Tuesday, 15 September 2020

दीप अमावास्या

 दिव्याची अमावास्या-ज्ञानाची, तेजाची उपासना

डाॅ.आर्या जोशी
(धर्मशास्र अभ्यासक आणि संशोधक)
श्रावण महिना हा व्रतांचा राजा. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते व्रत धर्मशास्राने सांगितले आहेच. ऊन - पावसाचा निसर्गातील खेळ अनुभवत परमेश्वरचरणी लीन होण्याचा हा महिना. व्रत वैकल्ये आणि पूजा हे परस्परपूरक भाग आहेत.पूजेतील एक महत्वाचा उपचार असतो दीपपूजन. अंधार नाहीसा करून प्रकाशाकडे नेणारा दीप भारतीय धर्म -संस्कृतीत पूजनीय मानला गेला आहे.
ज्या समाजात विजेची उपलब्धता नव्हती त्या समाजरचनेत, कुटुंबरचनेत प्रकाश देणारी व्यवस्था म्हणजे दीप. तेलाचे वा तुपाचे नीराजन लावणे, कंदील लावणे, मशाली पेटवणे, पलिते पाजळणे यातून उजेडाची निर्मिती केली जाई.
घरातील पावित्र्याचे स्थान मानले गेलेले देवघर सूर्यास्ताला निराजनाच्या प्रकाशात उजळून निघे. संपूर्ण घरात आणि अंगणात तुळशीपुढेही दिवा लावण्याची पद्धत आजही घरोघरी दिसून येते.
शारदीय नवरात्रात अखंड नंदादीपाची स्थापना केली जाते. अंधार म्हणजे अज्ञान आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा हा दीप.
आषाढ महिन्याच्या सांगतेला म्हणजे श्रावण महिन्याच्या उंबरठ्यावर असे दीपपूजन केले जाते. अमावास्या हा दिवस म्हणजे चंद्रबिंबाचे दर्शन न होण्याचा दिवस. सृष्टी अंधारात बुडलेली असताना अमावास्येला असे दीपपूजन औचित्याचे आहे.
केवळ देवापुढीलच नव्हे तर संपूर्ण घरातील वापरायचे दिवे या दिवशी घासूनपुसून लख्ख केले जातात. त्यात तूप घालून वाती लावून देवघरात ते ठेवले जातात. देवाप्रमाणेच त्यांची पूजा केली जाते. चातुर्मासाच्या कथेत दोन भिन्न कुटुंबातील दिव्यांचा संवाद येतो. यातून स्वच्छतेचे महत्वच दिसून येते. आपल्या रोजच्या वापरातील वस्तू स्वच्छ ठेवणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे यालाही भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान दिले गेले आहे.
धातूच्या दिव्यांच्या जोडीने दिव्याच्या अमावास्येला पुरणाचे वा कणकेचे दिवे केले जातात.ते प्रज्वलित करून त्यांचीही यथोचित पूजा केली जाते.
भो दीप ब्रह्मरूपः त्वं ज्योतिषां पतिरव्ययः
आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे।
हे दीपा, तू ब्रह्मस्वरूप आहेस. अनंत ज्योतींचा पती आहेस. तू आम्हाला उत्तम आरोग्य, संतती दे अशी प्रार्थना दिव्याला केली जाते.
सोमवारी येणारी अमावास्या ही सोमवती अमावास्या म्हणून ओळखली जाते. लोकदैवतांच्य उपासनेत सोमवती अमावास्येचे विशेष महत्व आहे. जेजुरीच्या खंडेरायाचे उपासक सोमवती अमावास्येला तळी भरतात आणि देवाची विशेष पूजा बांधली जाते.
दिव्याचे पूजन किंवा दिव्याची स्वच्छता हे बाह्य प्रतीक आहे. आपल्या मनातील आणि बुद्धीतील ऊर्जेचा, चैतन्याचा, ज्ञानाचा अखंड नंदादीप सतत तेजाळत रहावा आणि आपल्या प्रयत्नांचे इंधन त्यात पडून तो सतत प्रकाश देत रहावा अशी सदिच्छा या आषाढ अमावास्येला करूया.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...