काहीतरी शोधायला मदत करतात आपल्यातलचं! गुगल बुक्सच्या जमान्यातही हाती असलेलं असं पुस्तक वाचण्याची गंमत न्यारीच आहे.ती यांत्रिक पुस्तकं "बोलत"नाहीत असं वाटतं मलातरी.त्यामुळे दुर्गा भागवत,पुल,गोनीदा अशा आजीआजोबांच्या कुशीत बसून त्यांचे हात डोक्यावर फिरत असल्याचा भास व्हायचा असेल तर त्यासाठी हाती पुस्तक घेऊनच वाचायला हव. शेवटी आईच्या हातचा साजूक तुपातला शिरा आणि तयार विकत पिझ्झा यात फरक असतोच की!आर्या जोशी
No comments:
Post a Comment