Monday, 23 November 2020

मी स्री आहे म्हणून....

 #सहसा बोललं न जाणारं पण दरवेळी मनात नक्कीच येणारं...

आज हे चित्र पाहिलं. प्रत्येक स्रीच्या मनात जे येऊन गेलं ते माझ्याही आलंच.

मला Kamakshi Joglekar Barveने गप्पा मारताना विचारलं की अभ्यास आणि कुटुंब याची सांगड तू कशी घालतेस? याचं उत्तर माझ्या दृष्टीने होतं की माझ्या माहेरी मला शिकवलय की आपलं कुटुब प्राधान्यात असावं. पण त्यामागे हा विचारही मनात येत होतं की माझा अभ्यास हाही कधीतरी माझ्या कुटुंबाच्या प्राधान्यात असला तरी चालेल ना?

मी हे फक्त माझ्या कुटुंबाबद्दल नोंदवत नसून ते सार्वत्रिक आहे. नोकरी करून दमून पुन्हा घरी येऊन ओट्यापाशी उभं राहणारी, उत्सवी काळात छान नटूनथटून आणि तरीही नैवेद्याचे उत्तम पदार्थ करून देवाला नव्हे तर कुटुंबातल्या ज्येष्ठ महिलांना खुश करणारी स्री अधिक कौतुक मिळवून जाते. आणि हे सगळं करूनही अभ्यास करणारी सून मात्र कौतुकास पात्र ठरली तरी तिची गुणवत्ता ही असंख्य वेळेला स्वयंपाकघरातील गुणवत्तेवरच ठरवली जाते.

स्री आहे म्हणून नटायला हव, स्री आहे म्हणून घरी सगळं करायला हवं, आई आहे म्हणून मूल मोठं झाल्यावरही तिचं केंद्र कायमच तिचं मूलच असायला हवं?!!

हे जिथे तिथे दिसतंच... कोणत्याही पिढीत हे आहेच. हे पुरुषसत्ताक पद्धतीमुळे नाही तर स्रियांच्या शतकानुशतकं न बदललेल्या मानसिकतेमुळे असावं.

परवाच घरात उंच माझा झोकाचे जुने भाग पहाणं सुरू होतं त्यात मी ऐकलं की त्यात त्या ताईसासूबाई रमाला म्हणतात की इंग्रजी शिकून संसार होणार आहे का?त्यावर ती म्हणते की मी माझी कामे करून आले होते.पण त्याने काही ताईसासूबाईंचं समाधान झालं नाही.आणि रमाबाई रडू लागल्या. हे तेव्हा होतं तसंच आत्ताही आहेच.काळ बदलला पण मानसिकता नाही बदललेली!

याची जबाबदारी कुणाची? कोशात "समाधान" शब्द सर्वांच्यायच असायला हवं.कुटुंब, घर ही अशी जबाबदारी आहे की ती न संपणारी आहे. मग भरारी घ्यायला उत्सुक घरातल्या स्रीचे पंख पसरायला मदत करायची आणि कधीतरी संधी मिळाली की ती सगळं सोडून कशी निघून जाते हे इतरांना सांगायचं... हे असं खूप खूप ऐकायला पहायला अनुभवायला मिळतं.

तिलाही तिच्या मर्यादा आहेत, तिलाही तिचे छंद आहेत... अखंड ती फक्त चूल आणि मूलच करत राहिली तर अशी भरारी तिला कधीच घेता येणार नाही.

उकडलेल्या बटाट्याच्या फोडी मध्यम होतात की बारीक होतात यावर जर तिचं सर्वांगीण कौशल्य ठरत असेल तर अजूनही काळ बदललेला नाही हेच अधोरेखित होतं...यावर सर्वच महिलांनी विचार करून तसं वागण्याची गरज आहे....

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...