Tuesday, 1 January 2019

या मम्माला बेबीज किती?? बालकथा

या मम्माला बेबीज किती??
मनू आईबरोबर मटार सोलत बसली होती.
थंडीचे गुबगुबीत दिवस होते. ऊबदारशा उन्हात अंगणात बसून आई आणि मनू निवांत मटार सोलत बसल्या होत्या.
मटाराची एकेक शेंग सोलता सोलता आई आणि मनू गप्पा मारत होत्या. मनूला आई म्हणाली मने हे बघ ही एकेक शेंग म्हणजे नं मटार बाळाची आईच असते गं.
मनूला गंमत वाटली...
आई ,माणसाच्या आईला पण एकावेळी एवढी बाळं होतात का?
आई हसून म्हणाली नाही ग पिलू. हे आपण आत्ता भाज्यांच्या आणि फळांच्या बाबतीत बोलतोय गं.माणसांमधे आईला देवबाप्पा एकावेळी एक किंवा फारतर दोन बाळं पाठवतो. अगदीच कधीतरी तीनसुद्धा.पण आपण आत्ता मटार मम्मांच्या बेबीज मोजूया चल..
मनूला मग वेळ घालवायला उद्योग मिळालाच...
मटार सोलणं मागे पडलं आणि प्रत्येक शेँगेत मटार किती म्हणजे "या मम्माला बेबीज किती?"
म्हणताना मने हळूच तोंडात मटाराचे गोड गोड दाणे टाकायलाही विसरली.
एक शेंग उघडली... या मम्माला बेबीज किती??? नऊ!!!
दुसरी शेंग सोलली... या मम्माला बेबीज किती?
पाच!!!
तिसर्‍या शेंगेतून हळूच एक हिरवी हिरवी अळूताई मनूच्या हातावर येऊन फिरायला लागली...
मनूने घाबरून तिला सोडून दिली...
आई यात बेबीज कुठेत???
अग ती अळी शेंग खायला आली होती... ती शेंग  आपण नाही घ्यायची खायला...
मग पुढची शेंग... त्यात अगदीच पिलू पिलू मटारचे दाणे होते...
मनू म्हणाली "आई गं हे बेबीज तर अजून किती पिटुकले आहेत.. कसले गोड दिसत आहेत..."
आणि मग शेंगेतले मटार मोजण्याबरोबर या बेबीजचं वय काय असेल हाही विचार मनूने सुरू केला...
अशी सगळी गंमत सुरु झाली..
काही मटार बाळे चागली लठ्ठमुठ्ठं टपोरी तजेलदार होती.. आई म्हणाली मनू ही बाळं आपल्या आईच्या पोटात बसून भरपूर खाऊ खातात,आईचं ऐकतातही सगळं.म्हणून कशी टवटवीत आहेत...
काही बाळं अगदीच कोरडी आणि जरा कमी हिरवी दिसत होती...
आई ही बाळं आईने दिलेला खाऊ नीट खात नसणार...
बरोब्बर मनू... अगदी तुझ्यासारखीच आहेत. नाही का??
असं करत करत सगळ्या मम्मांची बाळं मोजून,त्यांचं वर्णन करून सगळी बाळं एकदाची मनूच्या आईच्या स्वयंपाकाच्या रोवळीत जाऊन बसली...
त्यांच्या मम्मा शेंगा आईने आणि मनूने ओल्या कचर्‍याच्या खड्ड्यात नेऊन टाकल्या...
एक शेंग तशीच राहिली होती.. मनूने सोलली आणि त्यात एकच दाणा निघाला टपोरा हिरवा हिरवा...
ही मनू आणि ही मनूची आई... मनूने आईला पटकन् तो दाणा भरवला....
आता मनूला छंदच लागला आहे.
डाळिंब,सीताफळ,पपई, शेंगभाज्या सर्वांमधेच मोजत बसते.. या मम्माला बेबीज किती???
त्यामुळे चार वर्षाच्या मनूला आता एकपासून शंभरपर्यंत आकडे म्हणता आणि मोजता पण येतात बरं का!
चला... तुम्हीही मोजताय का आईबरोबर?
या मम्माला बेबीज किती????


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...