Tuesday, 5 February 2019

चंद्रमाधवीच्या प्रदेशात....

गुलालाची उधळण
उडत्या थव्यांची पखरण
खिल्लारांच्या गळ्यातील किणकीण
संध्यासमयी ईश्वराला अनन्यभावे लीन!!
चांदोबाचा टीळा
चांदण्यांची रांगोळी
सांजगारव्याचा धूप
अनाहत नादाची टाळी!
अशी सजली पूजा
संध्यासमयीची
परमेश्वराच्या चरणी
ओढ माझ्या अंतरीची!!
या माझ्या ओळी... गावातल्या रम्य संध्याकाळी मला सुचल्या... अवतीभवती जे अनुभवायला मिळतं ते "छंदा"त बांधण्याचा माझा हा "छंद" अर्थात कविता करणं.
तसंही लहानपणापासूनच समोर काही वेगळं दिसलं की त्याचा निबंध लिहीण्याची सवय मला माझ्या बाबांनी लावली आहे.थोडी मोठी झाल्यावर माझी समजही थोडी वाढली असावी.संस्कृत भाषेने माझं शब्दविश्व समृद्ध केलं आणि गद्याऐवजी पद्यात अभिव्यक्त होण्याचा "छंद" मला जडला... मी कविता करू लागले माझ्याही नकळत...
शहरातल्या गर्दीच्या रस्त्यातून जाताना लाल चाफ्याचं फूलही माझ्या कवितेचा विषय होतं आणि कोकणातल्या आमच्या आडगावातल्या घराभोवती धुक्याला लपेटून येणारी पहाटही मला प्रेरणा देते कविता करण्याची...
हा अनुभव वेगळाच असतो. असं बसून ठरवून कागद लेखणी घेऊन कविता सुचत नाहीच. ती सुचण्यासाठी समोर डोळ्यांनी काही अनुभवावं लागतं, ते डोळ्यातून हृदयाच्या तळाशी झिरपावं लागतं... मग मनाच्या कागदावर वैखरी अक्षरं उमटवत जाते. आणि साकारते "कविता".
मन आनंदी असलं तरी कविता सुचते आणि मन निराश झालं तरी त्या भावनांना मोकळी वाट करून देते माझी "कविताच".
मी शहरात होते त्यापेक्षा गावात आल्यावर मला माझा छंद अधिक ऊर्जा देतो असं जाणवतं. माझा एकाकीपणा घालवणारा, मला लोकांच्या मनोराज्यात फिरून यायची मोकळीक देणारा, काहीवेळा वास्तवापलीकडे जाऊन चंद्रमाधवीच्या प्रदेशातही फिरवून आणणारा माझा छंद!
तो माझा छंद नसून तो माझा मित्र आणि प्रतिबिंबही आहे.
अलीकडे तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीही मला कवितेची प्रेरणा देतात. अगदी मीच थापलेली भाकरी पौर्णिमेचा चंद्र होते तर  गावातल्या मतिमंद मुलाला फिरायला नेणारी आईही मला काव्य सुचवते.
पहिली माझी ओवी! देवाजीच्या पायी!
फुलांची ओंजळ! त्याच्यासाठी!!
दुसरी माझी ओवी! झाडापानांसाठी!
त्यांच्या सोबतीने! पक्षी राहती!!
तिसरी माझी ओवी! शेतीभातीसाठी!
धरतीच्या कुशी! हिरवी बाळे!!
चवथी माझी ओवी!चवतीचा चांद!
मळ्यात आपुल्या ! कष्ट करी!!
पाचवी माझी ओवी! चंद्राची  चांदणी!
खेळे माझ्या अंगणी! रातदिन!!
माझं कुटूंब,आमचं रोजचं आयुष्य हे असं आता वेगवेगळ्या "छंदात" सामोरं येतं.कधी ओवी तर कधी अभंग होऊन,कधी चारोळी तर कधी मुक्तछंद  होऊन.
सणांच्या शुभेच्छा सर्वांना देतानाही त्या आतूनच "छंदातच" उसळत येतात आणि मला अनामिक ऊर्जा देऊन जातात.
ज्ञानाचा नंदादीप,
सद्भावनांची माला!
आत्मीयतेच्या घटी
परमेश्वरी लीला!!
नवज्ञानाची शस्रे पारजून
कुंठीत विचारांचे सीमोल्लंघन!
विजयादशमी अशी साजिरी
प्रसन्न होईल तन आणि मन!!
असं म्हणत माझा छंद मला ईश्वरचरणी लीन करतो तर कधी देशप्रेमाने उचंबळूनही येतो.
मी आणि माझ्या रोजच्या जगण्याला "अर्थ" देणारा माझा छंद कालांतराने मला व्यवहारातही "अर्थ" मिळवून देऊ लागला.. पण माझा छंद त्यासाठी नाही हे मला पक्कं ठाऊक आहे. केवळ हौस म्हणून मी तंत्रज्ञानाचा वापर करून काव्यनाद हा माझा पहिला ई कवितासंग्रहही प्रकाशित केला.. तो क्षणही आठवणीत जपून ठेवण्यासारखाच आहे.
माझा छंद मला प्रत्येकवेळी प्रसववेदनांची आठवण करून देतो. शब्ध मनातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतात, मी ही कासावीस होते, स्वतःला विसरते.कधी श्रांतावतेही. पण हळूहळू   माझ्या शरीराची नाळ तोडत तोडत  अक्षरं स्वतःचं अस्तित्वं दाखवतात, अक्षरांचे शब्द,शब्दांच्या ओळी, ओळींना छंदांची जोड मिळत एक बाळ हाती येतं... टपोर्‍या अक्षरात हसतं.... माझं काव्य.
माझा छंद म्हणजे कविता करणं हे माझं बाळही आहे. तो पुनःप्रत्ययाचा आनंद हीच माझी ऊर्जा आहे.


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...