प्रत्येकीच्या मनात गजर्याची एकतरी सुगंधी आठवण असते. कधी आजीने घट्ट वेण्या घालून त्यात माळलेला तर कधी मैत्रिणीने लग्नात गुंफलेला...
काल माझ्या वाडीतल्या कुंदाच्या केसात भरगच्च माळलेली अबोली पाहिली.तिला सहजंच म्हटलं "किती छान दिसतोय ग"! तर आज तिने कुणाच्यातरी हाती स्वतः पायावर तयार केलेला मोगरा आणि अबोलीचा गच्च गजरा माळून पाठवला. तिच्या अंगणातल्या फुलांचा...
ती कोण आहे?खरंतर एकाच वाडीत राहूनही ती अजून माझ्या घरापर्यत पोहोचलेली नाही. आज येते उद्या येते करत
ती अजून येतेच आहे!! पण जाता येता भेटणारी ती कधी गाई वळते तर कधी शेण्या थापते.कधी पाणी भरते तर कधी बैलांना चारा खाऊ घालताना दिसते.
कधी अंगण परस झाडताना तर कधी पाणचुलीत लाकडं सारताना...
ती माझी कोण आहे??? तसं पाहिलं तर मैत्रीणच.पण तिची माझी भेट संध्याकाळी मी बाहेर पडल्यावर होते.
पण तिची माझी जाता येताची मैत्री आज सुंदर गंधाची आठवण लेऊन आली. माझं वास्तव्य सुगंधित करून गेली.फार अपेक्षा नसते खरं नाही का आपल्याला? पण मुखवटे ल्यालेली माणसं सगळं कसं छान आहे या मुखवट्यापलीकडे खरं रूप झाकून ठेवतात आणि त्या बेगडी मुखवट्याचे भावच खरं आहेत याला आपण भुलून बसतो. तेव्हा मग अशी एखादी कुंदा परमेश्वर भेटवतो जिला काही नको आहे पण जिला सहज बोललेल्या वाक्याचा अर्थ समजून घेऊन त्यातला भाव पोचविण्याचं सामंजस्य ईश्वराने दिलं आहे!
No comments:
Post a Comment