Tuesday, 15 September 2020

छोट्यांचा बाप्पा

 हा बाप्पा तुमच्याशी नक्कीच बोलणार आहे. तुमच्या सहवासात त्याला खूप खूप खूपपप आनंद होणार आहे. मात्र यासाठी पुढील अटी लागू आहेत हं.....

* तुम्हाला गणपती हा देव नसून तो आपला मित्र आहे असे वाटणे सर्वात महत्वाचे आहे.
* गणपतीची मूर्ती बुक करायला गेल्यावर घरच्यांना जो आवडला त्यापेक्षा भलताच गणपती तुम्हाला आवडणे आवश्यक आहे.
* मूर्ती घरी आणल्यावर किमान दहावेळा तरी त्या मूर्तीवरचा रूमाल काढून पाहण्याची गरज तुम्हाला वाटली पाहिजे.हे कुणी पाहिलेच तर आपल्या दंडाला किंवा कोपराला धरून खसकन् ओढून तिथून कुणीतरी तुम्हाला ओरडून बाजूला केले पाहिजे.
* केलेले डेकोरेशन नीट झालेले आहे ना याची सतत तुम्ही काळजी घ्यायला हवी आणि त्या चिंतेपायी तुम्ही त्यात काही अनावश्यक बदल केले पाहिजेत.
* घरातला नैवेद्य तुम्हालाच करायचा आहे अशा थाटात आईच्या अलार्मबरोबर तुम्हीही उठणे गरजेचे आहे. सोवळे नेसलेले बाबा किंवा आजोबा आणि नैवेद्यात आई आजी गर्क असतानाच तुम्हाला निसर्गाच्या हाकेला ओ द्यावीशी वाटण्याची अत्यंत तातडी निर्माण झाली पाहिजे.
*बोर्नव्हिटा घातलेले दूध आणि त्यानंतर खिचडी खाल्ल्यावर तुम्हाला पेंग येणे आणि तुम्ही सोफा किंवा गादीत लोळत पडणे आवश्यक आहे.
*अंघोळ झाल्यावर घातलेले कपडे पुढच्या काही मिनिटांतच तुम्हाला टोचू लाजले पाहिजेत, खाज येऊ लागली पाहिजे आणि हे कपडे बटणे तडातडा ओढून किंवा जमेल तसे ताणून अंगातून काढता आले पाहिजेत.ते तसेच फेकूनही देणे अपेक्षित. कपाटातला तुमच्या आवडीचा डोरा किंवा फ्रोजन नाहीतर स्पायडरमॅन विराजमान असलेला पोशाख घालुन तो गणपतीला दाखवण्याची तुमची हौस दांडगी असली पाहिजे.
* तुम्हालाही पूजा करावीशी वाटली पाहिजे आणि पूजेची सामग्री सांडणे,पाडणे तुम्हाला लीलया जमले पाहिजे.
* समोर ठेवलेल्या तीन चार रंगीत पुठ्ठ्यांच्या खोक्यातल्या खाऊची वाट पाहणे आणि जमल्यास नैवेद्य दाखवण्याआधीच तुम्ही एखादी वडी, बर्फी, पेढा उचलून कुणाला कळण्याच्या आतच तुमच्या तोंडातही गेला पाहिजे. त्यातलाच एक माव्याचा मोदक गणपतीच्या डाव्या तळहातावर ठेवण्याची जबरदस्त इच्छा तुमच्यात असायला हवी हं!
नातेवाईकांचा फोन आल्यावर """हो हो बसला नं गणपती"" अशा चर्चा ऐकताना पाटावर गणपती आधीच "" बसलेलाच होता नं"" मग आता परत कुठे जाऊन """ बसला""" असा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे
*किमान जयदेव जयदेव ध्रुवपद म्हणता आले पाहिजेच. आरती आली नाही तरी मोठ्यांच्या ओठांच्या हालचाली टीपत तुम्हीपण नवी आरती रचणे आवश्यक आहे.
झांजा वाजवता येणे आणि त्याही कोणताही ताल नसलेल्या "तालात""हे ही अनिवार्यच.
*अथल्वशील्श म्हणता येतं मला... पण ते ब्लम भूललल बूवश्वलोम असं म्हणणे किंवा कदाचित नीट छान शुद्ध म्हणणे पण फलश्रुतीत गडबड होणे ही आवश्यक.
अगदी हे सर्व नाही जमलेच तर " "" गंपटीबाप्पा मोलया...मंग्गमूत्ती मोलया.... तरी यायला हवे म्हणजे हवेच.
हे ज्यांना येईल त्यांचा हा बाप्पा त्यांना खूप खूप आनंद देवो!!!!!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...