Tuesday, 5 February 2019

माझ्या गावी भेट दिलीच पाहिजे कारण


माझ्या  गावी भेट दिलीच पाहिजे कारण....(शब्दसंख्या १०५४)




माझं गाव म्हणजे माझं जन्मगाव नाही. माझं माहेरचं किंवा सासरच्या कुटुंबाचं गावही नाही... मग तरी हे गाव माझं कसं?





शहरातल्या धकाधकीला काहीसं कंटाळून आणि निसर्गाच्या सान्निध्यात रहायचा विचार पक्का झाला म्हणून आम्ही एक गाव शोधायचं ठरवलं. पण इथे आम्हाला जवळपास समुद्र किंवा पर्यटनस्थळ नको होत, गजबज नको होती. आम्हाला हवा होता निसर्गाचा पुरेपूर सहवास जो देईल आम्हाला मोकळा श्वास !





आम्हाला लावायची होती परसात भाजी आमच्या कुटुंबापुरती. आम्हाला हवा होता ओहोळ ज्याची झुळझुळ मनाला आल्हाद देईल. आम्हाला हवी होती जिवाभावाची माणसं जी आम्हाला सामावून घेतील.





आम्ही गावात जमीन घेतली, जमीन म्हणजे शेतजमीन. तिथेच   बांधलं घर. चिरा किंवा सिमेंटचा वापर करून नाही तर फक्त आमच्याच शेतातली माती आणि बांबू वापरून कौलारू घर. सूर्य आमच्या घराला अखंड ऊर्जा पुरवतो आणि धुक्याची दुलई घराभोवती लपेटून पहाट येते माझ्या अंगण- परसात.





माझं हे गाव इतिसाहकालीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आमच्या जवळच्या निसर्गरम्य अणुस्कुरा घाटातून व्यापारी मार्ग जात असे. पांढरपाणीची लढाई तर प्रसिद्धच आहे.  विशाळगडाकडे पाहिलं तरी छाती अभिमानाने फुलून येतेच..





ओळखलंत का माझं गाव ?  थोडं कठीण आहे कारण माझं गाव तसं अनघड आहे. हे गाव आधुनिक पर्यटकांना आकृष्ट करणारं नाही ना!!! पण निसर्गप्रेमींना या गावाला भेट देणं म्हणजे  आनंदयात्राच !





पुण्याहून आलात तर कराड, मलकापूर मार्गे अणुस्कुरा घाटातून  खाली उतरायचं. देशातून हा घाट कोकणात उतरवतो आपल्याला. घाटमाथ्यावरून थोडा विसावा घेऊन, निसर्गाची उधळण पाहून खाली उतरलं की येतं ‘पाचल’. हे आमच्या आठवडी बाजाराचं गाव. इथून एक निसर्गरम्य डांबरी सडक तुम्हाला आमच्या गावात घेऊन येते. ... चारी बाजूंनी डोंगरांच्या मध्ये खोलगट खड्यात वसलेलं म्हणजे जणूकाही देवपूजेच्या ताम्हनात वसलेल माझं “ताम्हाने.”




या गावाला का भेटायचं बरं? इथे समुद्रकिनारा आहे ? छान सुखसोयी देणारी आधुनिक पर्यटक निवासस्थाने आहेत? इथे जवळपास मांसाहारी भोजनालय किंवा मद्यपानाची दुकानं आहेत? गावात एखाद प्रसिद्ध देऊळ तरी आहे का मग ? तर या सर्व सहज स्वाभाविक प्रश्नांची उत्तर “नाही” अशी आहेत आणि हेच माझ्या गावाचं माझया “नजरेतून ‘ वेगळेपण आहे.





कोकण म्हटलं की वरचे सर्व प्रश्न समोर येतातच पण माझं गाव “कोकणात असूनही या सर्वाला अपवाद आहे.





मग आहे  काय इथे???????  





कोकणातील अस्पर्शित आणि म्हणूनच निसर्गाने संपन्न माझं गाव.




ताम्हाणे गावाच्या बारा वाड्या. तेली वाडी, पहिली वाडी, न्हाव्याची वाडी,  गावंदर वाडी,सौंदळकर वाडी आणि आमची वाडी म्हणजे होळीचा मांड.





गावातील बहुतेक लोकसंख्या आता मुंबईत आहे पोटापाण्यासाठी. त्यामुळे शहर सोडून गावात आलेले आम्ही मात्र त्यांच्या नजरेत वेडे ठरतो. पण नेटवर्कची सुविधा आमच्या गावात आल्याने आम्ही आमचा नोकरी- व्यवसाय इथून सांभाळतो आणि निसर्गाची उबदार कूस ही अनुभवतो. आहे न गंमत?





आमच्या गावात राहत असलेले लोक तसे निवांत आहेत. इथला निसर्ग त्यांना रोजचाच. पण निसर्गप्रेमी माणूस किंवा आजच्या काळातील हिरवाईची निकड ओळखणारा माणूस इथे मोकळा श्वास घेऊ शकतो.   गावात किराणा मालाचा पूर्वापार व्यवसाय करणार एकच दुकान, एक दोन गिरण्या, सकाळ संध्याकाळ येणारी एसटी हे सर्व आहेच. पण गावात वेगवेगळ्या वाड्या जोडणारे रस्ते आजही मातीचे आहेत. वाहन इथे पोचत नाही. शाळेतली मुलं शाळा सुटल्यावर गप्पा मारत सहा किलोमीटर चालत जातात.... दंगा करत....





तेलीवाडीत चला  संध्याकाळी.... झाडात लपलेला सुंदर पक्षी लांबच लांब शीळ घालतो.. शाळेतल्या विद्यार्थ्याला एखादी कविता पाठ करायला बाईंनी सांगावी आणि त्याने ती पुन्हा पुन्हा म्हणत बसावं अशी सुंदर शीळ!





मोकळ्या हवेत फिरायला जायचंय का? पहिल्या वाडीपर्यंत चला नाहीतर बौद्धवाडीत चला...  मोकळ्या मळ्यातून आपण निवांत चालत राहतो. मधेच चढ मध्येच उतरंड अशी डोंगरातली वाट...  इथे वाहन जाऊ शकत नाही अशीच पायवाट! या वाटेत काय दिसेल? खैराच्या झाडावर लटकलेल चिमुकल्या पक्ष्याचं घरटं, निवांत उडणारे गायबगळे,दगडाखाली लपून बसलेले चिमुकले बेडूक असं खूप काही आनंद देणारं. हे पक्षी इथे धमाल करतात कारण वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नाही. सारं कसं शांत, निवांत...





पिवळ्या चोचीच्या धनेश पक्ष्याची जोडी हवेत पंख पसरून झेपावताना आणि एकमेकांना साद-प्रतिसाद देताना तुम्हाला पहायला मिळेल. पण हे सर्व करताना या पक्षी मित्रांना आपला त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यायलाच हवी. बरोबर ना?





सुंदर रंगांनी सजलेला खंड्या उडताना पाहणं, रंगीबेरंगी रानफुलांनी घातलेला गालिचा पाहत  प्रसंगी नाईलाजाने तुडवतही पायी चालणं हे इथे अनुभवता येतं.





गावातून वाहणारा ओहोळ हा एक वेगळाच अनुभव. पाण्यातून चाला, तुरुतुरु चालणारे खेकडे पकडणारी मुलं पहा...  एखादा चिमुकला ससा , भेकर, रानडुक्कर इथे भेटेलही. माकडदादांची टोळी ही तर गावभर वाकुल्या दाखवत, शेत तुडवत या झाडावरून त्या झाडावर फिरत असते.





एखाद्या दिवशी कंटाळा आला आणि वाहन हातात असेल तर राजापूरच्या धोपेश्वर मंदिराला भेट देऊन नतमस्तक व्हा... राजापूरच्या गंगेत पावन व्हा... उन्हाळ्याचे गरम पाण्याचे झरे पहा... डोंगरभेट घ्यायची असेल तर विशाळगड आहेच... पूर्णगडचा किनारा, आडिवरे देवी इथून दीड तासांवर आहे.. पण खर तर गावातला एक डोंगर चढून दुस-या गावात जाण्याची मौजही कमी नाही. ताम्हाने चढणे आणि रायपाटणात डोंगरावरून उतरणे. निसर्गाच्या कुशीत, सह्याद्रीचे दर्शन घेत चालत रहा. चालत रहा...   मधेच एखादी म्हातारी भेटेल... तिच्या तरुणपणापासून इथूनच जाते येते ती रोज…





माझ्या गावात काजू आहेत,, आंबे आहेत.. पण फवारणी करून पिकवलेला हापूस नाही. राजापुरी हापूस आणि तो ही जरा उशीराच येणारा पण अत्यंत मधुर...  माझया गावात वनसंपदा विपुल आहे. खैर, किंजळ, अर्जुन, साग अशी स्वदेशी झाडं विपुल आहेत. जैवविविधता म्हणून तर अजूनही जपली गेली आहे. रात्री कोल्हे, रानमांजर आणि चुकून वाघोबाही दिसेल.  एखाद्या दारातली अबोली, तिचा गजरा मळलेली मालकीण, तिच्या गोठ्यात नुकतीच व्यालेली गाय आणि तिची गोंडस पाडी आपलं लक्ष वेधून घेईलच.





आषाढात आलात तर मुसळधार पावसाचा सपासप मारा कंटाळा आणेपर्यंत हैराण करेल अक्षरशः! पण त्याचवेळी डोक्यावर इरली पांघरून गुडघाभर चिखलात उभे गावकरी भातलावणी करताना पाहताना डोळ्याचं पारणं फिटेल. फोटो काढलात तर निरागस महिला हातात रोपं घेऊन पोज देतील. शहरातील लबाडी अजून तरी त्यांच्या ओळखीची नाही!!!





गणपतीच्या एखाद्या कारखान्यात गणपती घडताना पहायला मिळेल.





हिवाळ्यात आलात तर  पानगळ पहा... हलत डुलत एकेक पान झाडाचा निरोप घेत जमिनीवर विसावताना पाहताना अंगावर काटा येईल. गावावर पसरलेली कडाक्याची थंडी तुम्हाला गारठवेल आणि धुकं तुम्हाला चंद्रमाधवीच्या प्रदेशातच नेईल.





शिमग्याची मजा पहायची तर चला... हा होळीचा मांड. शिशिरात खराटा झालेल्या शुष्क झाड़ला एकेक चाफा उमलू लागतो, शिमगा येताना झाड जरा बाळसं धरत. ग्रामदेवता गुप्तादेवी भक्तांना भेटायला बारा वाड्या फिरते आणि सर्वाना कृतार्थ करते.





भक्तिभाव असेल तर भजन सप्ताह किंवा कीर्तनाला अवश्य या. नीरव शांततेत लांबून येणारे टाळ- पखवाजाचे आवाज  तुम्हाला मंदिराकडे ओढून नेतील.





कोणतीही  विशिष्ट लोककला इथे नाही, आमचे सरपंच किंवा अन्य पदाधिकारी ही सर्वसामान्य आहेत, जवळ आकर्षण वाटणारं पर्यटनस्थळ नाही. तरीही माझं गाव निसर्गाच्या वरदहस्ताने संपन्न आहे. पण एक विनंती. गावाला हौशी पर्यटक नको आहेत जे इथे येऊन प्लॅस्टिक आणि खावचा कचरा आणतील, जे गावाची शांतता भंग करतील, इथल्या पशू -पक्ष्याचे अधिवास नष्ट करतील. ज्यांना खरा निसर्ग अनुभवायचा आहे त्यांचं स्वागत, इतरांना मज्जाव! आणि जर असं दिसलाच तर तुम्हाला गावातून नम्रतापूर्वक हद्दपार होण्याची विनंती करणारीही मीच असेन बरं का !





गावचे अस्पर्शीत सौंदर्य जपले जावे आणि इथला निसर्ग असाच हसरा असावा ही माझी प्रांजळ  आणि प्रामाणिक मानसिकता !





चला तर मग कधी येताय निसर्गाच्या कुशीत अलगद विसावायला ?





****************************




No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...