आज मी माझ्या शाळेत गेले होते. कार्यक्रमाची अध्यक्षा म्हणून डाॅ.आर्या आशुतोष जोशी यांचा परिचय करून देण्यात आला. माझ्या सगळ्याच शिक्षिका माझ्या माहेरच्या अदिती याच नावाने हाक मारत होत्या आणि कुणाशीही ओळख करून देताना आमची "अदिती" असंच म्हणत होत्या.
विवाहात मुलीचं नाव बदललं जाण्याचे धर्मशास्रीय संकेत मला माहिती आहेत.तो आत्ताच विषय नाही. पण मी आज दिवसभर स्वतःला शोधत होते , अदिती आणि आर्या.
माझ्यापुरतं सांगायचं झालं तर आशुतोषने माझं नाव बदलणं यात मला कोणताही तात्विक अपमान वाटला नव्हता.ती माझ्यासाठी गंमत होती.नवं नाव घेण्याची. पण माझी अट होती की मी तुला नावं शोधून देईन माझ्या आवडीची आणि त्यातलंच एक निवडायचं.त्याने ते मान्य केलं.
विसुभाऊंशी बोलून मी कोशातून शोधलेल्या नावांचे अर्थ एकदा पक्के करून घेतले आणि तीन नावं आशुतोषच्या स्वाधीन केली. आर्या ठेव आवडेल मला हेही आवर्जून सुचवून ठेवलं होतं.
दिती म्हणजे मर्यादा,बंधन. जी त्याच्याही पार ती अदिती. आर्या म्हणजे प्रगती करणारी. अर् धातू आहे त्यात. noble ,wise असा त्याचा इंग्रजी अर्थ.
आपलं नाव आपली ओळख असते. त्यामुळे बंधनरहित अदितीला जोडीदारही असा लाभला की ज्याने तिच्या अभ्यासाला कधीच बंधन घातलं नाही आणि त्यामुळे या नव्या आर्या नावाच्या अर्थाकडे माझी वाटचाल नक्कीच सुरु झाली.
माहेरचं नाव हे जास्त आत्मीय असतं.अलीकडे तर आडनावही बदलण्याची पद्धत लोप पावायला लागली आहे.मी यावर स्रीवादी दृष्टीकोनातून नक्कीच लिहीत नाही आहे.हे केवळ माझंच मनोगत आहे माझ्या नावापुरतं. पण तरी आज मला जाणवलं की नाव बदललं नसतं तरी फरक नसता पडला नक्कीच. मी अभ्यास करत राहिले असतेच. पण तरीही माझ्या सहचराने खूप विश्वासाने माझ्यावर ही नवी जबाबदारी सोपवली होती सहजीवनाच्या उंबरठ्यावर.ती पूर्णत्वाने नाही पण काही अंशी तरी जगण्याचा आणि सार्थ करण्याचा प्रयत्न मी नक्कीच केला.आईबाबांची आत्मीयता आणि सहचराचा विश्वास दोन्ही एकावेळी घेऊन जगता येणं तितकच अवघड पण स्वतःला बळ देणारं वाटलं मला!
No comments:
Post a Comment