माझा कणा मोडतो तेव्हा... एक हसरा रूग्णानुभव
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.. ही कुसुमाग्रजांची कविता शाळेत शिकले खरी पण आयुष्याच्या लढाईत ती विसरले आणि संसाराची कसरत आणि नवर्याच्या ध्येयाची "पाठ"राखण करता करता मी माझी "पाठ" आणि "कणा" एकदाचा मोडून घेतलाच...
विकीच्या दोन बैठकींना जाण्याच्या बेतात असतानाच माझी कंबरताई बोलू लागली.मला चालताना तिची थरथर जाणवू लागली.कंटाळली किंवा थकली असेल ती असे समजून मी तिला मधेमधे विश्रांती देऊ लागले.पण ही बया काही सुधारेना..
सहा तासांचा प्रवास करत माझा मोडका मणका सांभाळत मी पुण्यनगरीत पावती झाले.
दोन दिवस जरा उपचार व्यायाम योगनिद्रा वगैरे करून मी माझ्या "पाठी"शी उभी राहिले.
तरीही एके दिवशी माझ्या पाठीने असहकार पुकारला.तूला सरळ उभंच राहू देणार नाही बघ आता असं म्हणत तिने मला शरणागत मुद्रेतच आणलं.हालचाल नाही की काही नाही.
तशीच एक रात्र अक्षरशः घडाळ्यात मिनिटं मोजत मी काढली.चौथीत शिकलेला तास काटा मिनिट आणि सेकंद काटा मदतीला आला.
कशिबशी सकाळी सहाला योगकेंद्रात पोचले आणि चांगली तीन तास मी योगनिद्रा केली.अस्मिता माझी मैत्रीण आणि तिथले शिक्षक खरोखर सहकार्य करणारे.त्यामुळे मी सगळे लाड करून घेतले.
कुणी पाणी पाजतय,कुणी ब्लँकेट घालतय,कुणी डोक्यावरून मायेने हात फिरवतय आणि कुणी धीर देतय.आणि मी मोडक्या कण्यामुळे तीन महिन्याच्या बाळासारखी पाठीवरच पडून वेदना अनुभवत होते.
केदार सरांनी येऊन दिलासा दिला आणि मी इच्छाशक्तीवर दोन तायांच्या मदतीने उभी राहून चालले.काहीही कळत नव्हतं पण तरी मी जिंकले.
मंजूताईंनी भरवलेले दडपे पोहे, संपदाताईंनी पाजलेलं आलं लिंबाचं सरबत आणि मोरावळा खाऊन तीन दिवसाच्या उपाशी शरीराला दिलासा मिळाला.
मी अँम्बुलन्समधे चालतच बसले निर्धाराने.आत स्टेचरवर झोपावे लागले.परिचीत रस्ता कधी असा वरून पाहिलाच नव्हता मी...
हाॉस्पिटलला न्यायला हर्षद होता सोबत आणि माझी जिवलग विनया आलीच होती.
वर्षभराच्या शारिरिक मानसिक ओढाताणीचा,मनात साठवून ठेवलेल्या घटनांचा निचरा करायची हीच सँधी! चलो आर्याताई लुट लो मजे!!
तिथल्या सिस्टरने माझा ताबा घेतला.मी पण आता "पेशंट" मोडमधे शिरले, हे भगवान माझ्यासारख्या वळवळ्या जीवाला पेशन्स ठेवावा लागतोय... बरं झालं हे पण शिकायला मिळालं.
आश्वस्त आणि मैत्रीपूर्ण शब्दात परिचय
करून घेणारे डाॅ.सुमीत अग्रवाल आले.माझा बडबड्या स्वभाव इथे उपयोगी पडतो.लगेच दोस्ती कुणाशीही!
चला मग आता उपचार घेऊ.स्पाईन सर्जन येतीलच,
व्वा.
भर चाळिशीत आणि कणा मोडक्या अवस्थेतही उमद्या आणि देखण्या डाॅक्टरच्या ताब्यात राहण्याचा आगाऊ आनंद झाला मला... हा हा हा..
डाॅ.वरूण देशमुख आले आणि माझे उपचार सुरू झाले.विनयाने कोणतीही कसूर न ठेवता जहांगीरच्या थंडगार खोलीत मला दाखल केलं.
ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे सदस्य पेशंटला दिलासा द्यायला तिथे येतात.त्यातल्या एक मुखर्जी नावाच्या गोड आजी आल्या. Why this beautiful lady is so sad.. व्वा. आनंद झाला.जोशीबुवांना सध्या झाडा शेतातून वेळ मिळत नाही त्यामुळे कुणीतरी माझ्या सौंदर्याला दाद दिली तर.... ही आजी मला जामच आवडली...
वेदनांनी कणा पुरता क्षीण झाला होता.मला स्वप्नांच्या राज्यात सैर करण्याची पूर्ण संधी डाॅक्टरांनी दिली.पेनकिलरची जबरदस्त इंजक्शन्स काम करू लागली.मी तरंगू लागले.किती झोपावे माणसाने नाही का??? अनेक जागलेल्या रा त्रींची झोप मी भरून काढली.
सिस्टर चांगल्या मिळाल्या सगळ्या.त्यांना सिस्टर का म्हणतात हे त्यांना कळले आहे अशाच त्या वागत होत्या.विनया माझी मैत्रीण नसून बहिणच आहे असे सर्वांना वाटत होते. आम्ही कायमच एकमेकींसाठी आहोतच!
संध्यासमयी पतीराज अवतरल्यावर माझा उजळलेला चेहरा माझ्या सखीच्या नजरेतून सुटला नाही.त्याचं प्रेम पर्यावरण असलं तरी माझं अद्यापतरी त्याच्यावर प्रेम कायम आहे... हा हा हा
स्वप्नांच्या प्रदेशात सैर करताना मजा येत होती.आजूबाजूच्या जाणिवा पुसट होत होत्या.
एमआरआयच्या गुहेत शिरताना मृतवत् होऊनच शिरावे नाहीतर माझे हृदय आतच बंद पडण्याची शक्यता दाट! लेकराचा कोवळा चेहरा समोर तरळला... भर लाॅबीमधे डाॉक्टर आणि नवर्यावर जोरात खेकसून मला अॅनेस्थेशिया द्याच अशी मागणी मी केलीच. आगाऊपणा माझ्यात मुरलेला आहेच... यंत्रात शिरण्याचा अनुभव घेत क्षणापेक्षाही कमी वेळात मी झोपले आणि जागी झाले तेव्हा सोपस्कार पूर्ण झाले होते.आपण वैकुंठात नसून लाॅबीत आहोत व्वा व्वा!!
मणक्याचा असहकार आता पूर्णांशाने समजला.उमद्या डाॅक्टरांनी तितक्याच समजूतदारपणे मला आॅपरेशन थिएटरमधे ते काय करत आहेत हे मिनिटामिनिटाला समजावून सांगत, समोर चित्र दाखवत माझ्यातला संशोधक जागा ठेवला....
दुसर्या दिवशी त्यांचाच हात धरून पाऊल वाकड पडलंच... आता होणारच की हो.... पडेल सरळ पडेल सरळ..
लटपटणारी कंबर झोपली.ठसठसणारा मणका आणि नस औषध पित बसले आहेत.वेदनाशामकांनी त्यांचं काम केलं आहे.
भारताचा "अभिनंदनीय " क्षणही झोपून पाहण्याची संधी मिळाली.
चला आता आर्याताई घरी आल्या.लेकराने चेहरा कुरवाळून गोड पापी घेतली.तिने इस्पितळात दाखल आई प्रथमच पाहिली होती. तीच आई घरी आल्यावर तिला आनंद झाला.तिच्याकडे पाहूनच मी कण्याला आणि पाठीला समजावलं आहे... या जीवाला ताठ मानेने आणि ताठ कण्याने जगता यावं यासाठी आता मला उभं रहायचं आहे. पुन्हा मोडलास तर तंगडं मोडून हातात देईन!!!,
आर्या.
Saturday, 2 March 2019
माझा रूग्णानुभव
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment