गाणपत्य संप्रदायाचे उपास्य दैवत म्हणजे श्रीगणपती. गणेश पुराण, मुद्गलपुराण या पुराणांनी गणेशाचे महात्म्य सांगितले आहे.
ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती ही देवता.या देवतेचे ब्रह्मणस्पती सूक्तही ऋग्वेदात आहे. ओं गणानां त्वा गणपतिं हवामहे।या मंत्रामधे म्हटले आहे त्याप्रमाणे ब्रह्मन म्हणजे वाणीची देवता आणि गणांचाही अधिपती म्हणजे ब्रह्मणस्पती. पुराणकाळातील गणपती हे ब्रह्मणस्पती या देवतेचेच विकसित रूप आहे.भाद्रपद शुक्ल चतुर्थीला महासिद्धिविनायकी चतुर्थी किंवा शिवा म्हणतात. या दिवशी आपण श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करतो आणि पूजन करतो.या व्रताला " पार्थिव गणेश व्रत" असे नाव आहे.
सर्व चराचरात भरून राहिलेले ईश्वरी तत्व वंदनीय आहेच. पण सर्वसामान्य भक्तीला ईश्वराप्रती कृतज्ञता अर्पण करण्यासाठी त्या ईश्वराचे सगुण साकार रूप हवे असते. हत्तीचे मुख आणि मानवी शरीर असलेला गणपती हा मूर्तीरूपात आपल्यासमोर येतो आणि आपण त्याच्यात प्राण फुंकतो, आपल्यातले चैतन्य प्रक्षेपित करतो.
सुपाएवढे कान बहुश्रुतता शिकवतात, बारीक डोळे लांबचे पाहण्याचा म्हणजेच भविष्याचा वेध घ्यायला शिकवतात. उंदीर हा अज्ञानाचे प्रतीक आणि गणपती ही ज्ञानाची , विद्येची , कलेची देवता. ज्ञानाने अज्ञानाला पायाखाली धरले आहे म्हणजेच त्यावर मात केली आहे असाही एक विचार यामागे आहे. आपापल्या कुटुंबातील पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस पूजन करतो. काही कुटुंबात हे व्रत वर्षभराचे सुद्धा असते.
पूजेमधे आपण देवतेला आवाहन करतो.गंध, अक्षता, फुले, कापसाची वस्रे, यज्ञोपवीत वाहून पूजन करतो.अथर्वशीर्षाचा अभिषेक करतो.आयुर्वेदाने महत्व सांगितलेल्या उत्तम द्रव्यांचे मिश्रण असे पंचामृत अर्पण करतो. निसर्गात या दिवसात सहज उपलब्ध असलेल्या एकवीस औषधी पत्री, वेगवेगळी फुले, थंड गुणधर्माच्या दूर्वा गणपतीला अर्पण करून निसर्गाशीही जवळीक साधतो.
मोद म्हणजे आनंद देणारे उत्तमोत्तम पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतो.अनेक कुटुंबांमधे देवाचे रंजन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार गायन, वादन, नृत्य अशा कलांची सेवाही गणेशाचरणी रूजू होते.
शरीर- मन- बुद्धीला स्थिरता देणारे गणेश अथर्वशीर्ष गणपतीच्या उपासनेत महत्वाचे ठरते. अथर्वण ऋषींनी लिहीलेले हे एक उपनिषदच आहे. गुरुंच्या जवळ बसून गणेशाच्या तात्विक रूपाचे चिंतन करणे, त्याचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अथर्वशीर्षाचे पठण करणे.
गणपती हा सेनानयक. संघटनेचा अधिपती. लोकमान्य टिळकांनी या देवतेच्या या वैशिष्ट्यांचा आधार घेत स्वातंत्र्य चळवळीसाठी समाजाला एकत्र करण्यासाठी श्रीगणेशाकडेच नेतृत्व सोपविले आणि दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आजही सामाजिक एकत्रीकरणासाठी, समाज प्रबोधनासाठी गणेशोत्सव हे महत्वाचे माध्यम ठरले आहे.(कोरोना महामारीच्या या वर्षीच्या काळाचा विचार करता सामाजिक अंतर राखणे अधिक उपयुक्त ठरेल.)
गाणपत्य संप्रदायाच्या जोडीनेच देवी उपासना म्हणजेच शाक्त संप्रदायाची उपासना भारतीय धर्म संस्कृतीत महत्वाची आहे.
व्रत- वैकल्यांनी माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचा प्रयत्न धर्मशास्रकारांनी केलेला दिसतो. ज्येष्ठागौरी पूजन हे असेच एक व्रत. अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन असेहे व्रत आहे.गौरी म्हणजे अनाघ्रात पृथ्वी.या दिवसात सभोवती फुललेल्या तेरड्याच्या फुलांना सुद्धा गौरी म्हणून पूजले जाते. मुखवट्यांच्या गौरी,खड्यांच्या गौरी, तांब्यावर मुखवटा रेखून केलेल्या गौरी असे वैविध्यपूर्णप्रकार गौरीपूजनासाठी पहायला मिळतात. प्रांताप्रांतानुसार आणि कुळाचारानुसार त्यात फरकही दिसतो. माहेरवाशिणी म्हणून आलेल्या गौरींचे विशेष कौतुक होते. विविध प्रकारचे नैवेद्य, आरती,सजावट, पोशाख - दागिने यांनी गौरींचे पूजन केले जाते. गौरी आगमनाने घरात समृद्धी नांदावी, दूधदुभते उदंड असावे,धान्याची राशींनी कोठार भरून जावे अशी प्रार्थना केली जाते. सुवासिनींना बोलावून हळदीकुंकूही केले जाते. महिलांना एकत्र आणणारे आणि त्याच्या कला कौशल्यांना वाव देणारे हे एक सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक असे व्यासपीठच आहे.
समाजमन जोडणारे, माणसाच्या धार्मिक भावनांना व्यक्त होण्यासाठी अधिष्ठान देणारे असे हे उत्सव. सर्वांनी ईश्वराचे मांगल्य! पावित्र्य सांभाळून या व्रतांचा आनंद घ्यावा आणि द्यावीही.
गणपतीबाप्पा मोरया!
No comments:
Post a Comment