कोकणातला गणेशोत्सव#
मुळातच सभोवतालच्या हिरवाईने मन प्रसन्न झालेलं असतं आणि त्यातच गणरायाचे वेध लागतात.
भातलावणी झालेली असते, नाचण पेरून होते, कुठे वरईही पेरतात आणि आता गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहही दाटायला लागतो.
हिरव्यागार भातशेतीतून छोटी रोपं वाकुल्या दाखवायला लागतात आणि त्याच शेताच्या बांधावरुन वा मधल्या पाऊलवाटेवरून गणराया पाटावर विराजमान होऊन भक्ताच्या डोक्यावर बसून घरी यायला निघतो. ढोल ताशाच्या आवाजावरूनच समजतं की अमक्या वाडीतल्या तमक्या घरात बाप्पा येतोय किंवा वाडीतले तीन चार गणपती एकत्रच आणले जात आहेत.
घराघरातली गडबड, एकवीस मोदकांचा नैवेद्य, लायटिंग करण्यासाठी, सजावट करण्यासाठी एकमेकांना मदत करणे, वाडीवाडीत घरोघरी संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत (किमान)होणारी आरती, भजने यांचा आवाज दूरवर ऐकू येतो. कोरोनाच्या काळातही दरवर्षीइतका नसला तरीही काही प्रमाणात हा आनंद अनुभवता आला.
साग्रसंगीत नैवेद्याचं वाढलेलं पान पाहून केवळ देवच नाही तर भक्तही खुश होतो. दारच्या केळीच्या पानावर मांडलेले,हळदीच्या पानावर वाफवलेले सुबक शुभ्र मोदक पाहूनच आणि वासानेच तबियत खुश हो जाती है!
सभोवताली उमललेले तेरड्याचे रोप गौरीचे एक रूप म्हणून घरोघरी येते. महिला उत्साहाने कामाला लागलेल्या असतात. तीन चार जावा मिळून गौरीसाठी अगदी सामिष नैवेद्यही अवघ्या दोन तासात करून गौरीसह घरच्या गणोबांनाही तृप्तीची ढेकर द्यायला लावतात.
विसर्जनाच्या दिवशी पुन्हा ढोल ताशा.... शेजारीपाजारी जाऊन एकमेकांच्या बाप्पांचं विसर्जन, त्याआधीची आरती, देवाला शिदोरी देणं... त्यातून ज्या गावालगत समुद्र असेल तिथे तर विसर्जनासाठी समुद्राच्या दांड्यावर उडालेली रंगीबेरंगी झुंबडही मन मोहून टाकते. तर ज्यांच्या घरात विहीर असते ते एखादे दादा किंवा काका स्वतःच्या विहीरीत उतरून गणपती विसर्जन करतात ते पाहण्याची मज्जा औरच!
सात दिवसाची ही लगबग आज शांत होते, तरीही कानात आरतीचे शब्द घुमत राहतात, प्रसन्न बाप्पा अजूनही
नजरेसमोर दिसत राहतो, बाप्पाचा कोनाडा रिता होतो , गौरींची आरास उदास वाटू लागते...पण मन मात्र पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात कधीच पोहोचलेलं असतं....
मी हे सगळं या सात दिवसात तुकड्या तुकड्याने वेगवेगळ्या ठिकाणी कोकणातच अनुभवलय... एक छान चित्र जोडलं गेलं आहे त्यातून...
कधीतरी हे अनुभवायला एकदातरी कोकणात यायलाच हवं बरं का!!!
No comments:
Post a Comment