मावशीच्या घरचे आंबे एक वर्षाआड यायचे.गोठण्यात दारात उभं राहिल्या राहिल्याच झाडाचे आंबे खुणावू लागत.
अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस माझ्यासाठी अक्षय्य आनंद घेउन भरून राहिला आहे.गोठण्यात देऊळवाडीत भार्गवरामाचं देऊळ आहे.मावशीच्या तळेवठारापासून वीस मिनीटं पायी अंतर!
तृतीया आमरसाच्या वाट्याच नजरेसमोर घेऊन उजाडायची.
सकाळी सड्यावरच्या ब्रह्मनदेवाचा नैवेद्य असे.घराघरातून आपटे मंडळींच्या गृहिणींची लगबग सुरु असे.माझाही सहभाग नव्हे लुडबुड असायचीच.पक्वानांनी भरलेली भांडी घेऊन पर्यातून रस्ता काढत आम्ही जायचो. आमचे काका वयाने सर्वात मोठे.त्यामुळे ते आधी नैवेद्य दाखवायचे.मग नारळी पोफळींनी भरलेल्या थंडगार छायेत जेवणं व्हायची.स्वप्नाळू पेंगेतच घरी यायचो.दुपार उतरायला लागली की भार्गवरामाच्या जन्मोत्सवाला जायची लगबग सुरु होई.चालत ओढीने गप्पा करत देऊळवाडीत पोचायचो.दारातला पांढरा चाफा आपोआप स्वर्गीय भक्तिभावात नेऊन सोडत असे.देवळाला प्रदक्षिणा घालणारी पालखी,बुवांचं कीर्तन,जन्म,पाळणा सगळा साग्रसंगीत कार्यक्रम.घरी परतायला नऊ वाजायचे.चालत परतताना पुन्हा गप्पा पण मनात अजूनही जय जय रामकृष्ण हरी रुंजी घालत असे.रात्री घरासमोरच्या सारवलेल्या अंगणात झोपताना सड्यावरून जाणारी वरात ऐकू येई. एखादी नवपरिणीत जोडी रात्री घरी येई आशीर्वाद घ्यायला.मग अख्खी वरात दारात.नवरीची ओटी भरली जाई.आशीर्वाद घेऊन मंडळी मार्गस्थ होत.पलीकडच्या गावात कुणीतरी गात असे खड्या आवाजात.नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची,तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची! एका जनार्दनी गवळण हसली! हरिचरणांशी मिठी तिने मारली!!
देवांचे आशीर्वाद घेऊन सुरु झालेली तृतीया कुट्ट अंधारात या भक्तिभावातच पेंगू लागे.दूरच्या जुवे बेटात कोणी एक वल्ली छोटी नाव घेऊन मासे पागायला निघे.त्याच्या नावेत लावलेल्या कंदिलाचा मिणमिणता उजेड आजही माझं मन उजळवून टाकतो केवळ स्मरणाने!!!आर्या.
No comments:
Post a Comment